शिवसेनेचं चलो दिल्ली…

शिवसेनेचं चलो दिल्ली…

संपादकीय

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भाजपच्या हिंदुत्वावर कोरडे ओढत शिवसैनिकांना ‘चलो दिल्ली’चा नारा दिला. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक असं ब्रीदवाक्य घेऊन ‘सामना’कार सकाळ-संध्याकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला ठोकत असतात. संपादकीय भूमिका पक्षीय धोरणामध्ये परावर्तित करण्यासाठी शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचा मुहूर्त साधला. खरं तर शिवसेना आणि भाजप हे देशाच्या राजकारणातले सर्वाधिक काळ एका विशिष्ट उद्देशासाठी एकत्र राहिलेले राजकीय पक्ष म्हणून सार्‍यांनाच परिचित आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांच्या व्यक्तिगत मैत्रीतून तयार झालेला जिव्हाळा दोन्ही पक्षांची युती होण्यात परावर्तीत झाला. हिंदूंची मतं विभाजित होऊ नयेत म्हणून केलेल्या या युतीला राष्ट्रीय राजकारणामध्ये एक वेगळे स्थान होते. आता या दोन्ही पक्षांच्या दुसर्‍या पिढीला मात्र या युतीची अडचण वाटू लागली. साहजिकच विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जे ज्येष्ठांचं आणि त्यांच्या वारसांचं होतं तेच सेना-भाजपमध्ये सध्या सुरू आहे. ठाकरे-महाजन हे जरी हिंदुत्वाच्या युतीसाठी एकत्र आले असले तरी अत्यंत आक्रमकपणे हिंदुत्व देशपातळीवर घराघरात नेण्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या पश्चात आता हिंदुत्वासाठी आक्रमकपणे बोलण्यापेक्षा काम करण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखवत आहेत. शिवसेनाप्रमुख जेव्हा हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका मांडत होते, त्यावेळी त्यांना मिळालेला प्रतिसाद आक्रमकतेमुळेच होता. आता ती गोष्ट भाजपच्या नरेंद्र ते देवेंद्र या सगळ्यांनाच नीट कळून चुकली आहे. साहजिकच आक्रमकतेला त्याच पद्धतीने उत्तर देण्याच्या प्रयत्नात भाजपनं शिवसेनेबरोबर महाराष्ट्रातील युती तोडून राजकीय पंगा घेतला. हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली युती तुटल्यानंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊन मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आपल्या पारंपरिक विरोधकांबरोबर मांडीला मांडी लावून बसणे पसंत केलं, पण त्याच वेळी पंचवीस वर्षांची जुनी मैत्री असलेल्या भाजपला मात्र अंगावर घेताना जुनाच आक्रमकपणा दाखवायला सुरुवात केली.

मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शारीरिक मर्यादा, पक्षाकडे असलेलं मोजकं राजकीय बळ आणि केंद्रीय संस्थांमार्फत सुरू असलेली शिवसेनेतील नेत्यांची झाडाझडती, यामुळे उद्धव ठाकरे फारसे आक्रमकता दाखवणार नाहीत असा समज झालेल्या भाजपची मात्र उद्धव ठाकरे यांच्या ‘चलो दिल्ली’च्या नार्‍याने लाहीलाही झाली नसती तरच नवल. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपवाद वगळता आक्रमकपणे मोदी किंवा भाजप यांच्या अंगावर जाण्याचे धाडस राष्ट्रीय राजकारणात कोणीच करताना दिसत नाही. शरद पवारांनीही वेळोवेळी आपल्या रणनीतीला आणि शब्द नीतीलाही अनपेक्षित वळण दिले आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर त्यांच्याशी केलेल्या हातमिळवणीचा पवारांना फायदा झाला. केवळ स्वप्नवत असलेलं मुख्यमंत्रीपद सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चालत आलं. आजपर्यंत अनेकांनी आपलं आयुष्य राजकारणात खर्ची घालूनही त्यांना हे पद मिळवता आलेलं नाही. ती गोष्ट सेनेच्या प्रमुखांबाबत सहजगत्या घडून आली.

शिवसेना हा कडव्या निष्ठावंत आणि लढवय्या शिवसैनिकांचा पक्ष आहे. सध्या राजकारणात बेदिली माजली असतानाही पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानणार्‍या शिवसैनिकांची तळापासूनची मोठी फळी, जोडीला भगवा झेंडा आणि शिवसेनाप्रमुखांनी जागृत केलेली हिंदुत्वाची परंपरा अधोरेखित करणारं धनुष्यबाण हे पक्षाचं निवडणूक चिन्ह या सगळ्याच गोष्टी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार्‍या आहेत. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपला उद्धव ठाकरे यांनी ‘चलो दिल्ली’ची दिलेली हाक मोदींना जड जाऊ शकते याची कल्पना फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेत्याला नेमकी आलेली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासहित पक्षावरही हल्ला चढवण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये रोखण्यासाठी उत्तर प्रदेश खालोखाल खासदारांची रसद पुरविणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते.

बंगाल आधीच पंतप्रधान मोदींच्या विरोधात गेलेलाच आहे, त्यापाठोपाठ जर शिवसेनेनेही महाराष्ट्रात मोदींच्या विरोधात शड्डू ठोकला तर भाजपला त्याची राजकीय किंमत चुकवावी लागू शकते. उत्तर प्रदेशमध्ये सारं काही आलबेल नाही, याची एव्हाना मोदी आणि योगी दोघांनाही कल्पना आलेली आहे. त्यामुळेच उद्धव यांचा राष्ट्रीय पातळीवर जाण्याचा संकल्प हा भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. नोटबंदी, कोविडनंतरची बेकारी, इंधन दरवाढ, प्रचंड महागाई आणि पाकिस्तान, चीनचं छुपं आक्रमण यांसारख्या गोष्टींवर शिवसेना वेगळ्या पद्धतीने रान उठवू शकते. यावर शिवसेना हा व्यक्ती आणि कुटुंब केंद्रित पक्ष आहे, असा ठपका जर भाजपच्या मंडळींनी ठेवला तर त्यांच्याकडेही मोदी आणि शहा यांचा अपवाद वगळला तर फार काही प्रतिभावंत नेते राष्ट्रीय राजकारणात नाहीत. जी अडचण शिवसेनेची होऊ शकते तीच भाजपचीही होऊ शकते. कारण बर्‍याच राज्यांमध्ये प्रचाराची सगळी जबाबदारी मोदींना आपल्या खांद्यावर घ्यावी लागते.

महाराष्ट्रात हिंदू मतांचे विभाजन झाल्यास आगामी काळात त्याचा फायदा धर्मनिरपेक्ष राजकारण करणार्‍या राजकीय विरोधकांना होऊ शकतो. संख्याबळ तोकडं पडल्यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत जास्त आमदारसंख्या असूनही भाजप राज्यातील सत्तेपासून दूर आहे. आगामी काळात भाजपला राज्यात सत्ता मिळवायची असल्यास आपली आमदारांची ताकद आणखी दीडपट वाढवावी लागेल किंवा ‘मॅजिक फिगर’ची ताकद पुरवणारा सहकारी मिळवावा लागेल. या दोन्ही गोष्टी सध्या तरी भाजपला शक्य नाहीत. त्यामुळेच त्यांची राज्यात आगपाखड सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेतून बोलताना आपल्या शिवसैनिकांना ‘चलो दिल्ली’चा नारा देत चेतवलं आहे.

हे कमी म्हणून की काय ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री’ हा नारा देत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिद्दीने पेटून उठलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं एक जुन व्यंगचित्र ट्वीट केलं. त्यामुळे प्रमोद महाजन यांची खासदार कन्या पूनम महाजन यांनी राऊतांवर टीका केली. खरं तर राऊत यांनी ट्विट केलेलं व्यंगचित्र एकेकाळची भाजपची स्थिती दाखवणारं आहे. पंतप्रधान मोदींच्या रूपाने राष्ट्रीय पातळीवर राजकीय जादूगार सापडल्यानंतर भाजपने संपूर्ण देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा चंग बांधला आहे. त्याला आव्हान देण्याचं काम ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंसारखी नेते मंडळी आपापल्या ताकदीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज भाजपच्या खासदारांच्या ‘300 प्लस’ समोर शिवसेनेची ताकद दहा टक्केही नाही, तरीदेखील देशभरातील वेगवेगळ्या भागातील अशीच ताकद जोडण्याचं काम मोदी विरोधक जर करू शकले तर भाजपला स्वप्नभंजनाचा त्रास होऊ शकतो.

First Published on: January 26, 2022 5:41 AM
Exit mobile version