..धन्य झाले ‘वार’करी !

..धन्य झाले ‘वार’करी !

नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात,
अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात..

असं म्हणत संतश्रेष्ठ देवेंद्र महाराजांनी पाच वर्षं पालखीची धुरा विलक्षणपणे सांभाळली.. लौकीकार्थानं या दिंडीच्या वाटेतही खाच-खळगे होतेच.. विरोधकांबरोबर स्वकियांनीही वाटेत काटे पेरले. पण तशातही वाट काढत हा पाच वर्षांचा सत्तासोहळा पार पडला. त्यानंतर मात्र ‘मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन’चा गजर सुरू झाला. हा गजर इतका निनादला की त्यातून कानठळ्या बसू लागल्या.. याच काळात पालखीचा मानकरी बदलण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.. संंतश्रेष्ठ उद्धवजी महाराज यांनी पुढाकार घेत नव्या वारकर्‍यांसोबत सत्तापालखीच्या दिशेनं प्रस्थान करण्याचं योजलं..

राजकीय पटाला, सारं कसं माफ
पातकांचा धनी, मन त्याचं साफ।
बलशाली रिंगणी, रोजची जातात
धर्म आणि राजकारण सोबतीच खातात॥

धर्मनिरपेक्ष सेवेकर्‍यांना बरोबर घेऊन उद्धव महाराजांनी हिंदुत्वाची पताका उंचावण्याचा प्रयत्न सुरू केला.. माऊली, हाच तर होता दिंडी सोहळ्याचा पहिला पडाव. भेटीगाठींची अखेरची प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात विसावण्यासाठी ठेवण्याचं नियोजन झालं. या प्रदक्षिणेत दमलेले वारकरी रात्रीच्या समयी थोडे काय ते विसावले, या बेसावध क्षणीच अजित महाराजांना सोबत घेत देवेंद्र महाराजांनी आपुली पताका रोवली..

पहाटेच्या समयी झोपली प्रजा
जागविले राजा,
राज्याभिषेकाची सोय लाऊनिया॥

पण हे सुख मानवणं दिसतंं तितकं सोपं नव्हतं.. दुसर्‍याच दिवशी होत्याचं नव्हतं झालं..‘काका मला वाचवा’चा टाहो ऐकू आला. राजा पुन्हा एकदा आपल्या सैन्यात दाखल झाला.. ‘सुबहका भुला श्याम को फिर वापस आया.. इसलिये आजतक उसे कोई भुला नहीं बोला.. बोलने की किसीने हिंमत भी नहीं की माऊली!’.. आता पुन्हा एकदा भगवी पताका घेऊन राज्यातील ‘वार’करी दंड थोपटून आनंदसरींची अनुभूती घेताहेत. सर्वत्र ‘खुर्चीनामा’चा जागर होतोय.. नव्यानं पुढील प्रवासासाठी ही मंडळी निघाली.. आजवर ज्यांना टोकाचा विरोध केला त्या दोन पक्षांशी उद्धव महाराजांनी हातमिळवणी केली… माऊली, बघा किती ही सहिष्णुता.. किती हा सात्विकपणा.. निरागसपणा.. मनात ना मित्र गमावण्याची सल ना शत्रूला कवटाळण्याची भीती.. ‘तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण। तया त्रिभुवन अवघें खोटें ॥’ उद्धव महाराजांनी परमार्थ साधीला.. म्हणूनच राज्याभिषेकाचा सोहळा थाटात पार पडला. हा सोहळा म्हणजेच दिंडी सोहळ्याचा दुसरा पाडाव म्हणावा महाराज…

राजकीय महत्वाकांक्षा आहेसी बोलक्या
सत्ता दिंडीत प्रत्येकाच्या पालख्या..

आता जुन्या पालख्यांना छान सजवण्यात आलं. ‘समते’ची पालखी पुन्हा एकदा रंगात आली.. बारामतीच्या पालखीचाही ‘भाव’ वाढला. कधी दिल्लीश्वरांच्या दरबारी ही पालखी दर्शन देऊन येई तर कधी मातोश्री चरणी.. या भेटींवर चर्चा झडत राहिल्या, तसतशी सत्तापालखीही पुढेपुढे सरकत गेली. या पालख्यांना नांदेड, नगर, कोकण, विदर्भ, मराठावाड्यातील पालख्या येऊन मिळाल्या.. पण याच काळात कोरोनारुपी राक्षसाचं ‘विश्वरुप दर्शन’ झालं.. त्यापासून वाचण्यास्तव प्रत्येकाला आपल्या जीवाचं पडलं.. वैद्यकीय सेवा तुटपुंज्या पडल्या.. माऊलीचं राऊळ बंद केलं गेलं. मग कुणी डॉक्टरांमध्ये माऊली शोधली तर कुणी नर्समध्ये, कुणी पोलिसांमध्ये तर कुणी सरकारी कर्मचार्‍यांत. प्रत्येकाची माऊली वेगळी होती. भाव मात्र समान होता..

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवायली..

प्रत्येकाचा भाव हाच होता. ‘जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।’, याची पदोपदी अनुभूती येत होती. बापुड्या वारकर्‍यानं मदतीला येणार्‍या प्रत्येकालाच देव मानलं. पण या संकटातून सावरताना हा सामान्य वारकरी पुरता मेटाकुटीला आला. त्याच्या परिवारांचं मोठं नुकसान झालं. दिंडीचा हा तिसरा टप्पा सार्‍यांनाच मोठा जिकीरीचा गेला महाराज. अर्थात त्यातही राजकीय टाळ ‘कोरस’सारखा वाजतच राहिला. त्याला ना तमा होती परिस्थितीची ना लोकांच्या भेदरलेल्या मानसिकतेची. कसंबसं हे संकट आता विरत चाललंय.. ते अजून दूरही झालं नाही महाराज, तोच राजकारणाच्या पंढरीत म्हणजे मुंबापुरीत आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्माच्या उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले. खेळ दोन दिवस बहोत रंगला.. टाळ-मृदंगाच्या निनादाप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचा गजर होत होता. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या नावानं ‘भंडारा’ही घातला जात होता. या रिंगण सोहळ्यात आता पालखीचे धनी बदलले जातील असं चित्र पुसटसं दिसू लागलं. तेवढ्यात अतिउत्साही वारकर्‍यांना उधाण आलं.. ‘भास्कर’नामाचा गजर करत पीठासनाजवळ धुडगूस घातला गेला अन् काही क्षणातच इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरलं महाराज. कारण काय तर..

काम, क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं। आवडी धरिली पायांसवें॥

या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा ‘वार’कर्‍यांना विसर पडला. परिणामी क्रोधरुपी विकारानं होत्याचं नव्हतं केलं, अन् १२ ‘वार’कर्‍यांना वर्षभरासाठी राजकीय पंढरीत ‘वारीला’ बंदी घातली गेली. आतातरी यांना बापुड्या वारकर्‍याचं दु:ख समजलं असेल.. जिथं काळीज अडकलंय, तिथं जायलाच बंदी घातली तर घालमेल कशी होते हे यांना समजलं तर असेल ना महाराज. असो, आता वारीचा पुढचा पडाव सुरू आहे. अधूनमधून स्वबळाचा गजर होतो.. अशा वेळी उद्धव महाराजांनी ठाकरी शैलीत ठणकावून सांगितलं.. ‘आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. आमुचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झालाय. आम्ही भलत्या-सलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी आमुचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू.. म्हणायला उद्धव महाराजांचा हा बाणा ‘श्रवणीय’ आहे. पण ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ ही शिकवण आम्हाला मिळालीय ना महाराज.. पण तशी अनुभूती येताना दिसत नाही. मग कसे करावे ‘पादुका पूजन’?

महाराज, एक मात्र सांगतो, ही सत्तादेवीची पालखी भल्याभल्यांची दमछाक करतेय. होऊ दे दमछाक.. पण जनतारुपी आम्हा वारकर्‍यांचं नशीब तरी त्यातून बदलावं.. झेंडेकरी बदलतात.. झुल धरणारे बदलतात.. पण या बापुड्या वारकर्‍यांचं प्राक्तन मात्र बदलत नाही. खुर्चीनामाचा गजर या सार्‍यांच्याच तोंडी अव्याहतपणे सुरू असतो. या गजरात सामान्य वारकर्‍याचं भजन-कीर्तन विरुन जातं..त्याचा आवाज आसमंतापर्यंत पोहोचतच नाही. त्याला राऊळ बंद.. त्याला वारी बंद.. त्याचं जगणंही बंद.. सारंच बंद..पण ह्यांचे सोहळे मात्र आजही दिमाखात सुरू आहेत..

लबाड जोडिती इमले-माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार
उद्धवा अजब तुझे सरकार..

गदिमांच्या या ओळी सांप्रत काळात चपखल बसताय याची अनुभूती जळीस्थळी येतेय महाराज. या मंडळींचे विवाह सोहळे असो वा उद्घाटनं.. कुठेच नियमांचं पालन नाही की त्यांच्यावर कारवाईही नाही.. वारकर्‍याला मात्र आज वारीला जायचीही चोरी झाली.

ठेविले साहेबा। तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे। असंतोषपण॥

असं म्हणत प्रत्येकानं मुखवाणी आवरती घेतलीय. पण आता हे फार सहन केलं जाईल असं वाटत नाही. उद्धव महाराज, तुमच्याच शब्दांत सांगतो. आम्ही वारकरी सहनशील आहोत. पण त्याचा अर्थ आम्ही लाचार आहोत असं नाही. तुकोबानं सांगितलंच आहे ‘भले तरि देऊं कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी..!’ सुज्ञास अधिक सांगणे न लगे… म्हणूनच तर शेवटी महाराज म्हणतात-

राज्याची शिवारी। आषाढीची वारी।
धन्य (!) झाली नगरी। अवघेचि।
सत्ताधारी, विरोधकांची। रंगली मांदियाळी।
गुपचूप कारभार कराया सुफळ॥
बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…

First Published on: July 20, 2021 3:45 AM
Exit mobile version