काँग्रेसमध्ये नेतृत्वाची आणीबाणी

काँग्रेसमध्ये नेतृत्वाची आणीबाणी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांंनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधील एका कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ कौशीक बसू यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक अनपेक्षित गौप्यस्फोट केला, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. आपली आजी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशभरात लावलेली आणीबाणी ही चूक होती, असे राहुल यांनी मान्य केले. त्यात पुढे या विधानाला सावरून घेताना, असे नंतर त्यावेळी इंदिराजींनाही वाटले होते, हे म्हटले आहे. पण मुद्दा असा आहे की, खुद्द गांधी घराण्यातील कुणी असे जाहीरपणे मान्य करणे की, आणीबाणी लावणे ही इंदिराजींची चूक होती, हेच मुळी अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. कारण आजवर देशात आणीबाणी लावल्यावर इंदिराजी आणि काँग्रेस पक्ष यांच्यावर प्रचंड टीका झाली. आणीबाणी लाऊन इंदिराजींनी लोकशाहीची हत्या केली, इथपर्यंत विरोधकांनी टीकेचे टोक गाठले.

आज जे केंद्रात सत्तेत आहेत, त्या भाजपच्या बर्‍याच नेत्यांनी इंदिराजींनी लावलेल्या आणीबाणीचा बोचरा अनुभवही घेतला आहे. पण या आणीबाणीबाबत काँग्रेस पक्ष मूग गिळून गप्प बसला होता. कारण त्यांना त्यावर आणीबाणीचे समर्थन करणारे उत्तर देणे शक्यच नव्हते. जेव्हा आपल्याला आपल्या कृतीच्या समर्थनार्थ कुठलेच उत्तर देता येत नाही. तसेच आपली परिस्थिती प्रतिकूल असेल तर एकच उपाय असतो की, आपली चूक कबूल करा आणि मोकळे व्हा. म्हणजे प्रश्न मिटला. असा काही वेळा प्रश्न मिटतो, पण तो तितका शुल्लक असला तरच हे शक्य आहे. पण भारतासारख्या मोठ्या देशावर १९७५ ते १९७७ इतका कालावधी आणीबाणी लादणे ही काही शुल्लक गोष्ट नाही. या आणीबाणीत सरकारवर टीका करणार्‍या सगळ्यांचीच तोंडं आणि हात बांधण्यात आले होतेे. खरे तर १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताला जे प्रचंड यश मिळाले त्यावरून इंदिरा गांधी यांची जगभरात वाहव्वा झालेली होती. भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी इंदिरा गांधी यांना दुर्गा का अवतार, अशा शब्दात गौरवित केले होते.

पण पुढे अवघ्या पाच वर्षात असे काय झाले की, इंदिराजींना देशात आणीबाणी लागू करावी लागली. इंदिराजींच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील विजयानंतर त्यांची जी एकमेवाद्वितीय अशी प्रतिमा निर्माण झाली होती, त्याचा त्यांच्याच निकटवर्तीयांनी गैरफायदा घेतला होता का, अशी दाट शंका आहे. पंतप्रधान कार्यालय हे भ्रष्टाचाराचे आगार होऊन बसले होते. आता आपण काही करून शकतो, असाच जणू अतिरेकी आत्मविश्वास इंदिराजी आणि विशेषत: त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये निर्माण झाला होता. त्यातून ज्या चुका त्यांच्या हातून घडल्या त्यातून स्वत:ला वाचवण्याचा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे उरला होता तो म्हणजे देशात आणीबाणी लागू करणे. तोच मार्ग त्यांनी पत्करला आणि त्याचे पुढील काळात राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागले. त्या अगोदर कधीही केंद्रीय सत्तेतून पायउतार न झालेल्या काँग्रेस पक्षाची सत्ता गेली आणि पंडित नेहरूंच्या समाजवादी संस्कारात वाढलेल्या इंदिराजींना रुद्राक्षाच्या माळा घालून फिरावे लागले. अर्थात, इंदिरा गांधींच्या विरोधात उभे राहून सत्तेत आलेल्या अनेक पक्षांच्या जनता पक्षाचा राजकीय पोरखेळ पाहून लोकांनी पुन्हा इंदिराजींना बहुमताने निवडून दिले हा भाग वेगळा.

इंदिराजींनी लावलेल्या आणीबाणीचा फटका सगळ्याच बिगर काँगेसी पक्षांना बसला. पण पुढे तो विषय सातत्याने लावून धरून त्याचा केंद्रातील सत्ताप्राप्तीसाठी खर्‍या अर्थाने उपयोग केला तो भाजपने. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या केली, असे भाजप सांगत राहिला. खरे तर भारताची स्वातंत्र्य चळवळ ही काँग्रेसच्या माध्यमातून चाललेली आहे. पण पुढे ‘इंदिरा इज इंडिया’ अशी काँग्रेसची आणि इंदिरा गांधी यांच्या पाठिराख्यांची भावना झाली. त्यातूनच मग पुढे आणीबाणी आली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती, पण अलीकडच्या काळात काँग्रेसची अवस्था पाहिली तर या पक्षामध्ये पक्षीय आणीबाणी आलेली दिसेल. गटबाजी फोफावलेली दिसेल. त्यामुळे इतकी मोठी ऐतिहासिक परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष सापडेनासा झाला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला, पण जसे इंदिरा गांधी यांना वाटले की, आपल्यानंतर आपल्या मुलाने पक्षाची जबाबदारी घ्यावी. तसेच सोनिया गांधी यांना वाटत असावे, त्यामुळे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकी अगोदर राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवण्यात आली. त्यावेळी काँग्रेसचा दुसर्‍यांदा मोठा पराभव झाला.

विरोधी पक्षात बसण्याइतक्याही जागा त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे खट्टू होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आजवर विचार केला तर असे दिसून येते की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जिथे आणि जेव्हा निवडणुका लढवल्या गेल्या, तिथे काँग्रेसचा पराभव झाला. इतकेच नव्हे तर सतत होणार्‍या पराभवामुळे राहुल गांधी यांना पक्षाच्या प्रमुखपदी राहण्यात काही रुची वाटेनाशी झालेली आहे, असे वाटते. मध्यंतरी त्यांनी असे जाहीर केले की, काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष हा गांधी घराण्याच्या बाहेरील असावा. पण अध्यक्ष व्हायला कुणी काँग्रेसमधून पुढे आला नाही. काँग्रेससारखा मोठा पक्ष नेतृत्वाशिवाय ठेवून चालणार नाही. अशी पत्र मोहीमही काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी राबवली, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. सोनिया गांधी यांना सतत वाटते की, राहुल गांधी यांनी पक्षाचे प्रमुखपद स्वीकारावे. पण राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या बोहल्यावर चढायला काही तयार नाहीत. खरे तर त्यांच्यावर ही जबरदस्ती होतेय का, याचाही सोनियाजींनी विचार करायला हवा. कारण राजीव गांधी यांनी राजकारणात येऊ नये, अशी सोनियाजींची इच्छा होती. पण इंदिराजींनी त्यांना जबरदस्तीने आणले. अशीच जबरदस्ती पुत्रप्रेमापोटी सोनियाजी राहुल गांधींवर करत आहेत का, याचा विचार सोनियाजींनी करायला हवा.

कारण आज राहुल गांधी सांगत आहेत की, देशात आणीबाणी लागू करणे इंदिराजींची चूक होती. खरे तर ही चूक मान्य करून त्याचा काँग्रेसला खूप काही फायदा होईल, अशातला भाग नाही. कारण इंदिराजींच्या त्या चुकीवर त्यांच्यावर अनेकांनी प्रचंड टीका केलेली आहे. त्यामुळे ती चूक होती. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पण भाजप इंदिराजींच्या चुकीचे सातत्याने भांडवल करून राजकीय फायदा मिळवत आहे. सध्या भाजपला रोखणे हे काँग्रेससाठी अवघड होऊन बसलेले आहे. खरे तर काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाने संयमाचा मार्ग स्वीकारायला हवा होता. कारण आपल्यासमोर नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व आहे. खरे तर मोदी आणि राहुल गांधी यांचे वय आणि राजकीय अनुभव यात बराच फरक आहे. त्यामुळे त्यांच्यात तुलना आणि स्पर्धा होऊ शकत नाही. राहुल गांधी यांनी संयम ठेवून काँग्रेसची धुरा सांभाळायला हवी होती. पण सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून ‘आणीबाणी’ निर्माण झालेली असल्यामुळे राहुल गांधींनी इंदिराजींचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चुकीचा होता असे मान्य केले असावे.

First Published on: March 9, 2021 3:15 AM
Exit mobile version