आत्महत्येचा ‘ट्रेण्ड’

आत्महत्येचा ‘ट्रेण्ड’

संपादकीय

‘त्याला माझ्यापासून सुटका हवी असेल तर त्याला मिळाली पाहिजे. मी खूश आहे की मी अल्लाहला भेटेन. मी विचारेन त्यांना, माझं काय चुकलं? मला चांगले आई-वडील मिळाले. पण तरी काहीतरी उणीव राहिलीच माझ्यात किंवा कदाचित माझ्या नशिबातच ते लिहिलं होतं. पण मी आनंदात आहे. समाधानाने सगळ्यांचा निरोप घेतेय. मी अल्लाहकडे प्रार्थना करेन की मला कृपा करुन माणसांचे चेहरे पुन्हा दाखवू नका…’ अहमदाबादच्या आयशाचे हे अखेरचे शब्द.. साबरमती नदीत उडी मारुन तिने आत्महत्या केली. पण त्यापूर्वी तिने व्हिडिओ तयार करुन तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर कमालीचा व्हायरल होतोय. प्रचंड अस्वस्थ करणारी ही घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही अशाच प्रकारची दुसरी घटना घडली. कन्नडमधील एका तरुणीने एका विहिरीजवळ उभी राहत आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ तयार केला. त्याच वेळी नाशिकमधील एका तरुणाने पोलीस अधिकार्‍याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि गळफास घेतला. एकाच आठवड्यात घडलेल्या या तिन्ही घटनांनी सगळेच हादरुन गेले आहेत. अशातच आणखी एक शहारा आणणारी घटना औरंगाबादमध्ये घडली. एक १४ वर्षांची मुलगी दोन दिवस सतत मोबाइलवर आत्महत्येचे व्हिडिओ पाहत होती. त्यावरुन तिचे आई-वडील रागवले. या रागातून तिने आत्महत्या केली.

एकूणच काय तर मरण आता स्वस्त झालेय. जगण्यातला अर्थ अनेकांच्या दृष्टीने हरवत चाललाय. आजवर आत्महत्येपूर्वी लोक चिठ्ठी लिहून ठेवायचे. पण आता काळाबरोबर ट्रेण्डही बदलला आहे. चिठ्ठीची जागा व्हिडिओने घेतली आहे. आपल्या भावना व्हिडिओच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहचतील असा कदाचित समज असावा. पण, विविध माध्यमांवर विशेषत: समाज माध्यमांवर वारंवार टाकले जाणारे असे व्हिडिओ इतरांनाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात याचा कोणी विचार केला आहे का? औरंगाबादमधील घटना यातूनच घडलीय. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत मार्गदर्शक तत्व ठरवून दिले आहे. आत्महत्येची बातमी प्रसारित करताना माध्यमांनी संवेदनशीलता व संयम बाळगणे जरूरीचे असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने आत्महत्येची बातमी दाखवली जाते, तिचा प्रभाव आत्महत्येचा विचार मनात घोळविणार्‍यांच्या मनावर पडतो. परंतु लोक मेले तरी चालतील आपला टीआरपी तेवढा वाढावा या विकृत मनोवृत्तीतून आत्महत्यांचे ज्या पद्धतीने सादरीकरण होत आहे ते पाहून हे सादरीकरण नव्हे तर हे उदात्तीकरण आहे असेच म्हणावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात महिलांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण हे एक लाख स्त्रियांमागे १६.४ एवढे, तर पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण एक लाख पुरुषांमागे २५ एवढे आहे.

जगातील ७९ टक्के आत्महत्या या कमी व मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये होत आहेत. नैराश्यातून सर्वाधिक ७० ते ८० टक्के आत्महत्या होतात. आत्महत्या करणार्‍यांमध्ये १५ ते २४ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. ही आकडेवारी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा नकारात्मक होतोय हे दर्शविते. प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. मात्र, त्यातील काही लोक हा संघर्ष पचवू शकत नाही आणि त्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या हा खरेतर कोणाचाही आवडीचा पर्याय होऊ शकत नाही. इतर कोणताही पर्याय न दिसता तो निवडावा लागणे ही किती गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असू शकेल हे लक्षात घ्यावे. खरे तर, माणूस वगळला तर अन्य कुठलाही प्राणी आत्महत्या करताना दिसत नाही.

म्हणजे माणसाशिवाय अन्य प्राण्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही. अन्य प्राण्यांना जीवनाचे महत्व जितके कळले आहे तितके ते माणसाला कळलेले नाही असा अर्थ यातून निघू शकतो. मानसिक रोगतज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांच्याकडे येणार्‍या ७० टक्के व्यक्तींच्या आयुष्यात कधीनाकधी स्वत:ला संपवून टाकावे असे विचार येऊन गेलेले असतात. पण त्यातली बरीच मंडळी स्वतः त्या विचारांना झटकून टाकतात. मरणाच्या पर्यायाचे दार बंद करतात. कधी भीतीने (डेरिंग होत नाही म्हणून) तर कधी हा उपाय नाही असा त्यावेळेपुरता समंजस विचार करून ते समुपदेशकापर्यंत पोहोचलेले असतात.

पण, जे जीवनातील कोणत्या न कोणत्या समस्येमुळे, आलेल्या अपयशामुळे इतके खचून जातात की, स्वत:ला त्या समस्या किंवा अपयशापुढे खूप छोटे समजतात, ते आयुष्य संपवण्याचा पर्याय निवडतात. म्हणजेच समस्येला स्वतःपेक्षा ते कितीतरी मोठे समजत असतात. दुर्दैवी बाब म्हणजे शारीरिक आजारांप्रमाणे मनाचेही आजार असतात ही गोष्ट असंख्य भारतीय समजूनच घेत नाहीत. मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये तसेच त्याच्या नातेवाईकांमध्ये मानसिक आजारांबाबत असलेल्या न्यूनगंडामुळे हा आजार लपवून ठेवण्याकडे या लोकांचा कल असतो. परिणामी या आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे समाजामध्ये विध्वंसक प्रवृत्ती व आत्महत्येच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. रोजच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या जीवनामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

आज समाजामध्ये डिप्रेशन म्हणजे काय हेच अनेकांना माहीत नाही. लोकांनी जर डिप्रेशन म्हणजे काय याची कारणे जाणून घेतली आणि शासनाने ती माहीत करुन देण्यासाठी उपाययोजना राबवल्या तर आत्महत्या रोखता येऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य जेव्हा बिघडते तेव्हा शरीर जसे आजारी पडते तसेच मनदेखील आजारी पडते, हे वास्तव आता आपण सगळ्यांनी डोळसपणे स्वीकारले पाहिजे आणि शरीराचे दुखणे जसे अंगावर न काढता आपण डॉक्टरकडे जातो तसेच, मन आजारी पडले की, मानसोपचार तज्ज्ञ, मनोचिकित्सक, तज्ज्ञ समुपदेशक यांच्याकडे जाणे गरजेचे आहे व मदत किंवा उपचार घेणे गरजेचे आहे. माणसाला आयुष्यात जगण्याचे कौशल्य येणे महत्वाचे आहे. जीवनात कोणताही प्रसंग आला तर त्याला तोंड देता आले पाहिजे. शासनाने हे कौशल्य शाळांमधून मुलांना देणे गरजेचे आहे.

कवी मंगेश पाडगावकर ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, असे जेव्हा लिहितात तेव्हा जगण्यातील मजा आणखी आपल्याला कळते. जीवन सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगले पाहिजे असे जेव्हा वाटते तेव्हा नैराश्य खूप लांब पळून जाते. मानसिक आजार वेळीच लक्षात न आल्याने किंवा त्यांकडे दुर्लक्ष केल्याने व्यक्ती मानसिक आजाराची बळी ठरते. उत्तम पालकत्व आणि कुटुंबाची योग्य साथ यामुळे पुढील पिढीतील आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल. यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणातून येणारे नैराश्य टाळता येईल. कुटुंबातील कोणताही सदस्य आत्महत्येची धमकी देत असेल, तर ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. त्याच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. आत्महत्या रोखण्याकरिता एकमेकांशी असणारा संवाद जितका महत्वाचा तितकाच स्वतःशी असणारा संवाद महत्वाचा आहे. या संवादाची कला आणि शास्त्र सर्व पातळ्यांवरून शिकविणे अत्यंत महत्वाचे आहेत. समस्या निराकरण, निर्णयक्षमता, ताणतणाव निवारण या जीवन कौशल्यांबरोबर स्व-प्रतिमा आणि आत्मप्रतिष्ठा या संकल्पना शिकणे, त्याचा विचार करणे आवश्यक आहे. ज्यामुळे जगणे अवघड होऊन मरण सोपे होण्याच्या मानसिकतेत आपण बदल घडवून आणू शकतो.

First Published on: March 5, 2021 3:00 AM
Exit mobile version