नाना जरा दमानं घ्या…!

नाना जरा दमानं घ्या…!

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सध्या स्वबळाच्या नार्‍यावरुन धुसफूस सुरू आहे. ही धुसफूस सुरू होण्यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आहेत. नाना गेले काही दिवस त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नाना पटोले स्टेटमेंट्स करत नाहीत. ते फायरिंग करतात. आजची नाही, ही त्यांची जुनी सवय आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्याच्या हे लक्षात आलं. जे आधीपासून नानांना ओळखतात त्यांना ही त्यांची सवय माहिती आहे. नानांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केलं आहे. महाविकास आघाडी नेते जरी हा दावा फेटाळून लावत असतील तरी देखील नानांच्या आक्रमकपणामुळे महाविकास आघाडीला धोका होऊ शकतो.

नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं. नाना जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते तेव्हा अनेकांना अत्यंत शांत वाटत होते. मात्र, जेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतले तेव्हा त्यांचा आक्रमकपणा दाखवायला सुरुवात केली. २०१४ मध्ये जेव्हा हातातून सत्ता गेली तेव्हापासून काँग्रेस पक्ष झोपी गेला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांवर मरगळ आली होती. ही मरगळ हटवण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षामध्ये ऊर्जा भरण्यासाठी एखादा आक्रमक नेता प्रदेशाध्यपदी असणं पक्षाला आवश्यक आहे. यासाठी नानांचं नाव चपखल बसत होतं. अखेर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाना पटोले हे मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे आहेत. भंडारा जिल्ह्यातील एक छोट्या गावातून स्थानिक पातळीपासून ते विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष असा जबरदस्त प्रवास नानांनी केला आहे. नाना हे विदर्भातून येतात. नानांची ओळख ही आक्रमक बाण्याचा, लढाऊ, शेतकरी आणि ओबीसी समजाचं नेतृत्व अशी आहे. नानांचा हा आक्रमकपणा महाविकास आघाडीला धोक्यात आणू शकतो.

नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांच्या आक्रमक वक्तव्यांची बातमी झालेली नाही असा दिवस क्वचितच उजाडला असेल. सातत्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, ज्यामुळे चर्चेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडी देखील येत आहे. सत्तेचा भाग असलेले विधानसभाध्यक्षपद सोडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नानांचे घोडे फारच फुरफुरू लागले. अर्थात बराच काळ निश्चेष्ट पडलेल्या त्या पक्षात प्राण फुंकण्याच्या दृष्टीने नाना करीत असलेली धावपळ आणि बडबड योग्यच. पण ती तितकीच पुरेशी नाही. त्याच्या जोडीला वास्तवाचे काहीएक भान लागते आणि ते असेल तर एका दिशेने संबंधित सर्वाचे ठोस प्रयत्न आवश्यक असतात. काँग्रेस पक्षात सद्य:स्थितीत नेमकी त्याचीच बोंब. एके काळी २८८ सदस्यांच्या विधानसभेत २०० हून अधिक आमदार बाळगणार्‍या काँग्रेसची अवस्था आज जेमतेम ४० आमदारांवर आली आहे. तेव्हा मुळात या पक्षाने आधी प्रयत्न करायला हवेत ती आपली परिस्थिती कशी सुधारेल यासाठी. इतक्या काडीपैलवानी अवस्थेतून काँग्रेस स्वबळाचे शड्ड ठोकत बसला तर त्यातून केवळ विनोदनिर्मिती होईल. पैलवानांची स्वबळ भाषा गांभीर्याने घेतली जाते. पण काडीपैलवानही त्याच भाषेत बोलू लागले तर ते हास्यास्पद ठरते.

नाना सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहेत. परंतु, असं करताना ते मित्रपक्षांवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसैनिकांना कामाला लागाच्या आदेशावरुन निशाणा साधताना स्वबळावरुन माघार घेणार नाही, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. नाना एवढ्यावरच न थांबता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टिप्पणी केली. अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं करतात, काँग्रेसची करत नाहीत, असा आरोप केला. यानंतर अजित पवार यांनी नाराजी बोलून दाखवल्याच्या बातम्या आल्या. नाना महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचं काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांजवळ सांगितल्यांच्या चर्चा आहेत. त्यामुळे ज्या आघाडीमुळे राज्यात आपल्याला काही पत मिळाली आहे, त्या एकसंधतेला तडा जाणार नाही, एवढे तरी नानांनी लक्षात ठेवायला हवं.

स्वबळावर लढण्याच्या घोषणेने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने नापसंती व्यक्त केली असतानाही, २०१४ च्या धर्तीवर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, कोणताही धोका नको म्हणूनच स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी नानांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना लहान व्यक्तींबद्दल बोलत नाही अशी प्रतिक्रिया दिली. नानांच्या पाळत ठेवण्याच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर नानांनी “तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे,” असा खुलासा केला. अशा पद्धतीने सारवासारव करावी लागावी अशा चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी नानांनी घ्यायला हवी. अन्यथा आघाडीत बिघाडी होण्याची विरोधक वाटच पाहत आहेत अन् यासाठी स्वत:ची मदत होणार नाही याची काळजी नाना पटोलेंनी घ्यावी.

नानांनी लोणावळ्याच्या सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाळत ठेवत असल्याचा आरोप केला. काँग्रेससाठी पाळत हा विषय काही नवा नाही. केंद्रात विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार कोसळ्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. मात्र, काही महिन्यातच राजीव गांधींनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर देशाला मध्यावधी निवडणुकांना समोरे जावं लागलं. आता आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करणारे नाना पटोले सरकार पाठिंबा काढून घेणार काय? मुळात त्यांना तसा निर्णय घेण्याचा अधिकार आहे काय? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. आपल्या पक्षाची वाढ आणि विस्तार करणे हा नानांचा अधिकार आणि जबाबदारी आहे. मात्र, प्रमुख काम म्हणजे सरकार टिकवणं हे नाना विसरुन गेले आहेत की काय? सरकारमध्ये एकत्र आणि पक्ष म्हणून चालवताना आणि वाढवताना थोडेफार ताण तणाव येणार हे उघड आहे. म्हणून कायम स्वबळ आणि मित्र पक्षांना अंगावर घेण्याचा पवित्रा वाईट आणि उपयोगाचा नाही. याची जाणीव कदाचित नानांनी असावी, पण ते आक्रमकतेच्या, उत्साहाच्या भरात विसरत असावेत. असं असेल तर त्यांनी त्यांच्या उत्साहाला आवरावं.

नाना मेहनती आहेत. इरेला पेटले तर फायद्या तोट्याचा हिशोब न करता वाटेल ते करतात. मोदींचा सूर्य तळपत असताना त्याच्यावर टीका करून खासदारकी सोडणं, पक्ष सोडणं आणि खाली झालेल्या जागेवर मित्रपक्षाचा उमेदवार निवडून आणणं लहान गोष्ट नाही. नानांनी ती करून दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांचा फेव्हरेट कॅबिनेट मंत्री विधानसभेत पाडून दाखवला आहे. नाना कर्तबगार आहेत, याबद्दल त्यांच्या जुन्या-नव्या कुठल्याच विरोधकांना शंका नाही. पण नानांची फायरिंग अनेकांना त्यांच्यापासून तोडते. आताही तेच सुरू आहे. फक्त आताची धोका एरव्हीपेक्षा मोठी आहे. आता ते पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांची फायरिंग त्यांच्यापुरती मर्यादित नाही. त्यांचं बोलणं पक्षाची भूमिका असते. आता जे सुरू आहेत याचे परिणाम धड होणार नाहीत. पक्ष वाढवायचा तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा लागतो हे बरोबर. पण, हा उत्साह सध्या सुरू असलेली व्यवस्था मोडणारा तर ठरणार नाही ना हे बघावं लागेल.

सध्याचं राज्य सरकार डळमळीत आहेच. ते मोडावं म्हणून सुरू असलेले प्रयत्न जगजाहीर आहेत. अशावेळी, त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटणार नाही ना, आपली नॉन स्टॉप वक्तव्य निमित्त ठरणार नाहीत ना याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. तसं खापर फुटलं तर फार मोठी हानी होईल. एक मोठा वर्ग पक्षापासून कायमचा तुटेल. सत्ता असली तर पक्ष वाढेल. कार्यकर्त्यांना ताकद मिळेल. ती गेली तर अडचणी वाढतील. आता आणखी अडचणी वाढून चालणार नाही. पक्ष वाढवायचा आहे. ही जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी हालचालींची घाई करायला हवी हेही बरोबर आहे. पण ही आता जशी घाई सुरू आहे ती काही फार बरी नाही. एवढं भान राहू द्यावंच लागेल. पडत्या काळात शांत राहून काम करणं गरजेचं असतं हे नानांनी लक्षात घ्यायला हवं. असाच आक्रमकपणा आणि मित्रपक्षांवर आरोप करत राहिले तर बरंच काही गमावून बसावं लागेल. त्यामुळे नाना जरा दमानं घ्या…!

First Published on: July 16, 2021 11:09 PM
Exit mobile version