दिवाळीने उडवली अर्थव्यवस्थेची कोरोना मंदी!

दिवाळीने उडवली अर्थव्यवस्थेची कोरोना मंदी!

कोविड १९ मुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या, कित्येकांना पूर्ण पगार मिळाले नाहीत. परिणामी या क्षेत्रातील जाणकारांनी असे मत व्यक्त केले होते की, देशवासियांची क्रयशक्ती कमी झाली असणार; पण हे मत खोटे ठरले. दिवाळी काळात प्रचंड किरकोळ विक्री-खरेदी झाली. यंदा कित्येकांना बोनस मिळाले नाहीत. कित्येकांना कमी मिळाले तरीही या दिवाळीत सर्वसामान्य लोकांकडून चांगली खरेदी झाली. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. भारतीयांची उत्सवप्रियता हे कदाचित या मागचे कारण असू शकेल. तसेच ऋण काढून हा होईना; सण साजरा करायची भारतीयांची जी मनोवृत्ती आहे ती याला कारणीभूत असावी. अर्थव्यवस्थेला मिळालेली चालना भविष्यातही टिकेल का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

या दिवाळीच्या खरेदीचे आणखी एक महत्व म्हणजे जनतेने चिनी वस्तू फार कमी खरेदी केल्या. जास्त पैसे मोजून जास्तीत जास्त भारतीय वस्तू खरेदी केल्या. भारत सरकारने चीनच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणे तितकेसे सोपे नाही. तो आंतरराष्ट्रीय विषय होऊ शकतो. देशाने जर चीनच्या आयातीवर बंदी घातली तर भारतातून चीनला होणारी निर्यात बंद होवू शकते. ते देशाला परवडणारे नाही. त्यामुळे याबाबत सरकारने निर्णय घेण्याऐवजी जनतेने स्वेच्छेने चिनी वस्तू नाकारल्या हे चांगले झाले.

कोट्यवधींची उलाढाल- यंदाच्या दिवाळीत १.२५ लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल देशभरातील बाजारात झाली. ही सर्व उलाढाल विविध भागांतील स्थानिक बाजारांत झाली आहे. ‘कॅट’ या व्यापार्‍यांच्या संघटनेने दिवाळीआधी, ‘स्थानिकांकडून सामान खरेदी करा’ असे आवाहन करणारी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला देशभरात जबरदस्त प्रतिसाद मिळाला असे ‘कॅट’ने म्हटले आहे. मुंबई ही देशाची राजधानी आहे. त्यामुळे देशाच्या एकूण व्यवसायापैकी जवळपास ८ ते १२ टक्के उलाढाल मुंबईत होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीत मुंबईच्या स्थानिक बाजाराने जवळपास १० हजार कोटी रुपयांची उलाढाल केली.

भारत सरकार आर्थिक व्यवहार ऑनलाईन व्हावेत किंवा चेकने व्हावेत यासाठी प्रयत्नशील असूनही, या दिवाळीत खरेदी करताना लोकांनी रोखीतील व्यवहारांना प्राधान्य दिले. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी चलनात २८.३० लाख कोटी रुपयांची रोकड होती. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते पुढील कारणांनी देशात रोखीचे व्यवहार जास्त होतात – १) कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सामान्य नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रोख रक्कम जवळ ठेवत असावेत. २) अजूनही देशातील १५ कोटी जनतेची बँक खाती नाहीत. त्यांच्यासाठी रोख रक्कम हाच व्यवहाराचा पर्याय आहे. ३) अनेक व्यापारी-व्यावसायिक अद्यापही रोखीनेच व्यवहार करतात. या कारणांमुळे रोखीत व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर होतात.

यंदाची दिवाळी ही बाजारपेठा फुललेली (कोरोनाच्या निर्बंधांकडे डोळझाक करून) चलनवलन सुरू झालेली व भविष्याबद्दलच्या नव्या आशा जागविणारी होती. तेजीची पहिली चाहूल मुंबई शेअर बाजारात लागली. तर यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी देशातील सोन्याच्या विक्रीने नोंद केली. यंदा प्रथमच देशातील सराफा बाजारात १५ टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. विक्री झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत साडेसात हजार कोटी रुपये होती. मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर आणि अहमदाबाद आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी झाली. ‘कॅट’च्या आकडेवारीनुसार, दिल्लीत एक हजार कोटी रुपयांची सोने विक्री झाली. दक्षिण भारतात हीच आकडेवारी २००० कोटी रुपयांच्या आसपास होती. दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांनाही प्रचंड मागणी होती.

जेव्हा सामान्य ग्राहकाकडे अधिकची रक्कम शिल्लक असते तेव्हा तो सोने-चांदी खरेदी करतो हे जर खरे मानले तर देशभरात आज फार मोठ्या प्रमाणावरील जनतेची क्रयशक्ती चांगली आहे. भारतीय अर्थकारणाला प्रचंड गती मिळण्याची ही सुरुवात असू शकते. तसे पाहिले तर, इंधनाच्या चढलेल्या भावांनी सार्वत्रिक महागाई झाली आहे. हजारो घरांना कोरोनाने जीवघेणा तडाखा दिला आहे. मात्र, कोरोना काळात सर्वात जास्त हात दिला तो लागोपाठ दोन वर्षे पडलेल्या उत्तम पावसाने! यामुळे ग्रामीण भागात, अर्धनागरी भागात दिवाळीचा विशेष उत्साह जाणवला. यंदा एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत देशभरात ७ लाख १९ हजार कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक सार्वजनिक व खासगी अशा दोन्ही क्षेत्रात झाली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी परदेशी गुंतवणूकीतही बाजी मारली आहे. महाराष्ट्राचा विशेषत: विदर्भाचा विचार केला तर, यंदा कापसाला चांगला भाव मिळाला म्हणून कापूस उत्पादक आनंदी आहेत. आता दिवाळी सरली असून तुलसी विवाहानंतर लग्नसराईचे दिवस चालू होतील. यंदा लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. त्यामुळे खरेदी वाढणार म्हणजे बाजारपेठा गजबजलेल्याच राहणार! त्यानंतर येणार डिसेंबर. वर्ष अखेर व त्यात नाताळ. या काळात पर्यटन उद्योग तेजीत असतो. गेली दोन वर्षे पर्यटन हा शब्दच उच्चारला गेला नव्हता; पण दिवाळीत लोकांनी बरेच पर्यटन केले. तसेच डिसेंबरातही नेहमीप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावर पर्यटन होईल. म्हणजे एकूणच आपली अर्थव्यवस्था प्रगतीशील राहील! करमणूक क्षेत्रही यात मागे नाही. अजूनही सर्वत्र शंभर टक्के आसन क्षमतेने सिनेमागृह सुरू झाली नसूनही, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

कोरोना काळात अनेकांच्या कमाईवर मोठी गदा आली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर काही अंशी सुधारणा झाली असली, तरी अनेकांच्या बाबतीत ती पूर्ववत झालेली नाही अशांनी दिवाळीत लहान मोठे व्यवसाय करण्याचा पर्याय निवडला आणि या व्यवसायांनी त्यांना दिलासाही दिला. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेवून त्यांनी हंगामी व्यवसाय सुरू केले होते. पूर्वी अशी परिस्थिती गिरणी कामगारांच्या संपानंतर निर्माण झाली होती. त्यावेळी गिरणी कामगारांनी वॉचमन, पावभाजी, वडापाव वगैरेंच्या गाड्या चालविणे वगैरे व्यवसाय केले होते तसे आता बर्‍याच जणांनी केले. दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात उटणे, कंदील, पणत्या, गेरू यांना मोठी मागणी असते म्हणून उत्पन्नाचे साधन बंद झालेल्यांनी हे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. या दिवाळीच्या हंगामी व्यवसायात मोठी गुंतवणूक लागत नाही. मोठा गाळाही लागत नाही. आणि दहा-पंधरा दिवसात पैसा हातात येतो. या व्यवसायांचा बर्‍याच जणांना दिलासा मिळाला.

कारविक्रीत संमिश्र वातावरण-देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या ऑक्टोबरमधील कारविक्रीत वार्षिक आधारावर २४ टक्के घट नोंदविण्यात आली. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या बजाज ऑटोच्या विक्रीतही वार्षिक विक्रीत १४ टक्के घट झाली आहे. मात्र व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनातील अशोक लेलँडच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये २१ हजार ३२२ कार निर्यात केल्या. गेल्यावर्षी हे प्रमाण ९ हजार ५८६ इतके होते. ऑक्टोबरमध्ये टाटा मोटर्सने ६७ हजार ८२६ कार विकल्या. गेल्या वर्षी हा आकडा ५२ हजार १३२ इतका होता. यात ३० टक्के वाढ झाली. याच कालावधीत व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही १८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. कंपनीच्या देशांतर्गत वाहनविक्रीत ३१ टक्क्यांची वाढ झाली. कार विक्रीत मात्र वाढ झाली. दिवाळीच्या तीन दिवसात मुंबईतील सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात एकूण १४५० जागांचे रजिस्ट्रेशन झाले. परिमाणी राज्य सरकारच्या तिजोरीतही बराच महसूल जमा झाला. शासनाच्या तिजोरीत १०२ कोटी रुपये जमा झाले.

भविष्यकाळ आशादायी-स्थूल व सूक्ष्म अर्थशास्त्रीय निर्णय योग्य प्रकारे तसेच योग्य वेळी घेतल्यामुळे आणि या निर्णयांना आर्थिक व्यवहारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे वाटचाल करत आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात मांडले आहे. वेगाने केले जात असलेले लसीकरण आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात कोरोना काळात झालेली तफावतही वेगाने दूर होत आहे. रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळेही अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने वेग घेण्यास ठरलेली प्रमुख कारणे – यंदाच्या समासुदीच्या दिवसांत वस्तूंच्या खरेदीत झालेली वाढ. दिवाळीत गेल्या दशकभरातील झालेली सर्वाधिक १.३० लाख कोटी रुपयांची उलाढाल. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची मावळलेली शक्यता. बाजारातील सकारात्मक वातावरण व संपुष्टात आणलेले काही निर्बंध आणि त्यामुळे ग्राहकांचे उंचावलेले मनोबल. अर्थव्यवस्थेच्या दमदार वाटचालीत देशाच्या कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे. जलसाठे मुबलक आहेत. देशात सरकारकडून खतांची व बियाणांची पुरेशी उपलब्धता करून देण्यात आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या काळात कृषी निर्यातीत वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ झाली आहे. ग्रामीण भागातूनही कृषी उत्पादनांना वाढती मागणी आहे. ट्रॅक्टर आणि दुचाकींना ग्रामीण भागातून मागणी वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिवाळीत देशाच्या अर्थव्यवस्थेने जी आगेकूच चालू केली आहे, अशीच पुढेही सुरू राहील, अशा आशा करुया.

First Published on: November 26, 2021 6:02 AM
Exit mobile version