सारे प्रवासी गडबडीचे!

सारे प्रवासी गडबडीचे!

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय सांधेजोडणीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते करण्यासाठी जी काही उलाढाल झाली ते पाहता सध्या पक्षीय राजकारणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ काँग्रेसी असलेल्या शरद पवारांनी आपल्या इच्छाआकांशा आणि महत्वाकांक्षेसाठी स्थापन केला. त्यामुळे त्यांची विचारसरणी ही काँग्रेसशी मिळती जुळती आहे. या दोन्ही पक्षांचे मंडळी स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात. आम्ही जाती धर्मावरून होणार्‍या भेदाला थारा देत नाही, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे शिवसेनेला ही मंडळी दूर ठेवत असत. कधी काळी हे दोन पक्ष शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील, याची कल्पना दुसर्‍यांनी सोडाच या पक्षातील नेत्यांनीही केली नसेल, पण जे अकल्पित होते ते प्रत्यक्षात उतरले आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ शिवसेनेला सोबत घेतले नाही, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला आणि त्यांना महत्त्वाची खातीही घ्यायला परवानगी दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी इतकी उदारता का दाखवली, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्याचे उत्तर एकच आहे की, त्यांना भाजप आणि पर्यायाने शक्य असेल त्या मार्गाने नरेंद्र मोदी या व्यक्तीला आवर घालायचा आहे.

महाराष्ट्र त्यातही पुन्हा पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची धुळधाण उडाली होती. तेव्हा एकट्या महाराष्ट्राने काँग्रेसला तारले होते. अर्थात, त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते. महाराष्ट्रात काँग्रेसला भरघोस यश मिळालेे होते. तेव्हा प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी एक मार्मिक आणि बोलके व्यंगचित्र काढले होते. त्यात डोंगरावरून एक शिळा लहान मुलाच्या दिशेने गडगडत येत असते. तो मुलगा घाबरलेला असतो. तेव्हा आकाशातून एक सुपरमॅन येतो. तो ती शिळा आपल्या हातांनी अडवतो. लहान मुलाला राजीव गांधींचा चेहरा लावण्यात आलेला होता, तर सुपरमॅनला शरद पवारांचा चेहरा लावण्यात आलेला होता. तेव्हा दूरवरून दोन मुंग्या हे पाहत असतात. एक मुंगी दुसरीला विचारते, हे कसं शक्य झालं तर ती सांगते, ‘शुगर पॉवर’. महाराष्ट्रातील काँग्रेसचे सगळे राजकारण हे या साखरशक्ती भोवतीच फिरत राहिलेले आहे.

काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच हक्काचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या झुंजार नेत्याने तो बालेकिल्ला फोडण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. २०१४ च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अक्षरश: धुळधाण होऊन दोन आणि चार खासदार निवडून येण्या इतकी दुर्दशा झाली. मोदी लाटेने सगळे साफ धुवून नेले होेते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोदींचा भलताच धसका घेतला. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही थोड्याबहुत फरकाने तीच परिस्थिती झाली. मोदींची महाराष्ट्रावर घट्ट होत जाणारी पकड कशी ढिली करायची, असा प्रश्न काँग्रेस अणि राष्ट्रवादीपुढे होता. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मदत घेऊन भाजप सत्तेवर आली तरी त्यांना सत्तेत पुरेसे स्थान नसल्यामुळे त्यांची भाजपविरोधात अखंड आगपाखड सुरू होती. शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत होती. त्यामुळे त्यांच्या मनात भाजपविषयी प्रचंड असंतोष खदखदत होता. पण शिवसेनेच्या जागा कमी असल्यामुळे त्यांना काहीच पर्याय नव्हता. आमचे राजीनामे आमच्या खिशात आहेत, हे शिवसेनेच्या मंत्र्यांनी वारंवार सांगणे हास्यास्पद होऊन बसले होते. तुम्ही राजीनामे कधी देणार, असे पत्रकारांनी विचारल्यावर आम्ही वेळ आली की देऊ, असे ते सांगत, पण भाजपपासून फारकत घेण्याची वेळ काही येत नव्हती. शेवटी ती वेळ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आली.

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आम्हाला लोकसभा निवडणुकीत युती करताना विधानसभेत मुख्यमंत्रिपदाचे वचन दिले होते, त्यामुळे त्याचे त्यांनी पालन करावे, असे शिवसेनेचे म्हणणे होते, पण आम्ही असा काही शब्द दिला नव्हता, असे भाजपचे म्हणणे होते. शेवटी भाजपविषयी जी शिवसेनेच्या मनात पाच वर्षे खदखद होती, त्याचा स्फोट झाला. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवायचाच, असा निर्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मदतीने त्यांनी काँग्रेसचेही मन वळविले आणि राज्याची सत्ता काबीज केली. यात शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत राज्याची सत्ता मिळवायची होती, दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना निष्प्रभ करायचे होते. कारण महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य भाजपच्या हातून जाणे हा नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का होता. महाराष्ट्रात मोदी लाट चालते, हा समज त्यांना खोटा ठरवायचा होता. त्यात येनकेन प्रकारेन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यशस्वी ठरले.

आता मुद्दा असा आहे की, केवळ मोदी विरोधावर एकत्र आलेली ही मंडळी पुढे किती काळ सत्ता चालवणार हा आहे. कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना फार वेळ आपल्या खांद्यावर घेत नाही. कारण त्यात त्यांचे नुकसान होत असते आणि प्रादेशिक पक्ष अधिकाधिक मजबूत होत असतो. शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सत्तेत काँग्रेस सहभागी झाली असली तरी त्यांची राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्वस्थता जाणवू लागली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट करून ती दाखवून दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि सोनिया गांधींचे विश्वासू आहेत, त्यामुळे ते बेजबाबदारपणे कुठलेही विधान करणार नाहीत. तसेच कुठलेही कारण नसताना अनाठायी बोलणे हा त्यांचा स्वभाव नाही. ज्या अर्थी ते बोलत आहेत, त्याचा अर्थ त्यांना सोनिया गांधींचे काही तरी निर्देश असावेत. त्यातूनच यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१४ साली काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला होता, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यावर शिवसेनेने तसा पुरावा त्यांनी द्यावा असे म्हटले आहे. थोडक्यात, काय तर मोदींना रोखण्यासाठी शिवसेनेसारख्या वेगळ्या विचारसरणीच्या पक्षाला सोबत घेऊन तीन पक्षांनी उभा केलेला डोलारा आता हलू लागला आहे. या तिघांनी एकत्र राहण्यामागे मोदीविरोध हा प्रमुख मुद्दा आहे. संजय राऊत तर देशभरातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करून शरद पवार यांना पुढचे राष्ट्रपती करायला निघाले आहेत. प्रादेशिक आघाडी बनवताना ते विसरत आहेत की, अशी आघाडी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला रुचणारी आणि पचणारी नाही.

First Published on: January 23, 2020 5:36 AM
Exit mobile version