पाकिस्तानविषयी अनाठायी अचंबा!

पाकिस्तानविषयी अनाठायी अचंबा!

संपादकीय

ब्रिटिशांचे जगाच्या ज्या भागावर राज्य होते, तिथे ब्रिटिशांचा मूळ खेळ असलेला क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळेच या खेळाला अतिशय मोठा प्रेक्षक वर्ग आहे. भारतामध्ये तर क्रिकेटने इतकी लोकप्रियता गाठलेली आहे की, त्यामुळे इतर खेळांकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. त्या खेळाची आठवण फक्त चार वर्षांनी ऑलिम्पिक आले की होते. बहुसंख्य भारतीयांसाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर तो एक धर्म बनून गेलेला आहे. भारतामध्ये देव आणि धर्म या गोष्टींना फार महत्व आणि लोकप्रियता असते. इतर देशांमध्ये इतके महान क्रिकेटपटू होऊन गेले; पण त्यांच्या खेळाडूंना कुणी देव म्हटलेले नाही. पण भारतात विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला इथल्या लोकांनी ‘क्रिकेटचा देव’ बनवले आहे. क्रिकेटचे सामने सुरू झाले की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अबालवृद्धांच्या तोंडी क्रिकेटचीच चर्चा विड्यासारखी रंगलेली असते.

भारताचा क्रिकेट सामना अन्य देशांसोबत असला तर भारतातील लोक उत्साहाने पाहतातच; पण जर भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना असेल तर सगळे भारतीय लोक डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत असतात. एक एक चेंडू म्हणजे एकमेक श्वास झालेला असतो. हृदयाची धडधड वाढलेली असते. प्रत्येक जण शक्य असेल तिथून हा सामना पाहण्यासाठी धडपडत असतो. घरात तर लोक टीव्हीच्या समोर ठाण मांडून सहकुटुंब बसतात. हॉटेल्समध्ये, मॉल्समध्ये, मोबाईलवर सर्वत्र लोकांचे भारत-पाक सामन्याकडे डोळे ताणलेले असतात. एकवेळ त्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून चषक मिळवता आला नाही तरी चालेल; पण पाकिस्तानशी आपला संघ कुठल्याही परिस्थितीत हरता कामा नये, हीच भावना बहुसंख्य भारतीयांची असते. पाकिस्तानच्या बाजूनेही अशीच भावना असते की, काहीही करून भारताचा पराभव करायचाच, याच जिद्दीने त्यांचे खेळाडू खेळत असतात. दोन्ही देशांच्या खेळाडूंवर दोन्ही देशांच्या लोकांकडून भावनिक दबाव असतो. त्यामुळे दोन्ही संघांना खेळताना दोन्ही बाजूंकडील जनभावनेचे भान ठेवून सर्वशक्ती पणाला लावावी लागते.

टी-२० विश्वचषकातील रविवारी भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी असेच झाले. सगळ्यांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये तणाव असतो. दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यात चार युद्धे झाली. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर गोळीबार सुरू असतो. अतिरेकी कारवाया सुरू असतात. त्यामुळे या ताणलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने होतात तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील लोकांसोबतच जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमींना अटीतटीचा सामना बघायला मिळणार असतो. त्यामुळे त्यांचीही उत्सुकता प्रचंड ताणलेली असते. भारतात तर संघ जिंकावा म्हणून बर्‍याच ठिकाणी होम हवन केले जातात. प्रार्थना केल्या जातात. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेट सामन्यांच्या वेळी प्रचंड भावनिक गुंतवणूक झालेली असते. याचवेळी या क्रिकेट सामन्यांच्या वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काळी, गोरी आर्थिक उलाढाल होत असते, त्याचा तर काही हिशेब नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेटच्या सामन्यांना अक्षरश: युद्धाचे स्वरुप येते. या ठिकाणी खेळाडूंच्या हातात बॅट आणि बॉल असतो, इतकाच काय तो फरक. पाकिस्तान हा भारताच्या तुलनेत सर्वच बाबतीत छोटा देश आहे.

त्यांनी भारताशी चार वेळा रणभूमीवर युद्ध करून पाहिले; पण त्यातून त्यांना पळ काढावा लागला. त्यामुळे निदान क्रिकेटच्या मैदानात तरी भारताला हरवता आले तर मनाला समाधान मिळवता येईल, यासाठी सगळी शक्ती ते एकवटतात. पण त्यात त्यांना फारसे यश येत नाही; पण रविवारी झालेला सामना पाकिस्तानने दीर्घ काळानंतर जिंकला. पाकिस्तान भारतापेक्षा क्षेत्रफळ, आर्थिक विकास, लष्कराची ताकद अशा सगळ्या बाबतीत छोटा असताना भारतीय लोक त्यात इतके भावनिक गुंतून का पडतात हेच कळत नाही. उलट, अशा प्रकारे बाऊ करून भारतीय लोक उगाचच जागतिक पातळीवर पाकिस्तानचे महत्व वाढवत आहेत. खरे तर जागतिक पातळीवर पाकिस्तान हा बदनाम देश आहे. जगभरातील कडवे दहशतवादी पाकिस्तानात सापडले आहेत. त्यामुळे तो देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झालेला आहे. पाकिस्तानमध्ये सरकार, लष्कर, मुल्ला मौलवी, दहशतवादी संघटना, त्यात पुन्हा मुस्लिमांचे शिया, सुन्नी आणि अन्य उपगट यांच्यात प्रचंड संघर्ष सुरू असतो. तेथील अस्थिर वातावरणामुळे कुणी गुंतवणूक करायला मागत नाही. चीनची जी गुंतवणूक सुरू आहे, ती चीनच्या स्वार्थासाठी आहे. पाकिस्तानच्या हितासाठी नाही.

भारत हा पाकिस्तानच्या तुलनेत सर्वच बाबतीत मोठा देश आहे, असे असताना आपण त्या देशाला इतके महत्व कशासाठी देत आहेत. त्याच्याविरोधात आपण इतकी भावनिक गुंंतवणूक कशासाठी करत आहोत, याचा विचार सगळ्याच भारतीयांनी करण्याची गरज आहे. आपल्याला भारताने महत्व द्यावे, असे पाकिस्तानला तर वाटत आहेच. पण असे करून भारतीय लोक उगाचच पाकिस्तानचे महत्व वाढवत आहेत. भारत आपल्याला महत्व देत असल्याचे दिसत असल्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढत आहे. त्याच्याच बळावर ते भारताच्या कुरापती काढत आहेत. भारताशी होणारे क्रिकेटचे सामने हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. या दोन देशांतील सामन्यांमधून त्यांना जास्त आर्थिक फायदा मिळत असतो. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने झाले नाही तर भारतीय क्रिकेट बोर्डाचे काही अडत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आहे. पण हे सामने झाले नाही तर पाकिस्तानचे घोडे अडते; पण भारतीय लोक उगाचच पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांचा बाऊ करून, त्यांच्याविषयी अतिरेकी उत्साह दाखवत आहेत.

त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि पाकिस्तानचे जागतिक पातळीवर रेटिंग वाढत आहे. खरे तर पाकिस्तानला त्यांच्या जागी राहू दिल्यास त्यांनाही त्यांची पात्रता लक्षात येईल, ते आपल्या मर्यादेत राहतील. पण जो देश सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा छोटा आहे, त्याला आपल्या बरोबरीचे स्थान देऊन त्यांच्याविरुद्ध जिंकणे म्हणजे काही तरी जागतिक पराक्रम गाजवत आहोत, असा भ्रम करून घेणे हे खरे तर भारताचे नुकसान करणारे आणि पाकिस्तानला नवसंजीवनी देणारे आहेे. पण ही गोष्ट भारतीय लोक कधी लक्षात घेणार हा खरा प्रश्न आहे. भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जेव्हा पाकिस्तानविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते, ‘पाकिस्तान हा छोटा देश आहे. भारताने त्याच्यात गुंतून पडता कामा नये, भारताने जागतिक महत्वाकांक्षा बाळगून मोठे यश संपादन करायला हवे.’ पाकिस्तानला राष्ट्र म्हणून उभे राहण्याची मोठी महत्वाकांक्षा नाही. हेच त्यांनी मागील ७५ वर्षांमध्ये दाखवून दिले आहे. भारताच्या कुरापती काढण्यासाठी त्यांची आर्थिक, लष्करी शक्ती वापरण्यात येते. भारताने त्यांचा कुरापतखोरपणा कठोरपणे मोडून काढायलाच हवा; पण त्याचबरोबर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा पराभव करणे म्हणजे जग जिंकणे ही जी आपली मानसिकता झालेली आहे, यातून भारतीयांनी बाहेर यायला हवे. कारण त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये गुंतून पडणार आहे, तेच भारताला रोखू पाहणार्‍या जगातील मोठ्या देशांना हवे आहे.

First Published on: October 26, 2021 5:45 AM
Exit mobile version