कोरोनाचा फेरा पुन्हा न येवो

कोरोनाचा फेरा पुन्हा न येवो

कोरोना विषाणूने गेल्या वर्षभरात आपले जीवन कसे विस्कळीत करून टाकले होते. जीवनाचे अनेक व्यवहार कसे ठप्प करून टाकले होते. अर्थव्यवस्थेला कसे धक्के दिले होते. अनेकांचे रोजगार गेले होते. अनेक लोक रोजगार नसल्यामुळे शहरे सोडून मिळेल या रस्त्याने आपल्या गावी कसे जात होते हे आपण पाहिले आहे. कसे बसे गाव गाठल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या शहरांमधून आल्यामुळे गावचे लोक त्यांना गावात घेत नव्हते. अगदी जवळचे नातेवाईकही दूरचे झाले होते. जो तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. गावाला गेल्यावरही लोकांना गावाच्या बाहेर विलगीकरणात रहावे लागत असे. त्यानंतर संशय दूर झाल्यानंतर त्यांना गावात प्रवेश मिळत असे. जे लोक शहरामध्ये राहत होते, त्यांच्यापैकी अनेकांच्या कंपन्या कोरोना लॉकडाऊनमुळे बंद पडल्या होत्या. ज्यांच्या सुरू होत्या त्यांना कामावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती.

कमाई ठप्प झाली होती. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो गर्दीत जास्त पसरतो. त्यामुळे अगदी भाजी बाजारावरही मर्यादा आलेली होती. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने विशिष्ट वेळ चालू होती, तर बाकीची दुकाने बंद होती. खासगी वाहनाने रस्त्यावरून जाणार्‍यांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होता. मुळात २०१९ सालच्या उत्तरार्धात चीनच्या वुहान शहरात उद्भवलेल्या या विषाणूने तिथे हाहा:कार उडवला होता. अनेकांचे बळी जात होते. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा विषाणू पसरू नये, यासाठी चिनी सरकारने लोक इमारतींमधील त्यांच्या घरातून बाहेर येणार नाहीत, यासाठी काही ठिकाणी बाहेरून कुलूपे लावली होती. लोक आतून जीव वाचवण्यासाठी ईश्वराची करूणा भाकत होते. अशा व्हिडिओ क्लिप्स आपण सोशल मीडियावर पाहत होतो. आपल्यापासून ते दूर असल्यामुळे काही वाटत नव्हते, पण हा हा म्हणता, हा कोरोना विषाणू कसा जवळ आला. त्याने जगभर आपला कसा विस्तार केला, हे लोकांना कळलेदेखील नाही.

भारतात २०१९ च्या नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोची येेथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तो बाहेरील देशातून आलेला होता. हा कोरोना चीनच्या वुहान शहरापुरता मर्यादित राहिला, पण इतर देशांमध्ये तो सर्व शहरांमध्ये पसरला. भारतामधील विविध शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २२ मार्चला केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन घोषित केले. संसर्गजन्य असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडे अन्य कुठलाही उपाय नव्हता. कोरोना हा त्यावेळी अनपेक्षितपणे उद्भवलेला असल्यामुळे लगेच कुठली लस उपलब्ध असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि औषधे यावरच डॉक्टरांचा भर होता. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना वाचवण्यासाठी अशीच प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येत होती. अशा वेळी काय करावे हे कुणाला कळत नव्हते. फक्त संपर्क येणार नाही. सुरक्षित अंतर, शारीरिक स्वच्छता, घराबाहेर पडल्यावर मास्क लावणे इतकेच उपाय माणसांच्या हाती होते. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स आणि परिचारिका त्यांच्या जीवाला असलेल्या धोका पत्करून सेवा देत होत्या. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्यासाठी पोलिसांना सतत तैनात रहावे लागत होते.

त्याचसोबत बस आणि एसटी चालवणार्‍या गाड्यांच्या चालक आणि वाहकांना आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेतील लोकांची ने आण करावी लागत होती. इमारतींमध्ये आणि शहरांच्या रस्त्यांवर स्वच्छता रहावी यासाठी सफाई कामगार काम करत होते. त्यांच्या जीवालाही धोका होता, पण समाजातील काही लोकांनी त्यांच्या जीवाला असलेला धोका पत्करून सुरक्षेचे उपाय करून सेवा दिली म्हणून आपण कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत आहोत, पण मानव जातीभोवती पडलेला हा विळखा अजून पूर्णपणे सुटलेला नाही. मागील एका वर्षाच्या काळात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपचार सुरू होते, त्याचबरोबर कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधण्याच्या कामात जगभरातील संशोधन संस्थांमधील जीवशास्त्रज्ञ अहोरात्र झटत होते. लसींच्या निर्मितीनंतर त्यांची चाचणी घेणे आवश्यक होते. कारण मानवाला ती परिणामकारक ठरते का, याची खात्री करणे आवश्यक होते. भारतामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅस्किन अशा दोन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरात भारताचे कौतुक झाले. त्याचसोबत या लसी भारतातीत जे अत्यावश्यक सेवेतील लोक होते, त्यांना देण्याचे काम सुरू आहे. पण कधी एकदा लस येते आणि ती कधी आम्ही घेतो, असे वाटत असताना काही तरी वेगळेच घडताना दिसत आहे.

सामान्य माणसांचे सोडाच, पण जे लोक अत्यावश्यक सेवेत होते, तेही कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला फारसे उत्सुक असल्याचे दिसत नाही. यामागे दोन कारणे आहेत, एक तर त्यांनाही वाटत आहे की, कोरोनाचा प्रभाव आता कमी झालेला आहे, आता तो जाईल, त्यामुळे लस घेण्याची काय गरज आहे. तर दुसर्‍या बाजूला या लसींविषयी लोकांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. म्हणून लोक लसी घेण्यासाठी फारसे पुढे येताना दिसत नाहीत. ज्यांचा कोविन अ‍ॅपद्वारे नंबर लागला आहे. ते लोकही काही बाही कारणे देऊन लस घेण्यासाठी गैरहजर राहत आहेत. म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी जी लस बनवली त्यालाच लोक घाबरू लागले आहेत. पण जर माणूस औषधालाच घाबरला, तर मग आजाराला कसे रोखणार, असे नवे आव्हाने सरकारपुढे उभे राहिले आहे. अगोदर लस निर्मितीचे आव्हान होते, आता लोकांना लस घ्यायला लावण्याचे आव्हान आहे. मुंबईतील लोकल रेल्वे ही माणसांची जीवन वाहिनी आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून ती मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू होती. गेल्या पंधरा दिवसापूर्वी ती विशिष्ट वेळेचे बंधन पाळून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे.

पण सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू केल्यानंतर कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा चिंता वाटू लागली आहे. मुंबईतील व्यवहार मंदावले किंवा ठप्प झाले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, याचा अनुभव गेल्या वर्षभरात सगळ्यांनी घेतला आहे. मुंबईतील बसगाड्यांमध्ये गर्दी असते, पण तिथे असलेला कंडक्टर प्रवाशांना मास्क घालायला भाग पाडतो, पण लोकलमध्ये अशी शिस्त लावणारा कुणी नसतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. ही संख्या वाढू नये आणि कोरोनाचा फेरा पुन्हा येऊ नये, यासाठी सगळ्यांनी घराबाहेर पडल्यावर मास्क, सॅनिटायझर आणि शक्य तेवढे सुरक्षित अंतर याचे पालन करायलाच हवे. सकाळी सातच्या अगोदर, दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ वाजल्यानंतर सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. मुंबईतून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत होती. बरे होणार्‍यांची संख्या वाढत होती. पण मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार होती, ती तारीखही पुढे ढकलावी लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा फेरा पुन्हा येऊ नये, यासाठी आपण सगळ्यांनी जागरुक राहण्याची गरज आहे.

First Published on: February 16, 2021 6:50 AM
Exit mobile version