काळजाला हात घालणारा ‘लोकल’ प्रश्न !

काळजाला हात घालणारा ‘लोकल’ प्रश्न !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रभावामुळे मुंबईची उपनगरीय लोकल सेवा गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी बंद आहे. दुसरीकडे मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार पुन्हा एकदा क्यूआर कोड प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. पण मुंबई लोकलच्या निमित्ताने एका तरूणाचा व्हायरल झाला आहे. नोकरी धंद्याला गेले तर लोक जगतील, नाही तर तसेही मरतीलच, असे त्या व्हिडिओचे सार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या निमित्ताने लोकल प्रवेशाचा सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारने ताणलेला विषय आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा असाच आहे. प्रत्येक मुंबईकरांच्या मनातीलच बोलतोय हा तरुण, अशीच अनेकांची व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया येत आली. मुंबईत वेळेत पोहोचण्याचे महत्व असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ आपला वाटतो. कारण मुंबईकरांच्या सर्वसामान्यांच्या मनातील भावनांना या व्हिडिओतून वाट करून दिली आहे.

कोरोनामुळे घरी बसून काढलेला काळ, त्यानंतर दीड वर्षांनी मिळालेली नोकरी. अशा परिस्थितीत लोकलने प्रवास केल्यानंतर विनातिकिट प्रवासामुळे तिकिट तपासणीसांकडून दंडाच्या रकमेच्या वसुलीचा अनुभव सांगितला आहे. आता बस्स झाले, पुरे झाला कोरोना. आम्हीही सर्वसामान्य लोकच आहोत, मग आम्हाला लोकल प्रवेश का नाही ? फक्त सरकारी कर्मचार्‍यांनाच पोट आहे का ? सर्वसामान्यांचेही हातावरच पोट आहे, रोज कमावून रोज खाणारे लोकच मुंबई लोकलने प्रवास करतात. मग आम्हाला लोकल प्रवेशासाठी मज्जाव का आहे ? असे सवाल या तरूणाने विचारले आहेत. गेले दीड वर्ष बेरोजगार राहिलो, किमान आता रोजगार मिळाला आहे, आता तरी लोकल प्रवेश खुला करा, अशी विनवणी या तरूणाने एका व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. पण या तरूणाच्या विनंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा लोकलवर अवलंबून असलेला उपजिविकेचा आधार अधोरेखित झाला आहे.

मुंबईतील सर्वात स्वस्त आणि जलद अशा स्वरूपाचे वाहतुकीचे साधन म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई लोकलच्या आधारावरच मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेपासून, फेरीवाले, मासळी व्यवसाय, हार, फुलांपासून ते गवतापर्यंतचा असा सगळा व्यवसाय हा मुंबई लोकलच्या फेर्‍यांवर आहे. अगदी कुरिअरसारख्या छोट्या व्यवसायापासून ते इडलीसारख्या मेगा व्यवसायाचाही मुंबई लोकलच कणा आहे. पण या लोकलमधील प्रवेश हा अनेक हातावरच्या पोटावर संकट आणणारा असा ठरला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून सर्वसामान्य कुठेतरी ऑन ट्रॅक येण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रस्ते वाहतुकीच्या आणि बस सेवेच्या उपलब्धततेच्या मर्यादा, प्रचंड वाहतूक कोंडी आणि मुंबईतला पीक अवर्स या सगळ्या संकटात मुंबई लोकलचा प्रवेश मिळावा ही सर्वसामान्य मुंबईकरांची सध्याची अपेक्षा आहे.

लोकलसारख्या वाहतुकीच्या साधनावर अवलंबून असलेले अनेकांचे व्यवसाय आणि नोकर्‍या या सगळ्या मागणीचा मूळ गाभा आहे. पण राज्य सरकारचा मात्र सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये मुंबई लोकल प्रवेशाच्या मज्जावालाच अधिक भर आहे. त्याचं कारणही तसंच आहे, ती म्हणजे मुंबई लोकलमधील गर्दी. ज्या पद्धतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये त्या ठिकाणच्या मेट्रो सेवा या कोविड स्प्रेडर ठरल्या, तशीच अवस्था मुंबई लोकलच्या निमित्ताने उद्भवू नये, असे सध्याच्या घडीचे सरकारचे मत आहे. पहिल्या लाटेच्या अनुभवानंतर दुसर्‍या लाटेच्या निमित्ताने लोकल प्रवेश अनेक दिवस बंद ठेवण्यासाठी हेच एक कारण आहे. पण कोरोनाच्या काळात मुंबई लोकलच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रवासाच्या आणि वाहतुकीच्या साधनांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

मुंबईत येत्या दिवसांमध्ये येऊ घातलेले 350 किमी हून अधिक मोठे मेट्रो सेवेचे जाळे हे मुंबईसाठी येत्या काळातील एक पर्यायाचे साधन म्हणून उपलब्ध होईल. ग्रीन ट्रान्सपोर्ट हा मेट्रोच्या सेवेचा गाभा आहे. पण मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि मुंबईचा होणारा विस्तार हा वाहतुकीच्या साधनांच्या मर्यादा समोर आणणारा असा आहे. मुंबईतील लोकल सेवेला मेट्रोचा पर्याय नक्कीच असेल. मुंबईत आरे कारशेडमुळे लांबलेला प्रकल्प, कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे रखडलेले मेट्रो प्रकल्प, कोरोनाच्या महामारीमुळे रखडलेले प्रकल्प अशा अनेक कारणामुळे या पर्यायाच्या उपलब्धततेमध्ये अडथळे येत आहेत. पण मुंबईला गती देणारा असा हा प्रकल्प मुंबईकरांच्या वेगात नक्कीच भर घालणारा ठरेल यात शंका नाही. या पर्यायाला आणखी काही वर्षे लागली तरीही शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार शहर नियोजनाचा भाग म्हणून मुंबईतील प्रवासी वाहतुकीचा मेगा प्लॅन आगामी काळात होणे गरजेचे आहे.

कारण मुंबईतील वाहतुकीची समस्या एकट्या मेट्रोच्या पर्यायाने सुटणारी नाही. मुंबईतील वाहतुकीमध्ये येत्या दिवसांमध्ये कोस्टल रोडचा पर्यायही समोर येणार आहे. या दोन्ही मार्गांनी मुंबईतील प्रवास वेगवान करण्याचा मानस आहे. पण या दोन्ही पर्यायामध्ये सर्वसामान्यांचा वाहतुकीसाठीचा खर्च कसा मर्यादित राहील यावरही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. मेट्रोचा पर्याय तुलनेने स्वस्त आणि जलद असेल. पण रस्ते वाहतुकीला मात्र तितकासा दिलासा नसेल. कोस्टल रोडसारख्या पर्यायासाठी नक्कीच अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे पर्याय यानिमित्ताने विचारात असणे गरजेचे आहे. पण हे सगळे पर्याय येण्यासाठी मुंबईकरांना अनेक दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे मुंबईच्या वाहतुकीच्या मर्यादा समोर आल्या आहेत. अगदी मुंबई पावसाच्या पाण्यानेही ठप्प होते. दुसरीकडे एखाद्या तांत्रिक बिघाडानेही शहराचा वेग मंदावतो, पण अशा सर्व परिस्थितीत मात्र शहर वेठीस धरले जाते, ही मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहराची शोकांतिक आहे. अगदी लोकलच्या मिनिटानुसार कॅलक्युलेटीव्ह असलेला मुंबईकर हा व्हॅल्यू फॉर टाईम याच एका आधारावर धाव घेत असतो, ती एकट्या मुंबई लोकलच्या आधारावर. आगामी वर्षांच्या निमित्ताने हा शहरातील ट्रेंड नक्कीच बदलण्याची गरज आहे. त्यासाठीच येत्या वर्षांमध्ये शहराच्या नियोजनाचा भाग म्हणजे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे गरजेचे आहे. मुंबई लोकलला काय पर्यायी साधने देता येतील, जी सर्वसामान्यांच्या रोजगारालाही हातभार लावतील आणि प्रवासाची सहज साधने होतील असा विचार धोरणकर्त्यांनी, नियोजन करणार्‍या संस्था आणि नगर रचनाकार यांनी करायला हवा.

शहरातील सर्वसामान्यांना दिलासा मिळायला हवा. शहरातील विविध घटकांचा विचार या शहर नियोजनात त्यानिमित्ताने व्हायला हवा. शहरासाठी योगदान देण्याची हीच काय ती संधी मुंबईकरांना असेल. त्यामुळेच एखादा प्रकल्प लादला जाऊन त्याचा मोनोरेल्वेसारखा हत्ती होणार नाही यासारख्या बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. अन्यथा सर्वसामान्यांचा पैसा हा बिग टिकिट प्रकल्पांसाठी उधळणे याचाच ट्रेंड कायम राहील. परिणामी सार्वजनिक प्रकल्पाच्या निमित्ताने मेट्रोसारख्या प्रकल्पासाठी जसे आशादायी चित्र सध्या मुंबईकरांच्या मनात तयार झाले त्याचा स्वप्नभंग व्हायला नको इतकीच काय ती अपेक्षा.

एका मुंबईकर युवकाचा नुकताच व्हारयल झालेला व्हिडिओ हा सर्वसामान्य मुंबईकर ज्या परिस्थितीतून जात आहे, त्याचे ते प्रातिनिधीक उदाहरण आहे. कोरोनामुळे अगोदरच अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे हातातोंडाची मिळवणी कशी करायचा हा प्रश्न उभा राहिलेला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक उद्योगधंदे आहेत, त्यामुळे रोजगार उपलब्ध होत असतात. मुंबई शहर हे कधीही झोपत नाही, तसेच मेहनत करणार्‍याला हे शहर उपाशी झोपू देत आहे. मेहनत केली तर चार पैसे मिळतील. आपल्या कुटुंबासह गावची जबाबदारीही पेलता येईल, या आशेने विविध राज्यांमधील युवक मुंबईत येत असतात. पण कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंदी आलेली आहे. त्यात मुंबईच्या लोकलचाही समावेश आहे. लोकल सुरू आहे, पण सर्वसामान्यांसाठी बंद आहे.

कोरोना रोखण्यासाठी सरकारने सर्वसामान्यांना प्रवेश नाकारला आहे, पण आता जगायचं कसं, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याचे उत्तरही सरकाराला शोधावे लागेल. कारण लोकल ही मुंबईकराला परवडणारे वाहतुकीचे साधन आहे. लोकलच्या वेगाशी मुंबईकराच्या जीवनाचा वेग जोडलेला आहे, म्हणूनच लोकलला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटले जाते. मुंबईकरांच्या सुखदु:खांची ही वाहिनी आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती एका बाजूला आहे, तर दुसर्‍या बाजूला बँक खात्यावरचे पैसेही संपत चालले आहेत, जसं पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, जगात बाकी सगळ्याचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याचाच सर्वसामान्य मुंबईकर सध्या लोकलबंदीमुळे धडधडता अनुभव घेत आहे.

First Published on: June 28, 2021 11:30 PM
Exit mobile version