लतादीदींचे शिवतीर्थाशी मन:स्पर्शी ऋणानुबंध!

लतादीदींचे शिवतीर्थाशी मन:स्पर्शी ऋणानुबंध!

लोकशाही देशांमध्ये राजकीय, कला, विज्ञान, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय आणि अतुलनीय अशा योगदान दिलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याची पद्धत आहे. तर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे हा प्रत्येक राज्य सरकारच्या अखत्यारीतील अधिकार आहे. राष्ट्रीय शोक जाहीर करतानाच अर्धा दिवसाची सुट्टी देण्याचा आधीचा नियम होता. कालातंराने या नियमात काही सुधारणा झाल्या आहेत. त्यामध्ये सुट्टीची घोषणा आणि शासकीय इतमामातील अंत्यसंस्काराची घोषणा हा आता राज्याच्या अखत्यारीतील विषय झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय ? तो कधी जाहीर केलो जातो आणि कोणत्या गोष्टींना बंदी आणि मर्यादा आहेत हेदेखील समजून घेणे गरजेचे आहे.

लतादीदींच्या ९३ व्या वर्षी निधनाच्या वृत्तानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्यासोबतच महाराष्ट्र आणि कोलकाता यासारख्या राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली. या राष्ट्रीय दुखवट्याच्या निमित्ताने राष्ट्रध्वज अर्ध्यावरही उतरवण्यात आला. पण याआधीही देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. याआधीही काही व्यक्तींच्या बाबतीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. देशात राष्ट्रीय दुखवटा करण्यासाठीचे काही निकष आहेत. त्यामध्ये काही व्यक्तींच्या निधनानंतरच हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय दुखवट्याचे निकषही बदलण्यात आले आहेत. प्रत्येक राष्ट्रामध्ये शोक व्यक्त करण्याची परंपरा वेगळी आहे. देशात लोकशाही स्वीकारलेल्या राष्ट्रात शोक व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण ही शोक व्यक्त करण्याची प्रक्रिया ही सारखीच आहे. राष्ट्रीय शोक हा एकप्रकारे त्या संपूर्ण देशवासीयांचे दुःख व्यक्त करण्याचा प्रतिकात्मक मार्ग समजला जातो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने हा राष्ट्रीय शोक व्यक्त करण्यात येतो.

भारताने लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. भारतात ध्वज संहितेनुसार देशात शोक जाहीर केल्यानंतर संपूर्ण भारतात आणि परदेशात दुतावासात भारताचा तिरंगा हा अर्ध्यावर उतरवण्यात येतो. त्यानुसार महाराष्ट्रातही मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच भाजपने उत्तर प्रदेशातील जाहीरनामा रद्द करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांचे स्क्रिनिंग पुढे ढकलण्यात आले. तर काही दौरे आणि वाढदिवसांचे सेलिब्रेशनही रद्द झाले. या संपूर्ण काळात देशात औपचारिक आणि सरकारी कामे केले जात नाहीत. तसेच दौरे, मेळावे, कार्यक्रम, सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमावरही बंदी असते.

कोणत्या व्यक्तीबाबत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करावा याबाबत केंद्र सरकारने १९९७ मध्ये अधिसूचना जारी केलेली आहे. त्यानुसार पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांचे निधन झाल्यानंतर सार्वजनिक सुट्टी देण्यात येते. या सुट्टीचा निर्णय हा राज्य सरकारचा असतो. गृह विभागाच्या सूचनेनुसार एका वायरलेस मेसेजच्या माध्यमातून ही सूचना प्रत्येक राज्य सरकारला देण्यात येते. त्यानुसार राष्ट्रीय दुखवटा आणि ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचेही आदेश या संदेशाद्वारे देण्यात येतात. याआधी सुट्टीची तरतूद ही अधिसूचनेनुसार रद्द करण्यात आली होती. पण राज्य सरकारचा निर्णय हा सुट्टी जाहीर करण्याबाबतचा असतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लतादीदींच्या निधनामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर याआधी २०१३ साली पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ साली द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. २०१९ मध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. २०२० मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

मुंबईतही लतादीदींच्या निधनानंतर अवघ्या काही मिनिटांतच देशाचा गृह विभाग कामाला लागला. दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रीय ध्वजदेखील अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना वायरलेस मेसेजच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यानंतर काही मिनिटातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी हजर राहणार असल्याची माहिती आली. मुंबई महापालिकेच्या शिवाजी पार्क मैदानात सहजासहजी अंत्यसंस्काराला परवानगी देण्यात येत नाही.

पण विशेष बाब म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशाने याठिकाणी लतादीदींच्या अंत्यसंस्काराला परवानगी देण्यात आली. लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी येणारा मोठ्या प्रमाणातील जनसमुदाय पाहता दादर स्मशानभूमीत खूपच गर्दी होईल हे लक्षात घेऊन शिवाजी पार्कात लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्यात आली. लतादीदींचे शिवाजी पार्कातील अंत्यसंस्कार हादेखील एक योगच आहे. याआधी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापने दिवशी शिवतीर्थावर लतादीदींनी ‘घन:श्याम सुंदरा’ही भूपाळी गायली होती. लतादीदींच्या निधनानंतर ९३ व्या वर्षी लतादीदींवर शिवतीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईतल्या पेडर रोड येथील निवासस्थानापासून लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. लतादीदींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे लतादीदींच्या पार्थिवावर भारतीय तिरंगा ठेवण्यात आला. महाराष्ट्र सरकारने लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिल्यानेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे निवासस्थान प्रभूकुंज येथे त्यांना पोलीस बँडद्वारे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शिवाजी पार्क येथील अंत्यसंस्काराच्या वेळीही त्यांना पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. तसेच बंदुकीच्या फैरी झाडून सलामीही देण्यात आली. अंत्यसंस्काराच्या काही मिनिटे आधी त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा हा मंगेशकर कुटूंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

लतादीदींसाठी देशवासीयांकडून राष्ट्रीय शोक व्यक्त करताना एक दिवसाची सुट्टी देताना अनेकांनी भुवया उंचावल्या. या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोडही उठली. पण महाराष्ट्र सरकार हे एकमेव राज्य सरकार ही सुट्टी घोषित करणारे राज्य नव्हते. महाराष्ट्रासोबतच पश्चिम बंगालनेही सुट्टी जाहीर केली. त्यासोबतच लतादीदींची गाणी ही पंधरवड्यात वाजवली जातील अशीही घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय शोक हा दोन दिवसांचा घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावरही अनेक राजकीय पक्षांनी स्वतःला आवर घातला आहे. तर दुसरीकडे सुट्टीच्या निर्णयावर मतमतांतरेही आहेत. लतादीदींच्या कला क्षेत्रातील योगदानाच्या निमित्ताने त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. तसेच सुट्टीही जाहीर करण्यात आली. पण यामध्येही समर्थक आणि विरोधी असे गट पडले आहेत.

आपलं संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तीने गायनाच्या कलेसाठी वाहून घेतलं, त्या कलाकाराची एक संगीत साधनेसाठीची आयुष्यभराची तपश्चर्या होती. लतादीदींचे योगदानच इतके मोठे होते की ते इतर क्षेत्रासारखे इतिहास म्हणून बंदिस्त दस्तावेज राहणार नाही. त्यांच्या योगदानाला तशा मर्यादाही नाहीत. लतादीदींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील संगीतमय प्रवासात गायलेली गाणी ही अजरामर झाली आहेत. प्रत्येकाच्या मनात आणि ओठावर सहज येणारी ही गाणी त्यांचे योगदान आणखी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा तोकडाच ठरेल. पण लोकशाही प्रक्रियेतील एक जबाबदार नागरिक म्हणून आपलीही तितकीच जबाबदारी आहे की अशा क्षेत्रातील व्यक्तींइतकी उंची गाठता येणे शक्य नसले तरीही त्यांना सन्मान देणे ही आपली मोठी जबाबदारी आहे.

अशा प्रसंगी जबाबदारीने वागणे इतके छोटे योगदान आपण नक्कीच देऊ शकतो. लोकशाहीत आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार म्हणून आपण काय, कधी आणि कोणावर टीका करतो याचेही भान रहायला हवे. शाहरूखच्या निमित्तानेही हाच निकष लागू पडतो. शाहरूखने आपल्या धर्माच्या रिवाजानुसार लतादीदींचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर फुंकर घातली. पण अनेकांनी या कृतीला थुंकल्याचे म्हटले. कोणती व्यक्ती कोणत्या ठिकाणी काय गोष्ट करते त्यासाठीचे कारण समजून घेणे हेदेखील त्याच जबाबदारीत मोडते. म्हणूनच समाजमाध्यमांवर समाजभान ठेवणे हीच लतादीदींसारख्या मोठ्या कलाकारांना खरी श्रद्धांजली ठरेल.

First Published on: February 8, 2022 5:55 AM
Exit mobile version