अति घाई कामाची नाही

अति घाई कामाची नाही

संपादकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करून काही विद्यमान मंत्र्यांना वगळले तर काही नव्या चेहर्‍यांना स्थान दिले. मंत्रिमंडळामध्ये नव्या दमाच्या माणसांना वाव दिल्यामुळे कामकाजाला अधिक गती येईल, अशी मोदींना अपेक्षा आहे. त्याच सोबत लवकरच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे तेथील लोकांनाही संतुष्ट करण्याची गरज होती. मोदींनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे भाजपमध्ये कही खुशी, कही गम, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा ज्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती, त्यांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे ती मंडळी फारच नाराज झाली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर अतिशय आक्रमक होऊन आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या माध्यमातून पंकजांनी आपल्या नाराजीचे वजन दाखवून दिले.

आपली बहीण प्रीतम मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही, हा त्यांनी मुंंडे परिवारावर झालेल्या अन्याय आहे, अशीच भूमिका घेतली. पंकजा मुंडे यांच्या नाराजीचे महत्वाचे कारण म्हणजे प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात न घेता त्यांच्याच समाजातील भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मुंडे परिवाराचे महत्व कमी करण्याचा यामागे हेतू आहे, असे समजून पंकजा अधिक आक्रमक झाल्या. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा माझे नेते आहेत, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगूून त्यांचे राजीनामे नामंजूर केले. आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना आक्रमक झालेल्या पंकजा मुंडे यांनी महाभारतातील अनेक उदाहरणे दिली, आपण धर्मयुद्ध लढत आहोत, असेे सांगितले. पंकजा मुंडे काय निर्णय घेणार असे अनेकांना वाटत होते. पण मोदी-शहांनी त्यांच्या उद्रेकाला फार महत्व दिले नाही, हे लक्षात आल्यावर त्या शांत झाल्या.

पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांची मुलगी असल्यामुळे जसे आपले वडील भाजपमध्ये मागास आणि बहुजनांचा चेहरा होते, तसेच आपणही आहोत, असाच त्यांचा विश्वास होता. त्यामुळे आपल्यालासुद्धा तसाच मान देण्यात यावा, असे त्यांना वाटते. गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजांकडे सगळी जबाबदारी आली. पंकजा यांचा स्वभाव आक्रमक आहे, त्या महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे आपल्याला उच्चपदावर म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचायचे आहे, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरू असतात. २०१४ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला. शेवटी त्यांचा घसा बसला. त्याचा फायदा भाजपला झाला. कारण मोदी हे गुजरातचे विकास पुरुष होते, त्यांनी भाजपला केंद्रात पहिल्यांदाच बहुमत मिळवून दिले होते. त्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला. त्यामुळे भाजपच्या १२२ जागा जिंकून आल्या. खरं तर भाजपला बहुमत मिळावे यासाठीच मोदींनी सगळा जोर लावला होता, पण तसे झाले नाही. पुढे भाजपने सत्ता स्थापन केली, त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना त्यात सहभागी झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांची निवड पंतप्रधान मोदी यांच्या पसंतीतून झालेली होती.

मोदींना नव्या दमाच्या व्यक्तीची गरज होती, त्याचसोबत जी व्यक्ती आपल्या आदेशांचे विनाविलंब पालन करेल, अशी हवी होती. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अगदी काही दिवस उलटत नाहीत, तोवर आपणही मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी महत्वाकांक्षा असलेल्या भाजपमधील स्पर्धकांची नाराजी उघडपणे दिसू लागली. खरे तर ज्यावेळी भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणारे हे जवळ जवळ निश्चित झाल्यावर एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत द्यायला सुरुवात केली होती, पण मोदींनी फडणवीसांना पसंती दिली. त्यामुळे पुढे फडवीसांचे स्पर्धक कोण असतील, हे अगोदरच दिसून आले होते.

भाजपची सत्ता आली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण देवेंद्र तो कल का बच्चा हैं, असे सांगून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांना जुमानत नसून आपणच खरे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहोत, असे सूचित केले होते. विनोद तावडे यांनीही जाहीरपणे नाही तरी अप्रत्यक्षपणे आपली महत्वाकांक्षा व्यक्त करून दाखवली होती. मुख्यमंत्रीपद नाही, तर निदान गृहमंत्रीपद तरी मिळावे असा तावडे यांचा प्रयत्न होता, त्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत धाव घेतली होती, पण शहांना गृहमंत्रीपद ठेवायचे नव्हते, त्यामुळे तावडेंचा तो प्रयत्न फसला. पंकजा मुंडे या तर जाहीर सभांमधून लोकांना आपणच मुख्यमंत्री व्हावे, असे लोकांना वाटत आहे, असे सांगत असत. त्यांनी तर बरेच वेळा आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांना वंजारी समाजाचा मोठा पाठिंबा असल्यामुळे त्या बिनधास्तपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवत होत्या. पण या सगळ्याकडे देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करून आपला कारभार चालवत होते. कारण त्यांना माहीत होते की, आपल्या डोक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात आहे.

एकनाथ खडसे हे नाराज आहेत, हे मोदींना माहीत होेते, त्यामुळेच त्यांच्याकडे महसूलसारख्या महत्वाच्या खात्याप्रमाणेच बरीच खाती देण्यात आली होती, पण तरीही खडसे त्यावर खूश नव्हते. त्यांना मुख्यमंत्रीपदावर आरुढ व्हायचे होते. पुढे त्यांची ही महत्वाकांक्षा फडणवीसांना त्रासदायक ठरू लागली. त्यानंतर एकनाथ खडसे यांचे भोसरी जमीन प्रकरण बाहेर आले आणि त्यांना पुढे मंत्रिमंडळातूनच बाहेर पडावे लागले. आपले काहीच चालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली, पण त्यांना तिथे फारसे महत्व नाही. फडणवीसांच्या कार्यक्षेत्रात भरारी मारण्याचा प्रयत्न करणार्‍या विनोद तावडे यांची पहिल्यांदा खाती कमी करून त्यांचे पंख छाटण्यात आले. मुख्यमंत्रीपदासाठी आतुर झालेल्या पंकजा मुंडे यांचे अचानक चक्की खरेदी प्रकरण बाहेर आले. असे सगळे सुरू असताना भाजपची पाच वर्षे संपली. त्यानंतर २०१९ ची विधानसभा निवडणूक आली.

त्यावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना तिकिटच देण्यात आले नाही. पंकजा मुंडे यांचा होम पिचवरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक पराभव झाला. पुढे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपद देऊन महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना ज्यांनी आव्हान दिले, त्यांना असे निष्प्रभ करण्यात आले. मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, पण त्यासाठी संयम राखण्याची गरज असते, आपल्याच पक्षातील व्यक्तीला खाली खेचून त्या जागी बसण्याची अति घाई एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना महागात पडली. खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. विनोद तावडे महाराष्ट्रात दिसतच नाहीत. भागवत कराड यांना पुढे आणून पंकजाच नव्हे तर मुंडे परिवाराचे महत्व कमी करण्यात आले आहे.

First Published on: July 20, 2021 3:30 AM
Exit mobile version