चीनबद्दलचा राग-द्वेष कायम राहणार!

चीनबद्दलचा राग-द्वेष कायम राहणार!

जगभर कोरोना लाटेचा प्रभाव जसा वाटतो तसा चीनबद्दलचा असंतोषही वाढत आहे. कोरोना व्हायरसची साथ जगातल्या १६० हून अधिक देशांना सतावत असताना या मुद्द्यावरून जागतिक राजकारण पेटताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर माणुसकीला लांछन ठरेल अशा प्रकारची भूमिका चीन घेताना दिसत आहे. वुहान आणि कोरोना ही नावे आज एकमेकांशी अशी जोडली गेली आहेत की चिन्यांचा स्वाभिमान डिवचला जात आहे. चायनीज व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे त्याचे वर्णन ऐकले की त्यांना कानामध्ये शिसे ओतल्यासारखे वाटते. या प्रकरणी एकंदरीतच संयमाची वानवा असलेला देश म्हणून चीन जगासमोर आला आहे. आपले काही चुकल्यामुळे जगभरातल्या हजारो निष्पापांच्या आयुष्याला गालबोट लागले आहे – काहींचे त्यात प्राण गेले तर काहींना आज आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु त्याबद्दल जराही अपराधित्वाची जाणीव चिन्यांना आहे असे जगासमोर आलेले नाही. लपवाछपवीच्या तंत्रामुळे चीनमध्ये उणेपुरे चार साडेचार हजार लोक मृत्युमुखी पडले ही जगभरच्या जनतेला शुद्ध थाप वाटत आहे.

जिथे कोरोनाचा जन्म झाला नाही त्या न्यूयॉर्क शहरात जर ९००० लोकांना प्राण गमवावे लागले असतील तर चीनमध्ये हा आकडा खरा आहे हे विश्वसनीय वाटत नाही. आणि आकडा खरा असेलच तर चिन्यांकडे या व्हायरसवरचे काही औषधही असावे पण चीन ते अन्य देशांना देत नाही असे लोकांना वाटले तर दोष कोणाला द्यायचा? साथ सुरू झाली व अन्य देशात पसरली तरी चीनतर्फे आम्ही आमच्या देशामध्ये काय उपाय केले, कोणती औषधयोजना केली, कोणत्या परिस्थितीमधला रूग्ण कोणत्या उपायांना प्रतिसाद देताना दिसला आदी एकाही विषयामध्ये चीनने ना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेला ना कोणत्या देशाच्या सरकारला आपल्यातर्फे माहिती दिल्याचे दिसले नाही. हे करायचे तर सोडून द्या पण नेदरलँडस्, स्पेन, इटाली, पाकिस्तान, भारत आदी सर्वच देशांमध्ये चीनने पाठवलेल्या मालाच्या गुणवत्तेच्या व्हिडियोजचा समाजमाध्यमांमध्ये पाऊस पडत आहे. सदोष माल पाठवल्याबद्दल चीनने दिलगिरीही व्यक्त केल्याचे दिसलेले नाही. किंबहुना काही ठिकाणी तर चीनने रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मालाचा पुरवठा हवा असेल तर अमुक तमुक करा म्हणून अटीही घालायला कमी केलेले नाही. स्वतःच्या वंशाविषयी वृथा अभिमान आणि जगावर राज्य करण्याची फक्त आमचीच लायकी आहे असा आंधळ्या आकांक्षांचा डोंगर यामुळे संकटकाळामध्ये वडिलधार्‍यांप्रमाणे वागण्याचे भान उरलेले दिसत नाही.

चीन आणि अमेरिका यामध्ये गेली दोन ते तीन वर्षे जो संघर्ष चालू आहे त्याला या साथीमुळे विराम मिळण्याऐवजी एक वेगळी धार आलेली दिसते. त्यामुळेच काही विश्लेषक या परिस्थितीमुळे कोरोना व्हायरसची साथ म्हणजे चीनचा चेर्नोबिल क्षण असल्याचे म्हणत आहेत. चेर्नोबिल या उक्रेनमधील शहरामध्ये एका अपघातामुळे अणुभट्टीमध्ये स्फोट झाला आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या राज्यपद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचे पडसाद रशियाच्या राजकारणावर अतिशय खोलवर गेलेले होते. घटनेनंतर त्याची कबुली लगेच कोणी दिलेली नव्हती, पण आज स्वतः मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ही कबुली दिली आहे. गोर्बाचेव्ह यांनी राज्यावर येताच ग्लासनॉस्त आणि पेरिस्त्रोईका (पारदर्शकता आणि पुनर्रचना) ह्या संकल्पना राबवण्यास सुरूवात केली होती. अफगाणिस्तानमधील माघारीमुळे रशियन साम्राज्याला छेद गेला आणि त्यातूनच हे साम्राज्य कोसळले असे सर्वसाधारण मत आहे. पण साम्राज्याला छेद जायला खरी सुरूवात चेर्नोबिल या अपघातामुळे झाली असे आता गोर्बाचेव्ह सांगतात. वुहानमधून अन्यत्र पसरत गेलेली ही साथ म्हणजे चीनचा चेर्नोबिल क्षण ठरेल का ही शंका विश्लेषकांना सतावते आहे. तसेच अन्य काही विश्लेषकांना तर हा क्षण म्हणजे पुन्हा एकदा जगामध्ये शीतयुद्धाला सुरूवात होत असल्याचे वाटत आहे. अर्थात गेले शीतयुद्ध रशिया आणि अमेरिकेदरम्यान होते तर येऊ घातलेले शीत युद्ध अमेरिका आणि चीनमध्ये असेल अशी ही अटकळ आहे.

म्हणजेच चीनच्या अंतर्गत राजकारणामधली खळबळ आणि जागतिक पडसादातून ऐकू येणारे शीतयुद्धाचे सूर यावर विश्लेषक बोट ठेवत आहेत. त्याला दोन देशांमधील वक्तव्यांमुळे आधार मिळाला आहे. माओ यांनी छेडलेल्या सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी कम्युनिस्ट पक्षाने आपले फेब्रुवारी महिन्यामध्ये भरव़ण्यात येणारे अधिवेशन पुढे ढकलले होते. त्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच हे अधिवेशन पुढे ढकलले गेले आहे. वुहान शहरामध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शी जिन पिंग १० मार्चला गेले तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणामध्ये काही मुद्द्यांची झलक मिळाली. कोरोना व्हायरस म्हणजे एक सैतान असल्याचे सांगत या सैतानाविरोधात चीनच्या लोकांचे युद्ध सुरू असून आपण त्यामध्ये विजयी होऊ असे शी जिनपिंग यांनी सांगितले. वरकरणी पाहता या शब्दरचनेमध्ये कोणाला काय गैर वाटावे? पण हेच भाषेचे वैशिष्ठ्य असते.

एक म्हणजे एका कम्युनिस्ट देशामध्ये शी जिनपिंग सैतानाचे अस्तित्व मान्य करत आहेत आणि लोकांना त्याचे रूपक वापरून लढ्याला उद्युक्त करत आहेत. दुसरे असे की शी जिनपिंग स्वतः कडवे कम्युनिस्ट नाहीत. ते स्वतःला कन्फ्युशियसचे अनुयायी समजतात. सैतानाचे अस्तित्व मानणे म्हणजे दैवी अघोरी शक्तींचे अस्तित्व कन्फ्युशियस मानत होता. तीच ही विचारधारा इथे दिसते. पण खरी गोम आहे ती पुढेच. चिनी भाषेमध्ये सैतान म्हणजे “गोरा” सैतान असतो. त्यामुळे शी जिनपिंग सैतानाविरोधातील लढाई असे म्हणतात तेव्हा ते गोर्‍यांच्या विरोधातील लढाई छेडण्याचे आवाहन करत असतात. या ‘परकीय’ संकटाचा सामना करण्यासाठी ते जनतेला लोकलढ्यात उतरा म्हणूनही साद घालत आहेत. अशी लोकयुद्धाची भाषा माओ करीत असे आणि तीही पाश्चात्यांच्या विरोधात. तेव्हा शी जिनपिंग यांना कोणाविरोधातला लढा अपेक्षित आहे हे वेगळे सांगायला नको.

एकंदर हे अस्थिर राजकीय वातावरण-एकमेकावरील आरोप प्रत्यारोप आणि पसरतच जाणारी कोरोनाची साथ अशा पार्श्वभूमीमुळे जर कोणाला चेर्नोबिल वा शीतयुद्ध आठवले तर नवल वाटायला नको. एवढे होऊनही चीन स्वस्थ बसला नसून दक्षिण चीन समुद्रात तसेच भारताच्या परसदारात त्याचे औद्धत्यपूर्ण वर्तन चालूच आहे. कराचीला निघालेल्या एका चिनी जहाजामध्ये भारतीय नौदलाला अणुभट्टीसाठी आवश्यक वस्तू मिळाव्यात हा केवळ योगायोग नाही. चीन आज कोंडीत पडला आहे. आर्थिक संकटात आहे. अनेक कंपन्या तिथून आपला पसारा बाहेर हलवण्याचा विचार करत आहेत. चीनने आपली विश्वासार्हता गमावली आहे. आणि आपली राजकीय आर्थिक पत त्याला पुन्हा एकदा शून्यातून उभी करावी लागणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली ऋजुता मात्र इतक्या मोठ्या फटक्यानंतरही तिथे दिसून येत नाही. ही बाब चीनसाठी चिनी जनतेसाठीच चिंतेची आहे. पण गीरे तो भी नाक उपर, अशी चीनची भूमिका नेहमीच राहिलेली आहे. आज सगळे जग कोरोनाच्या साथीमध्ये होरपळून निघालेले असताना चीन मूग गिळून गप्प बसलेला आहे, असे बाहेरून वाटत आहे. तरी त्यांच्या कम्युनिस्ट पोलादी पडद्याच्या मागे काय शिजत आहे, हे कुणाला कळणे अवघड आहे. त्यामुळे चीनविषयीचा जगातील लोकांच्या मनातील राग कायम खदखदत राहणार आहे.

First Published on: April 14, 2021 3:30 AM
Exit mobile version