अशीच एक दहशत होती… रामन राघवनची!

अशीच एक दहशत होती… रामन राघवनची!

आज संपूर्ण जग कोरोनासुराच्या दहशतीखाली आहे. तो वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या रंगाची, धर्मांची माणसे खात सुटला आहे. त्याचा वध कसा करायचा? सगळ्या जगाच्या हालचाली त्याने बंद केल्या आहेत. चंद्रावरच काय, शनी आणि मंगळावरही पोहोचू शकणारा माणूस आज इथेच हतबल झाला आहे. हे संकट मानवनिर्मितच आहे यावर ‘अनेकांचे एकमत’ आहे. अशाच एका मानवाच्या क्रौर्याने, ५२ वर्षांपूर्वी ही मुंबई गोठवून टाकली होती. दहशतीने ठप्प केली होती. रामन राघवन हे त्याचे नाव!

सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करणारा रामन राघवन हळूहळू अत्यंत क्रूर आणि विकृत खुनी बनला. पैशाच्या लालचीने तो खून करायचा असे म्हटले तर तो अत्यंत गरीब, मोलमजुरी करणाऱ्या, झोपडीतल्या माणसांचे खून करीत होता. १४ दिवसांच्या बालकापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत तो कुणालाही सोडत नव्हता. तो अत्यंत नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने खून करीत असे. त्यासाठी त्याने प्रश्न चिन्हाच्या आकाराचे ‘?’ या आकाराचे लोखंडी हत्यार बनवून घेतले होते. त्याने २ सत्रांमध्ये हे खून केले. आधी घाटकोपर परिसरामध्ये आणि नंतर जोगेश्वरी, शांताराम तलाव, पठाणवाडी, कांदिवली, दहिसर भागामध्ये त्याने हे खून केले.

१९६५ ते १९६८ या काळामध्ये रामन राघवनने सुमारे ४२ माणसांवर हल्ला केला. त्याने हे सर्व खून रात्रीच्या वेळीच केले. हल्ला केला म्हणजे तो मेलाच असे तो समजत असे. त्याने तसे नंतरच्या कबुलीजबाबात सांगितले. त्यातील सुमारे २२ जण गंभीर जखमी झाले पण वाचले, २० जण मात्र मृत्युमुखी पडले. त्याला अटक झाल्यावर त्याने दिलेल्या जबाबात, तो “उपरका कानून”, “उपरसे ऑर्डर” आल्यामुळे खून केल्याचे सांगे. तो सिद्धी देवीचा भक्त होता आणि तिच्या आज्ञेने तो खून करीत असे असेही सांगे. त्याला सिद्धी दलवाई, अण्णा, तंबी, वेलुस्वामी अशा अनेक नावांनी ओळखले जात असे. मुंबईत अशा अत्यंत क्रूरपणे होणाऱ्या या खुनांमुळे पोलीस खात्याची झोप उडाली होती. सामान्य माणूस तर पार हतबल झाला होता.

हा खुनी कुणी माणूस नसून तो आत्मा किंवा भूत आहे, तो अचानक मांजर किंवा कुत्र्याचे रूप घेऊन हल्ला करतो अशा अफवा पसरल्या. काळोख पडल्यावर रस्ते, बागा, दुकाने ओस पडू लागली. रात्रीचे सिनेमांचे शोज, हॉटेल्स रिकामी राहू लागली. लोक ऑफिसांमधून लवकर घरी परतत असत. त्यावेळी टेलिफोन खूपच कमी होते. टीव्ही अस्तित्वातच नव्हता. मोबाईलही नव्हते. त्यामुळे खोट्या ब्रेकिंग न्यूज नाहीत, आक्रस्ताळे निवेदक नाहीत, नळावरच्या भांडणांसारख्या “विद्बवानांच्या” रोखठोक वगैरे चर्चा/महाचर्चा असे काहीच नसायचे. याचा चांगला परिणाम म्हणून लोकं प्रत्यक्षच जमून उपाय योजनांवर चर्चा करीत. काही विज्ञानवादी आणि आधुनिक मंडळी “भुताखेतांची शक्यता” जोरदारपणे फेटाळत असत. भुतांवर विश्वास ठेवणाऱ्यांची टर उडवत असत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरांमध्ये रात्रीची जनता गस्त, पहारा देणे सुरु झाले. जागोजागी, वस्त्यांमधून, सोसायट्यांमधून हातात काठ्या, हॉकीस्टिक्स घेऊन सामूहिक गस्त सुरु झाली. हातात लाठ्याकाठ्या घेतलेले शूर वीर, प्रत्यक्षात मनातून खूप घाबरलेले असत. गैरसमजातून कधीकधी एखाद्या भिकाऱ्याला किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या गरिबाला त्यांचा मार खावा लागत असे. तथाकथित भुताच्या बंदोबस्तासाठी, तोडगा म्हणून गरिबांच्या झोपड्यांवर काळ्या रंगात तीन फुल्या XXX काढल्या गेल्या.

आमच्या सोसायटीतही रात्रीची गस्त सुरु झाली. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत गस्त घातली जात असे. माणसांचे खरे स्वभाव कसोटीच्या क्षणीच कळतात. त्यावेळी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात मी शिकत होतो. तेव्हा मी NCC मध्येही असल्याने, खास काम म्हणून लोकांच्या ड्युटी आणि पोस्टिंग देण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. गस्त घालण्यासाठी लोकांच्या रात्री ९, १२, ३ वाजतांसाठी ३/३ तासाच्या बॅच असत. मी सगळ्याच बॅचमध्ये असायचो. माणसांच्या स्वभावातील अनेक गंमती, इतक्या तणावपूर्ण वातावरणातही पाहायला मिळत असत.

आमच्या शेजारी पेईंग गेस्ट म्हणून राहणारा एक रहिवासी एक दिवस मला म्हणाला, “तुला एक विनंती आहे, मला ड्युटी लावू नकोस”. मी विचारले, का बरे ?…तो म्हणाला, गावाला माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्यातच आहे. मी म्हटलं, अहो पुढच्या महिन्यात ड्युटी लावणार नाही. तो म्हणाला, तसं नाही. मी एकुलता एक आहे. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर आमचा वंश कसा वाढणार? त्याची ती गंभीर अगतिकता पाहून मला हसावे की रडावे हे कळेना. अरे इथे वाढलेल्या वंशांचे रक्षण करण्यासाठी आम्ही झटतोय आणि तू…..! जाऊ दे, मी त्याची ड्युटी रद्द केली, लोकांच्या शिव्याही खाल्ल्या. पण आनंदाची गोष्ट अशी की त्याचे लग्नही झाले आणि वंशवाढही भरपूर झाली.

दुसरे दोघेजण एकदा मला म्हणाले, अरे आम्हाला रात्रीची १२ ते ३ ची बॅच दिलीस आणि तीही बिल्डिंगच्या मागे? म्हटलं, अरे तुम्ही दोघे एकत्र आहात! ..मग कशाला भिता? ते म्हणाले, नाही रे, तो रामन राघवन म्हणे भूत होऊन कुणाचेही रूप घेऊन येतो. हेच दोघे गेली अनेक वर्षे, भूत पिशाच्च मानणाऱ्यांची खूप टिंगल करीत असत. पण स्वतःवर वेळ आल्यावर केवळ भुताच्या काल्पनिक भीतीनेच ते खूप घाबरले होते. तर काही मंडळी ड्युटी लावूनही येत नसत. घरी जाऊन विचारले तर त्यांच्या सौ. येऊन सांगायच्या की त्यांना ताप आलाय म्हणून ते झोपलेत….! या रामन राघवनच्या भुताच्या कल्पनेने सगळेच घाबरले होते.

५२ वर्षांपूर्वी आजच्या सारखी, हाताशी कसलीही आधुनिक सामुग्री नसताना मुंबईचे पोलीस मात्र त्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते….. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक व्यापक मोहीम हाती घेतली. त्याची सगळी सूत्रे त्यावेळचे एसीपी रमाकांत कुलकर्णी यांच्याकडे होती. रामन राघवनने विविध खून केलेला सर्व परिसर पोलीस पिंजून काढत होते. काही जणांनी त्याला प्रत्यक्ष पहिले होते. त्यांनी केलेले वर्णन, जुन्या पोलीस रेकॉर्डवरील छायाचित्रे यावरून हा खुनी रामन राघवनच आहे, हे कुलकर्णी साहेबांनी ओळखले होते. त्याला पकडायचे शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच, पोलीस इन्स्पेक्टर अॅलेक्स फियालो हे डोंगरी येथे रस्त्याने जात असताना, त्यांच्या समोरून येणारा रामन राघवन अगदी बाजूने गेला. फक्त एकच क्षण…. बस्स. फियालो यांना हा रामनच आहे याची खात्री पटल्यावर मोठ्या कुशलतेने त्यांनी त्याला पकडले. गणेश चतुर्थीचा दिवस होता तो! सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गणपती बाप्पानेच मुंबईवरचे हे अघोरी संकट दूर केले असे सगळ्यांना वाटले. आचार्य अत्रे यांनी पोलीस इन्स्पेक्टर अॅलेक्स फियालो यांना “मराठा” दैनिकाच्या कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला. नंतर प्रदीर्घ न्यायालयीन केस चालली. रामन राघवन दोषी ठरला. फाशीची शिक्षा अटळ होती. काही मानवतावादी मंडळींनी तो मनोरुग्ण असल्याची ओरड सुरु केली. वैद्यकीय तपासणीमध्ये तो मनोरुग्ण नसल्याचा अहवाल आला. मग पुन्हा दुसऱ्या समितीची नेमणूक, त्यांचा अहवाल, तो मनोरुग्ण असल्याचा आला! शेवटी त्याला फाशी ऐवजी जन्मठेप होऊन तो आमरण येरवड्याच्या तुरुंगात राहिला. बरोबर २५ वर्षांपूर्वी तो तुरुंगातच मरण पावला.

भारतीय सिनेसृष्टी एवढ्या मसालेदार कथानकाचा फायदा न घेती तरच नवल! यावर सव्वा तासाचा एक हिंदी चित्रपट, तामिळ, तेलगू, पुन्हा २०१६ मध्ये हिंदी चित्रपट आले. जपानी आणि रशियन भाषेतही यावर चित्रपट निघाले.

आज सरकारने कायदेशीर आणि लोकांच्या जिवासाठी फायदेशीर अशी संचारबंदी लागू करूनही लोकं संचार करतातच आहेत. पण तेव्हा मात्र संध्याकाळनंतर अत्यंतिक भयापोटी संचारबंदी आपोआपच लागू होत असे.

(माझ्या त्यावेळच्या आठवणीतून हे सर्व लिहिले असल्याने याच्या तपशिलात थोडाफार फरक होऊ शकतो. काही संदर्भ गुगल माहिती महाजालाच्या सौजन्याने. लेखातील छायाचित्रे तत्कालीन नियतकालिकांमधून साभार!)

First Published on: April 18, 2020 11:19 PM
Exit mobile version