देवाचिया द्वारी…

देवाचिया द्वारी…

संपादकीय

शारदीय नवरात्रौत्सवाची घटस्थापना गुरुवारी झाली. याच मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आणि अग्यारी उघडण्यात आल्या. गेले अनेक दिवस भाजपसहित मनसे अगदी हिरीरीने आंदोलन करत, घंटानाद करत मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भंडावून सोडत होते. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळे उघडण्यात आली. त्यावेळेला सर्वात आधी या धार्मिक स्थळांवर पोहोचण्याचं काम कोणी केला असेल तर ते राज्यातील मंत्री नेते आणि पुढार्‍यांनी. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक मुंबादेवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजल्या जाणार्‍या परळीच्या प्रभू वैजनाथाचं दर्शन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलं. जवळपास गेले वर्षभर धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आलेली आहेत. सर्वसामान्य आस्तिक मंडळींची देवावर श्रद्धा असते. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मांची मंडळी आपापल्या धार्मिक स्थळावर जाऊन पूजा, नमाज, मास आणि प्रार्थना या माध्यमातून आपापल्या देवदेवतांना साकडे घालतात. आपल्या मनातल्या गोष्टींची मन्नत मागत असतात. अशा मंडळींमध्ये राजकीय नेते मंडळींची संख्या ही खूपच लक्षणीय असते. हे आपण नेहमीच पाहत असतो. गेले अनेक महिने सर्वसामान्यांना कोविडच्या निर्बंधांमुळे धार्मिक स्थळांपासून दूर ठेवणार्‍या मुख्यमंत्र्यांनी मंदिरे उघडताच सगळ्यात आधी स्वतःच्या कुटुंबीयांसह मुंबादेवीच्या मंदिरात धाव घेतली.

देवदर्शनानंतर या नेत्यांनी आपण जनतेसाठी कोविड संकटाला थोपविण्यासाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं. तसंच महाराष्ट्राचं भलं व्हावं, पाऊस भरपूर पडावा यासाठी देवदेवतांना साकडं घातल्याचं ही मंडळी वाहिन्यांच्या कॅमेरासमोर बोलून दाखवतच असतात. यावर जनता किती विश्वास ठेवत असेल ते देवच जाणो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा नेते देवाच्या द्वारीही स्वतःच्या कुटुंबासाठी, राजकीय स्थैर्यासाठी किंवा अगदी राज्याच्या जनतेसाठी साकडे घालत होते, त्याचवेळेला राज्यभरातल्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या. या आयकर धाडींचा फटका सर्वाधिक जर कोणाला बसला असेल तर तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांना. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणी आणि जवळच्या नातेवाईकांप्रमाणेच काही बांधकाम व्यावसायिक, साखर कारखाने, त्यांच्या संचालकांनाही आयकर विभागाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागला.

त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाचिया द्वारी जाणार्‍या राजकारण्यांना आयकर विभागापासून आपल्याला सुटका मिळवून ईडीची पिडा टळो, यासाठीच साकडं घालावं लागलं. कारण केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील विरोधकांना ज्या प्रकारे आणि प्रमाणात लक्ष्य केलं जातंय ते पाहिल्यावर सत्ताधार्‍यांना ‘देवाच्या दारी’ जाण्यावाचून पर्याय नाही, असं म्हणण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. जी गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची. ठाकरेंना थेट लक्ष्य करण्याऐवजी त्यांच्या खासगी सचिवापासून ते व्यावसायिक भागिदारी असणार्‍या पक्षातील नेत्यांपर्यंत या केंद्रीय संस्थांची काकदृष्टी आहे. अशा परिस्थितीत मानसिक आधारासाठी नेत्यांना देवाचाच आधार सध्यातरी दिसतोय. अर्थात, उलटसुलट व्यवहार करणारे नेते आणि त्यांचे चेलेचपाटेच या आपत्तीला कारणीभूत आहेत. पण सध्या त्यांना देवाशिवाय दुसरा कुणी तारक वाटत नाही.

सामान्य नागरिकांना महागाईच्या आगीत होरपळून निघताना कोविडमुळे बेकारीचा सामना करावा लागतोय. तेव्हा धावा करण्यासाठी त्यांना याच देवाचा आधार घ्यायचा होता. पण कोविडच्यामुळे निर्बंध लादत राज्य सरकारने देव आणि भक्तांची भेट लांबणीवर टाकली होती. घटस्थापनेच्या निमित्तानं वेगवेगळ्या देवदेवतांची द्वारं उघडताच राजकीय नेत्यांनीच सामान्यांच्या आधी मंदिर मशिदींमध्ये धाव घेतली. त्यानंतर सर्वसामान्य भक्त राज्यभरातल्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकणार आहेत. अर्थात यासाठी ऑनलाइन बुकिंग हा एक महत्वाचा भाग असणार आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि देशातील दुसर्‍या क्रमांकाचा न्यास असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात दिवसभरात फक्त पंधरा हजार भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात दररोज दहा हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे तर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये क्यू आर कोडचं बंधन असणार आहे. धार्मिक स्थान आणि देवालय उघडताना कोविडबाबतच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. भक्तांच्या शरीराचे तापमान चेहर्‍यावरचा मास्क आणि सुरक्षित अंतर याच्या आधारित नागरिकांना आपल्या देवादिकांना भेट देता येईल.

हे सगळं करत असताना या मंदिरांमध्ये हार, प्रसाद, नारळ किंवा इतर स्वरूपाचा चढावा चढवता येणार नाही. या देवस्थानांच्या किंवा धार्मिक स्थळांच्या आजुबाजूला उपजीविका करणारे विक्रेते किंवा व्यावसायिक हार, फुले, प्रसाद यांची विक्री करतात, त्यांचा प्रश्न अवघड झाला होता. याकडे काही पक्षांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हे जरी खरं असलं तरी या गोष्टी व्यवस्थित न हाताळल्यास पुन्हा एकदा तिसर्‍या लाटेच्या रूपात कोरोना उसळी घेऊ शकतो. यासाठी सगळ्यांनाच जागरूक राहावे लागेल. कारण बुधवारी एकट्या मुंबईत 629 नवे बाधित रुग्ण आढळून आले. तर राज्यभरात 2876 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. सात जुलैनंतर आढळून आलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत, असं प्रशासनाची आकडेवारी सांगते. नवरात्र उत्सवामध्ये दांडिया आणि गरबा खेळण्यास सरकारने मनाई केलेली आहे. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाची लागण होण्याची भीती प्रशासनाला वाटते. त्यामुळेच सरकार सावध पावले टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या या सावध पवित्र्यावर विरोधक संशयी नजरेने बघण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि आरोग्य व्यवस्थेचे धाबे दणाणले. त्यामुळे आता देवालयं, चर्चेस, गुरुद्वारा आणि मंदिरं यांची द्वारं उघडल्यानंतर सगळ्यांनीच पहिल्या झटक्यात देवाच्या दर्शनासाठी धावाधाव करण्याची गरज नाही.

हे खरं आहे की, धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येकाला मन:शांती मिळवण्यासाठी देवदर्शन एकमेव मार्ग आणि पर्याय सध्या उपलब्ध आहे. जी गोष्ट सामान्य माणसांना ताणतणावात अनुभवायला येते. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ताणतणाव राजकीय नेते आणि पुढारी त्यांच्या जीवनात आणि रोजच्या दैनंदिन कामकाजात सहन करत असतात. सहाजिकच सामान्य माणसांच्या आधी त्यांना देवाचं दर्शन घेण्याची ओढ लागलेली होती. मग ते उद्धव ठाकरे असो किंवा अजित पवार. जयंत पाटील असोत किंवा धनंजय मुंडे अथवा नवाब मलिक, हे जरी खरं असलं तरी या नेत्यांप्रमाणे आपणही लगोलग धार्मिक स्थळांकडे धाव घेताना एका गोष्टीची खबरदारी घेण्याची गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवाची. कोविडसारख्या हाहा:कार उडवणार्‍या आजारामध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं की एका विशिष्ट पातळीनंतर आरोग्यव्यवस्थाच काय, पण सरकारंही खुजी आणि असहाय वाटायला लागलेली होती. त्यामुळे याच देवालयांकडे किंवा धार्मिक स्थळांकडे धाव घेताना सगळ्यांनाच एका गोष्टीचं भान ठेवावं लागणार आहे, ते म्हणजे या मनःशांती देणार्‍या ठिकाणी घाईगडबडीने पोहोचणं हे व्यक्तिगत स्तरावर त्रासदायक ठरू शकतंच. तसंच ते सामाजिक स्तरावरही अधिक नुकसानकारक होऊ शकतं.

First Published on: October 8, 2021 6:20 AM
Exit mobile version