एसटी संपात प्रवाशांची होरपळ

एसटी संपात प्रवाशांची होरपळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कामगार संपावरून सध्या चर्वितचर्वण सुरू आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने संपकर्‍यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले तरी अनेक कामगारांचा अडेलतट्टूपणा सुरूच आहे. हा संप खरोखर मिटवायचाय की त्यात राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा उद्योग चाललाय, ते समजणे आकलनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. गेल्या ५ महिन्यांपासून संप सुरू आहे. संपात काही तडजोडी झाल्या. त्या काहींनी मान्य केल्या आणि कामावर परतले. त्यामुळे बंद पडलेली एसटी काही प्रमाणात धावू लागली. १९४८ मध्ये स्थापना झाल्यानंतर इतके दिवस रेंगाळलेला एसटीचा हा पहिला संप आहे.

कामगारांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य झाल्या किंवा राहिलेल्या भविष्यात होतीलसुद्धा! पण ज्या एसटीवर महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवासी अवलंबून आहे त्याचे काय? संपाचे जे काय दळण दळलं जातंय त्यात हा प्रवासी पूर्णपणे भरडला गेला आहे. आज काही प्रमाणात एसटी सुरू असली तरी अनेक फेर्‍या अद्याप बंद असल्याने प्रवाशांना प्रवासाची ‘अ‍ॅडजस्टमेंट’च करावी लागत आहे. कोरोना काळात प्रवासी सेवेवर परिणाम झाल्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. नेहमीप्रमाणे काही दिवसांतच संप मिटेल ही आशा फोल ठरली. संपाला प्रारंभ झाला आणि तेव्हापासून प्रवाशांचे हाल सुरू झाले. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीच्या वैध-अवैध सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी सामान्य प्रवासी बराचसा एसटीवर अवलंबून आहे.

ग्रामीण भागात तर आजही एसटीला पर्याय नाही. प्रवासासाठी सर्वात सुरक्षित आणि खात्रीचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. रात्री-अपरात्री एकटी-दुकटी प्रवासी महिलाही निर्धास्तपणे प्रवास करू शकते, अशी एसटीची ख्याती आहे. एसटीचा संप सुरू झाला की प्रवासाची नाळ तुटून जाते अशी सामान्य प्रवाशांची मानसिकता आहे. त्यामुळे सुरू झालेला संप हा या सामान्य प्रवाशांना रुचलेला नाही. संप रेंगाळणार असेल तर आम्हाला परवडणार्‍या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्या, ही त्यांची मागणी योग्य म्हणता येईल. दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करणारी एसटी आता निम्मीच प्रवासी वाहतूक करीत आहे. एसटी सुरू झाली असली तरी ती पूर्ण क्षमतेने नसल्याने वेळापत्रकात अनियमितता आहे. ग्रामीण भागात तर अनेक फेर्‍या बंद आहेत. ग्रामीण भागाला जोडणारी एसटी तेथे दुरावली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपामुळे एसटी जेव्हा पूर्ण ठप्प झाली, तेव्हा खासगी प्रवासी वाहतुकीचे चांगलेच फावले.

अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. कधीतरी आरटीओ, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस रस्त्यावर उतरण्याचा फार्स झाला. यात अनेकांनी चांगले हात धुवून घेतले ते लपून-छपून नव्हे तर उजळ माथ्याने, किंबहुना मेंढरासारखे वाहनात कोंबून भरलेले प्रवासी पैशांची चालणारी देवाण-घेवाण उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यामुळे हे वाहतूकदार मनाला येईल ते भाडे सांगत आणि प्रवासीही ते निमूटपणे देत. हा प्रकार अजून अनेक ठिकाणी सुरू आहे. गरजू प्रवासी दुप्पट-तिप्पट पैसे मोजायला तयार असल्याचा फायदा काही लबाड वाहतूकदारांनी घेतला. अवघ्या ५० किलोमीटरच्या प्रवासाला ५०० रुपये मोजणारे प्रवासीही होते.

प्रवास परवडत नाही म्हणून अनेकांनी बाहेरगावी नोकरी करणे सोडून दिले ही वस्तुस्थिती आहे. प्रवाशांच्या सेवेच्या गोंडस नावाखाली शहरातून बंद असलेल्या स्कूल बसही रस्त्यावर आल्या होत्या. अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात आहे, कुणीतरी लक्ष द्या हो, ही प्रवाशांची आर्त हाक संबंधित सरकारी यंत्रणांच्या कानाला कधी ऐकू जात नाही. परिणामी महागडा प्रवास अजूनही प्रवाशांच्या नशिबी आहे. एसटी संपाचा फटका बसला तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना! कोरोना निर्बंध उठल्यानंतर शाळा रितसर सुरू झाल्या तरी हक्काची एसटी नसल्याने हे विद्यार्थी एक तर घरी थांबणे पसंत करीत किंवा ज्यांना परवडत होते ते एसटी भाड्यापेक्षा दुप्पट भाडे मोजून प्रवास करीत होते.

आता ग्रामीण भागात काही प्रमाणात एसटीचे दर्शन होऊ लागले असले तरी काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय कायम आहे. परीक्षा काळातही या विद्यार्थ्यांचे हाल झाले आणि अजूनही होत आहेत. ग्रामीण किंवा दुर्गम भागातून बरेचसे विद्यार्थी एसटीसाठी महामार्गावर येऊन थांबतात. परंतु तथाकथित ‘जलद’च्या नावाखाली बस रिकामी असली तरी थांबत नाही. मग या विद्यार्थ्यांना टॅक्सी, रिक्षा किंवा खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. प्रवाशांची कुतरओढ सुरू असताना कुठले राजकीय पक्ष त्यांच्यासाठी पुढे आले असे दिसले नाही. संपाबाबत आपली मते मांडण्यासाठी चमकोगिरी करू पाहणारे एसटी प्रवाशांचे होणारे हाल मात्र लक्षात घेत नाहीत.

महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजणे परवडत नाही. महागाई वाढली की महागाई भत्त्यात वाढ होण्याची सुविधा ठराविक वर्गालाच असल्यामुळे जमाखर्चाची तोंडमिळवणी करताना या सामान्य माणसाची दमछाक होत आहे. असे असताना हा सामान्य माणूस ५० रुपयांच्या प्रवासाला ५०० रुपये मोजेल, हे शक्य नाही. एसटी संपाने सर्वसामान्यांची कोंडी करून टाकलेली असताना तिकडे रेल्वेही कोरोना काळातील झालेले नुकसान भरून काढण्याच्या कामात गुंतलेली आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोकण रेल्वे मार्गावर १५ रुपयांचा प्रवास ४०, १० चा ३० रुपये झाला आहे. यावर कुणीही बोलत नाही. रेल्वेकडून सुरू असलेल्या या अधिकृत अतिरिक्त वसुलीबाबत संसदेत कुणा खासदाराने आवाज उठवला असे दिसलेले नाही. प्रवास महागला, करायचे काय, हा सर्वसामान्यांचा सवाल कुणी मनावर घेईल, अशी परिस्थिती नाही. तुम्हाला गरज आहे तर तुम्ही काही पण करा, असा काहीसा प्रकार आहे.

ग्रामीण भागातून अनेक पुरुष, तसेच महिला कामानिमित्त शहराच्या ठिकाणी जात-येत असतात. त्यांचा प्रवास महागलाय, एसटीत अजूनही अनियमितता आहे, याची दखल घेतली पाहिजे. रेल्वेने महाग करून ठेवलेला प्रवासही दखल घेण्याजोगा आहे. एसटी किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली नाही तर खासगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय राहत नाही. आता तेथेही संबंधित यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. एसटीचा संप सुरू आहे, सर्वसामान्य प्रवाशांचे किती हाल होत असतील, याकडे बोलघेवड्या नेतेमंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. या प्रवाशांना कुणी तरी वाली आहे, हे दिसू देत!


 

First Published on: April 12, 2022 4:46 AM
Exit mobile version