चौथ्या खांबाचे ‘दगडगोटे’!

चौथ्या खांबाचे ‘दगडगोटे’!

स्थळ… रिया चक्रवर्तीचं घर (आतापर्यंत शेंबड्या पोरालाही ही कोण ते माहिती झालं असावं!).. इमारतीच्या गेटवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा… कुठूनतरी एक ऑनलाईन फूड सिस्टीमचा डिलिव्हरी बॉय येतो… कुठल्यातरी रिपोर्टरला कुणकुण लागते की रियाच्याच फ्लॅटमध्ये हे जेवण जाणार आहे… झाडून सगळे प्रतिनिधी त्याला गराडा घालतात… प्रश्नांची सरबत्ती… जणूकाही सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातला महत्त्वाचा माणूस माध्यमांना सापडला आणि काही मिनिटांत खऱ्या गुन्हेगाराचा शोध लागणार अशा थाटात माध्यमं त्याच्यावर तुटून पडली. प्रश्न काय? तर ऑर्डर कुणी दिली? तू कुणाला फोन केला होता? पलिकडून कोण व्यक्ती बोलत होती? पार्सलमध्ये काय आणलंय? ऑर्डरवर कुणाचं नाव होतं? कदाचित सीबीआय देखील एखाद्या गुन्हेगाराची अशी चौकशी करत नसेल जशी त्या बिचार्‍या डिलिव्हरी बॉयची चालू होती! बाईट सुरू असताना त्याला कुणाचातरी फोन आला, तर प्रतिनिधीने त्यालाच ऑर्डर सोडली, ‘फोन स्पीकर पे डालो’! डिलिव्हरी बॉयला आपणच सुशांतची हत्या केलीये की काय असं वाटलं असणार आणि त्याला पत्रकारांच्या गराड्यात पाहून त्याच्या कुटुंबियांना आपलं पोरगं डिलिव्हरी बॉय नसून राज्याचा मुख्यमंत्रीच आहे असाच भास झाला असणार!

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (या दोन महिन्यांत इतक्या काही घडामोडी, दावे, प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, खुलासे आणि न जाणो काय काय घडलंय, की त्यामुळे या प्रकाराला आत्महत्या म्हणावं की हत्या म्हणावं या विवंचनेतून थेट मृत्यू हा शब्द निवडला!) तब्बल दोन महिन्यांनी या प्रकरणात ‘मुख्य आरोपी’ ठरवल्या गेलेल्या रिया चक्रवर्तीने आपलं मौन सोडलं. काही न्यूज चॅनल्सना तिने प्रदीर्घ मुलाखत दिली. या पूर्ण मुलाखतींमध्ये अँकरने रियाची पोलीस घेतात तशीच उलट तपासणी घेतली. रियानेही कोणताही मुद्दा न टाळता प्रश्नांची उत्तरं दिली. पण या सगळ्या मुलाखतींमध्ये तिनं एकच मुद्दा ठासून मांडला. ‘मला माझी बाजू मांडण्याचा न्याय्य अधिकार मिळणार आहे की नाही? की सत्य बाहेर येण्याआधीच मी दोषी ठरले आहे. या मानसिक तणावामध्ये जर मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली, तर त्याला जबाबदार कोण असणार?’ रियाचा हा सडेतोड प्रश्न समोर तिची मुलाखत घेणाऱ्या अँकरलाही काही क्षण निरुत्तर करून गेला. कारण तिची मुलाखत घेणारी व्यक्ती देखील त्याच प्रसारमाध्यमांची एक प्रतिनिधी होती ज्यांनी गेल्या दोन महिन्यांत ‘मीडिया ट्रायल’ चालवली आहे.

खरंतर इथे रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्याचा किंवा तिला निर्दोष सिद्ध करण्याचा किंवा अपराधी ठरवण्याचा असा कोणताही प्रयत्न नाही. आणि कोणत्याही निष्पक्ष भूमिकेमध्ये तोच प्रयत्न असायला हवा. मुद्दा फक्त इतकाच आहे की कुठूनतरी लीक झालेले किंवा लीक ‘करवले’ गेलेले काही व्हॉट्सअॅप मेसेजेस, सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि बॉलिवुडमध्ये काही न्याय्य म्हणावे इतकी विश्वासार्हता नसलेल्या मंडळींनी केलेले दावे या आधारावर आख्ख्या मीडियानं रिया चक्रवर्तीला ती दोषी सिद्ध होण्याच्या आधीच दोषी, झाड-फूक करणारी, विष पाजणारी विषकन्या, सुशांतचा मानसिक छळ करणारी व्हीलन अशा अनेक उपमा देऊन टाकल्या. एकीकडे या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एकाही व्यक्तीकडून या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती किंवा दावे केले जात नाहीयेत. मग भले ते मुंबई पोलीस असोत, ईडी (अंमलबजावणी संचलनालय) असो, सीबीआय असो किंवा मग नार्कोटिक्स (एनसीबी) असो. आणि दुसरीकडे तपासाचा कुठेही संबंध किंवा संदर्भ नसताना बाहेर हाती आलेल्या तुटपुंज्या, तोकड्या किंवा मिळेल तेवढ्यात माहितीचे बिंदू जोडून माध्यमांनी परस्परच सुशांतच्या हत्येचा आख्खा सीनच उभा केला.

माध्यमांची ही सवय काही नवीन नाही. आजपर्यंतच्या अनेक हाय प्रोफाईल केसेसमध्ये माध्यमांचा रेटिंग्जसाठी आणि त्यासाठीच्या बातम्यांसाठीचा हपापलेपणा सर्वश्रुत आहे. मग ती घटना राजकीय असो, मनोरंजन विश्वातली असो, सामाजिक क्षेत्रातली असो किंवा मग आणखी कुठली. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रत्यक्ष बाथ टबमध्ये बसलेल्या न्यूज चॅनल्सच्या वृत्तनिवेदिकाही आपण पाहिल्या (खरंतर सहन केल्या) आहेत. दूरदर्शनच्या काळात ‘वृत्तनिवेदिका’ या शब्दाला आणि पदाला असलेला मान आणि आजच्या काळात या शब्दाला असलेला मान यांची तुलना केली, तर माध्यमांनी आपली विश्वासार्हता किती गमावली आहे हे सहज लक्षात यावं. आणि दुर्दैवं म्हणजे आज विश्वासार्हता कमावण्यासाठी नसून रेटिंग्ज आणि पैसा कमावण्यासाठी जास्त मोठी स्पर्धा आहे. नव्हे, फक्त त्यासाठीच स्पर्धा आहे!

पण सुशांतच्या प्रकरणात सलग २ महिने तितक्याच प्रकर्षाने ही मीडिया ट्रायल सुरू आहे. अर्थात, त्यामुळे तपास वेगाने करण्यासाठी दबाव वगैरे आला असल्याचा ‘दावा’ केला जात असला, तरी आता माध्यमे फक्त यासाठी दबाव आणण्याच्याही पलिकडे गेली आहेत. आता प्रत्यक्ष पीडित, आरोपी आणि त्यांच्याशी संबंधितांवर दबाव आणण्यापर्यंत माध्यमांची मजल गेली आहे. त्यामुळेच रियाच्या घरी साधं जेवण आणणाऱ्या कुठल्याशा डिलिव्हरी बॉयचा देखील कीस पाडायचं काम या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चोखपणे पार पाडलं. उद्या माध्यमांच्या दबावामुळे त्याला देखील सीबीआय चौकशीसाठी पाचारण करण्याची वेळ ‘ओढवू’ शकते. ज्या देशात शेकडो भारतीयांचे जीव घेणाऱ्या कसाब, अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांना देखील न्यायपालिकेकडून वारंवार बाजू मांडण्याची संधी दिली जाते, तिथे माध्यमांनी अशा प्रकारे परस्परच एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तिचं वैयक्तिक सामाजिक आयुष्य संपवून टाकणं हे दुर्दैवी आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाचा नेमका काय सहभाग होता? तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? किंवा फक्त रियाच नाही तर या प्रकरणात आरोप लावण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची बाजू काय आहे? याची माहिती किंवा उत्तरं फक्त तपास करणाऱ्या यंत्रणाच देऊ शकतात. एकीकडे मुंबई पोलिसांकडून तपास सीबीआयकडे गेला म्हणून मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित करायचा आणि दुसरीकडे सीबीआयलाही किंमत न देता स्वत:च दोषी जाहीर करून सीबीआयवरही अविश्वास दाखवायचा असा आचरट प्रकार माध्यमं सध्या करत आहेत. इथे मुद्दा रिया गुन्हेगार आहे किंवा नाही हा नसून फक्त तिच्यावरच्या संशयामुळे तिच्या किंवा तिच्या कुटुंबीयांच्या किंवा ज्या कुणावर आरोप आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं, त्यांच्या मानसिक आरोग्याचं आपण किती नुकसान करत आहोत, याची साधी संवेदनाही न होण्याइतपत प्रसारमाध्यमं बेभान झाल्याचं दिसतंय. आणि हा कोणताही दावा नसून टीव्ही चॅनल सुरू केल्यावर सगळ्यांनाच याचा साक्षात्कार होईल. याहीपुढे जाऊन जर या प्रकरणात रिया निर्दोष असल्याचं सिद्ध झालं, तर तितक्याच निर्ढावलेपणाने हीच माध्यमं तिच्या अशाच प्रदीर्घ मुलाखती घेतील ज्यात तिची तोंडभरून स्तुती केली असेल, एवढ्या संकटातही खंबीर राहण्याच्या तिच्या सामर्थ्याचं कौतुक केलं असेल, मोठमोठे व्हिडिओ केले जातील. एकदा विश्वासार्हता खुंटीला टांगायचं ठरवलं की त्यापुढे कितीही आणि कशाही कोलांटउड्या मारायला सीमा राहात नाही.

गंमतीचा भाग म्हणजे या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांत जे काही तथाकथिक ‘खुलासे’ समोर आले आहेत, त्यातला एकही खुलासा तपास संस्थांनी केलेला नाही. राजकीय नेतेमंडळी देखील आरोप-प्रत्यारोप किंवा दावे करण्यासाठी ‘माध्यमांमध्ये अशी वृत्त येत आहेत. ती जर खरी असतील तर…’ अशी पळवाट काढत आहेत. याचाच अर्थ सुशांत प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या गदारोळापैकी किमान ८० टक्के गदारोळाला प्रसारमाध्यमांनी मिळालेले बिंदू जोडून तयार केलेली खिचडी कारणीभूत ठरली आहे. शिवाय यामध्ये माध्यमांचं एक वेगळंच कसब यामध्ये समोर आलं आहे. प्रत्यक्ष गुन्हेगार कोण हे जसं अक्षरश: कंठरवाने सांगितलं जातं, तसंच, सगळेच गुन्हेगार असू शकतात हे देखील तितकाच कंठशोष करून सांगितलं जात आहे. त्यामुळे सुशांतची गर्लफ्रेण्ड, सुशांतचे मित्र, सुशांतचे कुटुंबीय, सुशांतचे बॉलिवुडमधील निर्माते, दिग्दर्शक, बॉलिवुडमधली तथाकथिक गँग, परदेशात बसलेले ड्रग्ज माफिया असे सगळेच दोषी आहेत. पण फक्त टीव्ही स्क्रीनवर. ऑन पेपर अजूनही यातलं कुणीही दोषी नाही! ते जेव्हा होतील तेव्हा होतील. पण आत्तापासूनच नुसत्या चर्चांच्या कढीलाच ऊत सुटलाय.

प्रसारमाध्यमांची सूत्र नक्की कोण असतात, हे आजपर्यंत बाहेर कुणाला कळलेलं नाही. पण या ‘सूत्रांच्या हवाल्याने’ दिली जाणारी वृत्त मात्र बघणाऱ्याला अनेकदा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला प्रवृत्त करत असतात. आणि यामध्ये विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नक्की विश्वास कुणावर ठेवावा असाच प्रश्न बघणाऱ्याला पडतो. पण खरी गंभीर बाब म्हणजे असा प्रश्न फारच थोड्या लोकांना पडतो. बहुतांश प्रेक्षक ‘परवा चॅनलवर सांगत होते’ असं म्हणून जे दाखवलं किंवा सांगितलं जातं त्यावरच विश्वास ठेऊन आपली मतं बनवत असतात. आणि अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीवर आधारीत मतं बनवणारी हीच जनता मतं देऊन सरकार बनवत असते. त्यामुळे हल्लीच्या आर्थिक साठमारीत आपलं महत्त्व आणि खरं कर्तव्य काय आहे याचा माध्यमांना जरी विसर पडला असला, तरी अनेक वर्षांपूर्वी देशाच्या राज्यघटनेत माध्यम स्वातंत्र्याची तरतूद करणाऱ्यांना ते पूरेपूर माहिती होतं. आता लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या या दगडगोट्यांना त्याचा पुन्हा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. तोपर्यंत प्रेक्षकांच्या हाती हा तमाशा बघत राहणं आणि तमाशा होणाऱ्यांच्या हाती तो सहन करत राहणं एवढंच काय ते आहे!

First Published on: August 28, 2020 6:56 PM
Exit mobile version