बिग-बी पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा…

बिग-बी पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा…

मंगळवारी संध्याकाळच्या सत्रात दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या त्यातली एक होती ती चित्रपट रसिकांना सुखावणारी तर दुसरी होती राजकीय जाणकारांना आणि समीक्षकांना चक्रावणारी. गेली पन्नास वर्षे चंदेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने मोहरच नव्हे तर अख्खं मनोरंजन विश्व व्यापून टाकणार्‍या महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी देशातील मानाचा आणि सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. अमिताभ बच्चन गेली पन्नास वर्षे चित्रपटसृष्टी गाजवतायत. हे त्यांच्या कारकिर्दीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि दादासाहेब फाळके पुरस्काराचंही सुवर्ण महोत्सवी वर्ष. याआधी हा पुरस्कार 49 जणांना मिळाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिल्यानंतर ज्याला ज्याला चित्रपट कळतो,आवडतो आणि पहावासा वाटतो तो प्रत्येक माणूस सुखावला. बच्चन यांच्या शर्यतीत यावेळी दक्षिणेचा कसदार अभिनेता कमल हासन याचा मुकाबला होता.

तर दुसरीकडे पन्नास वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वावरणार्‍या शरद पवार यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी होण्याचे संकेत मिळाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी होणार असल्याचं स्पष्ट झालं. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं भिजत पडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उमेदवार मिळेनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांनी सरकार विरोधात शड्डू ठोकला आहे. याच शरद पवारांनी 2014 साली भाजपनं न मागताही बाहेरून समर्थन देण्याचा उपद्व्याप केला होता. पवारांनी बाहेरून पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना नाक मुठीत धरून भाजपच्या वळचणीला जाऊन बसली. त्यानंतर भाजपनं फुटकळ मंत्रीपद आणि राजकीय अवहेलना याच्या पलीकडे शिवसेनेला काही दिलं नाही.आणि ही अवहेलना सध्याही ते सुरूच आहे. गेल्या पन्नास वर्षांत शरद पवारांच्या विरोधात काही वेळेला दबक्या तर काही वेळेला उघडपणे आरोप करण्यात आले. कधी हे आरोप स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी केले तर कधी हे आरोप गो. रा. खैरनारांसारख्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी केले. तर कधी स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीने. पवारांचं नाव वेळोवेळी घेतलं, मात्र पवार तेल लावलेल्या पैलवानासारखे प्रत्येक वेळेला निसटले. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्याविरोधात दुसर्‍यांदा गुन्हा दाखल झाला आहे. ते म्हणतात, मी कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर कधीही नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 साली स्थापना झाली तीच मुळी गावोगावच्या साखर सम्राट, सूतसम्राट अशा संस्थानिकांची मोट बांधून. हेच पवारांचं साम्राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी पूर्ण ओळखलेलं आहे. त्यामुळे या सम्राटांच्या साम्राज्यावर हात घातला की हे कालपर्यंत पवारांच्या वळचणीला होते आज आपल्या वळचणीला येतील याचा पक्का विश्वास शहा-फडणवीस जोडीला आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. पवार हा महाराष्ट्रात महत्त्वाचा फॅक्टर आहे; पण प्रभावी फॅक्टर नाहीये हेही मान्य करावे लागेल. माध्यमांमधल्या आणि त्यांच्या पक्षांमध्ये काही पवार प्रेमी मंडळींना या विधानात पवारांचा दु:श्वास दिसू शकेल; पण असा दु:श्वास करण्याचं काहीच कारण नाही. शरद पवार यांना ममता बॅनर्जी, मायावती, मुलायम, चंद्राबाबू नायडू, जगन रेड्डी आणि नवीन पटनायक यांच्यासारखं एक हाती यश कधीही मिळवता आलेलं नाही. इतर नेत्यांनी आपापल्या स्वतःच्या करिष्म्यावर आणि प्रभावावर त्या-त्या राज्यातील सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली. पवारांना ते कधी जमलं नाही, असं इतिहास सांगतो. पवारांना क्रिकेट आवडतं ते तिथलं प्रशासन ही जाणतात. क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं तर ते सेंच्युरीअन बॅटसमन नाहीत. गेला बाजार 50-60 आमदार हीच त्यांची ताकद…

लेखाच्या सुरुवातीला बच्चन आणि पवार यांच्या बातम्यांचा किंबहुना साधर्म्याचा उल्लेख केला आहे. बच्चन आणि पवार यांची पूर्णत: तुलना इथे करायची नाहीये. दोघंही आपापल्या दुनियेतील दिग्गज आहेत. पण काही मुद्दे हे दोघांनाही स्पर्शून जाणारे आहेत. बच्चन यांना ‘बिग- बी’ या नावाने ओळखलं जातं. त्यांच्यावरही आयुष्यात काही आरोप झाले. 1984 साली लोकसभेत निवडून आल्यानंतर अमिताभ यांनी सभागृहात तोंड उघडलं नव्हतं. त्यामुळे एरवी चंदेरी पडद्यावर आपल्या दमदार आवाजाने एन्ट्री घेणारा हा नायक मौनी असल्याची टीका अनेकांकडून करण्यात आली होती. बोफोर्स घोटाळ्यात नाव आलं हा बच्चन यांच्या आयुष्यातला अत्यंत दुर्दैवी आणि कडवट अनुभव होता. त्यानंतर त्यांना राजकारणाची घृणा वाटू लागली. बोफोर्स घोटाळ्यातील नावामुळे बच्चन यांचा ‘शहंशाह’ चित्रपट देखील अडचणीत आला होता. लोकांनी चित्रपटाच्या विरुद्ध आंदोलन केलं. मराठा मंदिरमध्ये तर पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट प्रदर्शित झाला. नंतरचा काळ अमिताभसाठी अडचणीचा ठरला. याच काळात त्याचा गंगा जमुना सरस्वती चित्रपट आपटला. त्याआधी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला एका मोठ्या मासिकानं बच्चनवर कव्हरस्टोरी केली होती. त्याचं नाव होतं ‘आय एम फिनीश…’अमिताभच्या आयुष्यातला बॅड पॅच इतका अमानुष होता की त्याचा राहता बंगला राष्ट्रीयकृत बँकेने लिलावात काढला होता. बंगला वाचवून बच्चनच्या डोक्यावर छत्र कायम ठेवण्याचा प्रयत्न सहाराच्या सुब्रत रॉय सहारा यांनी यशस्वीपणे केला. त्यांनी बच्चन यांना एकरकमी दहा कोटी रुपयांचा धनादेश दिला. बच्चन यांचा बंगला वाचला. आणि नियतीने 2000 साली बच्चन यांना एक नवी खेळी करण्यासाठी उद्युक्त केलं. जून 2000 मध्ये छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ लाँच झाला आणि अमिताभ बच्चन यांनी सारं काही बदलून टाकलं…तोपर्यंत छोट्या पडद्यावर जाऊन काम करणं हे मोठ्या अभिनेत्यांना आणि त्यातही बच्चन सारख्यांना कमी प्रतिष्ठेचं समजलं जायचं. पण बच्चन यांना मिळालेलं यश, लोकांचा पाठिंबा आणि दणदणीत पैसे याचा विचार केल्यानंतर अनेक कलाकारांनी छोट्या पडद्याचा आधार घेतला. पण बच्चन यांची लोकप्रियता आणि पैसा हे यापैकी कोणालाच मिळवता आलं नाही. तिथेच त्यांचं खर्‍या अर्थाने ‘नायक’ असणं अधोरेखित झालं. तीच गोष्ट पवारांची केंद्रात युपीए सरकार असताना पवारांना राज्याबद्दलचा एखादा प्रश्न विचारला की ते आवर्जून सांगायचे ‘ही गोष्ट आमच्या राज्यातल्या नेतृत्वाला तुम्ही विचारा’. हे राज्यातील नेतृत्व तरी कोण होतं तर भुजबळ – तटकरे यांचा अपवाद वगळला तर बहुसंख्य वेळा ‘मराठा’च होते. आता सध्या शरद पवार संक्रमणाच्या काळातून जात आहेत. त्यावेळी त्यांची बाजू लावून धरणारा वंजारी जितेंद्र आव्हाड हा सतत पक्षीय वर्तुळाच्या कडेलाच राहिलाय. त्याला केंद्रस्थानी येऊ दिलं जात नाही हे कारस्थान पवारांच्या सांगण्यावर होतंय की पक्षातल्या पवारांच्या वारसांच्या इच्छेखातर होतय हेसुद्धा बहुजनांना जाणून घ्यावं लागेल. अनेक सुभेदार पवारांचा पक्ष सोडून गेले. त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. राजकीय हितासाठी, लाभासाठी जाणार्‍यांमध्ये पवारांचे कधी काळचे समर्थकही आहेत आणि नातेवाईकही आहेत. अशाच नातेवाईकांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पवारांच्या रागाचा पारा विलक्षण चढतो आणि ते पत्रकारांना पत्रकार परिषदेच्या बाहेर काढण्याची भाषा करतात. पवार असे कधीच नव्हते किंबहुना अनेक पत्रकारांना त्यांच्या मालकांना सांगून कंपनीकडून इच्छित गोष्टी देण्यामध्ये आणि सरकारकडूनही लाभ मिळवून देण्यामध्ये पवार यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. शरद पवार पत्रकारांच्या बोचर्‍या प्रश्नावर विस्कटून जातात त्यावेळेला बच्चनने माध्यमांवर घातलेल्या जवळपास दहा वर्षांच्या बहिष्काराची आठवण होते. अमिताभ बच्चन 10 वर्षे मीडियावर बहिष्कार टाकला होता. ‘आज का अर्जुन’ या चित्रपटानंतर हा बहिष्कार त्यांनी उठवला.

देशाच्या पंतप्रधान पदासाठी शर्यतीत असलेले शरद पवार विधानसभेच्या निमित्तानं आणि सातार्‍यातल्या लोकसभेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधा बांधावर आणि ग्रामपंचायतीवर कधी पोहोचले हे कळलंच नाही. पवारांचे हे पोहोचणं ही त्यांची ताकद आहे असं आपण म्हणू शकतो. कारण बच्चन जसे ‘कौन बनेगा’ च्या माध्यमातून छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचले अगदी तसंच पवारही बांदा-शिवारातून शेतकरी कष्टकर्‍यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहेत. अमितभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा..’ला अद्भूत यश मिळाल्यानंतर अनेक वाहिन्यांनी असाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला; पण बच्चन यांचा आवाज, संवादफेक, विनम्रता आणि पडदा व्यापून टाकणारी प्रतिभा हे सारं काही अप्रतिम होतं. साहजिकच त्यांना यश मिळालं. पवारांच्या बाबतीत हाच प्रश्न उणे गुण देणारा ठरतोय. शरद पवारांचं वार्धक्य, आजारपण या गोष्टींची पुंजी राष्ट्रवादीला आणि भाजपच्या विरोधकांना सहानुभूतीसाठी किती उपयोगी पडणार हा प्रश्नच आहे. कारण न मागता बाहेरुन पाठिंबा देणारेही हेच आहेत. शरद पवारांनी गावोगावचे संस्थानिक आणि सावकार-शेठ पोसले, वाढवले, असा त्यांच्यावर आरोप होतो. आणि आजही पवार त्याच वाटेने पुढे चालल्याचं लक्षात येतं.उदाहरणच द्यायचं झालं तर चंदगडचं देता येईल. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नीने आणि मुलीने राष्ट्रवादीकडून लढण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचे संचालक राजेश पाटील यांच्याकडे पवारांनी आपला मोर्चा वळवला. राजेश पाटील हे माजी आमदार नरसिंग पाटलांचे चिरंजीव आहेत. पैशानं साधनसामुग्रीनं बक्कळ आहेत. आणि या भागात त्यांचा प्रभावही आहे. इथे प्रश्न हा पडतो ज्या पवारांना तरुणांमधून नेतृत्व उभं करायचं आहे त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला एखादा तरुण का दिसला नाही? मुंबईसारख्या महानगरात वारंवार सपशेल अपयशी ठरून सचिन अहिरांनाच का मुंबईची सुभेदारी दिली? तर याचं कारण आहे या मंडळींकडे असलेली रसद…ईडीच्या या चौकशीतून पवारांना सहानुभूती मिळेल असं सांगणारा एक वर्ग आहे तर भाजपनं चार वर्षांत घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या अजित पवार, सुनिल तटकरे यांसारख्या नेत्यांवर कारवाईचा बडगा का उचलला नाही, असा प्रश्न करणारा दुसरा वर्ग आहे. दोघांच्याही मुद्यात तथ्य आहे. अर्थात पवारांनीही त्यांच्या चलतीच्या वेळ-काळ-स्थळ बघूनच विरोधकांना आणि मित्रांना न्याय दिलाय. सध्या छत्रपतींचे तेरावे वंशज पवारांच्या आठवणी काढून कॅमेर्‍यासमोर अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले, पवारांना मला तिकीट देऊन आडवं करायचं होतं. हे सगळं पाहिलं की सामान्य माणसाला प्रश्न पडतो यातलं काय खरं? भाजपची ईडीची चौकशी, छत्रपतींचे अश्रू की पवारांचा आयुष्याच्या संध्याकाळी सुरू असलेला बांधा-बांधावरचा विलक्षण अभिनय…पीएमसी बँकेमध्ये पैसे अडकलेल्या सामान्य माणसाला ठेवीदारांना यातल्या कशातच रस नाहीये. बच्चनच्या दादासाहेब फाळके पुरस्कारातही नाही आणि पवारांच्या बांधा बांधावर केलेल्या अभिनयातही नाही…त्याला करायचीय जगण्यासाठीची धडपड आणि तोच ठरवणार आहे खरा ‘बिग बी ’कोण आहे ते!

First Published on: September 26, 2019 5:30 AM
Exit mobile version