दैव देतं आणि कर्म नेतं!

दैव देतं आणि कर्म नेतं!

संपादकीय

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत जोरदार राजकीय धुरळा उडवून दिला होता. नारायण राणेंच्या यात्रेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. आज त्याच देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाशी भाजप सहमत नसल्याचं स्पष्ट करून राणे यांनी सुरू केलेल्या धुमशानापासून फारकत घेतली. राण्यांची जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वरच्या गोळवण येथे पोचल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. ही घटना दुपारी घडली असली तरी त्यासाठीची मोर्चेबांधणी गृहमंत्रालयाने सोमवारी रात्रीपासूनच सुरू केली होती. गृहमंत्र्यालयातील बडे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी मंथन करुन राणे यांच्यावरील कारवाईची रणनीती तयार केली. मुख्यमंत्री ठाकरेंविषयी नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य हे अदखलपात्र गुन्ह्याच्या वर्गात मोडते असं कायद्याचा अभ्यास केलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह कायदेतज्ज्ञांनी म्हटलं आहे. गोळवण येथे राणे यांना ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक पोहोचले असताना त्यांच्याकडे राणे यांच्या मुलांनी तसेच भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी वारंवार नोटिसीची मागणी केली.

पोलीस अधिकार्‍यांबरोबर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आणि राणे यांची मुलं हुज्जत घालत असतानाच मधुमेहाच्या त्रासामुळे राणे यांना जेवणाचं ताट आणून देण्यात आलं. राणे जेवत असतानाच पोलीस अधिकारी राणेंना आपल्याबरोबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात येण्यासाठीच्या सूचना देत होते. त्यावेळेस या खोलीत प्रचंड गोंधळ सुरू होता. मधुमेह, रक्तदाब या व्याधी असल्याने औषधं आणि वेळेवरच पौष्टिक तरीही पथ्याचं जेवण घेणार्‍या राणेंना या गोंधळातच आपलं भरलं ताट सोडून द्यावं लागलं. ही घटना लाखो लोकांनी दूरचित्रवाणीवरून पाहिली असेलच. प्रत्यक्षातही राण्यांसाठी सत्तेचं आणि मंत्रालयातील कामकाजाचं राजकीय ताटही बर्‍याच मोठ्या विलंबानंतर समोर आलं होतं. त्या राजकीय भरल्या ताटावरुनही बेताल जिभेमुळे आणि एकाच वेळी अनेक शत्रूंना उसकावण्यामुळे दूर जातं की काय असं वाटू लागलं आहे. राज्यातील सगळ्यात छोटा जिल्हा सिंधुदुर्ग हे राणेंचं होमपीच. या जिल्ह्यातील चाकरमानी आणि कोकणी माणसांवर राणेंची आणि शिवसेनेचीही भिस्त. या सिंधुदुर्गमध्ये विजयी योद्ध्याच्या आविर्भावात पोचावं यासाठी राणे आणि भाजपनेही मोठा फौजफाटा जमा केला होता.

नारायण राणे यांना कोकणातलं आपलं गतवैभव मिळवायचं होतं तर भाजपला शिवसेनेची राजकीय कंबर मोडण्यासाठी कोकणी वोटबँकेवर डल्ला मारायचा होता. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून येणार्‍या 60 नगरसेवकांचा मुंबई महापालिकेत समावेश आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्यासारख्या महापालिका कोळून प्यायलेल्या नेत्याऐवजी भाजपने आगामी महापालिका निवडणुकीसाठी कर्णधार म्हणून राणेंच्या नावाची घोषणा केली. तिथेच राणेंच्या कानात वारं शिरलं. नारायण राणे मुख्यमंत्री ठाकरे आणि मातोश्रीवर तुटून पडायला लागले. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला भाजपने महापालिकेसाठीचा ‘इव्हेंट’ म्हणून पाहिलं. साहजिकच यात्रेला गर्दी होऊ लागली. ही गर्दी दिसताच राणेंचा वारु आणखी उधळला. त्यांच्या तोंडून ठाकरेंवर टीका तर झालीच पण मंगळवारी ते वाहिन्यांचे पत्रकार, वाहिन्या आणि आजपर्यंत त्यांना सहानुभूती देणार्‍या तळाच्या शिवसैनिकांवरही घसरले. त्यानंतर माध्यमं आणि शिवसैनिक यांनी एकच कल्ला केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पोलिसांनी ताब्यात घेतलेले पहिले मंत्री असं दूषण राणेंच्या वाट्याला आलं. मंगळवारी सकाळपासूनच राणेंच्या दुर्गतीला सुरुवात झाली होती. तिचा शेवट राणेंना भरल्या ताटावरुन उठवण्यात झाला.

नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे मोदींनी शिवसेनेच्या दृष्टीने एक अप्रिय निर्णय घेतला होता, पण त्याच वेळेला हा निर्णय महाराष्ट्रातील तरुणांच्या दृष्टीने आणि उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. कारण राणे हे एक मोठे मास लीडर म्हणून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. देशभरात आलेल्या पुरांच्या संकटाचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. उद्यमशील महाराष्ट्र त्यामुळे पुरता कोलमडून गेला आहे. अशा देशातल्या दुसर्‍या क्रमांकाच्या राज्याला औद्योगिकदृष्ठ्या सावरण्याची जबाबदारी ही तितक्याच कसदार नेत्याकडे देणं मोदींना क्रमप्राप्त होतं. त्यामुळे यासाठी राणे यांची झालेली निवड ही अत्यंत बिनचूक होती. नागपूरचे नितीन गडकरी या पद्धतीत विकासाचा झपाटा आणि विकासाचा अश्वमेध घेऊन देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अहोरात्र काम करत असतात, तशा पद्धतीत राणे उद्योग क्षेत्रामध्ये काम करतील अशी अनेक मंडळींची धारणा होती. मात्र 2005 ते 2021 अशा सोळा वर्षांच्या काळामध्ये राणे विशेष काही बदल स्वतःमध्ये आणि स्वतःच्या राजकारणामध्ये घडवू शकले नाहीत, हेच आजच्या सगळ्या राण्यांच्या धुमशानावरून आपल्या लक्षात येऊ शकेल.

कोरोनाच्या महामारीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने जे वीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केलेले आहे त्यातला एक तृतीयांश वाटा सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांसाठी आहे. या मंत्रालयाचे सर्वेसर्वा नारायण राणे आहेत. सिंधुदुर्गमधील कुडाळ मालवण या मतदारसंघात वैभव नाईक यांनी राणे यांचा पराभव केल्यानंतर त्यांच्यासारख्या मास लीडरची खूप मोठ्या प्रमाणात राजकीय होरपळ झाली होती. ते जुने अपयशाचे दिवस विसरून एक नवी भरारी घेण्याची संधी नरेंद्र मोदींनी राणेंना उपलब्ध करून दिली होती. त्याच वेळेला राणेंचा अत्यंत कौशल्याने वापर करत महाराष्ट्राच्या सत्तेपासून भाजप जो दुरावलेला आहे, तिथे पुन्हा एकदा सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न भाजपच्या धुरंधरांनी केला होता, मात्र राण्यांनी मोदी-शहा यांच्याबरोबरच भाजपलाही आज काहीस निराश केलं आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, याचं कारण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या संपूर्ण कोकणी पट्ट्यात उद्योगांचं जाळं उभं करण्याची एक उत्तम संधी राणे आणि त्यांच्या कुटुंबाला प्राप्त झाली होती. त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात राणे यांना तर मिळालं असतं. पण त्याच वेळेला भाजपकडे मोठ्या प्रमाणात नवमतदार आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदारही आकर्षित होऊ शकला असता.

मात्र उचलली जीभ लावली टाळ्याला या राणेंच्या वृत्तीने आणि त्यांच्या आततायी स्वभावाने आज त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते असलेल्या शरद पवारांनी तर राणे यांच्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळेच ते असं बोलले असावेत, असं बोलून आपण त्यांना फार महत्व देत नसल्याचेही उदृत केलं. पवारांची ही प्रतिक्रिया म्हणजे राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याला शालजोडीतले देण्यासारखे आहे. मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती ही बारा कोटी जनतेचं नेतृत्व म्हणून विराजमान झालेली असते. स्वतः माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांना या सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्यांनी एकाच वेळेला शिवसेना, प्रशासन आणि निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना दुखावण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे बर्‍याच मोठ्या विलंबानंतर भरलेलं सोन्याचं ताट समोर आल्यावर राणेंनी त्यावर आपल्या वाणीमुळे लाथ मारण्याचं काम केलेलं आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यांत राडा सुरू झाला.

हा राडा विशेषत: भाजपविरुद्ध शिवसेना असा होण्यापेक्षा राणेविरुद्ध शिवसेना असाच होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचे प्रमुख झाल्यापासून शिवसैनिकांना अशा स्वरूपाचा राडा करण्याची संधी मिळालेली नव्हती. राणे यांनी ती संधी आणून दिली आणि त्यामुळे वरूण सरदेसाई किंवा नरेश म्हस्के यांच्यासारखे पक्षाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मखरामध्ये बसलेले अनेक शोभेचे गणपती बाहेर पडले आणि त्यांनी रस्त्यावर आकांडतांडव करायला सुरुवात केली. अगदी चोवीस तासांपूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या उत्सवाला स्पष्ट आणि ठाम शब्दात विरोध केला. या विरोधामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा करणारी तरुण मंडळीही काहीशी खट्टू झालेली होती, मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दहीहंडी करणार्‍या गोविंदांना ठणकावून सांगितलं. त्याच वेळेला अगदी चोवीस तासानंतर मुख्यमंत्र्यांच्या सन्मानासाठी किंवा राणे यांचा समाचार घेण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्या वेळेला कोरोना नेमका कुठे पळाला होता, हा प्रश्न ही दृश्ये आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघणार्‍या मराठी जनतेला पडला असेल.

नारायण राणे हे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा पल्लेदार राजकीय प्रवास करणारे नेते आहेत. राणे यांचं शिक्षण मर्यादित असलं तरी गेल्या पन्नास वर्षांचा त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. त्यांच्या गाठीशी असलेले प्रशासकीय अधिकारी, विधिज्ञ, कायद्याचे जाणकार आणि राजकीय विश्लेषक यांच्या माध्यमातून ते आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर सतत कुरघोडी करत असतात. हे सगळं करत असताना राणे अनेक अडचणींतून सहिसलामत बाहेर पडतात. संगमेश्वरच्या गोळवणमध्ये राणेंना ताब्यात घेतल्यानंतर झालेली पोलिसांची कारवाई हा राणे यांच्या दृष्टीने एक खूपच छोटा विषय आहे. कायदेशीर लढाईमध्ये आणि न्याय प्रक्रियेमध्ये नारायण राणे हे बाजी मारू शकतील, पण त्याच वेळेला राणे यांचे हाडवैर ज्यांच्याशी आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत. सत्तेसमोर शहाणपण चालत नसतं, असं म्हटलं जातं.

सत्ता ही राण्यांबरोबर आहे तशीच ती उद्धव यांच्याबरोबरही आहे, अर्थात हे दोन्ही नेते त्या त्या क्षणाला सत्ता कशी, किती आणि कोणासाठी वापरतात यावर या सत्तेच्या यशापयशाची समीकरणं अवलंबून आहेत. पण त्याच वेळेला राणेंसारख्या मोठ्या नेत्याने महानेता होण्याची संधी असताना भरल्या ताटावर लाथ मारण्याचा केलेला प्रकार ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या प्रवर्गात मोडतो आणि त्यामुळेच राणे यांनी मंगळवारी जे काही केलं त्यामुळे राणे यांचं नुकसान तर झालेलं आहेच, त्याचबरोबर राणे यांच्या मंत्रीपदामुळे ज्या कोकणी मुलखाला उद्योगधंद्यांमध्ये किंवा व्यवसायामध्ये संधी मिळवण्याचा आशेचा किरण दिसत होता, त्यालाही धुळीत मिळवण्याचे काम राणेंनी केलेलं आहे. अर्थात, ओढवून घेतलेल्या या आपत्कालीन परिस्थितीतून राणे तितक्याच आत्मविश्वासानं बाहेर पडणार की त्यांची पुढील राजकीय वाटचाल लटपटणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on: August 25, 2021 3:30 AM
Exit mobile version