सरकार पाडून काय करणार?

सरकार पाडून काय करणार?

संपादकीय

महाराष्ट्रात २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. त्याला शिवसेना कारणीभूत होती, त्यामुळे भाजपचा सगळा राग शिवसेनेवर आहे. त्यामुळे गेले सव्वा वर्ष भाजपकडून हा राग प्रामुख्याने शिवसेना आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काढण्यात येत आहे. ठाकरे यांच्या प्रमुखत्वाखाली स्थापन झालेले महाविकास आघाडीेचे सरकार कसे गोत्यात येईल आणि पडेल यासाठी सर्व तर्‍हेने प्रयत्नाची पराकाष्टा सुरू आहे. भाजपचे खासदार नारायण राणे हे तर वेळोवेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करत असतात. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली आहे, तिला काही महिने उलटले तरी राज्यपाल अनुमती द्यायला तयार नाहीत. सर्व बाजूनी ठाकरेंना पेचात पकडण्याचा प्रयत्न सुरू झाले. पण तरीही त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर ठाकरे सरकार इतक्या महिन्यात पडेल, अशी मुदत भाजपच्या नेत्यांकडून गेले सव्वा वर्ष जाहीर करण्यात आली.

पण तेही काही खरे ठरले नाही. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकार पुढील तीन महिन्यात कोसळेल. देवेंद्रजी तुम्ही तयारीला लागा, असे भाकीत केले. भाजपचे नेते राज्यातील सत्तेसाठी गुडघ्याला बांशिग बांधून उभे आहेत, पण सत्ता सुंदरीने त्यांना वरमाला घालण्याचा मुहूर्त काही येताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा होता, त्यामुळे भाजपसमोर झुकणे मान्य केले नाही. त्यांनी त्यासाठी त्यांच्या राजकीय विचारसरणीच्या विरोधी असणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि ते स्वत: मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, याची त्यांना स्वत:लाही कल्पना नव्हती. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत अशी हातमिळवणी करेल आणि काँग्रेस त्या सत्तासमीकरणात सहभागी होईल, याची कल्पना भाजपाला नव्हती. त्यामुळेच ते तसे बिनधास्त होते. पण काही अनपेक्षित असे सत्ता समीकरण जमवण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यशस्वी ठरले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे पुरता अपेक्षाभंग झालेले सगळे भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत.

राज्यात काही अनुचित घडत असेल तर तो विषय विरोधकांनी लावून धरायलाच हवेत. सत्ताधार्‍यांना त्याचा जाब विचारलाच पाहिजे, तेच तर विरोधकांचे काम आहे. पण भाजपचा पवित्रा पाहिला तर ते विषय लावून धरताना ठाकरे सरकार पडेल कसे यासाठी त्यांचे प्रयत्न होताना दिसत आहेत. सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू, अन्वय नाईक यांची आत्महत्या, पूजा चव्हाण हिचा संशयास्पद मृत्यू आणि त्यात वनमंत्री असलेले संजय राठोड यांचा हात असल्याचा संशय, आता अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेन त्यांचा संशयस्पद मृत्यू, या सगळ्या प्रकारामागे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा असलेला कथित हात अशी सगळी संशयास्पद मालिका आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. सुशात सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंंबई पोलीस योग्य प्रकारे करणार नाहीत, त्यामुळे ती सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी सातत्याने लावून धरणारी भाजप जेव्हा सीबीआयनेच ती हत्या नसून आत्महत्या आहे, असे सांगितले तेव्हा ते प्रकरण थंड झाले.

भाजप ठाकरे सरकारला पेचात पकडण्यासाठी जी प्रकरणे सतत लावून धरत आहे, ती कालांतराने त्याचा काही आपल्याला राजकीय उपयोग होणार नाही, हे लक्षात आले की, ती सोयीस्कररित्या बाजूला ठेवण्यात येत आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात काही दिवसांपूर्वी आकाश पाताळ एक करणार्‍या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आता कुठेच दिसत नाहीत. याचा अर्थ पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होऊन पूजाला आता न्याय मिळाला काय? भाजपने ही अशी सगळीच लावून धरलेली प्रकरणे पाहिल्यावर असे दिसते की, हे सगळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी चाललेले आहे. पण हे सगळे करत असताना भाजपचे राज्यातील नेते हा विचार का करत नाहीत, की, हे सरकार पाडून आपले सरकार राज्यात कसे येणार? कारण अलीकडच्या काळात पाहिले तर असे दिसेल की, महाराष्ट्रातील राजकारण हे भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा चार पक्षांमध्ये प्रामुख्याने विभागले गेले आहे. इतर पक्ष असले तरी त्यांची राजकीय जागा कमी आहे. हे चार पक्ष आपल्याच पक्षाचे सरकार यावे, यासाठी निवडणुकी पूर्वी प्रयत्न करतात. पण बहुमतासाठी जागा कमी पडल्या की, पुन्हा लोकमत झुगारुन हातमिळवणी करतात. त्यामुळे मतदान करणार्‍या मतदात्याच्या भावनेला तसा काही अर्थच उरत नाही.

भाजपने हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेनेशी युती केली होती. त्यातून दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत तसेच संसदेपर्यंत राजकीय फायदा झाला. पण पुढे काही वर्षांनंतर महाराष्ट्रात आपल्याला बहुमत मिळवायचे आहे, हा हेतू भाजपच्या मनात होता, त्यामुळे ते त्यांच्या पक्षीय मेळाव्यामध्ये महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपचा संकल्प सोडत होते. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या करिश्म्याने भाजपला केंद्रात पहिल्यांदाच बहुमत मिळाले होते. मोदी लाटेचा फायदा आपल्याला महाराष्ट्रात मिळेल म्हणून भाजपने शिवसेनेशी असलेली युती जास्त जागा मागण्याच्या निमित्ताने तोडली आणि ते स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. पण त्यांना बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या. तेव्हा त्यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने तांत्रिकदृष्ठ्या तारले, पण भाजपने राष्ट्रवादीशी नव्हे तर शिवसेनेशीच युती करावी, असे अगदी सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत होते. त्यामुळे निवडणूक प्रचार काळात लांब गेलेल्या शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढत सत्तेच्या जोखडाखाली त्यांना आणण्यात आले.

तेव्हा पुढे भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ता पाच वर्षे महाराष्ट्रात चालली. मागील सव्वा वर्ष भाजप ठाकरे सरकार पाडण्याची हरतर्‍हेने पराकाष्टा करत आहे, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, महाराष्ट्रात सध्या कुठल्याही एकपक्षाला बहुमत मिळण्याची स्थिती नाही. त्यामुळे समजा उद्या कुठल्या कारणामुळे आणि अगदीच नाही तर राज्यपालांच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती लावण्यात यश आले तरी भाजपचे सरकार येणार कसे हा प्रश्न आहे. कारण गेल्या सव्वा वर्षांच्या काळात भाजपने सत्तेसाठी जो काही हंगामा चालवला आहे, त्यामुळे लोकांच्या मनातील त्यांची प्रतिमा चांगलीच डागाळली झाली आहे. कारण भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडून जो संशय अपेक्षित होता तो दिसला नाही. त्यांच्या आक्रस्ताळीपणामुळे त्यांनी स्वत:ची शोभा करून घेतली आहे. त्यात पुन्हा मराठी माणूस म्हणून लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे. ते पूर्णपणे राज्याची सत्ता भाजपच्या हातात देऊ इच्छित नाहीत. कारण केंद्रातील भाजपच्या नेत्यांसमोर राज्यातील भाजप नेत्यांचे काही चालत नाही, हे लोकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पाडून काय करणार, त्यासाठी पर्याय उभारण्याच्या स्थितीत आपण आहोत का, याचा भाजप नेत्यांच्या मनात विचार येत नाही, हेच नवल म्हणावे लागेल.

First Published on: March 16, 2021 4:30 AM
Exit mobile version