मास्क आता नको रे बाबा !

मास्क आता नको रे बाबा !

संपादकीय

३१ मार्चपासून संपूर्ण देशाला कोरोना निर्बंधांपासून मुक्तता मिळणार आहे. खरे तर ही गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक सकारात्मक बातमी म्हणावी लागेल. हे निर्बंध हटवतानाच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आले होेते. त्यानंतर केंद्र सरकारची ही मोठी घोषणा आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे ठिक आहे, परंतु मास्क वापरणे अजूनही बंधनकारक असल्यामुळे उन्हाळ्यात लोकांचे हाल होतील. वास्तविक, अनेक प्रगत देशांनी मास्क लावण्याबाबतचे निर्बंध शिथिल केले आहेत. ईस्त्रायल हा स्वत:ला कोरोनामुक्त घोषित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. येथील सरकारने मास्क लावण्याचे निर्बंध सहा महिन्यांपूर्वीच काढून टाकले आहेत. न्यूझीलंड पाच महिन्यांपूर्वी मास्क फ्री देश बनला आहे.

कोरोनाचा उगम ज्या देशातून झाला तो चीन लसीकरणामुळे मास्क फ्री देश बनला आहे. चीन जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांपैकी एक होता, परंतु सध्या तो पर्यटनासाठीही खुला झाला आहे. अमेरिकेही लोकांना मास्क न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात झालेले लसीकरण आणि कोरोनाची सद्यस्थिती बघता मास्कबाबत विचार करण्याची आता वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाच वर्षे किंवा त्याखालील बालकांसाठी मास्कची सक्ती नाही. या वयातील बालकांवर कोरोनाचा फारसा प्रभाव दिसला नाही म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे. याच न्यायाने आता मोठ्यांच्या मास्कबाबतही विचार होणे क्रमप्राप्त ठरतो. जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला जाहीर केल्यानुसार, मास्कचे निर्बंध शिथिल करण्यासाठी भारतातील लसीकरणाचेे प्रमाण पुरेसे आहे.

मास्क मुक्ती आता मिळाली नाही तर ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे म्हणण्याची वेळ येईल. आज कोरोनाचे गंभीर रुग्ण दिसत नसले तरी मास्कच्या अतिवापरामुळे ज्यांची प्रकृती गंभीर स्वरुप धारण करत आहे, अशांची संख्या वाढत आहे. आपण श्वासाद्वारे प्राणवायू अर्थात ऑक्सिजन ग्रहण करतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर सोडतो. परंतु सातत्याने मास्क घातल्यामुळे शरीरात प्राणवायू पोहचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यातून भोवळ येणे किंवा श्वास घेण्यात अडथळा येणे अश्या समस्या उद्भवताना दिसतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मास्क लावून घेतलेल्या श्वासोच्छवासामुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि प्रतिकारशक्तीवर लक्षणीय परिणाम होतो. शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यास, त्यात असलेले हायपरकेनिया डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारखी समस्या वाढवू शकते. डांग्या-खोकल्याचा त्रासही या कोरोनाकाळात अनेकांना जडला आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, जास्त काळ मास्क लावल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. म्हणूनच, जेव्हा जास्त लोकांमध्ये उपस्थिती असेल तेव्हा मास्क लावण्याची सवय भारतीयांनीच लावून घ्यायला हवी.

परंतु, जेव्हा जास्त गर्दी नसेल तर आपण मास्कचा वापर कमी करण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या आजारी वा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात यायचे असेल तेव्हाच मास्क सक्ती करणे आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईच्या भीतीने काही मंडळी मॉर्निंग वॉक करताना वा जॉगिंग करताना मास्क लावत असल्याचे निदर्शनास येते. ही अतिशय घातक बाब म्हणावी. मास्क लावून वॉकिंग वा जॉगिंग केल्यास प्राणवायू कमी पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. भारतात अनेकांचे मृत्यू यामुळे झाले आहेत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन परदेशात मास्कविरोधात लोक रस्त्यावर उतरले, आंदोलने केलीत. परंतु, भारतातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आजाराला सौम्य केले. परंतु, आता या नागरिकांना मास्कमुक्त करण्याची जबाबदारी शासनाची आहे. अन्यथा मास्कमुळे नवे सामाजिक आणि मानसिक प्रश्न निर्माण होतील. शिवाय, मास्कमुळे जर नव्या आजारांनी भारतीयांच्या शरीरात प्रवेश केला तर त्याला रोखणारी लसही उपलब्ध नसेल हे सरकारने ध्यानात घ्यावे!

आजही सरकारी वा खासगी कार्यालयांत प्रवेश करायचा असेल तर मास्क सक्तीचे असल्याचे सांगितले जाते. केवळ प्रवेशासाठी मास्क सक्ती, आत गेल्यावर मास्क काढला तरी कुणी हटकत नाही. थोडक्यात मास्क सक्ती आज बहुतांश ठिकाणी केवळ औपचारिका म्हणूनच आहे. पण ज्यावेळी कुणी व्यक्ती मास्क सोबत बाळगतच नाही, त्यावेळी त्याला नव्याने तो खरेदी करण्यास भाग पाडले जाते. खरे तर ही पिळवणूक आहे. शिवाय मानवी हक्कांचे उल्लंघनही आहे. देश संपूर्णत: कोरोनामुक्त झालेला असतानाही मास्कच्या माध्यमातून सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याने हासिल काय होणार? आज राजकीय पक्षांचे मोठ-मोठे कार्यक्रम होतात. सभा होतात. परंतु, तेथे मास्कचे बंधन दिसत नाही. सर्वसामान्य मात्र काही कामानिमित्त बाहेर निघाला तर त्याला मास्क घालण्याचा धाक दाखवला जातो. कडाक्याच्या उन्हात तर मास्क घालून चालणे म्हणजे एक अवघड शिक्षाच असते. मुंबईत लोकलमध्ये उन्हाळ्यात मास्क घालून प्रवास करणे अतिशय जिकरीचे होत आहेत. त्यामुळे तातडीने मास्कची सक्ती हटवणे गरजेचे आहे. कारण आता मास्क हा विविध व्याधीचे आगार ठरू पाहत आहे.

मास्क सक्तीबरोबर लस सक्तीचाही त्रास आता सामान्यांना होत आहे. खरे तर, लसीकरण हे ऐच्छिक आहे. सक्तीचे नाही हे शासनानेच उर बडवून सांगत आले आहे. पण दुसरीकडे दोन डोस घेतले नसतील तर मॉलपासून थेअटरपर्यंत सगळीचकडे अडवणूक करण्यात आली. अनेक सरकारी कार्यालयांमध्येही लस नसेल तर प्रवेश नाकारण्यात येत आहे. लसीकरण केले नाही तर पेट्रोल बंद, रेशन बंद, नो व्हॅक्सिन नो एन्ट्री असे निर्णय घेण्यात आले. तसेच काही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आदेश बंधनकारक करण्यात आले. तुम्ही प्रशासकीय कर्मचारी असाल आणि तुम्ही लस घेतली नसेल तर प्रशासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, अशा भूमिकाही काही ठिकाणी घेण्यात आल्या. ‘नो व्हॅक्सिन-नो एन्ट्री’ धोरणांतर्गत अनेक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे न्यायालयाने फटकारुनही आजही अनेक चित्रपट गृह, नाट्यगृह, मॉल्समध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. लस सक्तीऐवजी एका विशिष्ट मुदतीनंतर मोफत लसीकरण बंद करण्याचा सरकारने निर्णय घ्यावा. तसे केल्यास १ हजार ते २ हजार रुपये देऊन लस घेण्याऐवजी नागरिक मोफत लसीकरणाकडे वळू शकतील.

First Published on: March 25, 2022 4:45 AM
Exit mobile version