सुन्न होत चाललंय भवताल!…गोठून जाताहेत श्वास…

सुन्न होत चाललंय भवताल!…गोठून जाताहेत श्वास…

सुन्न होत चाललंय भवताल!
कुठलेच आवाज ऐकू येईनासे झालेत
गोठून जाताहेत श्वास
नि:शब्द होताहेत उसासे
यंत्रवत् पाहताहेत डोळे दूरवर कुठेतरी
शून्यात…
किंवा.. कदाचित…
शून्याच्याही पलीकडे…
खरंच काही दिसतंय डोळ्यांना,
की झालेत तेही निष्प्राण?
आवेगाने पुढे जाण्यासाठी आपण पाऊल उचलावं
अंतरातला महाप्राण जागवत
आणि
अंतरातूनच उठू नये ऊर्मी
पाऊल पुढे टाकण्याची…
आपली नजर,
आपलं मन
जात असेल का पार करुन
चौथी मिती,
असलीच तर ?
की असेल तोही केवळ भास
आपण काहीतरी पाहत असल्याचा
किंवा
आपल्याला काहीतरी दिसत असल्याचा ?
नसावंच तिथे काही…
भवतालातही नसावंच काही…
पण मग,
नि:शब्द का असेनात,
का जाणवावेत ते उसासे तरी ?
हृषीदांचा आनंद
कुसुमाग्रजांच्या शब्दांतून
स्वत:च मारत असेल तांबडी रेघ
आपल्याच केसपेपरच्या तळाशी,
एक पेशंट संपला म्हणत ?
एकूणच स्वत:वरचा विश्वासही कमी व्हायला लागलाय की काय
अशी भीति वाटायला लागलीय आता…
भवताल सुन्न होत चाललंय…
कानात किणकिणतोय फक्त सुन्नतेचा हुंकार…
तरीही फ्रॉस्ट येऊन ठाकतो थेट उभा समोर
उठ, उभा राहा, चालत राहा
अरे, यू हॅव मेनी प्रॉमिसेस टू कीप..
कमॉन, माईल्स टू गो…
कीप गोईंग… कीप वॉकींग…
आणि मी चालत राहतो
भीतीच्या दाट अंधारातून वाट काढत
टागोरांच्या
त्या मिणमिणत्या पणतीच्या
उजेडाच्या दिशेने…
पण तरीही
भवताल
सुन्न होत चाललंय,
एवढं मात्र खरं!

– श्रीनिवास नार्वेकर

(लेखक – ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत.)

 

First Published on: April 30, 2021 2:30 PM
Exit mobile version