‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने…!

‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने…!

प्रातिनिधीक फोटो

‘डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप’ आणि ‘गरज सरो वैद्य मरो’ या परस्परविरोधी भावना समाजाच्या मनामध्ये वर्षानुवर्ष रुळलेल्या आहेत. परिस्थितीनुसार दोन्ही वापरल्या जातात. अगदी खोलात जाऊन विचार केला असता मुळात दोन्ही घातकच. देवाचं रूप म्हटलं की अपेक्षांचा पार कडेलोट होतो व रुग्ण दवाखान्यात भरती केला की जीव वाचलाच पाहिजे ही अपेक्षा निर्माण होते. मात्र जन्म-मृत्यू कोणताही डॉक्टर ठरवू शकत नाही हे शाश्वत सत्य सोयीस्करपणे दुर्लक्षित केलं जातं. या काळात वैद्यकीय पेशा बदनाम करून खलनायक ठरवले गेल्यामुळे ‘गरज सरो वैद्य मरो’ आणि ‘गरज न सरल्यास वैद्याला मारो’ ही भावना वाढीस लागल्याचे दिसत असतानाच कोरोनाचा विळखा जगावर पडला आहे. त्यानिमित्ताने वैद्यकीय पेशाविषयी समाजमन पुन्हा बदलायला लागले आहे आणि त्याची आश्वासक सुरुवात झाली असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आक्राळ विक्राळ शहरांच्या आरोग्याचे ओझे झेलणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी दिवस-रात्र अत्यावश्यक सेवेमध्ये अविरत राबत असतात. रुग्णांचे जीव वाचवत असताना प्रसंगी चतुर्थ श्रेणीचे कामही करत असतात. गरज पडल्यास अगदी पेशंटला स्ट्रेचरवरून नेण्याचे कामही करतात. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे किंवा ते कंत्राटी पद्धतीवर नेमले गेले आहेत त्यांचा अतिरिक्त भार स्वाभाविकपणे या डॉक्टरांच्या खांद्यावर येतो. दवाखान्यात रात्रंदिवस राबणाऱ्या १०*१० च्या वसतीगृहाच्या खोल्यांत मूलभूत गरजांशिवाय राहणाऱ्या आणि कधी वॉर्डात झोपणाऱ्या रेसिडेंट डॉक्टरांकडून त्यांच्या भावना, अडचणी, समस्या जाणून घेतल्यास वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य यंत्रणा रेसिडेंट डॉक्टरांच्या शोषणावर उभी आहे असे मला मनोमन वाटते‌. आज वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर काम करणारे डॉक्टर आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या रेसिडेन्सीचे दिवस आठवले तर ते सुद्धा सहमत होतील.

काही खाजगी आणि कॉर्पोरेट दवाखान्यात रुग्णांना येणारे भरमसाठ बिल, सरकारच्या (कोणत्याही पक्षाचे असो) उदासीन आरोग्य धोरणामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड, समाजातील स्वप्रतिष्ठित आणि राजकीय व्यक्तींचा उपचारांदरम्यान अनावश्‍यक हस्तक्षेप, आरोग्य यंत्रणेतील कित्येक त्रुटी, मसालेदार बातम्या या सर्वांमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय पेशाबद्दल समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली खदखद व या भावनेचा वापर करून रुग्णांशी काही देणेघेणे नसताना हात साफ करून घेणाऱ्या मानसिकतेचे समाजकंटक या सर्वांचा सर्वात जास्त त्रास रुग्णांचा व नातेवाईकांचा प्रथम संपर्क असणाऱ्या व हजारो रुग्णांचे प्राण वेळेत वाचवणाऱ्या निस्वार्थ रेसिडेंट डॉक्टर्सना होतो. मुळात सर्वात कनिष्ठ पदावर काम करत असलेले हे रेसिडेंट डॉक्टर्स अहोरात्र रुग्णसेवेत गुंतलेले असतात. प्रथम वर्षात त्यांना वैयक्तिक, पारिवारिक आयुष्याचा पूर्णपणे विसर पडलेला असतो असे त्यांच्या दैनंदिनीचा आढावा घेतल्यास जाणवते.

गडचिरोलीच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना किरकोळ आजारामुळे दगावणारे रुग्ण, ३-४ ग्रॅम हिमोग्लोबिन असताना प्रसव काळात अचानक दवाखान्यात भरती होणाऱ्या स्त्रिया, वॉर्डात काम करत असताना रक्ताअभावी सिकलसेल क्रायसिस मध्ये वेदनेने व्हिवळणाऱ्या लहान मुला-मुलींच्या वेदनेच्या आर्त किंकाळ्या केवळ मन भेदून जात नाहीत तर त्या हतबल वैद्यकीय पेशाच्या मर्यादा अधोरेखित करतात. छत्तीसगढ राज्य निर्मिती झाल्यानंतर काही कोटी खर्चून बांधलेल्या अत्याधुनिक सिकलसेल रिसर्च सेंटर द्वारे सिकलसेल प्रिव्हेन्शन ते ट्रीटमेंट केल्या जात असल्यामुळे त्या भागातील सिकलसेल रुग्णांचा जीवनस्तर दखल घेण्यायोग्य प्रमाणात सुधारला आहे. मात्र गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या पूर्व विदर्भ सिकलसेल पट्ट्याच्या नशिबात केवळ पिळवणूक लिहिली गेली असल्याचे सतत जाणवते.

कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. मात्र रुग्ण वाढीला लागल्यानंतर उपाययोजना आखल्या जात आहेत. मुळात अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी अद्ययावत आरोग्य यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे व हे केवळ तुमच्या-आमच्या सजग असल्याने होणार आहे. आपल्या देशात ग्रामपंचायत पासून ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरोग्य हा विषय कधीच नव्हता. म्हणून आरोग्य यंत्रणेची झालेली हेळसांड, राहिलेल्या त्रुटी, कुपोषणाचे लाखो बळी, साध्या हगवणीपासून ते टीबी व इतर दुर्धर आजारांनी दगावणारे हजारो बळी, गरोदर आणि प्रसव काळात दगावलेल्या माता, नवजात बालके या सर्वांचे खापर सरकारच्या माथी फोडून चालणार नाही. या सगळ्यांचा दोष आपल्या सर्वांचा आहे आणि तो सरसकट स्वीकारून वाटून घ्यावा लागणार आहे.

कनिष्ठ व वरिष्ठ, शासकीय-निमशासकीय व खाजगी डॉक्टरांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या न सुटणाऱ्या समस्यांविषयी विचारले असता त्यांचे अल्प राजकीय वजन व डॉक्टरांची राजकीय अनास्था कारणीभूत आहे तसेच वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे गोंधळ निर्माण होतो अशा तक्रारींचा सूर नेहमीच असतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये रुग्णसेवेसह ज्यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित्त डॉक्टर्स डे साजरा केला जातो अशा पश्चिम बंगालचे द्वितीय मुख्यमंत्री आणि थोर स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत डॉक्टरांचा सहभाग वाढावा व भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय पोलीस सेवांसारख्याच ‘भारतीय वैद्यकीय सेवा’ अस्तित्वात येऊन डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लागावेत व भारत केवळ रुग्णसेवाच नव्हे तर वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये सुद्धा असीमीत प्रगती करून जगातील सर्वोच्च वैद्यकीय महासत्ता म्हणून उदयास यावा याच जागतिक डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा!


लेखक केईएम मार्डचे अध्यक्ष आहेत.

First Published on: July 1, 2020 4:32 PM
Exit mobile version