महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले..

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले..

संपादकीय

जी मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्या देशाला उद्यमशीलतेमुळे आणि अर्थ निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देतो, त्या मुंबई आणि महाराष्ट्राला आज कोरोनाचा कहर झाल्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडलेली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध राज्यांकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. हा ऑक्सिजन बाहेरच्या राज्यांमधून रस्ते मार्गाने महाराष्ट्र आणि त्यांच्या विविध भागांमध्ये पोहोचेपर्यंत बराच उशीर लागेल, त्यामुळे केंद्र सरकारने हा ऑक्सिजन विमानाने महाराष्ट्रात तात्काळ आणण्यासाठी लष्कराला मदत करायला सांगावी, असे आवाहन केले आहे. याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कसा आणि किती वेळात प्रतिसाद देतात, हे पहावे लागणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील पथक आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आणि तो आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत असमाधान व्यक्त केले. इतकेच काय तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील सरकार हे वसुलीत गुंतले आहे, ते लोकांकडे लक्ष देत नाही, असा टोला लगावला होता.

सध्या केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध पाहता, केंद्राकडून कोरोनाच्या कठिण काळात राज्याला जी तात्काळ मदत हवी आहे, ती किती वेळात मिळेल याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे अनेक रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे. महाराष्ट्रात एक प्रकारे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झालेली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रुग्णाला इस्पितळात बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावा अक्षरश: हातापाया पडत आहेत, विनवण्या करत आहेत. लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे केंद्राला साकडे घालण्यात येत आहे. काळ अटीतटीचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. त्या कसोटीच्या काळात भाजपचे केंद्रातील सरकार राज्य सरकारला मदत करेल की, कसोटी पाहील, हे कळायला मार्ग नाही. कारण दीड वर्षांपूर्वी जेव्हा राज्यातील भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. त्याला शिवसेना कारणीभूत होती. कारण त्यांना त्यांचा मुख्यमंत्री बनवायचा होता. त्यापासून भाजपचा शिवसेनेवर राग आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील भाजपचे नेते जिथे संधी मिळेल ती पकडून ठाकरे सरकारला पेचात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

पण अजून तरी ठाकरे सरकार भाजपने लावलेल्या सापळ्यातून निभावून पुढे गेले. पण आता मात्र राज्यात कोरोनाचा जो काही कहर सुरू आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. यातूनच मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सायंकाळी साडेआठ वाजता राज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन सदृश्य संचारबंदी जाहीर केली. त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण हे नियम लागू करत आहोत, त्याला थेट लॉकडाऊन म्हणणार नाही, असे स्पष्ट केले. मागील गुढीपाडव्याला आपल्याला असे वाटले होते की, पुढील वर्षभरात कोरोनाचा प्रभाव कमी होत जाईल आणि हा गुढीपाडवा आपण सर्व खुलेपणाने आनंदात साजरा करू; पण तसे झाले नाही. उलट, यावर्षीचा गुढीपाडवा आपल्याला घरीच राहून साजरा करावा लागला. मुख्यमंत्र्यांनी लोकांना हे सांगताना महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीची कल्पना जनतेला दिली. त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. विशेषत: केंद्राकडून मिळणार्‍या लसींच्या प्रमाणात वाढ व्हावी, तसेच कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते, त्याचा तुटवडा भासत आहे.

मागील वर्षाच्या मार्चमध्ये जेव्हा देशभर मोठ्या प्रमाणात कहर सुरू झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. चीनमधून उद्भवलेला हा विषाणू पुढे जगभरात पसरेल आणि अख्ख्या जगाला जेरीस आणेल असे कुणाला वाटले नव्हते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्वाईन फ्लू, एबोला असे साथीचे रोग पसरले होते. पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तसेच कोरोनाच्या बाबतील होईल. कारण आता जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन झालेले असल्यामुळे त्यावर लवकरच प्रतिबंध करणारे औषध येईल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. कोरोनामुळे अनेक लोक बेजार होत होते, त्यातील बर्‍याच जणांचे बळी जात होते आणि आजही जात आहेत. या विषाणूपासून जीव वाचवण्यासाठी अगदी पटकन अवलंबण्यासारखा एकच उपाय सापडला होता, तो म्हणजे माणसांनी गर्दी करू नये.

एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावे, सॅनिटायझर वापरावे. कारण हा विषाणू संसर्गातून पसरतो, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय पुढे आला. मुळात माणूस हा समूहात राहणारा जीव आहे. तो फार काळ एकटा राहू शकत नाही. तसेच मानवी समाजाचे जगणे हे आर्थिक उलाढालीवर सुरू असते. ही उलाढाल विविध उद्योग आणि व्यवसायातून होत असते, त्यासाठी माणसे कंपन्यांमध्ये, धार्मिक सणसमारंभासाठी, देवळांमध्ये एकत्र जमतात, रेल्वे, बसगाड्या यामधून प्रवास करतात, अशा प्रकारे जेव्हा अनेक लोक एकमेकांच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात येतात तेव्हा त्यातून ज्यांना कोरोनाची लागण झालेली असते, त्यांच्यापासून हा आजार इतरांमध्ये पसरतो. या आजाराचा पसरण्याचा वेग मोठा आहे. त्यामुळे माणसांची गर्दी होणार नाही, हाच यावर सध्या तरी उपाय आहे. कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या दोन लसींचे सध्या भारतात उत्पादन होत आहे.

विदेशातूनही लसी मागवण्यात येत आहेत. या लसी सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी लोकांची गर्दी होणार नाही, अशी काळजी घेणे इतकेच सरकारच्या हाती आहे. तो पर्याय मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अवलंबलेला आहे. त्यामुळेच त्यांनी पुढील पंधरा दिवस लोकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करून निर्बंध घातलेले आहेत. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यू लागू केलेला होता. त्यानंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन लावला. तरीही कोरोना नियंत्रणात येईना, त्यामुळे हा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा एक प्रकारे लॉकडाऊन लागू केलेला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी अधिक वाढू नये, अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राची मदत करण्याची गरज आहे.

कारण महाराष्ट्र आणि त्यातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाला सगळ्यात करस्वरुपात मिळणारा पैसा हा मुंबईकडून मिळत असतो, महाराष्ट्र हा विविध राज्यांमधील मजुरांना रोजीरोटी देतो, याचा विचार करून देशाचा आर्थिक श्वास असलेल्या महाराष्ट्राच्या आपत्कालीन स्थितीचा विचार करून केंद्र सरकारने आवश्यक मदतीच्या ऑक्सिजनचा तात्काळ पुरवठा करण्याची ही वेळ आहे. कारण हे एकूणच सगळ्यांच्या हिताचे आहे, अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजधुरीण सेनापती बापट यांच्या, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा,’ या ओळी लक्षात घेण्याची गरज आहे.

First Published on: April 15, 2021 3:45 AM
Exit mobile version