नेत्यांची हवा बंडखोरीचे मूळ !

नेत्यांची हवा बंडखोरीचे मूळ !

राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात 288 मतदारसंघांत पार पडणार असून, निकाल 24 ऑक्टोबरला आहे. निकालानंतर दुसर्‍याच दिवशी अर्थात दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुरुवात होणार असल्याने दीपावलीच्या शुभ दिवसांमध्ये नवीन सरकार स्थानापन्न झालेले असेल. दसर्‍याच्या शुभ मुहूर्तापासून अनेक उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. कारण 288 पैकी 200 हून अधिक मतदारसंघांत कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यंदा सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. मुदत संपूनही शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही बंडाळी कायम राहिल्याने अनेक उमेदवार गॅसवर आहेत, तर काही जण अजूनही बंडखोरांना आपल्याबरोबर घेण्यासाठी आयडीयाची कल्पना करत आहेत.

आघाडीच्या तुलनेत शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढली असून निवडणुकीपर्यंत ही बंडखोरी कायम राहिली, तर भाजपचे स्वबळावर 144 हे स्वप्न स्वप्नच राहण्याची भीती जास्त आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी, अन्यथा त्यांची खैर नाही, त्यांना त्यांची जागा दाखवू. बंडखोरी कायम ठेवलेल्यांना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असतील, असे इशारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही त्याचा फारसा परिणाम भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोरांवर झालेला नाही. शिवसेना आणि भाजप युतीतच मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार परस्परांच्या विरोधात नशीब आजमावत आहेत.

निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 7 ऑक्टोबर होता. सर्वच पक्षांकडून येनकेन प्रकारेण बंडखोरांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होत. त्याला काही प्रमाणात शिवसेनेला यश आले; पण भाजपच्या गडातही बंडखोरांबाबत चिंतेचे वातावरण आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. पण यंदा दोन्ही पक्षांची हो नाय, हो नाय करीत अखेरच्या क्षणी युती झाल्याने बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. यंदा भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाल्याचेे दिसून येते. त्यापाठोपाठ शिवसेना पक्षामध्येही बंडखोरी झाली आहे. यावेळीच्या बंडखोरीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारापुढे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने उमेदवारी फॉर्म काही अपवाद वगळता भरलेला नाही तर भाजपच्या उमेदवारापुढे शिवसैनिक लढतोय. तर काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारापुढे भाजपचा उमेदवार नशीब आजमावतोय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल एकहाती भाजपच्या बाजूने लागल्यानंतर भाजपने आपले दंड फुगवण्यास सुरुवात करून जागावाटप फिफ्टी फिफ्टी होणार नाही, असे संकेत शिवसेनेला दिले होते. त्यामुळे ‘समसमान जागावाटप, समसमान मंत्रीपदे आणि मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षांचे’ यावर भाजपचे एकमत होणार नाही हे पाहून जागावाटपाची बोलणी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्येच होत होती. त्यामुळेच अधूनमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत हे प्रक्षोभक वक्तव्य करीत होते. मात्र 2014 प्रमाणे आततायी भूमिका न घेता शिवसेनेने यावेळी सामंजस्यपणाची भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 124 जागांना सकारात्मक प्रतिसाद देत अखेरच्या क्षणी युती जाहीर केली. त्याअगोदर दोन्ही पक्षातील नेत्यांनी ज्या जागांवर वाद नाहीत अशा उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे वरवर सारे काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न फोल ठरला आणि कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली.

बंडखोरी होण्याची किंवा एखाद्या संभाव्य उमेदवाराला भावी आमदार संबोधण्याची घाई त्या त्या पक्षातील प्रमुखांनीच केली. कारण भाजपचे चाणक्य असू द्या किंवा मातोश्रीवरील राबता असणारे नेते, हे सर्वजण खासगीत संभाव्य उमेदवाराला ‘तू कामाला लाग, आतापासून नेटवर्क उभे कर, लोकसभेपेक्षा लीड मिळायला हवा’, असे आदेश देत एकप्रकारे त्याला बंडखोरी करण्यास प्रवृत्त करत होते. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि नेत्यांच्या बैठकीत ‘कामाला लागा’, ‘एकला चलो’, अशा भूमिका मांडल्याने अनेक बंडखोरांनी आपल्यालाच तिकीट मिळणार, या आशेने जमीन जुमला, शेती विकून, तर काही ठिकाणी गहाण ठेवून जून महिन्यापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे आयत्या वेळी मतदारसंघात ज्याने मागील सहा महिने वर्षभरापासून तयारी केली त्याला तिकीट न देता भाजपला तो मतदारसंघ सोडला असेल, तर बंडखोरी होणार नाही तर काय होणार, हा सवाल शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक नेत्याने स्वत:ला विचारायला हवा. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपने निवडणुकीच्या अगोदर साम, दाम, दंड आणि भेद या चतुश्रृतीचा वापर करीत तुल्यबळ विरोधकांच्या हाती कमळ चिन्ह दिले आणि तिथेच भाजपतही धुसफूस वाढली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर केलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याने पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यापैकी एकट्या भाजपकडील २७ मतदारसंघांत जवळपास ११४ जणांनी बंडखोरी केली आहे.

या बंडखोरांमुळे पाडापाडीचे राजकारण होणार असून याचा फटका महायुतीला बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सर्व दौरे रद्द करून मुंबईत ठाण मांडून बसले होते. तर दुसरीकडे मातोश्रीवर नाराजांना बोलावून ‘आम्ही शिवसेनेचेच काम करणार’, असे बंडखोरांकडून वदवून घेण्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना नेते सुभाष देसाई कामाला लागले होते. असे चित्र असले तरी अनेक बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने मतविभागणी अटळ असल्याचे सध्या तरी दिसत आहे. यातही काही भागांत राष्ट्रवादी-मनसे यांनी पडद्यामागून एकमेकांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनसे उमेदवाराने माघार घेतली, तर त्याची परतफेड म्हणून ठाण्यात आणि कल्याणात मनसे उमेदवाराला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. तिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. सिंधुदुर्गातील तिनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपने बंडखोरी केली असून एकमेकांविरोधात बंडखोर उभे केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना विरोध करणार्‍या शिवसेनेने भाजपशी युती करण्याचे टाळले. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने अन्य दोन मतदारसंघांमध्ये राणे यांनी उमेदवार उभे केले. राणे आणि शिवसेनेत समझोता घडवून आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अपयश आले. परिणामी राज्यात युती असली तरी सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्ष परस्परांविरोधात रिंगणात आहेत. तिन्ही मतदारसंघांमध्ये या दोन पक्षांमध्येच लढती होण्याची चिन्हे आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारपर्यंत मुदत होती. या मुदतीत भाजप आणि शिवसेनेतील काही बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिला. मुंबई, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगडमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली. पुन्हा सत्तेत परतणार, असा दावा भाजपची मंडळी करीत असतानाच भाजपमध्येच सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. बंडखोरी सहन करणार नाही आणि बंड झाल्यास जागा दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. पण उमेदवारी नाकारलेल्या भाजपच्याच काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मतदारसंघांमध्ये मेळ जमू शकला नाही.

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. सावंत यांनी माघार घ्यावी, यासाठी ‘मातोश्री’ वरून बरेच प्रयत्न झाले; पण तृप्ती सावंत यांनी दाद दिली नाही. त्यामुळे आपल्या अंगणातील बंडखोरी मातोश्रीला आवरता आलेली नाही.
एकूणच आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना वेळोवेळी विश्वासात न घेतल्याने बंडखोरीचे लोण वाढल्याचे दिसते. सध्या इन्स्टंटचा जमाना आहे. तसेच राजकारणातही पदे लगेच मिळाली पाहिजेत, असा समज नव्या कार्यकर्त्यांचा झाल्याने आणि विरोधी गटातील उमेदवाराला आपल्या पक्षातून उमेदवारी मिळत असल्याची उदाहरणे मागील पाच वर्षांत वाढल्यानेच बंडखोरीचे प्रमाण वाढले. त्यात आयाराम गयाराम संस्कृतीशिवाय कोणताच राजकीय पक्ष स्थिरस्थावर होणार नाही, सत्ता मिळवणार नाही, त्यामुळेच साम, दाम, दंड आणि भेद वापरत जिंकणारा उमेदवार माझ्याकडे हवा. त्याची विचारसरणी आणि त्याने माझ्या नेतृत्वावर काहीही आरोप केले असले तरी त्याला माफी देत नंबर वाढवणे हाच एक उद्योेग राजकारणात सुरू आहे. त्यामुळे संबंधित नेत्यावरील आरोप, त्याची भ्रष्टाचाराची प्रकरणे योग्यवेळी शांत करून थंड बस्त्यात ठेवून ‘जो जिता वो सिकंदर’ असेच चित्र सध्या राज्यात पहावयास मिळते. आता रडायचं नाही लढायचं…तुम्ही फक्त लढ म्हणा…कामाला लागा… एकला चलो…असा शब्दच्छल राजकारणात मुरलेली नेतेमंडळी करू लागली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना समजेल तसा अर्थ घेत ‘आपलीच हवा कधी निघाली’ हे कार्यकर्त्यांना कळेपर्यंत वेळ निघून गेली होती.

First Published on: October 9, 2019 5:34 AM
Exit mobile version