पुन्हा एकदा ‘खंजीर’प्रयोग!

पुन्हा एकदा ‘खंजीर’प्रयोग!

संपादकीय

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी सुरुवातीपासून ‘पाठीत खंजीर खुपसणे’ हा राजकीय वर्तुळातील एक अत्यंत आवडता वाक्यप्रचार आहे असे समजायला हरकत नाही. स्थानिक पातळीपासून ते अगदी तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवरील राजकारणातदेखील सातत्याने पाठीत खंजीर खुपसला, गद्दार, चुकीला माफी नाही, अभी नही तो कभी नही, असे विविध वाक्यप्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वर्तुळात अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. अगदी सुरुवातीला जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते तेव्हापासून खरेतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाठीत खंजीर खुपसणे ही म्हण प्रचंड लोकप्रिय झाली. शरद पवारांचा हा तथाकथित खंजीर केवळ त्यांच्याकडेच असतो किंवा आहे असे समजण्याचे काही कारण नाही, वेळ बदलली आणि राजकीय परिस्थिती बदलली की तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या हातात आपसूक जात असावा.

2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आणि म्हणून या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी उभा पंगा घेतला. भाजप मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देत नाही असे जेव्हा लक्षात आले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा अत्यंत धाडसी प्रयोग केला आणि भाजपच्या मुखात नव्हे तर पोटात गेलेला सत्तेचा घास काढून घेतला. भाजपची शिवसेनेबरोबर युती होती त्यामुळे जरी शिवसेनेत मतभेद असले तरीदेखील युती म्हणून या दोन्ही पक्षांनी परस्परांना निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे भाजपचे तब्बल एकशे पाच आमदार निवडून आले होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख उमेदवार होते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. मात्र क्रिकेटमध्ये आणि राजकारणात अंतिम क्षणी काय होईल याचा अंदाज अथवा थांगपत्ता कोणालाच नसतो. ‘मी पुन्हा येणार’, ही गर्जना प्रत्यक्षात सत्यात उतरवून दाखवणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक सत्ता परिवर्तनामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले, मात्र त्याच बरोबर महाराष्ट्रातील भाजपची सत्तादेखील गमवावी लागली. त्यावेळीदेखील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे काही दशकांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हातात असलेला खंजीर हा 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात गेला की काय अशा चर्चा झडू लागल्या. हा राजकीय खंजीर कोण कोणाच्या पाठीत कधी खुपसेल याचा काही आता भरवसा राहिलेला नाही.

या खंजिराची आता 2022 मध्ये आठवण होण्याचे कारण म्हणजे भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर केलेला खंजीर खुपसल्याचा आरोप हे आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जर काँग्रेसला मदत केली असती तर जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आली असती, मात्र राष्ट्रवादीने मैत्रीचा हात पुढे करून पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करताना काँग्रेस याचा जाब राष्ट्रवादीला नक्कीच विचारेल असा गर्भित इशारादेखील नानांनी दिला आहे. त्यामुळे 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला खंजीर अडीच वर्षात अर्थात 2022 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवारांकडे गेल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात खरा धोका यापुढे आहे. खंजीर हे असं शस्त्र आहे की जे फार लांबून चालवता येत नाही. त्यामुळे खंजिरीच्या निशाण्यावर नेहमी टप्प्यातील जवळपासचे सावजच असते. आणि राजकीय वर्तुळात या खांजिराचा योग्य वेळी योग्य वापर करण्यात पवारांचा हातखंडा आहे हे कोणीच अमान्य करणार नाही. 2019 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार हे निश्चित झाले होते तेव्हा अगदी पहाटेचा झालेला शपथविधी हादेखील खंजीर खुपसण्याचा एक प्रयोग होता, मात्र काका अतिदक्ष असल्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र या प्रयोगातही उद्धव ठाकरेंनी खंजीर बाहेर काढण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर आणि शिवसेनेवर खंजीर प्रयोग केला होता.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादीतील खंजीर प्रयोग पुन्हा उफाळून आला असला आणि हा खंजीर पुन्हा चर्चेत आला असला तरीदेखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शांत आणि संयमी सुरात नाना पटोले यांना जे उत्तर दिले आहे ते खरोखरच चिंतनीय आहे. महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये जर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता शिवसेना अशा तिघांच्या आघाडीबाबत जर निर्णय करायचा असेल तर एकत्र बसणे आवश्यक आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असेल याबाबतदेखील पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला इशाराच दिला आहे.

त्यामुळे नाना पटोले यांना जर महाराष्ट्रात काँग्रेस बळकट करायचे असेल तर तीन पक्षांची आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशी टिकेल आणि त्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भांडवल न करता संयमाने आणि शांतपणे आगामी निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन रणनीती आखावी लागेल. तरच तीन पक्षांची आघाडी होऊ शकेल असे राष्ट्रवादीने स्पष्टपणे सुनावले आहे. त्यामुळे नानांनी आता खंजिराला अधिक बदनाम न करता पुढील निवडणुकीच्या तयारीला लागावे हेच अधिक योग्य होईल. कारण सध्या महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्यात परिस्थितीत येऊन ठेपले आहे, इथे कुणीही किती जोर काढला तरी एकपक्षाला बहुमत मिळणे अवघड होेऊन बसले आहे, त्यामुळे नानांचा पक्ष राष्ट्रीय असला तरी सध्या त्यांना नमते घेण्यावाचून गत्यंतर नाही. त्यामुळे खंजिराचा पोटातला वाक्प्रचार ओठात आणून सध्या तरी उपाय नाहीत, कारण तीन चाकांची गाडी चालवायची आहे.

First Published on: May 12, 2022 4:11 AM
Exit mobile version