हिंदुत्ववाद्यांचा नेहमीच दुहीने केला घात!

हिंदुत्ववाद्यांचा नेहमीच दुहीने केला घात!

महाराष्ट्रातील राजकीय पातळीवर सध्या जे काही आक्रमक रणकंदन सुरू आहे, ते पहिल्यावर असे लक्षात येईल की, अनेक मुसलमान आक्रमकांनी तसेच पुढे ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या आक्रमकांनी भारताचे जेवढे नुकसान केले नसेल तेवढे येथील हिंदूंमधील दुहीने केलेले आहे. बाहेरच्या आक्रमकांनी इथल्या हिंदूंमधील दुहीचा फायदा घेतला आणि इथे आपले राजकीय बस्तान बसवले. अगदी इसवी सनापूर्वीही असेच दिसेल ज्यावेळी ग्रीकचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्याच्या मोहिमेवर असताना भारतात आला तेव्हा त्याचे येथील पुरू या राजाशी युद्ध झाले, पण त्याच्या शेजारी असलेला अंबी हा पुरूच्या मदतीला गेला नाही. अलेक्झांडर हा दूरच्या देशातून आलेले परकीय आहे, आपला जवळचा असलेल्या पुरूची आपण मदत केली पाहिजे असे त्याला वाटले नाही. भारतासारख्या हिंदूबहुल देशाला बाहेरून आलेल्या मूठभर आक्रमकांनी वर्षांनुवर्षे अंकित करून ठेवले याला हिंदूंमधील दुही आणि भाऊबंदकी नेहमीच कारणीभूत राहिलेली आहे.

पानिपतच्या तिसर्‍या युद्धात अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशहा अब्दालीकडून मराठ्यांचा पराभव झाला. त्यावेळी अहमदशहा अब्दालीला कुणी तरी विचारले की, समजा या युद्धात मराठे जिंकले असते तर काय झालं असतं, त्यावर तो म्हणाला, मराठ्यांचा जो पराभव झालेला आहे, तोच मुळात त्यांच्यातील दुहीमुळे झालेला आहे. मी अफगाणिस्तानचा बाहदशहा मुख्य नेता रणमैदानात आहे. मराठ्यांचा मुख्य नेता नानासाहेब पेशवे पुण्यात आहेत. शिंद्याचे होळकरांशी पटत नाही. शिंदे आणि होळकरांचे पेशव्यांशी पटत नाही. होळकर ज्याला मानसपुत्र मानतात त्याच नजीब खानाने मला भारतात बोलवून आणले. त्यानेच माझा विजयासाठी पोषक परिस्थिती निर्माण केली. अशी सगळी परिस्थिती असताना समजा मराठ्यांचा विजय झाला असता तरी पुण्यापर्यंत ते पोहोचलेच नसते, त्यांनी आपापसात लढून एकमेकांना संपवले असते, सदाशिवराव भाऊ पुण्यापर्यंत पोहोचू शकले नसते. हा सगळा वृत्तांत विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’ या पुस्तकावर आधारीत ‘रणांगण’ या नाटकातील आहे. अब्दालीचे हे तंतोतंत शब्द नसतीलही, पण त्यातील भावार्थ चुकीचा ठरवता येणार नाही. कारण त्याला पुष्टी देण्यार्‍या अनेक घटना घडलेल्या होत्या.

हा सगळा इतिहास सांगण्याची गरज अशी की, इतिहास आपली पुनरावृत्ती करत असतो. महाराष्ट्रात सध्या तसेच होताना दिसत आहे. मराठ्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार करून अटकेपार झेंडे रोवले होते. महाराष्ट्र हे देशाचे बलस्थान आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. घातपात करणार्‍या अतिरेक्यांचा डोळा मुंबईवर असतो. या अशा या महाराष्ट्राबद्दल लोकनेते सेनापती बापट यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, अशा या महाराष्ट्रात राजकीय पातळीवर सध्या स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला सत्तेचा हव्यास हेच एकमेव कारण आहे. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या रक्षणासाठी 35 वर्षांपूर्वी एकत्र येऊन त्यांनी युती केली. कारण राज्यात आपली एकट्याची सत्ता येणे अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आले. या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्था आणि राज्यात युतीची सत्ता आली.

पण पुढे नरेंद्र मोदी यांनी केंद्रात भाजपला बहुमत मिळवून दिल्यावर भाजपला महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री असावा, असे वाटू लागले. त्यातूनच युती तुटली आणि मग सगळे महाभारत सुुरू झाले. आमची युती ही सत्तेसाठी नसून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे, असे लोकांना जाहीरपणे सांगणारे शिवसेना-भाजप सध्या एकमेकांना संपविण्यासाठी उतावीळ झालेले आहेत. मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची दोन शकले पडली आहेत. त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणत कार्यकर्त्यांची अवघड अवस्था होऊन बसली आहे. ज्यांनी मराठी माणसांच्या हितासाठी हातात हात घालून काम करावे, तेच भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. कालपर्यंत व्हिडिओ लावून मोदी आणि भाजप यांची पोलखोल करणारे राज ठाकरे सध्या आपली भूमिका सडेतोडपणे मांडत आहेत, ती भाजपला पोषक ठरत आहे. त्यामुळे भाजपचे नेते राज यांच्या भेटीगाठी घेण्यात आनंद मानत आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिलेला आहे. ३ मेच्या अल्टिमेटमनंतर याला हनुमान चालिसाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच औरंगाबाद येथे सभा घेण्यावर राज ठाकरे ठाम असल्यामुळे राज्यातील वातावरण बिघडू नये, म्हणून महाविकास आघाडीतील मंत्र्यांची धावपळ सुरू आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा आता केवळ राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर जाऊन पोहोचलेला आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि भाजपनेही भोंग्यांचा मुद्दा लावून धरल्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. सुरुवातीला सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही.

पण भोंग्यांचे गांभीर्य वाढत चालले असल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सगळ्या पक्षांच्या नेत्यांची भोंग्यांबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत यांनी मुस्लीम समाज दुखावला जाणार नाही, अशा प्रकारची सुरक्षित भूमिका घेत चेंडू पंतप्रधान मोदींचा बाजूला ढकलून दिला. सरकार मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याचा सल्ला देऊ शकते, पण भोंगे उतरवू शकत नाही, भोंग्यांविषयीचे राष्ट्रीय धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, असे सांगून पाटलांनी हात वर केले. त्यांनी ती जबाबदारी मोदींवर ढकलली आहे. तर दुसर्‍या बाजूला काही इमाम, मुल्ला, मौलवी

आम्ही भोंग्यांचा आवाज एक वेळ कमी करू, पण भोंगे उतरवणार नाही, यावर ठाम आहेत. राज्य सरकारने आम्ही भोंगे उतरवू शकत नाही, असे म्हटल्यामुळे मौलवींना अधिक बळ मिळाले आहे. मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होत आहे, आता इतकी वर्षे झाली, भोंगे उतरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला, तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. भोंगे अजून तसेच आहेत. भोंगे उतरवण्याची मागणी करणारा मराठी, त्याला पाठिंबा देणारा मराठी, त्याला विरोध करणारा मराठी, अशी परिस्थिती आहेे. मुस्लिमांना काहीच करावे लागणार नाही.

त्यांना फक्त आपल्या भूमिकेवर ठाम रहावे लागणार आहे. कारण भोंग्यांवरून तीन मराठी पक्षांमध्ये संघर्ष होणार आहे. तो संघर्ष आता पराकोटीला जाताना दिसत आहे. सुरुवातीला टीका टिपण्णी, आरोप प्रत्यारोपांपर्यंत मर्यादित असलेल्या गोष्टी आता रस्त्यावरील हाणामारीपर्यंत येऊ लागल्या आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी पिच्छा पुरवल्यामुळे हैराण झालेल्या शिवसेनेने भाजपचे नेते मोहीत कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. राणा दाम्पत्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला केला. ठाकरे सरकारचा अवमान केल्यामुळे राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता या सरकारशी चर्चा करण्याची स्थिती राहिलेली नाही. ते ठोकशाहीने वागत असतील तर आम्हीही तशाच प्रकारे ठोकशाहीने उत्तर देऊ, असे स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्य सरकारला आक्रमक प्रत्युत्तर द्यायचे ठरवले, तर शिवसेनेसोबत त्यांचा तुंंबळ संघर्ष होईल, असे दिसते. त्यात भाजपच्या बाजूने मनसैनिक उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शिवसेनेसारखा रस्त्यावर उतरून ताकद दाखवणारा कार्यकर्ता त्यांच्याकडे आहे. तो भाजपकडे नाही, त्यात पुन्हा भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या आक्रमकपणामुळे त्यांचेच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकेकाळी हिंदुत्वाच्या नावाने शपथा वाहणारी मंडळी आज सत्तेसाठी एकमेकांचे रक्त वाहण्यासाठी उतावीळ झालेले आहेत. महाराष्ट्रात असा संघर्ष पुढील काळात उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्या महाराष्ट्रात राजकीय उद्रेक झाला तर त्या जबाबदारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सल्लागार अमित शहा यांना हात वर करून चालणार नाही. राज्यातील भाजप नेते मोदींच्या आदेशाच्या बाहेर नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या अडीच वर्षात त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जंग जंग पछाडले, पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे भाजपला एक प्रकारचे वैफल्य आलेले आहे. मोेदींनी या भाजप नेत्यांना दमाने घेऊन विरोध करायला सांगितला असता, तर राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती. राज्यातील भाजप नेत्यांनी शांतपणे विरोध चालवला असता तर ठाकरे सरकार अंतर्गत विरोधाने कोसळले असते, पण भाजपने सातत्यपूर्ण विरोध केल्यामुळे सरकार अधिक मजबूत होत आहे. त्यांचा संघटितपणा अधिक बळकट होत आहे.

सरकार पडत नसल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे वैफल्य दिसून येत आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत ठाकरे सरकार पडायला हवे आहे, म्हणूनच ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. उद्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यानंतर निवडणूक लागली तर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावरून मराठी लोक लढणार आहेत. यातून उभा महाराष्ट्र एक राजकीय वादळात सापडणार आहे. त्या वादळातून त्याची सुटका करणे अवघड होईल. त्यामुळे मोदी आणि शहा यांनी खरे तर राज्यातील भाजपच्या नेत्यांना संयमाचे डोस द्यायला हवे होते. मोदी सरकारने देशभर कोरोना लशींचे मोफत डोस देऊन सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला. पण ते राज्यातील नेत्यांना संयमाचे डोस पाजायला विसरले.

भाजपचे नेते शांततेने सरकारची पोलखोल करत राहिले असते, तर विरोधक म्हणून त्यांची प्रतिष्ठा टिकून राहिली असती. पण त्यांनी जो आक्रस्ताळीपणा चालवला आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही बरीच खालावली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बरेच अंतर्गत मतभेद आहेत, पण मोदी विरोधासाठी ते संघटित होत आहेत. दुसर्‍या बाजूला भाजप नेत्यांनी केंद्राच्या सहाय्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेरीस आणले आहे. त्यातूनच पुढील काळात महाराष्ट्रातील तीन हिंदुत्ववादी पक्ष आपापसात लढतील. या यादवीमुळे हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍या या तिन्ही पक्षांचे अतोनात नुकसान होईल. हिंदुत्ववाद्यांच्या या यादवीकडे पाहणार्‍या मोदींचा तो एक हिंदुत्ववादी नेता म्हणून नैतिक पराभव असेल.

First Published on: April 28, 2022 4:45 AM
Exit mobile version