रात्रशाळांना हवा प्रकाश मार्ग

रात्रशाळांना हवा प्रकाश मार्ग

आज राज्यातील कानाकोपर्‍यात अनेक विद्यार्थी किंवा प्रौढांना अनेक कारणास्तव शिक्षण सोडावे लागते. अनेकांना नोकरीचा पर्याय निवडावा लागतो. अशा वेळी दिवसा नोकरी करून रात्री शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी रात्रशाळांचा पर्याय निवडला जातो. रात्रशाळांमुळे अनेक कष्टकरी विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून गेले आहे, याची अनेक कारणे आज देता येतील. मुळात रात्रशाळांचा इतिहास लक्षात घेतल्यास महात्मा जोतिबा फुले यांनी १८५५ साली पुणे येथे पहिली रात्रशाळा सुरू केली. गरीब, गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ब्रॅडले यांनी १८६६ मध्ये मुंबई येथे रात्रशाळा सुरू केली. १९४७ ते १९९३ दरम्यान औद्योगिक शहरात व गिरणगावात रात्रशाळेचा प्रसार झाला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून रात्र कनिष्ठ महाविद्यालय व रात्र महाविद्यालये रात्रशाळांना जोडून सुरू करण्यात आली.

आज महाराष्ट्रात खालील तक्त्याप्रमाणे रात्रशाळा, रात्र कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये कार्यरत आहेत व तेथे विद्यार्थी दिवसाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीमध्ये वरीलप्रमाणे रात्रशाळा, रात्र कनिष्ठ महाविद्यालये व रात्र महाविद्यालये कार्यरत असून त्यामध्ये जवळजवळ ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व १७०० शिक्षक ज्ञानदानाचे काम इमानेइतबारे करत आहेत. मुंबई व उपनगर मिळून १८६ रात्रशाळा कार्यरत आहेत. त्यातील जवळजवळ ९० रात्रशाळा या मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये भरत आहेत. ज्यात विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. यातील अनेक शाळा सध्या स्वयंसेवी संघटनांमार्फत देखील चालविल्या जातात. त्यांची कामगिरी उत्तम असली तरी आज यास अनेकांनी विरोधाचा झेंडा दाखविल्याने काही काळ हा विषय चर्चेचा बनला होता. आज रात्रशाळा अनेक कसोट्यातून जात आहेत. आजच्या घडीला रात्रशाळांसाठी पूर्वी भाडे कमी होते, परंतु १९९८ पासून भाडेवाढ झाली व २००४ पासून वेतनेतर अनुदान बंद झाले. त्यामुळे भाड्याचा प्रश्न उभा राहिला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाडेवाढीवर स्थगिती आणली. त्यामुळे रात्रशाळा वाचल्या, परंतु आता भाड्याच्या थकबाकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

रात्रशाळा शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून मार्ग काढण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र प्रदेश’ रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती अशा संघटना करत आहेत. शासन दरवर्षी राज्य साक्षर करण्यासाठी योजना आखत असते. मग रात्रशाळेमध्ये पट कमी होतो म्हणून त्या बंद करण्याचा निर्णय साक्षरता विरोधातला आहे. रात्रशाळेमुळे खर्‍या अर्थाने साक्षरता वाढत असते. शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचत असते. दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी या रात्रशाळेमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळते. रात्रशाळेमुळे कष्टकरी विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून टाकले आहे. रात्रशाळा काहींना वरदान ठरतात. जसे हणमंत कृष्णा बापट हा रात्रशाळेतील विद्यार्थी दिवसा केंद्र सरकारच्या कँटीनमध्ये काम करी व रात्री शिक्षण असे करून आता त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कंबोडीयन मिशनमध्ये (शांतिसेना) भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेने ‘शांतिपदक’ बहाल केले. तसेच रात्रशाळेतच शिकून सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले, तर काही सध्या उच्च पदावर कार्यरत आहेत. रात्रशाळा ही संकल्पना फक्त महाराष्ट्रातच आहे. बाकीच्या राज्यात नाही.

आज मुंबईसह राज्यातील अनेक रात्रशाळांमध्ये फक्त एकच शिक्षक आणि एकच शिक्षकेतर कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे. मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. या सरप्लस शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असणार्‍या रात्रशाळांमध्ये हलविले आहे. यामुळे सध्या रात्र शाळांतील शिक्षकांची समस्या दूर झाली असली तरी अनेक शाळांमध्ये सरप्लस शिक्षक अनेक शाळांमध्ये हजर झालेले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये आजही शिक्षक तसेच आहेत, तर दुसरीकडे या शाळांमध्ये शिक्षकांवर दोन गट झाले असून अनेक शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. सरप्लस झालेल्या शिक्षकांना तीन तासांसाठी याठिकाणी पूर्ण पगार मिळतो, तर दुसरीकडे येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांना अर्धा पगार मिळतो. त्याचबरोबर इतर सुविधांच्या बाबतीतही तशीच परिस्थिती असल्याचे पहायला मिळते. आजही अनेक शाळांना २००४ पासून प्रलंबित वेतनेतर अनुदान रात्रशाळेसाठी प्राधान्याने १२ टक्के मंजूर झालेले नाही, तर रात्रशाळा कर्मचार्‍यांना प्रवासभत्ता मंजूर करण्याची मागणी अनुत्तरीत राहिली आहे, तर वस्त्याचे स्थलांतर झाल्यामुळे विद्यार्थीसंख्या कमी होते. तेव्हा ज्या ठिकाणी वस्ती वाढलेली आहे अशा ठिकाणी रात्रशाळा स्थलांतरित करण्यास परवानगी मिळावी. त्यासाठी अंतराची अट नसण्याची मागणी केली होती. अद्याप ती पूर्ण झालेली नाही. शिक्षकेतर भरती ताबडतोब चालू करण्याची गरज आहे, तर रात्रशाळेसाठी विद्यार्थीसंख्येची सरासरी उपस्थिती अट १२ असावी व कनिष्ठ महाविद्यालयासाठी ४० असावी, यावरही विचार होणे गरजेचे आहे, तर रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची आवश्यकता आहे. रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झालेल्या तारखेपासून अनुदानप्राप्त मानाव्यात व त्यांना पूर्ण अनुदान द्यावे, ही मागणी ही तशीच कायम असल्याने अनेकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

रात्रशाळा ही काळाची गरज आहे. त्या टिकल्याच पाहिजेत. गरीब व अज्ञानामुळे जे तरुण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले किंवा नैसर्गिक आपत्ती व घरगुती अडचणीमुळे दिवसाच्या शाळेत जाऊ शकत नाहीत, वय वाढलेले असल्यामुळे शाळेत (मनात असूनसुद्धा) जाऊ शकत नाहीत त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात सहभागी होण्यासाठी रात्रशाळा हा उत्तम पर्याय आहे. मुक्तशाळा, मुक्त विद्यापीठे, बहिस्थ परीक्षा यामुळे शाळाबाह्य तरुणांना शिक्षण प्रवाहात येता येते, परंतु त्यामुळे दैनिक अध्यापन, वैयक्तिक मार्गदर्शन होत नाही. विद्यार्थ्यांना घरी स्वयंअभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण नसते. याच कारणासाठी रात्रशाळांना पर्याय नाही.

First Published on: November 11, 2019 5:30 AM
Exit mobile version