सनबर्न फेस्टिव्हल आणि वाद

सनबर्न फेस्टिव्हल आणि वाद

यंदाच्या वर्षी ३१ डिसेंबरनिमित्ताने ‘सनबर्न क्लासिक’ या संगीतरजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी आयोजक देत असलेला पट्टा (बँड) हाताला बांधावा लागतो. तो बँड मिळण्यासाठी रांगेत उभे असताना दोन तरुणांना चक्कर आली, त्यामुळे त्या दोघांना रुग्णालयात भरती करावे लागले. उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. या दोन तरुणांनी अमली पदार्थांचे अतिसेवन केले होते का, हे या दोघांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर उघडकीस येणार आहे. या वादग्रस्त कार्यक्रमाच्या आयोजनाच्या आधीच अशी खळबळजनक घटना घडली, प्रत्यक्ष हा कार्यक्रम जेव्हा दोन दिवसांनी होईल तेव्हा त्याचे काय परिणाम होतील, याची कल्पनाही करणे अशक्य आहे. कारण मागील ८ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता वाद या कार्यक्रमाला जोडला जात आहे. कधी या कार्यक्रमाच्या दरम्यान अमली पदार्थांची विक्री होते म्हणून हा कार्यक्रम वादात सापडला आहे, तर कधी आयोजकांकडून शासकीय नियम धाब्यावर बसवून आयोजन केले म्हणून कार्यक्रम वादात सापडला होता, तर कधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आवश्यक परवानग्या न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून वाद निर्माण झाला होता. असे असूनही या सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी होत असते. त्याला दरवर्षी विरोध होत असतो. मात्र तरीही या कार्यक्रमाचे आयोजन कसे होते, हा यक्ष प्रश्न आहे.

2009 साली गोव्यात जेव्हा ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अमली पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे नेहा बहुगुणा नावाच्या युवतीचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी खरेतर या कार्यक्रमाच्या आयोजनामागील समाजविघातक दृष्टीकोन उघडकीस आला होता. ३१ डिसेंबरच्या रात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिनदिक्कतपणे अमली पदार्थांची विक्री केली जाते. त्यातून हजारोंच्या संख्येने तरुण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जातात. तरुणाईला व्यसनाधीन बनवण्यासाठी हा कार्यक्रम कारणीभूत ठरतो. 2014 सालीदेखील ‘सनबर्न सुपरसोनिक डान्स फेस्टिव्हल’मध्ये ईशा मंत्री नावाच्या युवतीचा मृत्यू झाला होता. तिचाही अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे यंदाच्या २०१९च्या वर्षाला निरोप देण्यासाठी तिसर्‍यांदा गोव्यात या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन होत असताना त्याआधीच येथे दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे. त्या तरुणांचाही अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळेच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

२०१६ साली जेव्हा गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजनाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तेव्हा गोवा राज्याने नाईलाजास्तव या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, मात्र या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्या वर्षी थेट महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्र सरकारने गोवा राज्यातील उपरोक्त सर्व घटनांकडे कानाडोळा करत थेट विद्येचे माहेरघर समजले जात असलेल्या पुणे शहरातच या कार्यक्रमाला परवानगी देऊन टाकली. तिथे या कार्यक्रमासाठी खास शामियाना बनवण्यात आला होता. पुण्याजवळील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसोर्ट, बावधन येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी करबुडवेगिरी, अमली पदार्थांचा वापर, मद्याचा महापूर, अश्लीलता, धांगडधिंगा, पैशांचा चुराडा आदी गैरप्रकार पहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यावेळी कार्यक्रमाला रितसर परवानगी मिळालेली नव्हती, तरी आयोजकांनी कोट्यवधी रुपयांची तिकीटविक्री केल्याचा आरोप झाला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, ध्वनी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण तसेच मानवी नीतीमूल्यांचे हनन होणार असल्यामुळे या विरोधात पुण्यातील स्थानिक शिवसैनिक जयदीप पडवाल यांनी सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली होती. आयोजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा डी.जे., 14 परमिट बार, अत्याधुनिक रेस्टॉरंट, पार्टी पॉईंट यांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे, तर सनबर्न फेस्टिव्हलच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी जे.सी.बी.द्वारे डोंगर खोदून रस्ता बनवण्यात आला होता. जमीन सपाटीकरणासाठी अनेक झाडेही तोडल्याचे वृत्त होते.

यामुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाच्या विरोधात नाशिक येथील शिक्षणतज्ज्ञ रतन लूथ यांनीदेखील या फेस्टिव्हलच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या फेस्टिव्हलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यावेळी न्यायमूर्ती एस.एस. खेमकर आणि न्यायमूर्ती आर.जी. केतकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला अशा प्रकारे या ठिकाणी बेकायदेशीर मद्य विक्री करण्यास प्रतिबंध आणावा, असे निर्देश दिले होते.सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी अशाच एका वर्षी पुन्हा एकदा गोव्यात शिरकाव केला. त्यावेळी गोवा सरकारने फेस्टिव्हलला परवानगी देण्यापूर्वी आयोजकांनी यापूर्वी बुडवलेला 42 लाखांचा कर भरावा, असा आदेश गोव्यातील महसूल विभागाने दिला होता, मात्र आयोजकांनी हा कर न भरता सनबर्न कार्यक्रमाचे आयोंजन केले. त्यावेळी आयोजकांना 28 परवानग्या घेणे सक्तीचे केले होते, परंतु आयोजकांनी राहिलेल्या 8 परवानग्या न घेता हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गोवा राज्याने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे बिनदिक्कतपणे पाश्चात्य संस्कृतीतील ज्या ज्या गोष्टी स्वीकारल्या, त्यातून गोवा राज्याचेच अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई व्यसनाधीन बनली. गोव्यात पर्यटनासाठी जाणार्‍या अन्य राज्यांतील तरुणांपैकी बर्‍याच जणांना दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन हे गोव्यातच लागते, असे म्हटले तर ते कदापि खोटे ठरणार नाही. त्यात भर म्हणून आता ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या आयोजनसाठी ‘सनबर्न फेस्टिव्हल’सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी दिल्यामुळे तरुणाईचे आणखी नुकसान होणार आहे. गोवा राज्याला या कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी दिल्यानंतर कोणकोणत्या परिणामांना सामोरे जावे लागले, त्याची पूर्वकल्पना असतानाही यंदाच्या वर्षीही गोवा राज्याने ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला परवानगी दिली आहे.

ही अत्यंत खेदाची बाब आहे. अशा प्रकारच्या आयोजनावर आता केंद्रीय पातळीवरूनच कारवाई होण्याची गरज आहे. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात ‘नवीन वर्षाच्या आदल्या रात्री अर्थात थर्टी फर्स्टच्या रात्री अवघ्या 12व्या वर्षीय मुला-मुलींच्या हाती मद्याचा पेला येतो’, असे नमूद करण्यात आले होते. त्याला ‘सनबर्न फेस्टिव्हल’सारखे कार्यक्रम प्रामुख्याने कारणीभूत असतात.

First Published on: December 30, 2019 5:35 AM
Exit mobile version