नावच सुशील, बाकी शून्य!

नावच सुशील, बाकी शून्य!

संपादकीय

कुठल्याही भारतीय खेळाडूला न जमलेली अशी कामगिरी करणारा पैलवान म्हणजे सुशील कुमार. दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळवून त्याने भारताची मान अभिमानाने उंचावली होती. 2012 लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ पदक अशी कुठल्याही खेळाडूला हेवा वाटावा, असा मोठा पराक्रम सुशीलच्या नावावर असून खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा तो दुसरा कुस्तीगीर ठरला. 1956 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मराठी भूमीतील खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ पदक मिळवून तिरंगा फडकवला होता. त्यानंतर 52 वर्षांनी सुशीलने ऑलिम्पिक पदकाचे यश मिळवून दिल्याने सर्व भारतीयांना त्याचे मोठे कौतुक होते. सुशीलपासून प्रेरणा घेत देशाच्या कानाकोपर्‍यातील नवोदित मल्लांनी ऑलिम्पिक पदकाची स्वप्ने पाहायला सुरुवात केली. तो आदर्श ठरला… विशेष म्हणजे ऑलिम्पिक पदकांनी त्याला बक्षिसापोटी करोडो रुपये मिळाले. क्रिकेटनंतर इतर खेळांमध्ये सुद्धा खेळाडू कोट्यधीश होऊ शकतात, हे सुशीलने दाखवून दिले.

विशेष म्हणजे त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आले. शिवाय मानाच्या पद्मश्री पुरस्काराचासुद्धा तो मानकरी आहे. एवढे सर्व मोठे यश समोर उभे असताना एखाद्या माणसाच्या डोक्यात हवा जाते आणि त्याचे माणसूपण संपून त्याच्यातला तो हिंस्त्र पशू जागा होतो तसे सुशीलचे झाले असून आधी त्याने महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मल्ल नरसिंह यादवची कारकीर्द संपवली. नरसिंह ऑलिम्पिकमध्ये हमखास पदक मिळवणार असे वाटत असताना डोपिंग प्रकरणात त्याला अडकवून आपल्या वाटेतील अडसर त्याने कायमचा दूर केला. गेली अनेक वर्षे आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये, अशी त्याची दादागिरी सुरू होती. त्याला दादा, भाई म्हणा… तो म्हणेल ती पूर्व दिशा म्हणा… आणि असे होत असेल तरच बाकीच्या मल्लांची डाळ शिजणार. दिल्लीच्या पोलीस आणि केंद्र, राज्य प्रशासनात असलेली ओळख याच्या जोरावर आपण हवे तसे वागू असा एक माज सुशीलमध्ये तयार झाला होता. यामुळे त्याच्यात खेळाडू, मार्गदर्शक बाजूला पडून एक अघोषित गुंड निर्माण झाला. सध्या त्याला कुस्तीगीर सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटक झाली आहे. हे पाहून नाव सुशील, बाकी शून्य असे आता म्हणावे लागत आहे.

सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील मुख्य आरोपी असून तो दोन आठवड्यापासून फरार होता. अखेर मोबाईल ट्रेस करुन सुशील आणि त्याच्या साथीदारांना दिल्लीच्या सीमेवरुन ताब्यात घेण्यात आले. सुशील निर्दोष असता तर त्याला अटकेपासून वाचण्यासाठी इतका आटापिटा कशाला करावा लागला असता. सुशीलने आपल्या साथीदारांसोबत 4 मे रोजी रात्री पैलवान सागर राणासह तिघा जणांचे अपहरण करून दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हॉकी स्टिक, लोखंडी सळ्या वापरल्या गेल्या, असे तपासात समोर आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे सागर छत्रसाल स्टेडियममध्येच राहत होता. आणि तो सुशील कुमारचा शिष्य होता. प्रशिक्षण काळातच सागरने अनेक पदके जिंकल्याने त्याच्याविषयी खूप अपेक्षा असताना तो हे जग सोडून गेला.

एका गुरूने एका शिष्याची हत्या केल्याचे (आरोप सिद्ध झाला तर) हे प्रकरण क्रीडा जगातला शरमेने मान खाली घालणारे ठरेल. या हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस सुशील कुमारसह वीस आरोपींच्या मागावर होते. छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील सागरला मारहाण करताना दिसत असल्याचा दावा सागरच्या कुटुंबीयांनी केला असून या दिवशी सागरचे तीन साथीदार सोनू, भगतसिंग आणि अमित यांनाही स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या जबानींमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुशीलचेच नाव घेतले आहे. सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमॉर्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर भागांवर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सुशील आणि वाद हे नेहमीच हातात हात घालून चालत आले आहेत. सुशील कुमार आणि इतर खेळाडूंचे वाद हे चालत आले आहेत. सुशीलसोबत झालेल्या वादामुळे ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि रेल्वेचे अनेक प्रशिक्षक छत्रसाल स्टेडियममधून कायमचे बाहेर पडले आहेत. नरसिंह यादव आणि सुशील यांच्यातील वाद भारतीय कुस्ती क्षेत्रात सर्वश्रुत आहे. नरसिंह यादव आणि सुशील कुमार हे 74 किलो वजनी गटात 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठीचे प्रमुख खेळाडू होते. आपली काही डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच सुशीलने ऑलिम्पिक पात्रता चाचणीमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर, नरसिंहला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. नरसिंहनेही आपल्या प्रतिभेने ऑलिम्पिक पात्रता निकष यशस्वी पार केला. कुस्ती महासंघाच्या नियमांनुसार, वजन श्रेणीत जिंकणारा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो. सुशील दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता असल्याने त्याला वाटू लागले, की आपल्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळावी. त्यासाठी त्याने कोर्टाची पायरी देखील चढली होती.

पण, त्याची याचिका फेटाळून लावण्यात आली. यानंतर नरसिंहने सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण सुरू केले. नरसिंहचा डोपिंगसाठी पाठविलेला नमुना ऑलिम्पिकच्या दहा दिवस आधी आला. ज्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ज्यामध्ये नाडाने त्याला क्लिन चिट दिली. परंतु, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने त्याला केवळ ऑलिम्पिकमध्ये त्या वर्षी बाद नाही तर चार वर्षासाठी बाद केले. या प्रकरणात नरसिंहने उघडपणे सुशीलवर आरोप केले होते, की त्याला सुशीलच्या सांगण्यावरून डोपिंगमध्ये अडकवले. सोनीपत येथे प्रशिक्षण घेत असताना सुशीलच्या सांगण्यावरून त्याच्या अन्नात काहीतरी मिसळवले गेले असा आरोप त्याने केला. या प्रकरणात पंतप्रधानांच्या पुढाकाराने या प्रकरणाची चौकशी समितीदेखील गठित करण्यात आली होती. त्यावेळी नरसिंहच्या जागी कोणत्याही खेळाडूला पाठवण्यात आले नाही. सुशीलला देखील समितीने नकारच दिला.

लंडन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ब्रॉन्झ पदक जिंकणार्‍या योगेश्वरबरोबर देखील सुशीलचा वाद झाला होता. योगेश्वर छत्रसाल स्टेडियममध्येच प्रशिक्षण घ्यायचे. सुशीलसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी लंडन ऑलिम्पिकनंतर छत्रसाल स्टेडियम सोडले. योगेश्वर व्यतिरिक्त कुस्तीपटू जितेंद्र कुमार आणि प्रवीण हे सुशीलचे खास खेळाडू होते त्यांनीही छत्रसाल स्टेडियम सोडले. जितेंद्र आणि प्रवीण दोघेही 74 किलो वजनात बसायचे आणि ते सुशीलला आदर्श मानत. हे दोन्ही कुस्तीगीर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा खाली वाकून सुशीलच्या पायाला स्पर्श करायचे. आता सागर हत्येप्रकरणी सुशीलचा गुंड चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ज्या रेल्वेच्या सेवेत तो मोठ्या पदावर होता त्या पदावरून त्याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या आरोपातून त्याची सुटका झाली किंवा नाही झाली तरी कुस्ती महासंघाने सुशीलला कायमची कुस्तीची दारे बंद करायला हवीत. कारण कुस्ती क्षेत्राला लागलेल्या सुशील नामक या किडीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे. खरेतर तो आधीच केला पाहिजे होता, पण अजूनही वेळ गेलेली नाही.

First Published on: May 26, 2021 3:15 AM
Exit mobile version