साहित्य, कला आणि कोरोनाचे कारण !

साहित्य, कला आणि कोरोनाचे कारण !

कोरोनाकाळात ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, छोटे उद्योग व्यावसाय बसले त्यांना अद्यापही सावरता आलेली नाही. त्यामुळे जरी कोरोना परतीच्या मार्गावर असल्याचे आणि शंभर कोटींच्या लसीकरणाचे ढोल पिटले गेल्यावरही हे प्रश्न एवढ्याने सुटणारे नाहीत. अशा परिस्थितीत माध्यमांनी कोरोना संकटाने निर्माण केलेल्या परिणामांची चर्चा गांभीर्याने करायला हवी. इंधन दरवाढ, घरगुती गॅस आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न मांडायला हवेत, परंतु हे न होता, हायप्रोफाईल प्रकरणांनी बातम्यांनी माध्यमांचे पडदे भरून गेले आहेत. सजग आणि जबाबदार वृत्तांकनाबाबतची ही उदासीनता आजची नाही. इतर सामाजिक प्रश्नही जटील होत असताना सामान्यांच्या जगण्याशी न जोडलेल्या फास्ट फूड विषयांनी वर्मानपत्रांचे रकाने भरले जात आहेत.

अशा परिस्थित लेखन, साहित्य, नाट्य, कला, लोककला या सर्वच क्षेत्रातील पहायला कुणाला वेळ आहे. या कलांची भिस्त ज्या वाचक, प्रेक्षकांवर आहे. त्या रसिकच हतबल ठरला किंवा ठरवला गेला आहे. मागील दीड वर्षातील आजाराच्या संकटाच्या नावावर या सामान्य रसिकापुढे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आधी भाकरी मग कला हे हतबल तत्वज्ञान स्वीकारण्याखेरीच त्याच्याकडे पर्याय नाही. विचार करणार्‍या मानवी समाजाची गरज संपलेली आहे का, किंवा विचार करायलाच पर्यायच ठेवायचा नाही, अशी स्थिती जगण्यासाठी भाग पाडणारी नवी व्यवस्था माहिती तंत्रज्ञानाच्या आडून रेटली जात आहे का, निदान याचा तरी विचार करण्याची गरज आहे.

कोरोना काळात पत्रकारितेच्या क्षेत्रालाही मोठा फटका बसलेला आहे. छापील आणि चॅनल माध्यमांची स्थिती पूर्वपदावर यायला मोठा काळ जावा लागणार आहे. किंबहुना, छापील माध्यमे बंद करण्यासाठीच कोरोनाच्या संकटाचा वापर झाल्यासारखी स्थिती आहे. सरकार किंवा पत्रकारांच्या संस्था, संघटनाही सरकारदरबारी तक्रारी करून थकल्या आहेत. वाढत्या विज्ञान तंत्रज्ञान आणि संपर्कांच्या तसेच समाजमाध्यमांमुळे माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी पत्रकारितेची गरज निकालात निघाली आहे. मात्र त्यामुळे वस्तुनिष्ठ बातमी आणि अफवा यातील फरक नाहीसा झालेला आहे. अशा परिस्थितीत खरे तर विश्वासार्ह पत्रकारितेची गरज आणि जबाबदारी वाढलेली असताना लोकशाहीच्या चौथ्या खांबालाच सुरूंग लावला जात आहे.

माध्यमांनीही कोरोना संकटाचे कारण ठरवून उतरती कळा लागण्याच्या या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. सरकार आणि संबंधित संस्थांना जाब विचारणे बंद झाले असताना लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांपेक्षा गॉसिप्सवर भर दिला जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची हतबल स्थिती, इंधनदरवाढीचे परिणाम, महिलांवरील वाढते हल्ले, धर्मांधता, जातींचे वाढते प्रस्थं, आत्महत्येचे वाढते प्रमाण, सरकारी आणि प्रशासकीय संस्थांचे होणारे राजकीयीकरण आदी अनेक विषय असताना हायप्रोफाईल बातम्यांमध्येच माध्यमे गुंतून पडलेली आहेत. जाहिरातींमधून माध्यमांना मिळणारा महसूल समाजमाध्यमांमुळे निकालात निघाला आहे.

मागणी रोडावल्यामुळे वर्तमानपत्रांची छपाई अत्यंत कमी होण्याची स्थिती अमेरिकेत आपल्या आधीच आलेली आहे. मात्र त्याला कोरोनाचे कारण नाही, समाजमाध्यम आणि इंटरनेटमुळे काही सेकंदात लोकांपर्यंत माहिती पोहचली जात असल्याने न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्टसारख्या वर्तमानपत्रांच्या छापाई संख्येवर कमालीचा अनिष्ट परिणाम झालेला आहे. मात्र कोरोनाकडे बोट दाखवून या स्थितीची जबाबदारी नाकारण्याचा करंटेपणा येथील माध्यमांनी केलेला नाही. बँक खात्यातून विशिष्ट रक्कम वजा झाल्यावर आवश्यक ती बातमी वाचण्याची परवानगी येथील माध्यमांनी वाचकाला दिलेली आहे. त्यामुळे छपाई व्यावसाय आणि त्यासाठी काम करणारे कामगार या ठिकाणी संपल्यात जमा आहेत. नवं आल्यावर जुनं निकालात निघतं, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यावर डाय मेकिंग आणि खिळ्यांनी अक्षरजुळणी करणार्‍यांवर अशीच बेकारीची वेळ आली होती. परंतु हा बदल अपरिहार्य असल्याने स्वीकारण्यात आला.

तरीही नियतकालिके आणि पुस्तक छपाईचा व्यवसाय तग धरून होता. मागील एक ते दीड वर्षात पुस्तक प्रकाशन व्यावसायही डबघाईला आल्याने एक प्रकारचे निराशाजनक वातावरण तयार झालेले आहे. साहित्यिक, नाटककार, लेखक यात भरडले जात आहेत. मुंबई पुण्यातील नावाजलेल्या प्रकाशन संस्थांचे काम मागील दीड वर्षात थंडावलेले आहे. पंचवीस ते पन्नास अशा संख्येने कित्येक लेखकांची पुस्तके रांगेत असताना केवळ एक किंवा दोन जास्तीत जास्त पाच पुस्तके तीही उधारीच्या खर्चावर प्रकाशित केली जात आहेत. पुस्तकांचे वितरण, दर्जा आणि वाचकांची उदासीनता याचा फटका या छपाई आणि प्रकाशन व्यावसायाला बसला आहे. इंटरनेटवरील फास्टफूड साहित्य वाचण्याची नवी पद्धत खूप आधीच रुढ झालेली आहे. पुस्तकाची जागा बळकावण्यासाठी लॅपटॉप किंवा स्मार्ट फोनमध्ये स्पर्धा सुरू आहे. पुस्तकांची गरज संपणार नाही, वाचन आणि साहित्य हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याच्या वल्गना फसवणूक करणार्‍या आहेत. ही स्थिती कला आणि नाट्य क्षेत्रातही आहेच.

प्रत्यक्ष अभिनय आणि नाट्यानुभव हे नाटकाचा आत्मा असतानाच मोबाईलच्या छोट्या पडद्यावर नाटक पाहाण्याची नाईलाजाने होणारी सक्ती या कलापरंपरेच्या मुळावरच घाव घालणारी आहे. लोककलावंत तर याआधीच देशोधडीला लागलेले आहेत. या सर्व स्थितीला केवळ कोरोनाची साथ हे एकच कारण नाही, वाचन लेखनासाठी माणसांकडे वेळच उरलेला नाही किंवा त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे. नाट्य परंपरा सुरू झाल्यापासून थिएटर्स संपतंय, संपलंच, अशी चर्चा थिएटर्स आणि सिनेमांच्या समांतर काळापासून ऐकून आहोत, मात्र थिएटर्स अजूनही संपलेलं नाही, असं ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेअभिनेते नसिरुद्दीन शहांचं म्हणणं आहे. कोरोनाने मात्र थिएटर्सची घंटा ही धोक्याची घंटा ठरवली असल्यासारखी स्थिती आहे. रंगभूमीवरील प्रेक्षकांची संख्या कमी होण्यात कोरोनाचा वाटा नाही, कलेबाबतची ही उदासीनता त्याआधीपासून पोसली गेलेली आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या झगड्यात रंगभूमीचे होणारे नुकसान नवे नाही. दर्जेदार नाटकांना असा भेद मान्य नसल्याचं अनेकदा स्पष्ट झालेलं आहे.

साहित्य आणि लेखनक्षेत्रावरही प्रभाव पडला आहेच. यंदा दिवाळी अंकाची स्थिती काही वेगळी नाही. मागील वर्षाच्या तुलनेत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असतानाही दिवाळी अंकांची मागणी पुरेशी वाढलेली नाही. इंटरनेट माध्यमांवर नियतकालिकांच्या विक्रीच्या गणिताविषयी प्रकाशनसंस्था अनभिज्ञ आहेत. दिवाळी अंकाविषयी असलेली वाचकांची, प्रकाशकांची आणि लेखकांचीही उदासीनता स्पष्ट असताना मराठीतील एका मोठ्या लेखनाच्या सांस्कृतिक परंपरेला धक्का लागण्याचे चित्र निराशाजनक आहे. छपाईचे व्यवसाय मोठ्या संख्येने मागील दीड वर्षाच्या कोरोनाकाळात बंद पडलेले आहेत. दिवाळी अंक काढताना मान्यवर प्रकाशनसंस्थांकडून आर्थिक दमछाक होत असल्याचे सांगितले जात असताना कोरोनाने त्यावर अखेरचा घाव घातल्याने वाचकांना दर्जेदार अंक उपलब्ध करून देण्यास आपण हतबल आहोत, असं या प्रकाशन संस्थांचे म्हणणे आहे.

मजकुराचे संपादन, लेखन आणि कला या सर्व गोष्टी निकालात काढण्यासाठी अहमहमिका सुरू आहे. पुस्तकांऐवजी पिडीएफची मागणी करणारे आणि त्यांना तशी पिडीएफ उपलब्ध करून देणा-यांनी वाचन परंपरेविरोधात युद्ध पुकारले आहे. बदलत्या माहिती आणि तंत्रज्ञानामुळे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचे वाढते प्रस्थ येत्या काळात सर्वच क्षेत्रावर परिणाम करणारे ठरणार आहे. सर्च इंजिनने केलेल्या मागणीनुसार लेखकांना मजकूर द्यावा लागणार आहे. दर्जेदार लेखकांपेक्षा कंटेट रायटर्सची गरज शब्दांच्या बाजारात वाढली आहे. या स्थितीला केवळ कोरोना कारण नाही. मागणी तसा पुरवठा हे तत्व साहित्य किंवा कला क्षेत्रात लागू पडत नाही. समाजाला साहित्य आणि कला वैचारिक दिशा दाखवण्याचे काम करत असल्याचा भ्रम मागे पडला असून ज्या सर्च इंजिनच्या कर्सरचे बोट ज्या दिशेला जाईल त्या ठिकाणी लेखकांचे कळप निघालेले पहायला मिळत आहेत. लेखन किंवा कलेत व्यवसाय असावा का, हा प्रश्न जरी जुनाच आहे. मात्र त्याकाळात त्यात निदान प्रश्नचिन्ह होते, आता व्यवसाय आणि साहित्य, कला हे दोन्ही शब्द समानार्थी झाल्याचे भेसूर चित्र निर्माण झालेले आहे.

कोरोनाची भीती, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा बचाव, कोविडचा विषय आता मागे पडतोय. सरसकट सर्वच नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू झालेली नाही. पहिला डोस झालेल्यांना प्रवासाची परवानगी मिळेल, मात्र त्याआधीच लोकल आधीसारख्याच भरलेल्या आहेत. बसेसमध्येही कोविड काळाआधी दोन वर्षांपूर्वीचीच गर्दी होत आहे. हॉटेल्सना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळतेय, तर सिनेमागृहे आणि थिएटर्सनाही अटी शर्तींवर परवानगी मिळालेली आहे. शाळा कॉलेजेसही सुरू होण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत मागील दीड दोन वर्षात कोविडमुळे जे गमावलं त्यातून बाहेर पडून पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. कोरोनाचे जेवढे नावीन्य आणि गांभीर्य एक दीड वर्षापूर्वी होते ते निकालात निघाले आहे. त्याचा परिणाम असा झाला की कोरोनाच्या अप्रत्यक्ष परिणामांची चर्चाही थंडावली आहे, येणार्‍या काळात भोगावे लागणारे हे परिणामही कमी धोकादायक नाहीत.

 

First Published on: October 22, 2021 4:45 AM
Exit mobile version