काँग्रेसचे चिंतन की चिंता…

काँग्रेसचे चिंतन की चिंता…

मोदी लाटेत काँग्रेसची झालेली वाताहत निष्ठावान कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ४४, तर २०१९ च्या निवडणुकीत ५३ जागा असा काँग्रेसचा आलेख आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारत असा नारा नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते देत आहेत. अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भूईसपाट झाली. कधी काळी उत्तर प्रदेशवर हुकमत गाजविणार्‍या काँग्रेसला तेथे अपमानास्पद पराभव पत्करावा लागला. पक्षाची अशी वाताहत सुरू असताना जुना-नवा असा वाद चव्हाट्यावर आला आहे. राहुल गांधी हे प्रामाणिक नेते असले तरी त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय नेतृत्वाचा पर्याय निवडता आलेला नाही. सर्वसामान्य जनतेत गांधी घराण्याला वलय आहे. नवमतदारांवर नरेंद्र मोदींची जादू आहे.

राहुल गांधी युवा नेते असले तरी त्यांची जादू काही चालत नाही. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रियांका गांधींचे कार्ड वापरून पाहिले. त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षणीय होती. त्याही सर्वसामान्य, उपेक्षित जनतेत सहज मिसळून जाताना देशाने पाहिले. परंतु मतदान करताना त्यांना अर्थात काँग्रेसला फारशी पसंती दिली गेली नाही. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. राहुल आणि प्रियांका हे दोघे देशातील वातावरण ढवळून काढण्यास अद्याप तरी यशस्वी झालेले नाहीत. किंबहुना, बुजुर्ग नेत्यांनी राहुल यांच्या नेतृत्वावर वारंवार शंका उपस्थित केली आहे. मध्यंतरी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्यांनी पुन्हा एकदा पक्षात यावे, त्यांच्यासाठी पक्षाची कवाडे उघडी आहेत, अशा प्रकारची भावनिक साद सोनिया गांधी यांनी घातली. काँग्रेस ही बुडणारी नौका आहे किंवा दुरुस्तीच्या पलिकडे गेलेले वाहन असल्याने त्यात बसणे धोकादायक असल्याचे बाहेर गेलेल्या नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी ही साद मनावर घेतलेली नाही. अर्थात काँग्रेसने ज्यांना-ज्यांना मोठे केले त्यांनीच या पक्षाची वाताहत लावली, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

सत्तेशिवाय स्वस्थ न बसणारे अनेक नेते काँग्रेसचे बुरे दिन सुरू होताच दुसर्‍या पक्षात पटापट उड्या मारू लागले. भाजपने गळाला वेगवेगळी आमिषे लावल्याने अनेकजण त्यात सापडले. काहींना आपल्याकडे घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवली. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले विरोधी नेते भाजपमध्ये जाताच पावन होऊ लागले, हा अनुभव अनेक नेत्यांनी घेतला आहे आणि घेत आहे. भापजमध्ये गेल्यावर आता मला शांता झोप लागते, कारण तपास यंत्रणाचा ससेमिरा टळला आहे, अशी एका काँग्रेस त्याची प्रतिक्रिया ही प्राथमिक मानली जायला हरकत नाही.

लोकसभेची आगामी निवडणूक दोन वर्षांवर २०२४ मध्ये आहे. त्या अगोदर जवळपास १0 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेसला जय्यत तयारीनिशी रिंगणात उतरावे लागणार आहे. याचाच भाग म्हणून पक्षाने राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. वारंवार पदरी पराभव पडत असल्याने त्याची कारणमीमांसा होण्यासाठी चिंतन गरजेचे आहे, यात वाद नाही. मात्र या बैठकीतील सूर लक्षात घेता ही चिंतन बैठकीपेक्षा चिंता बैठकच होती, असे म्हणावे लागेल. नेत्यांनी केलेली वक्तव्ये लक्षात घेतली तर आगामी निवडणुकांतील पक्षाच्या एकूणच क्षमतेविषयी चिंता व्यक्त केली गेली आहे. या बैठकीतून फारसे काही निष्पन्न झाले असे दिसले नाही.

काँग्रेसकडे आजमितीला देशव्यापी आक्रमक चेहरा नाही. २०१४ नंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या झंझावातापुढे काँग्रेस क्षीण झाल्यासारखी वाटते. राहुल गांधी अनेकदा भाजपच्या मर्मावर बोट ठेवत असले तरी जनता त्यांना स्वीकारायला तयार नाही. प्रियांका गांधी याही कुठेतरी मागे पडत असल्याचे दिसते. काँग्रेसकडून नेतृत्व बदलाचा प्रयत्न केला गेला तर गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय समोर येत नाही. याचाच अर्थ फिरून फिरून काँग्रेस गांधी घराण्याजवळच येऊन ठेपते. सत्ता संपादन करायची असेल किंवा सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा तर राज्यांतून महाराष्ट्र, तामिळनाडूसारखा प्रयोग करावा लागेल, याकडे चिंतन बैठकीत काही नेत्यांनी लक्ष वेधले.

आज काँगेससोबत आघाडी करण्यास विरोधक धजावत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एखाद दुसरा पक्ष वगळल्यास काँग्रेस नको असे म्हणणार्‍या पक्षांची संख्या अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये सप, बसप यांना काँग्रेसची संगत नको. तृणमल काँग्रेसलाही राहुल गांधींच्या नेतृत्त्वातील काँग्रेस मान्य नाही. आतापर्यंत काँग्रेस विरोधात फारसे न बोलणारे प्रादेशिक पक्ष काँग्रेसविरहित आघाडीचे आडाखे बांधू लागले आहेत. घर फिरले की घराचे वासेही कसे फिरतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. परिणामी काँग्रेस नेतृत्त्वाची अवस्था भांबावल्यासारखी झाली आहे. खरं तर काँग्रेस हा तळागाळापर्यंत पोहचलेला पक्ष आहे. पक्षात नवनवे मनसबदार तयार झाले आणि हा पक्ष सामान्यजनांपासून दूर झाला. अल्पसंख्याक मतदार ही काँग्रेसची खरी व्होट बँक. मात्र उत्तर प्रदेशात हा मतदार काँग्रेसपासून दुरावल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीत दिसले. प्रादेशिक पक्षांचे वाढलेले बळ काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरलेली आहे. आता पश्चातबुद्धी म्हणून काँग्रेसने आगामी निवडणुकांत ५० टक्के जागा पन्नाशीच्या आतील उमेदवारांना देण्याचे चिंतन बैठकीत ठरविले आहे.

तसेच एकाच कुटुंबात दोन जागा देताना दुसर्‍याला पक्षात किमान ५ वर्षांचा अनुभव असण्याची अट असणार आहे. आघाडी करताना पक्षाला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली तरी त्यात खळखळ करू नये, असे स्पष्ट मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे. याचाच अर्थ काहीही करा पण सत्तेच्या सोपानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशी काहीशी मानसिकता अनेक नेत्यांची झाली आहे. तळागाळातील माणसापर्यंत पक्षाला पोहचावे लागेल. त्यासाठी नियोजित पदयात्रांचा उपयोग काही प्रमाणात होईल. इंदिराजींसारखा जादुई करिश्मा असलेला नेता आज काँग्रेसकडे नसल्याने पक्षाला झोकून काम करावे लागेल. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असलेल्या जागाही मिळालेल्या नाही. मरगळ झटकून, तसेच कल्पक नेत्यांना संधी दिल्यास काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतात. अन्यथा काँग्रेसमुक्त भारत ही मोदींची इर्षा पुरी होण्याचा दिवस दूर नाही आणि ते लोकशाहीसाठी घातक ठरू शकेल. कारण सक्षम विरोधी पक्ष असणे हे सदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते.

First Published on: May 17, 2022 4:00 AM
Exit mobile version