विवेकाची पेरणी करण्यात शिक्षणसंस्थांचे अपयश!

विवेकाची पेरणी करण्यात शिक्षणसंस्थांचे अपयश!

देशात राजकारणासाठी अनेक मुद्दे असताना अलिकडे शिक्षण हाही राजकारणाचा विषय बनत आहे. हिजाबवरून कर्नाटकात शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रातही त्याचे काही प्रमाणात पडसाद उमटले. उच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असेही सुनावले. या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याचवेळी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर आचार, विचार स्वातंत्र्याचा मुद्दादेखील चर्चेसाठी समोर आला. शिक्षणात धार्मिकतेचा विचार नको. सर्वांसाठी गणवेश सक्तीचे असावा, असे बरेच मुद्दे समोर आले. एकाचवेळी दोन धर्मांचे विद्यार्थी समोरासमोर आल्यानंतर काय घडते याचा कटू अनुभव देशाला पहावा लागला. ज्या वयात विवेकाची पेरणी करत विश्व समजावून घ्यायचे त्या वयात धर्माची पाऊलवाट चालणे पसंत करणे हे अनाकलनीय आहे.

खरेतर राज्यघटनेने आचार, विचार स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याप्रमाणे जगण्याचे अधिकार प्रत्येक धर्माच्या आणि जातीच्या नागरिकाला दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचरणाप्रमाणे वर्तन करण्याचा, पंरपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने प्रत्येक धर्मीयांना दिले आहे. जे राज्यघटनेने दिले आहे ते त्यांना उपभोगण्यासाठीचे स्वातंत्र्य देण्यास काय हरकत आहे? कोणी कोणाच्या खासगी जीवनात कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करू नये हे खरेच, पण आपले अधिकार उपभोगत असताना त्याचा परिणाम इतरांच्या जीवनावर होता कामा नये याची काळजीदेखील घेण्याची गरज असते. शिक्षणातून साक्षरतेचा आलेख उंचावत असताना देशात अशा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊ लागतात तेव्हा हा विवेकी दृष्टीचा अभाव आहे हे निश्चित. शिक्षणातून विचार करण्यास प्रवृत्त करणारी पाऊलवाट आणि विवेकी वाट चालणारी दृष्टी देण्यास कमी पडलो हेच या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे कोणी काय म्हटले आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता किमान शिक्षणातून यायला हवी. तेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ते झाले नाही तर अशा घटना हळूहळू मोठे स्वरूप प्राप्त करणारच. त्यातून समाजाच्या विकासाची प्रक्रिया गतीहीन होण्याची शक्यता अधिक आहे.

देशात शिक्षणाचा आलेख उंचावत असताना अशी एखादी घटना भोवतालात घडावी. त्या घटनेकडे विवेकाने न पहाता ती घटना देशभर पसरवली जावी, आंदोलन उभे राहावे हे अनाकलनीय आहे. शिक्षणाने चांगले, वाईट या संदर्भाने विचार करण्याची शक्ती मस्तकात भरायची असते. ती भरण्यात आपण कमी पडलो आहोत. शिक्षणातून ज्ञान लादले जात आहे, पण विचार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया होताना दिसत नाही. कोणतीही घटना चांगली वाईट हे आपल्या पंरपरा, पूर्वग्रहावर न ठरविता ती विवेकाने निश्चित करता यायला हवी. आपण कोणत्याही धर्मातील असलो तरी विचार मात्र विवेकाने करता यायला हवा. न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले होते की, आपण प्रतिष्ठा गमावून बसलो आहोत. आपली नजर नको ते न्याहाळण्यासाठी वखवखली आहे. आपले कान शेजारी पाजारी यांच्या संदर्भाने उठणार्‍या कंड्या ऐकण्यासाठी आसुसले आहेत. आपल्या जीभा अभक्षणीय फळाची चव चाखण्यासाठी आतूर झाल्या आहेत. हात दुसर्‍याचे धन हिसकावून घेण्यासाठी वळवळत आहेत. आपण पांगुळगाड्याच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे सारे वातावरण आता अधिक गडद होताना दिसते आहे आणि ते अधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे.

रानडे यांनी जे म्हटले होते, त्या संदर्भातील विचार आज त्यांच्या द्रष्टेपणाची ओळख सांगत आहेत. रानडे यांनी त्यावेळी जे दूरदर्शीपणे सांगितले होते, त्याचा विचार नव्याने करण्याची गरज आहे. त्यांनी ज्या सामाजिक विकृतीची भीती व्यक्त केली होती, त्यांना अधिक वाढणार नाही, त्याला पायबंद बसेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. समाजात जे जे वाईट आणि विकृत आहे ते दूर करणे हेच शिक्षणाचे काम आहे. विवेकाची पेरणी शिक्षणातून केली गेली तर समाजात संधी साधून दुफळी माजविणार्‍या कोणालाही मोठे होता येणार नाही. कोणीतरी अल्पशिक्षित माणूस आवाहन करतो आणि ते अविवेकाचे, समाज, राष्ट्र आणि विद्यार्थ्यांचे अहित करणारे आहे की, हित साधणारे आहे याचा विचार न करता गर्दी उभी राहते. आंदोलनासाठी रस्त्यावर विद्यार्थी येतात तेव्हा तो शिक्षणाचा पराभव म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकातील आशय शिकवून मार्क्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे एवढेच नाही.

आपण जे शिकतो आहोत त्याचा संदर्भ जगण्याशी जोडणे आहे. त्या आशयाला जीवनाच्या प्रगतीच्या दिशेने जोडणे गरजेचे असते. आज शिक्षणात जे काही शिकतो आहोत. त्याचा संबंध जीवनाशी नाते सांगत नाही. केवळ परीक्षेपुरते शिकणे होत असल्याने आणि शिक्षक, पालक यांनाही माणूस घडविण्यापेक्षा मार्कांचा आलेख उंचावण्यासाठी ज्या शाळा प्रयत्न करतात त्याच अधिक स्मार्ट वाटू लागल्या आहेत. त्यामुळे समाजात अशा घटना घडल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला प्रतिसाद मिळत जातो. त्यातून समाज,राष्ट्राचे आपल्या वर्तनाने काही अहित घडते का? याचा विवेकही गमावला जात आहे, असे अनेक घटनांतून वारंवार समोर येत आहे. समाजाचे जेव्हा विवेक, विचार आणि शहापणापासून दुरावणे होते तेव्हा भावनाचा खेळ सुरू होतो. विवेक हटला की विकार समाजमनावर अधिराज्य करत जातो. अशी दूरवस्था निर्माण झाली की समाजाच्या संवेदना बोथट होतात. समाज असंवेदनशील बनणार असेल तर त्यातून राष्ट्र व समाजाला धोका निर्माण होतो. समाजात ज्या शिक्षणाने विचार पेरायचे ते शिक्षणही मग अविवेकाची वाट चालू लागते. तेथे विचाराची पेरणी होण्याचे थांबते.

जिथे जिथे विवेक, शहाणपण असते तेथे धर्माच्या भिंतीपेक्षा माणूसपण अधिक महत्वाचे वाटते. मग माणुसकीसाठी आपण कोणत्या धर्माचे आहोत हे लक्षात घेण्याची गरज पडत नाही. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी काही आठवणी जागविल्या होत्या. त्या संदर्भाने त्यांनी म्हटले आहे की, राजकोटमध्ये एका बिशपांनी ख्राईस्ट महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलविले होते. त्यांच्या घरी असलेल्या प्रार्थना सभागृहात जगातील सर्व धर्मीय भावनाचा उत्तम आदर केलेला होता. त्याचवेळी तेथून जवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिरात येण्यासाठीचे निमंत्रण आले मी ते स्वीकारले. मी तिकडे जाणार म्हटल्यावर बिशपही माझ्याबरोबर येतो म्हणाले आणि येण्यास तयार झाले. त्यावेळी मंदिरातील व्यवस्थापनाने तिघांच्या मस्तकी तिलक लावण्यात आला. खरेतर तिघांचे धर्म भिन्न होते, पण धर्माचा खरा विचार कळाला की, धर्माच्या भिंती गळून पडतात. माणूसपणाच्या हृदयांने जोडणे घडते. कलाम ज्या महाविद्यालयात शिकत होते तेथे जगातील राष्ट्रपुरूष, धर्माचा विचार प्राचार्य अतिरिक्त तासांच्या माध्यमातून समजावून सांगत होते.

शिक्षणाने त्यांना विविध धर्मीय विचार दिले, पण त्यातून त्यांनी उत्तम ते स्वीकारत स्वतःची उंची निर्माण केली. जगातील कोणताही धर्म हा माणसात द्वेष, मत्सर, राग, अंहकार निर्माण करण्याची भूमिका घेत नाही. संत ज्ञानेश्वरांनीदेखील म्हटले आहे की, संत तिथे विवेक असणे केजी. तो विवेक पेरला गेला होता. महाराष्ट्रातील मातृहृदयी लेखक साने गुरूजी यांनी धर्माचा विचार सांगताना म्हटले होते की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा भाव आपण शाळा-महाविद्यालयात रूजविण्याची गरज वर्तमानात अधिक अधोरेखित करताना दिसत आहे. सामान्य माणसांच्या जीवनात धर्माचा फारसा प्रभाव नसतो. कोरोनाच्या काळात अनेक मुस्लीम धर्मीय लोकांनी हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार केल्याची उदाहरणे माध्यमातून पुढे आले होती. हिंदूनी मुस्लिमांसाठी मदतीचा हात दिला.

आज ग्रामीण भागात हिंदू आणि मुस्लीम समाजाची कुटुंबे एकत्र राहतात. त्यांच्यात होणारी देवाणघेवाण त्यांच्यातील बंधूभाव दाखवतो. मात्र सध्या हिजाब परिधान करण्यावरून जो संघर्ष सुरू आहे, असे काही समोर आले की मग मने अधिक धार्मिक आणि कट्टर होण्याचा धोका निर्माण होतो. ही कटूता आणि कट्टरता व्यापक समाजहित आणि देशाच्या प्रगतीसाठी मारक असते. त्यामुळे शिक्षणातून धर्मनिरपेक्षतेचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेने पेलण्याची निंतात गरज आहे. ती धर्मनिरपेक्षता म्हणजे जगातील सर्वधर्माचा सन्मान करणे आहे. आपलाच धर्म खरा असे नाही हेही लक्षात घ्यायला हवे. स्वामी विवेकानंद 1893 ला शिकागोच्या परिषदेत माझ्या बंधू आणि भगिनींनो, असे म्हणत धर्माचा खरा विचार पेरला होता. तो वर्तमानात पेलला गेला नाही तर समाजव्यवस्था घनदाट अंधाराच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता आहे.

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. शाळा महाविद्यालयात ज्ञानापेक्षा धर्म मोठा ठरू नये. धर्म ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्याचे दर्शन आणि प्रदर्शन घडू नये. सार्वजनिक जीवनात आपण केवळ भारतीय असायला हवे. धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा आदर करणे असते. धर्माच्या आधारे एकमेकांवर हल्ले करणे नाही.

First Published on: February 23, 2022 5:00 AM
Exit mobile version