पणशीकरांचा नाटक हाच ध्यास आणि नाटक हाच श्वास…!

पणशीकरांचा नाटक हाच ध्यास आणि नाटक हाच श्वास…!

Fayyaz Sheikh

फैय्याज शेख

तो मी नव्हेच’ नाटकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मी त्यात काम केल्यामुळे या नाटकाविषयी, प्रभाकर पणशीकरांविषयी, नाट्यसंपदेविषयी मला जो अनुभव मिळाला आहे तो अभूतपर्व आहे. मी आठवीत असताना १९६१ साली सोलापूरला प्रथम पणशीकरांचे ‘तो मी नव्हेच’ नाटक पहिलं. प्रचंड गर्दी होती, वय लहान होते त्यामुळे पणशीकर व्यक्तिमत्वाविषयी आश्चर्य वाटले.. ही व्यक्ती अभिनय करते, गातेसुद्धानाटकात पटकन वेश बदलून पुन्हा दुसरे पात्र अभिनित करते.. नवीन होते..

१९६५ साली मी मुंबईत आल्यावर पहिल्यांदा वसईच्या प्रयोगात या नाटकात अत्रे साहेबांमुळे ‘प्रमिला परांजपे’ हे पात्र साकारले. ही भूमिका करणारी अभिनेत्री आजारी असल्याने त्या जागी २३ वेळा काम करायला मिळाले. त्यावेळेस अत्रे थिएटरचा सगळा संच सोबत होता. पण जेव्हा अत्रे साहेब निवर्तले तेव्हा पणशीकर तिथले सर्वेसर्वा झाले आणि त्यांनी नाट्यसंपदेतर्फे ‘तो मी नव्हेच’ करायचे ठरविले.

मी सोलापूरची असल्याने कानाडीवर प्रभुत्वतेव्हा एकदा प्रयोगात चेनक्काची भूमिका साकारली आणि या पात्राचे भरपूर प्रयोग केले. जेवढ्या वेळा मी काम केलं तेवढ्या वेळा मी ते प्रचंड Enjoy केले. त्यानंतर बिर्ला थिएटरच्या sold out show ला अचानकच मला सुनंदा दातारची भूमिका करायला मिळाली. ‘तो मी नव्हेच’ च्या नेपथ्याचा असा एक फायदा असतो की विंगांच्या बाजूलाच पिंजरे असतात त्यामुळे विंगांमधून prompting केले तरी काम भागण्यासारखे असते. त्यानंतर मी, सुनंदा दातारचे १००० प्रयोग केले

पणशीकरांकडून खूप खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. नाटकाची संहिता जेव्हा तुम्ही करता तेव्हा एकतर पहिली गोष्ट तुमची चोख पाहिजे ती म्हणजे पाठांतर. इतके प्रयोग होऊन सुद्धा बस मध्ये,थिएटर मध्ये प्रवेश करण्याआधी, ग्रीन रूम मध्ये सतत त्यांच्या भूमिकेचा ‘संथा’ रियाझ चालू असायचा. हा त्यांचा मोठा गुण होता. रोज काही ना काही नवीन नवीन शिकवायचे . ते नट तर होतेच पण फार चांगले दिग्दर्शक होते. नेपथ्याची चांगली जाण त्यांना होती. कट्यारचे नेपथ्य, ‘फिरता रंगमंच’ , ‘सरकता रंगमंच’ ह्या सगळ्या कल्पना पणशीकरांच्या होत्या. अफलातून कल्पनाशक्तीजणू ‘नाटक हाच ध्या नाटक हाच श्वास..’ नाटक सोडून काहीही त्यांच्या डोक्यात नसायचे.

दौरे कसे आखायचे हे त्यांना नेमके माहीत होते त्यांना सगळे ‘दौरेबहाद्दर’ म्हणायचे. त्यांचा जवळजवळ महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा पाठ होता. रस्ता चुकायचा कधी प्रश्नच उद्भवला नाही. कारण , पणशीकरांच्या डोक्यात सगळं मार्किंग पक्क असायचं. त्यामुळे आम्ही एकापाठोपाठ एक २०२२ दौरे करु शकलो. टप्प्याटप्प्याने प्रयोग करीत करीत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला. कोल्हापूरच्या प्रयोगात प्रवेशानंतर प्रेक्षक ओरडायचे , “नवीन पाखरू आलंय वाटत!!!” त्यावेळी फार हसायला यायचे. पण पणशीकर कधीच bearing सोडायचे नाहीत.

मी १६ वर्षे नाट्यसंपदेत काम केलं आहे.. आणि तेही जास्त करून ‘तो मी नव्हेच’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ ही नाटकं आम्ही एकत्र केली.. ‘अंधार माझा सोबतीचा’ नाटकात माझ्यासारख्या गायक मुलीला आंधळ्या व्यक्तीचे पात्र दिले. ‘वीज म्हणाली धरतीला ‘ मध्ये ‘जुलेखा’ ची भूमिका दिली. पणशीकर हे ‘रत्नपारखी’ होते. कोणाकडून कुठले काम कसे करवून घ्यायचे हे त्यांना नीट कळायचे. त्यांनी कितीतरी कलावंत घडवले.

एकदा मीच पणशीकरांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांना मी असा प्रश्न विचारला की, तुम्ही जेव्हा अभिनय करता तेव्हा निर्माता तुमच्यावर कुरघोडी करतो की निर्मात्यावर अभिनेता? तेव्हा ते मला म्हणाले, जेव्हा मी ऑफ स्टेज असतो तेव्हा मी निर्माता असतो. किती बुकिंग झाले, तिकीटे विकली गेली ही आणि अशी कामांची जबाबदारी माझ्यावर असते.पण एकदा रंग चेहऱ्याला लावला की मग तिथे निर्माता संपतो आणि अभिनेता सुरू होतो. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त नाटकाची संहिता असते.

एका प्रयोगाला दीलीप कुमार आले , त्यांना ह्याच नाटकातील लखोबा लोखंडे म्हणजेच पणशीकरांचे पात्र चित्रपटात साकारायचे होते. पण पणशीकरांचा अभिनय आणि संपूर्ण नाटक पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा विषय चित्रपटात रुपांतरीत करावयाचा नाहीच मुळीनाटकाचाच आहे. कारण सिनेमात आम्ही एका गाण्यातील तीन कडव्यात तीन ड्रेस बदलतो पण, वेश पटकन बदलून पुन्हा लगेच मंचावर येणं‌ ही जी मज्जा प्रत्यक्ष बघण्यात आहे ती केवळ नाटकातूनच अनुभवता येते चित्रपटातील‌ पूर्वनियोजित प्रवेशांमधून नव्हेअसे दिलीत कुमार म्हणाले.

नाट्यसंपदेमधून त्यांनी ‘होनाजी बाळा’, जुनं नाटक ‘संत तुकाराम’ , ‘गोरा कुंभार’ ही नाटकं पुनर्निर्मित केली. ह्या संस्थेमधून आम्हाला दिग्दर्शक चांगले मिळाले, आजूबाजूचे कलावंत सुद्धा तेवढेच अनुभवी मिळाले. आम्ही नाट्यसंपदेचे महोत्सव हैद्राबाद,‌ बेंगलुरू, मंगलोर या आणि अशा अनेक ठिकाणी केले. मंगलोरला तर पणशीकरांनी कानाडी भूमिका साकारली.

वसईच्या प्रयोगाला जाताना अपघात होऊन सर्वांना इजा झाली तरीही पणशीकरांपासून प्रेरणा घेऊन ‘तो मी..’ चा प्रयोग केला. एवढा मोठा कलाकार पण कायम कलावंतांचे कौतुक करायचे. मनाचा मोठेपणा होता. कोणाला कधीही नावे ठेवली नाहीत. त्यांच्या ठिकाणी गुणग्राहकता होती, संस्कृत, मराठीवर प्रभुत्व होते. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणे,वाढदिवस साजरे करायचे यातून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसतो. निर्माता, नेपथ्यकार, अभिनेता, संगीताची जाण असलेल्या अश्या ह्या चतुरस्त्र व्यक्तीमत्वाने ‘तो मी नव्हेच’ या ‘न भूतो न भविष्याति’ नाटकाचे १००० प्रयोग केले . जे नाटक आम्ही जगलो ज्यातून आम्ही घडलो आणि बरंच काही शिकलो त्याच नाटकाला आता ६० वर्ष पूर्ण होत आहेत याचा फार‌ फार‌ आनंद होत आहे.

नमस्कार.

आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ नाटकाला 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या आजरामर नाट्यकृतीला मानवंदना देण्यासाठी 8 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे सायं.7 वाजता, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हीरकमहोत्सवी स्मृतिसोहोळा आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे.

(लेखिका मराठी नाट्य अभिनेत्री आणि गायिका आहेत)

शब्दांकन – कु. वैभवी चांदेरकर. (बदलापूर)

First Published on: October 6, 2022 8:45 PM
Exit mobile version