आरंभशूरांचे संकल्प सिद्धीस जावेत

आरंभशूरांचे संकल्प सिद्धीस जावेत

तर बरेच दिवस झाले होते. प्रदीपची काही गाठभेट नाही. थर्टी फर्स्टच्या रात्री त्याचा फोन आला. म्हणाला बसलोय ये जरा बोलायचंय. म्हटलं चला मोदीशेठची काहीतरी खबरबात मिळेल. रात्री बाराच्या ठोक्याला प्रदीपला भेटलो. हॅप्पी न्यू इयर वगैरे सोपस्कार झाले. मग सुरुवात झाली मूळ विषयाची. ईर्शाद म्हणायच्या आधी प्रदीप सुरू झाला, ‘यावेळी मी सिरीयसय.’ म्हटलं आता काही खरं नाही. हा मोदीशेठसाठी फुल टायमर होतोय की काय? मीही सिरीयस असल्याचा आव आणत म्हटलं, ‘भाऊ काय झालं?’ ‘नाय आपल्याला आता हेल्थकडं बघायला पाहिजे. मोदीशेठ बघा रात्री कितीही वाजले तरी सकाळी पाचला उठून योगा करतात. मग पुन्हा दिवसभर उर्जेने काम करायला तयार. मोदींनी कोणत्याही वेळेला फोटो काढला तरी चेहर्‍यावर सकाळी ७ चे फ्रेश हास्य असतं. नाहीतर आपण सकाळी ९ वाजता ट्रेनमधून उतरेपर्यंत गळपटलेलो असतो. तर मी पण आता योगा करणार!’ प्रदीपने आपले पत्ते ओपन केले.

प्रदीप योगा करणार? मला विचारच करवत नव्हता. मी जरा सावरत म्हणालो. हे असं अचानक कसं काय? तर प्रदीप म्हणाला, ‘हेल्थ इज वेल्थ.’ बरं म्हटलं विश यू लक, चालू दे तुझं. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा हाणून त्याचा निरोप घेतला. रात्री घरी जाऊन पडलो. प्रदीपचा संकल्प डोक्यात घुमत होता.‘खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है’, अशी हिंदीत एक म्हण आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दहावीनंतर मी कॉमर्स घेतलं म्हणून प्रदीपनेही विचार न करता कॉमर्स घेतलं. भारतातील अनेक बेरोजगार कॉमर्स ग्रॅज्युएट आपल्या मित्रांना शिव्या घालतात. त्याचे कारण हे. असो. तर प्रदीपसारखा योगा करणं काय आपल्याला जमणार नव्हतं. पण, यानिमित्ताने मी भुतकाळात पोहोचलो.

नववर्षासाठी आपण आधी काय काय संकल्प केले होते, ते माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. एका वर्षी मी एक जानेवारीलाच जिमला अ‍ॅडमिशन घेतलं होतं. वर्षभराची फी क्रेडीट कार्डने भरली. बॅग, टी-शर्ट, ट्रॅक पँट, स्पोर्ट्स शूज, पाणी प्यायला नवी बाटली, नॅपकीन…असा गरजेचा (किंवा स्टाईलचा म्हणा) सर्व माल चांगल्या मॉलमधून आणला. पहिल्या दिवशी जिमला जाऊन घाम गाळला. जेमतेम आठवडाभर उत्साहात जिम केली. पण, रविवार आला आणि घात झाला. रविवारच्या एका सुट्टीने सर्व इच्छाशक्तीचे पाणी पाणी झालं. सोमवारी मला झोपेतून उठवेनाच. मग मी स्वतःच्या मनाला कारणं द्यायचो. आज जरा अंग भरून आलंय, मग दुसर्‍या दिवशी थोडी अजून झोप काढू, दोन दिवस नाय गेलो अजून एक दिवस दांडी मारू, उद्या जावू. परवा जाऊ. मग आमचं उद्या-परवा काय आलं नाय. हजारो रुपयांचा चुराडा झाला. त्याआधी शाळा-कॉलेजमध्ये देखील असेच संकल्प धुळीस मिळाले होते. एकदा गिटार वाजवायचा नाद मनावर घेतला होता. महागडं गिटार आणलं. क्लासची फी भरली. ‘सारेगमपधनीसा’ उत्साहात पूर्ण केलं. त्यानंतर तारांना घासून बोटं दुखतायंत म्हणून काही दिवस आराम केला. तेव्हापासून गिटार भिंतीवरील खिळ्यावर आहे. प्रदीपच्या निमित्ताने वाटलं, याचे तरी संकल्प सिध्दीस जावेत. प्रदीपकडून आज चांगलीच सकारात्मक ऊर्जा मिळाली होती. (ही ऊर्जा सुवर्ण द्रव्य स्वरूपात होती बरं का) विचार करता करता झोपेचा संकल्प सिद्धीस कधी गेला कळलंच नाही.

मागच्याच आठवड्यातली गोष्ट असेल. सकाळी पेपर चाळत होतो. ठाकरे सरकारने त्यांचा संकल्पही पूर्ण केल्याचे वाचले. शिवभोजन थाळीचा जीआर अखेर निघाला. जीआरच्या अटी वाचल्यावर जरा गोंधळूनच गेलो. लहानपणी मी झुणका भाकरचे केंद्र पाहिलेले होते. एक रुपयातला तो चविष्ट झुणका भाकर (झुभा) मला कधीही खायला मिळाला नव्हता. जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा तो संपलेला असायचा. मग संध्याकाळी त्याच झुणका भाकर केंद्रावर आम्ही दहा-दहा रुपये काढून हाल्फ मंचाव सुप प्यायला जायचो. कॉलेजात गेल्यावर सुपच्या जागी राईस खाण्याची लायकी निर्माण झाली. पण, त्या झुभा केंद्राने मात्र कधी झुभा दिली नाही. मग पुन्हा प्रदीपचा विचार डोक्यात आला. म्हटलं सरकारचेच संकल्प जिथे सिद्धीस जात नाहीत, तिथे आपण पामर काय करणार…

प्रदीपच्या मोदीशेठचंही तसंच आहे. त्यांनीही अनेक संकल्प बोलून दाखवले. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, काळा पैसा आणू, दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, अच्छे दिन वगैरे आणू… पण छे, कसले काय अच्छे दिन. आपली परिस्थिती जैसे थे. मोदी सरकारने सांगितलेले संकल्प पूर्ण केले नाहीत आणि न सांगितलेले पूर्ण केले. बघा ना, ते CAA, NRC आणि काय ते NPR. याबद्दल कधी काय सांगितलं होतं का? पण, या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी मोदींचे राईट हँड मोटाभाई अमित शा जोरात कामाला लागलेत. सीएएचा तर अध्यादेशही निघालाय. २०२४ येईपावेतो मोदी सरकार काय काय संकल्प पूर्ण करेल, त्याचा काही नेम नाही. असो आपण पुन्हा एकदा प्रदीपच्या संकल्पावर फोकस करुया.

थर्टी फर्स्टच्या त्या यादगार रात्रीनंतर मकर संक्रांतीनिमित्त प्रदीपची भेट झाली. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.. वगैरे झालं. मग विषय आपसूकच योगावर आला. कोणती आसनं करतो, त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे ऐकण्यासाठी माझ्यासकट सर्व ग्रुपचे कान टवकारले होते. पण, प्रदीपचा चेहरा काही मोदींच्या सकाळच्या ७ च्या चेहर्‍यासारखा फ्रेश दिसेना. म्हणून उगं आपलं मोबाईलमधून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तरीही भाऊचा चेहरा खुलेना. म्हटलं काहीतरी गडबड आहे. मग जरा बाजूला नेऊन विचारलं. भाऊ काय झालं? मग प्रदीप जरा इकडं तिकडं बघत सांगायला लागला. ‘काय सांगू भावा, योगाला गेलो पण आपल्याला ते काही जमेना. चटई वर पडून प्राणायम करायला गेलो तर झोप येते. वक्रासन करताना मान मोडते, नौकासन करताना पोटात कळ मारते. तिकडं ट्रेनमधी बसायला आसन मिळत नाय अण इथं एकही आसन नीट होईना. कसंबसं एक आठवडा कळ काढून दिलं सोडून.’ आणि मग मी प्रदीपला १७ जानेवारीची माहिती दिली. जगात इतरही लोक आपल्या संकल्पाला लाथ मारत असतात. हे कळल्यावर प्रदीप खुलला. मग आम्ही मकर संक्रांत स्पेशल ग्रुप सेल्फी घेतला. या फोटोत प्रदीपच्या चेहर्‍यावर मोदीशेठसारखं स्मितहास्य खुललं होतं.

First Published on: January 17, 2020 5:35 AM
Exit mobile version