‘तो मूकबधिर’ पण त्याची चित्रे बोलतात

‘तो मूकबधिर’ पण त्याची चित्रे बोलतात

'तो मूकबधिर' पण त्याची चित्रे बोलतात

‘तो’ जन्मापासून मूकबधिर आहे. पण जिवंत माणसांची चित्रे हुबेहूब काढतो. त्या चित्रात रंगसंगतीचा सुरेख वापर करून जिवंतपणा आणतो. सध्या तो समाजसेवेचा एक भाग म्हणून शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतील ‘माझी शिवडी, सुंदर शिवडी’ला साकारण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची ३००- ५० फूट लांब भिंत आदिवासी समाजाचा वारसा जपणाऱ्या वारली पेंटिंगद्वारे रेखाटत आहे. त्याची चित्रे पाहिली तर कोणाला वाटणार नाही की, ती चित्रे काढणारा चित्रकार मूकबधिर असेल. कारण की, ‘तो’ जरी ऐकत आणि बोलत नसला, मूकबधिर असला तरी पण त्याची चित्रे बोलतात. त्याचे नाव निशांत श्रीपाद पारकर आहे.

निशांतचा जन्म तारीख १० ऑक्टोबर १९९२ आणि त्याचे गाव रत्नागिरी जिल्हातील जैतापूरच्या आंबोलगड हे आहे. तो मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागात डीसपॅच, मलनि:सारण विभागात गेल्या तीन वर्षांपासून कामाला आहे. मात्र तो उत्तम चित्रकार, रांगोळीकार आहे. दिवाळी, दसरा सणासुदीला तो काम करीत असलेल्या पालिका कार्यालयात, आवारात उत्कृष्ट रांगोळी काढतो. शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांची तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डॉ. आंबेडकर यांची रांगोळी काढतो. त्याची चित्रकला आणि रांगोळी पाहून त्याचे साहेब, सह कर्मचारी खूप आनंदीत होतात. त्यांना निशांतबद्दल खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे.

तो अगोदर या पालिका कार्यालयात ड्रेनेज लाईनचे काम करीत असे. मात्र तो मूकबधिर असल्याने आणि त्याची चित्रकला, रांगोळी कला पाहता त्याच्या साहेबांनी त्याला कार्यालयात एकाच ठिकाणी बसून काम करण्यासाठी त्याला डीसपॅचचे सोपे काम दिले, असे त्याच्या आईने आपल्या लाडक्या मुलाचे कौतुक करताना सांगितले. आपल्या मुलाबद्दल तोंडभरून कौतुक करताना आणि माहिती देताना त्या जरी मोबाईलवरून संभाषण करीत होत्या तरी पलिकडे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे त्यांच्या शब्दातून जाणवत होते. त्याच्या आईने अगदी कमी वेळात आणि कमी शब्दात निशांत व पारकर कुटुंबीयांचा जीवनपट उलगडून सांगितला.

कामावर आणि कुटुंबात आवडता

निशांत हा शिवडी येथील एका चाळीतील एका खोलीत राहतो. त्याच्या पारकर कुटुंबात त्याची पत्नी (७ मार्चला लग्नाला २ वर्षे पूर्ण होतील. मात्र तीही त्याच्यासारखीच आहे), त्याचे वडील श्रीपाद, आई श्रमीला, मोठा भाऊ श्रीशांत, वहिनी, त्यांची मुलं असा परिवार राहतो. गेल्या चाळीस वर्षांपासून ते शिवडी येथील चाळीत राहतात, असे त्याच्या आईने सांगितले. मात्र सध्या त्या राहत्या ठिकाणी काही पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने ते परळ येथे भाड्याच्या खोलीत राहतात.

निशांतचे वडील निशांत लहान असताना अवघ्या ६०० रुपयांत खासगी ठिकाणी काम करीत होते. आमची परिस्थिती बेताची होती. खूपच हलाखीचे दिवस काढले. सध्या त्याच्या वडिलांना पक्षघाताचा झटका आल्याने त्यांना जरा बरं नसतं. मात्र तरीही ते कामाला खासगी ठिकाणी जातात, असे त्याच्या आईने सांगितले.

निशांत जन्मापासूनच मूकबधिर आहे. त्याने बोलावे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या जिभेचे ऑपरेशनही केले. मात्र काहीच फरक पडला नाही. पुढे त्याला ऐकता यावे यासाठी मशीन त्याच्या कानाला लावली. तो लहान असताना त्याला छबिलदासमध्ये शिकायला पाठवले होते. त्यावेळी त्याच्या टीचर पुष्पा यांनी त्यांच्यामधील चित्रकला, तल्लख बुद्धी, मनमिळाऊ हे गुण हेरले. पुढे त्याने विकास विद्यालय, दादर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र नंतर त्याने वांद्रे येथील रहेजा आर्टमधून डिप्लोमा केला. मात्र तो कामावर जसा सर्वांना मदत करतो, कोणीही काहीही कामे सांगितली तर ती करतो, त्याचप्रमाणे तो घरीही सर्वांना सर्व प्रकारची मदत करतो. आई-वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करतो. समाजात त्याच्यासारख्या दिव्यांग, गरीब, ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्तींना तो जरूर मदत करतो.

गेट वे ऑफ इंडिया, सी लिंक हुबेहब चित्र

निशांत एक अस्सल चित्रकार आहे. कोणतेही चित्र काढताना तो त्यातील बारकावे चांगले हेरतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या राष्ट्रपुरुषांची, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीची हुबेहूब चित्रे, रांगोळी काढण्यात तो पटाईत आहे. तसेच तो गेट वे ऑफ इंडिया, सी लिंक, कार्टून, प्राणी, निसर्गचित्रे, व्यक्ती चित्रे खूपच छान काढतो.

 

शिक्षण फक्त दहावी पण रहेजा, वांद्रे येथे डिप्लोमा केला आहे. अनेक चित्रकला, रांगोळी स्पर्धेत तो लहानपणापासून भाग घेतो आणि एक एक करून त्याने अनेक पुरस्कार, ट्रॉफी, मेडल, मिळवले आहेत. निशांत जरी मूकबधिर असला तरी त्याची चित्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार हे बोलके आहेत, एवढे मात्र खरे.

First Published on: March 2, 2021 12:44 PM
Exit mobile version