कायदा, कायदा…क्या है फायदा!

कायदा, कायदा…क्या है फायदा!

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १७ लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली, वाहतूक विभागाला ६९ कोटींचा महसूल

कुठलीही इमारत ढासळून टाकायची असेल तर तिच्या मूलभूत सांगाड्याला जबरदस्त धक्का द्यावा लागतो. आपण आजकाल टीव्हीमुळे जगात अशा घटना घडताना बघत असतो. मोठमोठ्या गगनचुंबी इमारती घातपातात कोसळतात किंवा ठरवून सुरूंग लावून जागच्याजागी जमिनदोस्त केल्या जातात. त्यासाठी अतिशय योजनाबद्ध रितीने काम केले जात असते. ठराविक जागीच सुरुंग लावले जातात आणि एकामागून एक ते उडवले जातात. त्यातून ज्या समतोलावर इमारत उभी असते, ती बघता बघता जमिनदोस्त होऊन जाते. जो नियम त्या इमारतीला लागतो, तोच तसाच्या तसा एकाद्या समाजाला वा राष्ट्रालाही लागू होतो. तिथे जी रचना उभी असते, तिचा एक एक आधारस्तंभ खच्ची वा डळमळीत केला, मग बघता बघता ते राष्ट्र अस्तंगत होऊन जाते. वरकरणी भक्कम वाटणारी ती इमारत किती नाजूक समतोलावर आपले अस्तित्व टिकवून असते, त्याचे उत्तर त्या मोजक्या ठिकाणी सामावलेले असते, जिथे हे सुरुंग लावले जातात.

न्युयॉर्कचे जुळे मनोरे उध्वस्त करण्यासाठी ओसामा बिन लादेनच्या टोळीने दोनच विमाने वापरली आणि ती नेमक्या स्थानी इमारतीत घुसवून ते जगाचे कौतुक असलेले मनोरे काही मिनिटात जमिनदोस्त केले होते. तो नुसता घातपात नव्हता, तर अतिशय विचारपूर्वक योजलेला घातपात होता. पण त्यातून जे साधायचे होते ते मात्र लादेनला साध्य करता आले नाही. कारण त्या जुळ्या मनोरे वा गगनचुंबी इमारतीपेक्षाही अमेरिकन बहुसंख्य जनतेची इच्छाशक्ती भक्कम होती. तिला उध्वस्त करणारे सुरूंग अजून निर्माण झालेले नसल्याने अमेरिका कोसळून पडली नाही, की ते राष्ट्र संपले नाही. पण जे काम त्या जिहादी लोकांना जमले नाही, ते करायला तिथले अनेक उदारमतवादी आज अधिक आटापिटा करीत असतात. तशा लोकांची कमतरता आपल्याकडेही नाही. अन्यथा दिल्ली बघता बघता असे रणक्षेत्र कशाला झाले असते? पण ती दंगल वा इतर गोष्टींकडे बघण्यापेक्षा त्यामागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे.

राज्याच्या गृहमंत्र्यांची खंडणीखोरी, अँटिलियाबाहेर स्फोटकांची कार, सचिन वाझेप्रकरण अशी कायद्याला आव्हान देणारी प्रकरणे बघितली की, खरंच आरोपी मिळणार का? त्यांना शिक्षा होणार का? न्यायालयात जाऊन सर्व आरोपी दोषमुक्त होणार, असे प्रश्न सर्वांच्याच मनात उभे राहतात. कायद्याचा धाक किंवा प्रभाव गणवेशामध्ये वा सैनिक पोलिसाच्या हातातल्या हत्यारामध्ये नसतो. त्याचे मोठे हत्यार कायदाच असतो. कायदा म्हणजे सक्ती. समोरचा माणूस कायद्याचा अधिकारी आहे आणि त्याला कायद्याने विशेष अधिकार दिलेले आहेत, हे सर्वात मोठे प्रभावशाली साधन असते. त्याला आव्हान दिले तर आपण संपलो, असाच धाक कायद्याने निर्माण केला पाहिजे. जोवर तो धाक वचक कार्यरत असतो, तोपर्यंतच कायदा व्यवस्था ठिकठाक काम करू शकते. आजकाल कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि अशा प्रत्येक कृतीमधून तो धाक संपवण्याचे काम व्यवस्थित चालू आहे.

निर्भयाच्या गुन्हेगारांना जितक्या सवलती मिळाल्या, कायद्यातील तरतुदींचे संरक्षण मिळते आहे, त्यातल्या शतांश तरी सवलती वा सुविधा बळी ठरलेली निर्भया किंवा अन्य कुठल्या मुलीला मिळालेल्या होत्या का? नसतील तर कायद्याची गरज काय? त्याचा उपयोग काय? कायद्याने त्या गुन्हेगारांना नुसते पकडले वा न्यायालयासमोर हजर केले, म्हणजे कायद्याचे काम संपत नाही. कायदा हा गुन्हेगाराच्या मनात वचक निर्माण करण्यासाठी असतो आणि तसा धाकच कायदा म्हणून प्रभावशाली ठरत असतो. असा धाक वचक निर्माण करणार्यांनाच कचाट्यात पकडून गुन्हेगारासारखे अगतिक केले जाते; तेव्हा गुन्हेगाराला कायद्याचा विश्वास वाटू लागतो आणि सामान्य नागरिकाला कायदा निरूपयोगी वाटू लागतो. तिथून मग कायदा मोडायची हिंमत बळावू लागते आणि सामान्य नागरिकाचा कायदा व्यवस्थेपेक्षाही गुन्हेगाराच्या धमक्यांवर अधिक विश्वास बसायला लागतो. राजन, शकील वा दाऊद यांचा दबदबा त्यातून निर्माण होतो आणि तो पोलिसांपेक्षाही अधिक प्रभावशाली असतो. हळुहळू लोकांना असे आपापल्या भागातील गुन्हेगार आश्रयदाते वाटू लागतात. मग त्या परिसरात त्यांचे कायदे लागू होतात आणि शासन व्यवस्थेचे कायदे अधिकाधिक लुळेपांगळे होत जातात.

कायदा वा न्यायाचे पावित्र्य त्याच्या पुस्तकात छापलेल्या निर्जीव शब्दामध्ये नसते. ते पावित्र्य वा सामर्थ्य कृतीमध्ये सामावलेले असते. ज्या कृतीने करोडो लोकांना न्यायाची अनुभूती येते, त्याला कायद्याचे राज्य म्हणतात. आज कायद्याचा कीस पाडणार्‍यांना त्याचेच भान राहिलेले नाही. कायदा वा न्यायाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना कायदा हा जीवंत माणसांसाठी असतो आणि समाजाच्या जीवनातील अनुभवाशी निगडित असतो, याचेही भान उरलेले नाही. सजीव समाजापेक्षाही पुस्तकातील शब्द व त्याचे पावित्र्य मोलाचे ठरू लागते, तेव्हा जिवंत माणसांच्या समाजापासून कायद्याची न्यायाची फारकत झालेली असते. आपोआपच समाज नावाच्या माणसांचे झुंडीत रुपांतर होऊ लागते. एकदा माणसाचे कळपातल्या पशूमध्ये रुपांतर झाले, मग त्याला कायद्याचे बंधन उरत नाही. म्हणून कायद्याचे व बुद्धीचे पहिले काम असते, समाजाला झुंड होण्यापासून रोखायचे.

कारण झुंड फ़क्त हिंसेच्याच मार्गाने समाधानी होत असते आणि तिला रोखण्यासाठी त्यापेक्षा मोठी हिंसा करण्यातूनच उपाय राबवता येऊ शकतो. म्हणूनच कायदा, न्याय, त्याचे शब्द वा विषय यांचे अवडंबर न माजवता आशयाला प्राधान्य दिले पाहिजे. पोलिसांपासून वकीलांपर्यंत व न्यायालयापासून शासनापर्यंत प्रत्येकाने माणसाला पशू होण्यापासून रोखण्याला कायद्याचे राज्य म्हणतात. त्यात कोणी पशूवत वागला असेल, तर त्याला खड्यासारखा बाजूला काढून समाजाचा मुळ प्रवाह माणुसकीचा राहील, याची काळजी घेणे अगत्याचे असते. त्याचाच पोरखेळ होऊन बसल्याने ही परिस्थिती आलेली आहे. कुठेही लोक न्याय आपल्या हाती घेऊन मॉबलिंचींग करू लागले आहेत आणि लाखोच्या प्रक्षुब्ध समुदायाला खुश करण्यासाठी पोलिसांनाही झुंडबळी घेण्याचा मार्ग चोखाळावा लागला आहे. त्याला जमाव किंवा संबंधित पोलिस अधिकारी जसे जबाबदार आहेत, त्याच्या हजारपटीने सगळ्या कायद्याचा व न्यायाचा पोरखेळ करणारे सुबुद्ध अतिशहाणे जबाबदार आहेत.

लोकशाही म्हणजे शस्त्राने चालणारी व्यवस्था नाही, अशी एक ठाम समजूत शहाण्यांनी करून घेतली आहे आणि तीच समजुत राज्यकर्त्यांच्याही माथी मारलेली आहे. सहाजिकच सत्तेच्याच मुसक्या बांधणारे कायदे बनवण्यात आलेले असून, सत्ता राबवणार्‍यांच्या पायात अशा कायद्यांच्या बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. त्याचाच दृष्य परिणाम आपण सुकमा वा श्रीनगरमध्ये बघत असतो. इथे नक्षली सशस्त्र दलाला किडामुंगीसारखे ठार मारतात आणि श्रीनगरमध्ये मुलीही गंमत म्हणून सैनिकांवर दगड मारू शकतात. कारण शस्त्राचा कोणालाही धाक उरलेला नाही. खरे तर शस्त्राचा धाक अजीबात संपलेला नाही. शस्त्र हे निर्जीव असते आणि कुणातरी माणसानेच ते चालवावे लागत असते. सहाजिकच शस्त्राचा धाक नसतो, तर ते कोणाच्या हातात आहे, त्याचा धाक असतो. त्याच्या मनगटात शक्ती व मनात हिंमत असेल, तरच शस्त्राला धार असू शकते वा भेदकता असू शकते. त्या धारेला वा भेदकतेला लोक घाबरत असतात.

सहाजिकच ती भीतीच लोकांना काही करायला वा न करायला भाग पाडत असते. एकाकी नि:शस्त्र गावकरी नागरिकांना दहशतवादी वा नक्षलवादी ओलिस ठेवतात, ते शस्त्राचाच धाक घालून. तेव्हा ज्यांना शस्त्राचा धाक वाटत असतो, ते गुपचुप अशा घातपात्याचे आदेश मानत असतात. कारण पुस्तकातले वा न्यायालयातले कायदे त्या ओलिसांचे संरक्षण करू शकत नसतात. तो घातपाती पुस्तकातल्या कायद्यांना जुमानत नसतो. म्हणूनच त्याने रोखलेले वा हाती धरलेले हत्यारच, त्यावेळी कायदा असतो. ही हत्याराची महत्ता असते. ते हत्यार कोणाच्या हातात आहे व तो त्याचा कसा वापर करू शकतो, यावरच हत्याराचा धाक असतो. सैनिकाच्या हातातले हत्यार आपल्यावर होणार्‍या हल्ल्याचा बंदोबस्त करू शकत नसेल, तर त्याच शस्त्राला कोणी कशाला घाबरावे? ते शस्त्र काय उपयोगाचे? अशा शस्त्राने कुठला कायदा राबवला जाऊ शकतो?

First Published on: March 31, 2021 3:45 AM
Exit mobile version