तो पुन्हा डोकं वर काढतोय…

तो पुन्हा डोकं वर काढतोय…

संपादकीय

देशातच नव्हे, तर जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू डोकं वर काढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नुकतंच महाराष्ट्रासह 5 राज्यांना दुसर्‍यांदा पत्र पाठवून अलर्ट केलं आहे. पाच दिवसांपूर्वीच अशाप्रकारचे पत्र भूषण यांनी राज्यांना लिहिलं होतं. ज्या राज्यांना आरोग्य सचिवांनी पत्र पाठवलं आहे, त्या राज्यांमध्ये हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचा समावेश होतो. या पाचही राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या पाच राज्यांपैंकी खासकरून दिल्लीत कोविड पॉझिटिव्हिटी रेट वाढत असून कोरोना संसर्गाने बाधित होणार्‍या रुग्णसंख्येतही मोठी वाढ दिसत आहे. या रुग्णवाढीवर पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारांनी आपल्या पातळीवर आवश्यक ती पावलं उचलावीत. बदलत्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवावं आणि कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. एकाबाजूला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस खासगी रुग्णालयात मिळू लागणं आणि दुसरीकडं कोरोनाबाधितांची संख्या वाढणं हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर केंद्र सरकारने पूर्ण विचाराअंती कोविड-19 च्या निर्बंधांतून सर्वसामान्यांची सुटका केली. त्याआधी राज्यांनी आपापल्या पातळीवर बहुतांश निर्बंध हटवलेच होते. परंतु केंद्राच्या निर्णयानंतर नकोशी वाटणारी मास्कसक्तीही उठवण्यात आल्याने सर्वसामान्य खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेऊ लागले. विद्यार्थी शाळा- कॉलेजांत जाऊ लागले. ऑफलाईन परीक्षांना सुरूवात झाली. सरकारी-खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. शॉपिंग मॉल, सिनेमागृह, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसोहळे यांवरील गर्दीची मर्यादा हटवल्याने सगळ्यांनाच बिनादिक्कत सोहळ्यांचा आस्वाद घेता येऊ लागला आहे. आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने लोकांचे एकमेकांमध्ये मिसळणं वाढलं आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत सर्वच सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने लोकांची पर्यटनाच्या ठिकाणीदेखील गर्दी वाढत आहे. या निर्बंधमुक्तीला उणापुरा महिनाही होत नाही तोच पुन्हा एकदा कोविडचा अलर्ट मिळाल्याने सर्वजण सतर्क झाले आहेत.

ज्या देशातून कोरोना उद्रेकाचा खेळ सुरू झाला, त्या चीनमध्ये पुन्हा एकदा भयावह स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये एकाच दिवशी 20 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्ण लक्षणं नसलेली आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही चिंताजनक पद्धतीने वाढत असली, तरी अद्याप तिचे ठोस आकडे समोर आलेले नाहीत. चीनचं महत्वाचं शहर असलेल्या शाघांयसहीत 44 शहरांमध्ये काही ठिकाणी अंशत: तर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ चीनवर ओढावलेली आहे. जगातील इतर देशांमध्येही कुठं ओमायक्रॉन तर कुठं एक्सई या कोरोनाच्या उपप्रकारांचे रुग्ण आढळून येत आहेत. एक्सई या उपप्रकाराकडे दुर्लक्ष करू नका, हा व्हेरियंट घातक दिसत नसला, तरी सर्वाधिक वेगाने पसरू शकतो, असा धोक्याचा इशारा आधीच जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहेच. परंतु आपल्याकडे राजधानी दिल्लीतील दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता खर्‍या अर्थाने वाढली आहे. गुरूवारी दिल्लीत 1009 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

मागील 24 तासांतील ही वाढ 60 टक्क्यांहून अधिक आहे. तर देशात मागील 24 तासांत 2380 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत देशभरात 13 हजारांहून कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली असून मास्क न वापरताच सार्वजनिक फिरल्याचे आढळून आल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिल्ली प्रशासनाने दिले आहेत. दिल्लीला लागूनच असलेल्या उत्तर प्रदेशातील एनसीआर, गाजियाबाद, लखनऊसहीत 7 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील स्थिती बघायची झाल्यास मागील 24 तासांत 162 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील 98 रुग्ण हे मुंबईतील आहेत. 49 दिवसांतील हा मोठा आकडा आहे. मास्कसक्तीच्या बाबतीत प्रसारमाध्यमांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारलं असता तूर्तात तरी राज्यात मास्कसक्ती करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तरीही लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि बाहेर असताना सॅनिटायझरचा वापर केला तर कोरोनाला दूर ठेवता येईल.

तसं पाहता निर्बंध हटवताना केंद्र आणि राज्य सरकारांनी मास्क घालणं ऐच्छिक केलं होतं. मात्र सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क घालून खबरदारी घेण्याची सूचना आवर्जून केली होती. परंतु या सूचनांकडे राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनता पूर्णपणे कानाडोळा करतानाच दिसतेय. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेले दिसून येतात. बस, ट्रेन, सार्वजनिक वाहतूक सेवा, बाजारपेठा, चौपाट्या, बागबगीचे अथवा सभा वा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बहुतांश लोक हे विनामास्कचेच दिसतात. बीएचयूच्या काही संशोधकांनी काही कोरोनाबाधितांच्या नमुन्यांची नुकतीच चाचणी केली. त्यातून केवळ 17 टक्के रुग्णांमध्येच अँटिबॉडी असल्याचे दिसून आले. याचाच अर्थ याआधी ज्या कुणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतले असतील, त्या लसीचा परिणाम हळुहळू कमी होत असल्याचा निष्कर्ष यातून काढावा लागेल की काय? असा प्रश्न निर्माण होतोय.

केंद्राने 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे बूस्टर डोस घेण्यात परवानगी दिलेली आहे. परंतु ही लस सध्या तरी शासनाकडून मोफत मिळत नसून त्यासाठी खासगी रुग्णालयात जाऊन पैसे मोजावे लागत आहेत. केंद्राने अद्याप बूस्टर लस सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कुठलं धोरण बनवल्याचीही चर्चा नाही. त्यामुळे जसजशी कोरोनाबाबतची भयमात्रा वाढत जाईल, तस तसा बूस्टर लसीची मात्रा घेण्याकडे सर्वसामान्यांचा कलही वाढू शकतो. लाटांच्या चर्चा, संशोधकांचे निष्कर्ष, उपप्रकारांचे व्हेरियंट आणि कोरोनाबाधितांचे आकडे वाढून देशातील कोरोनाबाबतची भयमात्रा वाढण्याआधीच केंद्राने बूस्टर लसीचे धोरण ठरवावे. तर दुसरीकडे जगातूनच कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याच्या भ्रमात न राहता देशातील सुज्ञ जनतेने सावध! ऐका पुढल्या हाका… याच भावनेतून किमान सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी वावरताना स्वत:हून मास्कचा वापर वाढवावा, जेणेकरून सक्तीचे निर्बंध वा बूस्टर डोस घेण्याची गरज पडणार नाही.

First Published on: April 22, 2022 4:00 AM
Exit mobile version