कोरोनाचा शरीरापाठोपाठ मनावर हल्ला !

कोरोनाचा शरीरापाठोपाठ मनावर हल्ला !

कोरोना व्हायरसवर केवळ उपचार घेऊन बरं होण्यापुरता कोरोना व्हायरसचा परिणाम मर्यादित नाही. आता कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतरच्या उपचाराची. सरासरी सहा महिन्यांपर्यंत कोरोनाचा परिणाम शरीरावर होत असतो असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. कोरोना फक्त शरीराच्या फुफ्फुसावरच परिणाम करत नाही, तर तो मानसिक आरोग्यावरही परिणाम करत असल्याचे अनेक कोरोना रूग्णांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोनावर उपचार घेतलेल्या रूग्णांमध्ये सहा महिन्यात सरासरी तीनपैकी एक रूग्णांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कोरोना रूग्णांना ज्यानुसार मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा विषय भेडसावत आहे, तसाच विषय हा कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांनाही भेडसावत आहे.

मुंबईतल्या कोरोना परिस्थितीवर एका डॉक्टरचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये असणारे विदारक चित्र पाहून डॉक्टरला रडू कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे. हात जोडून विनंती करणारा डॉक्टर कोरोनामुळे रूग्णांची अतिशय भयावह परिस्थिती असल्याचे सांगत होता. पण त्याचवेळी मुंबईकरांना घराबाहेर पडून नका अशी विनंती करणारे हातही त्या डॉक्टरने जोडले. कोरोना रूग्णांची परिस्थिती पाहता आणि अनेक प्रयत्नानंतरही दगावणारे रूग्ण हे चित्र डॉक्टरांनी अक्षरशः डोळ्यासमोर मांडले. पण डॉक्टरांनी त्याचवेळी एक आणखी गोष्ट सांगितली ती म्हणजे कोरोना रूग्णांवर उपचार करताना दमलेली आरोग्य यंत्रणा. डॉक्टरच्या डोळ्यातून रडू कोसळतानाच आम्ही सध्या इमोशन ब्रेकडाऊनचा सामना करत आहोत हे सांगताना डॉक्टर हतबल झालेली दिसली.

कोरोनाच्या भारतातील एंट्रीनंतर गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणेतील अनेक लोक आपआपल्या परीने या महामारीच्या संकटाचा सामना करत आहेत. या कोरोनाविरोधातील लढाईत अनेक डॉक्टरांचा आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही कोरोनाने गाठले. कोरोनाच्या लढ्यातील अनेक फ्रंट वॉरियर्सलाही या संपूर्ण लढ्यात आपला जीव गमवावा लागला. पण कोरोनाविरोधातील अनेक फ्रंटलाईन वर्कर्स आणि अनेक आरोग्य कर्मचारीही इमोशनल ब्रेकडाऊनचा सामना करत आहेत. दिवसरात्र रूग्ण सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या लढ्यात त्यांच्या कुटूंबियांच्या संयमालाही सलामच करावा लागेल. अनेक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स हे आपल्या कुटूंबियांना आपल्यापासून संसर्ग नको म्हणून घरीच गेलेले नाहीत. तर अनेकांनी कामाच्या ठिकाणीच राहून काम करण्यासाठी पसंती दिली. कोरोनाच्या काळात रूग्णसेवा करताना आपले इन्फेक्शन कुटूंबियांना त्रासदायक ठरू नये म्हणून एका डॉक्टरची पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्या डॉक्टरने दोन महिन्यानंतरही आपल्या नवजात मुलीला भेटता न येण्याचे शल्य त्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते.

ब्राझीलमधील एका हॉस्पिटलमधून एक फोटोही काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. एका नर्सने हॅण्ड ग्लव्जमध्ये कोमट पाणी भरून मानवी स्पर्श देण्याचा प्रयत्न केल्याचा तो फोटो खूपच बोलका होता. मानवी स्पर्श हरवल्याची जाणीव करून देणारा हा फोटो अनेकांच्या भावना प्रतिकात्मक अशा स्वरूपात मांडणारा होता. पण कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोनाविरोधातली लढाई संपते हे अर्धसत्य आहे. कोरोनानंतरची खरी लढाई तर संसर्गातून मुक्तीनंतर सुरू होते. कोरोनावर उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये तीनपैकी एका रूग्णाला न्यूरो आणि मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आता जगभरातून समोर येत आहे. त्यामुळे कोरोना फक्त रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम करत नसून शरीरातील अनेक भागांसोबतच कोरोनाचा परिणाम हा मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे आता संशोधनातून समोर येत आहे.

लॅन्सेट जर्नलनेही जवळपास कोरोनावर उपचार झालेल्या २ लाख ३० हजार रूग्णांचा अभ्यास प्रकाशित केला आहे. या अभ्यासामध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित जवळपास १४ प्रकारच्या न्युरोलॉजिकल आणि मेंटल हेल्थ डिसऑर्डरशी संबंधित अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. अभ्यासानुसार तीनपैकी एक रुग्ण हा मानसिक आरोग्यावर उपचार घेत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. कोरोनावर उपचार घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच अनेकांना मनाचा कल आणि चिंताग्रस्त वाटणे यासारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत लॅन्सेटने केलेल्या अभ्यासानुसार २ लाख २६ हजार ३७९ कोरोना रूग्णांचा आकडा या अभ्यासासाठी वापरण्यात आला. यामध्ये श्वसनानेच आणि सर्दी, ताप, खोकला अशा आजारावर कोरोनाग्रस्त रूग्णांनी उपचार घेतला. त्यामध्ये कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर न्युरोलॉजिकल आणि मेंटल हेल्थ डिसॉर्डरचा त्रास झालेल्यांची टक्केवारी ३४ टक्के इतकी होती. तर एकूण १३ टक्के रूग्णांना पहिल्यांदाच मानसिक आरोग्यासाठी उपचार घ्यावा लागला. कोरोनावर मात केल्यानंतर अनेक रूग्णांमध्ये मेंदूचे विकार आणि सायकिअ‍ॅट्रिक डिसऑर्डर दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याचीही गरज या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनावर मात करणार्‍यांनी समाजमाध्यमांवर मांडलेल्या अनुभवानुसार पुन्हा नियमित आयुष्य जगताना अनेक मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टींचा सामना करावा लागत असलण्याची चिंता काहींनी व्यक्त केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एखाद्या गोष्टीमध्ये आपले लक्ष केंद्रित करता न येणे यासारख्या अडचणी अनेकांनी मांडल्या आहेत. अनेक गोष्टींमध्ये किंवा कामादरम्यान एकाग्र होण्यासाठीची गरज असते त्याठिकाणी कोरोनाच्या परिणामामुळे अशा गोष्टी करता येणे अवघड झाल्याचेही अनेकांचे मत आहे. अनेक पत्रकारांनी मांडलेल्या अनुभवानुसार सुरूवातीला एखाद्या गोष्टीसाठी लक्ष केंद्रित करून लिहिता येण्यासाठीचा जितका कालावधी लागायचा, त्यातुलनेत अधिक कालावधी आता लागत आहे. अनेक मानसिक आरोग्याशी संबंधित प्रोफेशन्समध्येही ही अडचण अनेकांनी बोलून दाखवली आहे. त्यामध्ये चिंताग्रस्त राहणे किंवा मनाचा कल बदलत राहणे यासारख्या गोष्टींचाही उल्लेख अनेकांनी आपला अनुभव व्यक्त करताना मांडला आहे.

वैद्यकीय उपचारासाठी जितके आपल्या देशात प्राधान्य दिले जाते, तितके प्राधान्य हे मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांकडे देण्यात आलेले नाही. एरव्ही सर्दी, खोकल्यामुळे वास न येणे, चव न लागणे यासारख्या सौम्य लक्षणांवर आता जगभरातून संशोधन सुरू झाले आहे. त्यामागचे एकच कारण आहे, ते म्हणजे कुतूहल. हे कुतूहल मानसिक आरोग्याच्या बाबतीतही भारतात निर्माण व्हायला हवे. अन्यथा कोरोनामुक्तींनंतर ही बाब नेहमी दुर्लक्षित राहील. ज्या पद्धतीने एखाद्या न्युक्लिअर डिझास्टर किंवा भोपाळसारख्या गॅस गळतीचे परिणाम अनेक पिढ्या भोगत आहेत. त्यानुसारच कोरोनाच्या बाबतीतही मानसिक आजाराच्या निमित्ताने परिणाम दिसायला वेळ लागणार नाही. त्यासाठीच आरोग्य यंत्रणेत उपचाराचा भाग म्हणून मानसिक आरोग्याला आणि उपचारांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. जगभरात त्यासाठीचे प्रयत्न होत आहेत. तसेच प्रयत्न भारतातही जोर धरणे गरजेचे आहे.

अमेरिकेचे बायडेन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार जो बायडेन यांनीही भारताला सल्ला देताना काही आठवड्यांसाठी संपूर्ण देश का लॉकडाऊन करत नाही, असा सल्ला दिला होता. या लॉकडाऊनच्या कालावधीत थोडावेळ घरातच थांबा आणि एकमेकांची काळजी घ्या असाही सल्ला त्यांनी दिला होता. खरंच या कोरोनाच्या कालावधीत कोरोनावर उपचार घेणार्‍यांवर तसेच उपचार घेऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगणार्‍यांना मदत करण्याची आपली समाज म्हणून जबाबदारी आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाईतून बाहेर पडलेल्यांसाठी त्यांचा मानसिक आधार देण्याचे काम आपल्याला नक्कीच करता येईल. कोरोनावर उपचार घेणार्‍यांचेही मनोबल वाढवण्यासाठीही समाज म्हणून नक्कीच प्रयत्न करण्याची आमची तुमची सर्वांचीच जबाबदारी आहे. ज्या कठीण काळात वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधाराची या रूग्णांना गरज असते तेव्हा आपली एखादी विचारपूस किंवा काळजी घेत असल्याचा एखादा छोटासा प्रयत्नही अशा रूग्णांना आधार देऊ शकतो.

कोरोनावर मात केल्यानंतर कोरोनाविरोधातील युद्ध संपत नाही, हीच गोष्ट कोरोनानंतरच्या सहा महिन्यात आलेल्या मानसिक आरोग्याशी संबधित आजारांच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळेच अशा महत्वाच्या कालावधीत कुटूंब तर त्या रूग्णाची साथ देईलच, पण समाज म्हणूनही आपली तितकीच महत्वाची जबाबदारी आहे. अनेकदा एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करण्यापेक्षा त्या गोष्टीसाठीचा मानसिक आधारही एखादी चिंता दूर करण्यासाठी मदतीचा ठरतो. कोरोनावर उपचार घेणार्‍यांसोबत कोरोना रूग्णांसाठी दिवसरात्र योगदान देणार्‍यांसाठी आपण नक्की काय करू शकतो, ज्यामुळे त्यांचीही कोरोनाविरोधातील लढण्याचे स्पिरीट कायम राहील आणि त्यांनाही आधार मिळेल याचाही शोध प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर घेण्याची गरज आहे. आपली एखादी छोटी कृतीही या कोरोना वॉरियर्सच्या पंखात नवीन बळ निर्माण करेल. म्हणूनच एकमेकांची काळजी घेतानाच मानसिक आरोग्यासाठीही आता लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या आमच्या या आधार देण्याच्या प्रयत्नानेच ही कोरोनानंतरची लढाई जिंकता येईल हे मात्र निश्चित.

First Published on: May 4, 2021 4:00 AM
Exit mobile version