बाजीराव सिंघम पार्ट 3

बाजीराव सिंघम पार्ट 3

संपादकीय

महाराष्ट्राचे आणि त्यातही विशेषता मुंबईचे पोलीस दल हे जगभरात स्कॉटलंड यार्डच्या दर्जाचे पोलीस दल म्हणून ओळखले जाते. अर्थात त्यावेळी मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांचा दरारा ही तसाच वाखाणण्यासारखा होता. ज्यूलियो रिबेरो, अरविंद इनामदार यांच्यासारखे कर्तव्यकठोर अधिकारी ही महाराष्ट्राची मुंबई पोलीस दलाची ओळख होती. त्यानंतरही अगदी अलीकडच्या काळात म्हणजे जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देखील अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे यांच्यासारख्या देशभक्ती अंगामध्ये ओतप्रोत भरलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी मुंबईकरांचे दहशतवाद्यांपासून जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीचा कोट केला. मुंबईकरांवर अतिरेक्यांनी झालेल्या गोळ्या या बहाद्दर आणि बेडर अधिकार्‍यांनी स्वतःच्या अंगावर झेलल्या. आणि लोकांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राण्यांची आहुती मात्र या पोलीस अधिकार्‍यांनी दिली. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आणि जगालाही अभिमान वाटेल असे काम कामटे, साळसकर, करकरे करून गेले. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील असताना आबांनी पोलिसांच्या कल्याणार्थ अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे पोलिसांचे पगार वाढवण्याचा. सरकारी खात्यांमध्ये सर्वात दुर्लक्षित आणि उपेक्षित जर कोणते खाते असेल गृहखाते अर्थात पोलिसांचे खाते असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

पोलीस म्हटलं की सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे दिवस-रात्र ऊन वारा पावसाची पर्वा न करता रस्त्यावरची वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी 24 तास रस्त्यांवर आणि चौकाचौकांमध्ये उभे असलेले वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस. केवळ अंगावर खाकी वर्दीचे कपडे आहेत म्हणून स्वतःच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता चोराचा पाठलाग करून त्याला पकडणारे पोलीस, खून,बलात्कार, दरोडे, बँका लुटणारे अशा नामचिन गुन्हेगारांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुरुंगाची हवा खायला लावणारे पोलीस. सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यासमोर पोलीस म्हटले की आजही नाक्यावरील बंदोबस्तावरील पोलीसच नजरेसमोर येतो. पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा पदांवरील आयपीएस अधिकारी अथवा मपोसे अधिकारी किंवा अगदी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने पोलीस या संज्ञेत खरे तर येतच नाहीत. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनता आजही ज्या विश्वासाने रस्त्यावर सुरक्षितपणे चालू शकते अथवा स्वतःच्या घरात सुरक्षितपणे राहू शकते याचे एकमेव कारण म्हणजे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लोकांच्या संरक्षणासाठी 24 तास लोक सेवेत असलेले हे सर्वसामान्य पोलीस आहेत.

गाव गुंड, गुन्हेगार, चोरटे, भामटे, महिलांची तरुणींची रस्त्यात छेड काढणारे अशांवर वचक आणि दरारा जो असतो तो नाक्यावरील पोलिसाच असतो. तेवढे सविस्तरपणे सांगायचे कारण म्हणजे गेले काही दिवस महाराष्ट्रात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, त्यातील लफंगे गिरी, महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट आणि त्यातही सर्वावर कळस म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांवरच बदली झाल्यानंतर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केलेले गंभीर आरोप. यावरून महाराष्ट्रातील पोलिसांची, मुंबई पोलिसांची जी काही प्रतिमा बदनाम करण्याचे षङ्यंत्र राजकीय वर्तुळात सुरू आहे ते अत्यंत घातक वळणावर आलेले आहे. मध्यंतरी पोलिसांवरती बरेच सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले त्या आधी देखील मराठी चित्रपट सृष्टीत देखील पांडू हवालदार ते मुंबईचा फौजदार असे देखील चित्रपट येऊन गाजले. त्यातही विशेषतः गेल्या काही वर्षात पोलीस अधिकार्‍यांवर जे हिंदीमध्ये सिनेमे आले त्यामध्ये सलमान खानचा दबंग तुफान लोकप्रिय झाला. त्यामुळे त्याचे दबंग 2 दबंग 3 असेच सिक्वेल सिनेमेदेखील निघाले. अजय देवगनचा सिंघम रिटर्न्स, सिंबा हे सिनेमेदेखील त्या पाठोपाठ आले.

तर आता सूर्यवंशी हा पोलिसांवरील सिनेमादेखील रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या पडद्यावरच छोट्या पडद्यावर देखील अर्थात टेलिव्हिजनवर सीआयडी क्राईम पेट्रोल यासारख्या हिंदी सिरीयल देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यामुळे सहाजिकच पोलिस अधिकार्‍यांना एक प्रकारचे ग्लॅमर बॉलीवूडमध्येआणि छोट्या पडद्यावर देखील मिळू लागले. याचा परिणाम थेट पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यशैलीवर होऊ लागला. आणि प्रत्येक पोलीस अधिकारी स्वतःला बाजीराव सिंघम समजू लागला. मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे असोत की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह असोत ही मंडळी बाजीराव सिंघमच्या अवताराचे बळी आहेत. मात्र हे करत असताना सिनेमा हे एक आभासी माध्यम आहे. अडीच तासांनंतर ते संपणार आहे, याचा सोयीस्कर विसर एका क्षणात मोठे होऊ इच्छिणार्‍या सचिन वाझेपासून ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासारख्या आयपीएस अधिकार्‍याला पडावा यासारखे महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव नाही. सचिन वाझेसारख्या अधिकार्‍यांनी तर महाराष्ट्र पोलिसांची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. जे करायला दहशतवादीही धजावत नाही असे कृत्य ते करून मोकळेही झाले.

मात्र एवढे मोठे कृत्य करत असताना त्याचे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि त्यातही विशेषत: या पोलिसांच्या विश्वासावर सर्वसामान्य माणूस सुरक्षितपणे स्वतःच्या घरात स्वतःच्या शहरात आणि राज्यांमध्ये राहतो आहे त्यांच्यावर आपण करत असलेल्या कृतीचा कोणता दुष्परिणाम होईल याचे साधे भान राखण्याची सौजन्यही या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दाखवू नये ही अत्यंत शरमेची बाब आहे.

विधिमंडळात सचिन वाझेवरून गदारोळ झाल्यानंतर अखेरच्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या आवारात पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असे सांगितले की सचिन वाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःला शोधण्याची गरज आहे. ओसामा बिन लादेन हा सर्वज्ञात दहशतवादी होता. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही मुंबईमध्ये सचिन वाझेंसारखे बुरख्याखाली आणखी किती छुपे अधिकारी आहेत याचा शोध घेण्याची वेळ आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावर आली आहे. कारण सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस खात्यातही काही खल प्रवृत्ती शिरतात. त्यांच्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. त्यातून पोलिसांचे मनोबल खालावते, हे समाजहितासाठी कधीही योग्य नाही. कारण पोलीस आहेत, म्हणून समाज सुरक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खल प्रवृत्तींना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत. कारण अशा प्रकारचे लोक पोलीस खात्यात वाढता कामा नयेत.

First Published on: March 25, 2021 3:30 AM
Exit mobile version