भाजपचा पाय खोलात…राष्ट्रवादी जोरात!

भाजपचा पाय खोलात…राष्ट्रवादी जोरात!

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अकल्पित महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांना अकल्पित असा धक्का बसलेला आहे, त्यातून ही मंडळी अजूनही सावरलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी होत चालली आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक राजकीय सिद्धांत आहे, तो त्यांनी काही वेळा आपल्या मुलाखतीतून सांगितला आहे. तो असा, आपल्याकडे सत्ता असायला हवी. कारण हातात सत्ता असल्याशिवाय लोकविकासाठी कामे करत येत नाहीत. त्यांचे हे म्हणणे खरे आहे.

कारण सत्तेच्या बाहेर विरोधात असलेल्या पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि सत्ताधार्‍यांवर आरोप करणे इतकाच पर्याय उततो, यामुळेच सत्ता असल्याशिवाय लोकांची कामेही करता येत नाहीत आणि पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पक्षात राहत नाहीत. त्यामुळे सत्तेचे महत्व मोठे असते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी मोठी तात्विक तडजोड केली. कारण शिवसेनेची विचारसरणी ही हिंदुत्ववादी असताना ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करतीलच कशी असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर एकच होते, सत्ता संपादन. म्हणजे सत्तेसाठी नियम आणि तत्वांनी वाकवले जाऊ शकते, त्यांना मुरड घातली जाऊ शकते, यातून दिसून येते.

कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आणि जनतेच्या हितासाठी आम्ही हे समीकरण जुळवले, असे सांगून टाकले की, तुम्ही असे कसे काय केलेत असा प्रश्न विचारणार्‍यांचे तोंड बंद करता येते. महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी किती काळ टिकेल, असा प्रश्न केवळ राजकीय विश्लेषक, जनता यांनाच पडलेला नव्हता, तर ज्यांनी ती स्थापन केली, त्या तिन्ही पक्षांना तो पडलेला होता. पण हिंदी चित्रपटातील डायलॉग प्रमाणे हालात ने हमे मजबूर कर दिया, असे म्हणत ती आघाडी झाली. पुढे काय होईल, ते पाहून घेऊ पण आता सत्तास्थापना करू, कारण आपला एकच प्रतिस्पर्धी आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांना आपल्याला शह द्यायचा आहे. त्यांचा विजयी रथ आपल्याला रोखायचा आहे. मागील पाच वर्षे भाजपचे मागे लटकण्यात गेली, पण आता नाही, आता आपणच मुख्यमंत्रीपद मिळवायचे, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे, असा शिवसेनेने पण केला होता.

राजकारणात सत्ता मिळवण्याची आलेली संधी ओळखण्यात पटाईत असलेल्या शरद पवारांनी हे ओळखले आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन महााविकास आघाडीची स्थापना केली. यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद तर मिळाले, पण त्यांनी जी तात्विक तडजोड केली, पण त्यामुळे त्यांना जनतेच्या मनातील विश्वासार्हता बर्‍याच अंशी गमावली. कारण शिवसेनेची विचारसरणी ही मराठी माणूस आणि पुढे कडवट हिंदुत्ववादी अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पुढे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि त्यांच्यातूनच निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच टीकेचे आसुड ओढलेले होते. त्यामुळे त्यांच्याशीच त्यांनी सत्तेसाठी हातमिळवणी केली. सत्तेत भागीदारी केली. शिवसैनिक हा वैचारिक पेचात सापडलेला आहे.

कारण युती आणि आघाडी पक्षाचे शीर्षस्थ नेते त्यांच्या सत्तेच्या सोयीनुसार बनवत असतात, पण निवडणुका लढवताना पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी कुचंबणा होते. शिवसैनिकांची सध्या तशीच अवस्था झालेली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या नव्या राजकीय समीकरणामुळे कोणतीही हानी झालेली नाही. त्यांच्याकडे फक्त मुख्यमंत्रीपद नाही, बाकी सगळे आहे, अशी त्यांची अवस्था आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीयांचा मोठा दबदबा राहिलेला आहे. त्यात पवार मंडळी मराठा लॉबीची प्रमुख मानली जातात. शरद पवार, अजित पवार, त्यांच्यानंतर आता रोहित पवार अशी मालिका दिसत आहे. त्यांच्यातीलच खासदार सुप्रिया सुळे या थेट महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करत नसल्या तरी पवार कुटुंबीयांकडे सत्ता येण्यासाठी आणि राहण्यासाठी त्या पोषक वातावरण तयार करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती गेली काही महिने बरी नाही. त्यांच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्या अगोदर त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे खरे तर ते मुख्यमंत्रीपदाची धावपळ कशी पेलवतील, असे अनेकांना वाटत होते, पण कोरोना काळात त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. पण त्यानंतर पाठीच्या कण्याचे आजारपण आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरेच हवेत, शिवसेनेतील अन्य व्यक्ती चालणार नाही. त्याचा प्रभाव पडणार नाही, याची पवारांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित केले. अर्थात, यात संजय राऊत यांच्याशी पवारांनी केलेली चर्चाही महत्वाची ठरते.

मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी राज्यात अलीकडेच झालेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडणूक आल्याचे दिसले तर शिवसेना राज्यात चौथ्या स्थानावर फेकली गेल्याचे दिसले. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून अट्टाहासाने मुख्यमंत्रीपद मिळवले, त्यांच्या म्हणण्यानुसार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा दिलेला शब्द पुरा केला, पण त्याच वेळी शिवसेनेचा संघटनात्मक ढाचा विस्कळीत झालेला आहे. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे हे अगोदरच शिवसेनेचे कडवे प्रतिस्पर्धी बनलेले आहेत. राज यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना आता नव्या दमाने मैदानात उतरवलेले आहे. त्यामुळे त्याचा फाटका शिवसेनेला पुढील काळात बसणार आहे. मनसे ही शिवसेनेचीच मते खात असते.

सध्या काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्षच नसल्यामुळे त्यांची सगळी अवस्थाच हंगामी झालेली आहे. पक्ष नेतृत्वाची खुर्ची अशी फार वेळ रिकामी राहिली तर संघटनेमध्ये ढिलाई येते, संघटनेचे नुकसान होते, असे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना थेट बोलण्याचे धाडस होत नसल्यामुळे पत्राद्वारे कळवले, पण त्यांना गप्प बसवण्यात आले. राहुल गांधी अनेकांनी आग्रह करून पक्षाध्यक्षपदाच्या बोहल्यावर चढायला तयार नाहीत, त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये ढिलाई येऊन गटबाजी उफाळलेली आहेे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विविध गट एकमेकांविरोधात लढत आहेत. जे राष्ट्रीय पातळीवर आहे, तेच राज्य पातळीवर आहे. पक्षाला संघटित करून मोठा प्रभाव निर्माण करेल, असा नेता सध्या महाराष्ट्रात नाही. त्यामुळे आजवर राष्ट्रीय पक्ष म्हणून रुबाब मिरवणार्‍या काँग्रेसला शिवसेनेसारख्या विचारसरणी मान्य नसलेल्या प्रादेशिक पक्षाच्या पालखीचे भोई व्हावे लागले आहे. काँग्रेस कमकुवत असल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे. कारण या दोन पक्षांच्या आघाडीची सत्ता महाराष्ट्रात सलग पंधरा वर्षे होती. त्यात पुन्हा राष्ट्रवादीची निर्मिती ही काँग्रेसमधूनच झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस कमकुवत झाल्याचा आपोआप फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार यात शंका नाही.

महाराष्ट्र भाजपची अवस्था दिवसेंदिवस बिकट आणि तितकीच हास्यास्पद होत चाललेली आहे. २०१९ सालच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता गेल्यानंतर खरे तर या पक्षाच्या नेत्यांनी संयमी विरोधक म्हणून भूमिका बजावायला हवी होती. पण त्यांनी जे काही प्रकार सुरू ठेवलेले आहेत, त्यांनी जो काही सरकारपाडू आक्रस्ताळीपणा चालवलेला आहे. ते पाहून पाहून महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील त्यांची प्रतिमा त्यांनीच आपल्या हातांनी बिघडवून घेतलेली आहे. त्यात पुन्हा ही प्रतिमा बिघाड प्रक्रिया ते थांबवतही नाही. भाजपमधील बहुतेक लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयमाचे आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार घेऊन राजकारणात सक्रिय झालेले असतात. पण त्यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी गेल्या अडीच वर्षात जो काही उतावीळपणा चालवलेला आहे, ते पाहिल्यावर ही मंडळी संघाचे संस्कार कसे आणि कुठे विसरले असा प्रश्न पडतो.

खरे तर कुठल्याही प्रकारचा उतावीळपणा आणि आक्रस्ताळीपणा न करत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला विरोध केला असता तर कदाचित हे तीन पक्षांचे सरकार अंतर्गत मतभेदातून लवकर कोसळले असते, पण भाजपने असा काही आक्रस्ताळी विरोध चालवला की, ज्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष भाजपची जिरवण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून अधिक ताकदीने उभे राहिले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारवर शेकडो आरोप केले. पण त्यांच्या कुठल्याच आरोपाचा फारसा काही उपयोग झालेला नाही. उलट, ते ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन नाट्यमय भाषेत विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करत आहेत, तो आता लोकांच्या मनोरंजनाचा विषय होऊन बसला आहे. भाजपच्या नेत्यांनी इतकी उलट सुलट विधाने केली आहेत, आणि ठाकरे सरकार पडण्याच्या इतक्या तारखा जाहीर केल्या आहेत, आणि त्यांचा इतका विचका झालेला आहे की, या नेत्यांना आता लोक गांभीर्याने घेईनासे झाले आहेत.

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या आरोपांच्या फैरींमुळे काही साध्य होत नाही, म्हणून राजभवनाचे कित्येकदा उंबरठे झिजवले, पण त्याचाही काही परिणाम होताना दिसत नाही. भाजपच्या राज्यातील नेत्यांचे वैफल्य तर वेळोवेळी दिसून येत आहे. पण त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतून केलेल्या भाषणातून कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असा आरोप केला. पण त्याचा उलटा परिणाम झाला. हा आरोप करताना मोदी हे विसरले की, महाराष्ट्रातील सरकारमध्ये केवळ काँग्रेस नसून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. मोदींच्या विधानामुळे तिन्ही पक्षांच्या हातात आयते कोलित मिळाले. एका बाजूला पंतप्रधान कोरोना काळातील महाराष्ट्र सरकारच्या कामाची प्रशंसा करतात, तर दुसर्‍या बाजूला सरकारमधील काँग्रेसवर टीका करतात, यावर राज्यात काय उत्तर द्यावे, अशा पेचात भाजपचे नेते सापडले.

पंतप्रधानांचा हा न पटणारा व्युक्तिवाद कमी की काय, म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी विधान केले. राज्यपाल कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने हे विधान केले, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला. आपण कुठल्या राज्यात आहोत, याचे राज्यपाल कोश्यारी यांना भान नाही, असे कसे म्हणता येईल. कारण कोश्यारी हे राजकारणपटूही आहेत. त्यांच्या विधानावर मोठ्या प्रमाणात नाराजीचा आणि निषेधाचा आवाज उठल्यानंतर राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा आपले विधान मागेही घेतले नाही, त्यांनी याविषयी मी तथ्यांची माहिती घेतो,असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यपालांनी ते विधान अनावधाने केलेले होते, असे म्हणता येत नाही. एकूणातच दिवसेंदिवसे भाजपचे नेते आणि संबंधित मंडळी महाराष्ट्रभूमीवर वादात सापडत आहेत. त्यातून भाजपचा पाय अधिकाधिक खोलात जात आहे, तर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल जोरात होत आहे.

First Published on: March 2, 2022 2:45 AM
Exit mobile version