२०२१ च्या पोटात दडलंय काय ?

२०२१ च्या पोटात दडलंय काय ?

2020 संपत आलंय. कधीही न विसरता येणार्‍या या वर्षात चांगल्या कमी आणि वाईट घटनांच्या वावटळीचं म्हणजेच कोरोनाचं सावट आहे. पण लशीचा शोध लागल्याने कोरोनाची ईडापिडा जावो आणि येणारं 2021 हे वर्ष तरी आनंदाचे, समाधानाचे, समृद्धीचं आणि आरोग्यवर्धक जावं अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. यामुळे सगळं जग आता अचूक भविष्य सांगणार्‍या बाबा वेंगा, फ्रान्सचे नॉस्ट्रॅडॅमस व इतर तज्ज्ञांच्या भाकिताकडे लक्ष ठेवून होते. पण दोन दिवसांपूर्वी या दोन भविष्यवेत्यांनी सांगितलेले भाकित प्रसिद्ध झाले आणि 2021 सालाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या जगाचा काळजाचा ठोकाच चुकला. कारण येणारं वर्ष हे सर्वनाशाचं आहे असंच या दोन तज्ज्ञांनी सांगितलं. थोडक्यात काय तर आगीतून फुफाट्यात ढकलणारं वर्ष असेल हेच या भविष्यवेत्यांनी सांगितले आहे. पण त्यावर विश्वास ठेवून जर आतापासूनच आपण हातपाय गाळून बसलो तर 2021 नाही तर त्यानंतरची येणारी सगळीच वर्षे ही निराशेने भरलेली असतील. म्हणूनच बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमस यांची भविष्यवाणी मनाला लावून घ्यायची की, आत्मविश्वासाने लढून जिंकायचं हे ज्याला त्याला ठरवावं लागणार आहे.

कारण जेव्हा कुठलेही वर्ष सरत असते तेव्हा असे अनेक जण येणार्‍या वर्षाचे भाकित करतात. याच पार्श्वभूमीवर 2021 हे वर्ष कसं असणार हे अमेरिकेतल्या गार्टनर या संस्थेनेही सांगितलं आहे. गार्टनर ही संस्था जगातील आयटी व इतर कंपन्यांना किती नफा तोटा झाला. यावर संशोधन करते. तसेच बड्या मंडळींना तज्ज्ञ सल्लागारही पुरवण्याचे काम करते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपयुक्त माहिती पुरवण्याचे कामही ही संस्था करते. यामुळे कंपन्यांचा त्यातील व्यवहारांचा सखोल अभ्यास करणार्‍या या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार 2021-25 ही आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत वर्ष असतील. सध्या जो डिजिटलचा बोलबाला सुरू आहे तो अधिक वाढेल. त्याला महत्व मिळेल. माणसांची कामं मशीन करेल. तर माणसं मशीनीसारखीच वागू लागतील. कामगारांवर मालकांचा डिजिटल वॉच असेल. माणसंच मशीनसारखी होणार असल्याने संवेदनाचा अभाव असेल. व्यावहारिक दृष्टीकोन वाढेल, असे गार्टनरने सांगितलं आहे. हे भविष्य 2025 पर्यंतच आहे. या काळात शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती घडेल असेही गार्टनरने म्हटले आहे.

तर अचूक भविष्यासाठी प्रसिद्ध असलेली बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिनेही मृत्यूपूर्वी जगातील अनेक घटनांचे केलेले भाकित खरं ठरतं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. बाबा वेंगा हिच्या वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. पण मृत्यूआधी तिने पुढील काही वर्षांची भाकितं नोंद करून ठेवली होती. 2020 साठी तिने केलेली भाकितंही खरी ठरली होती. त्यात तिने 2020 साली युरोपमध्ये मुस्लीम कट्टरपंथींचे वर्चस्व असेल असे म्हटले होते. युरोपसह अनेक दशात हे मुस्लीम रक्तपात घडवतील, रासायनिक हल्ले करतील यामुळे युरोपचे अस्तित्वच धोक्यात येईल, असेही भाकित बाबा वेंगा हिने केले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्ला होण्याचे भाकितही वेंगाने सांगितले होते. तसेच 2020 मध्ये नैसर्गिक संकटांबरोबरच मानवी स्वभावातही बदल होतील असेही तिने म्हटले होते.

त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गूढ आजाराने निधन होऊ शकते किंवा त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो असेही बाबा वेंगाने भाकित केलं आहे. तिची भविष्यवाणी 100 टक्के जरी खरी झालेली नसली तरी त्यात तथ्य आहे. कारण बाबा वेंगा हिने केलेल्या दाव्याच्या जवळपास जाणार्‍या घटना 2020 साली घडल्या आहेत. यामुळे आता 2021 सालचे बाबा वेंगाचे भविष्यही खरे ठरते की काय अशी भीती लोकांना वाटत आहे. 2021 हे आव्हानांचे वर्ष असणार आहे. जगाला आपत्ती संकटांचा सामना करावा लागणार आहे. जगासाठी हा सर्वात कठीण काळ असणार आहे. त्याचबरोबर यावेळी ब्रम्हांडामधील नवीन जीवांचाही शोध लागणार आहे. या शोधामुळे पृथ्वी कशी निर्माण झाली हे समजणार आहे. असे भाकित बाबा वेंगा हिने केल्याने आता सगळे धास्तावले आहेत.

हे कमी की काय आता फ्रान्समधील भविष्यवक्ता नॉस्ट्रॅडॅमस याचे भाकित समोर आले आहे. 2021 या वर्षात विनाशकारी घटना घडतील. तसेच 2021 मध्ये जगातील सैनिकांच्या मेंदूत मायक्रोचिप लावल्या जातील. पृथ्वीवर एक प्रचंड लघुग्रह आदळेल, जो रहस्यमयपणे संपूर्ण जगाचा नाश करेल असे नॉस्ट्रॅमसने म्हटले आहे. बाबा वेंगाप्रमाणेच नॉस्ट्रॅडॅमसने आधी केलेली भाकितंही खरी ठरली आहेत. यात लेडी डायनाच्या अपघाती मृत्यूबद्दलही नॉस्ट्रॅडॅमस याने केलेले भाकित खरे ठरले होते. यामुळे 2020 संपण्याची वाट बघणार्‍या जगभरातील नागरिकांचे हातपाय आधीच लटपटायला लागले आहे. तर थर्टी फस्ट साजरी करण्याचे अनेकांचे प्लान फ्लॉप झाले आहेत. बघायला गेलं तर या दोन भविष्यवेत्यांची 2021 ची भविष्यवाणी ही जगापुढे आणखीन एक संकट उभे राहणार असल्याचे नांदी आहे. एकीकडे अमेरिकेतल्या गार्टनर संस्थेचे भाकित पाहिले तर येणारे वर्ष लोकांना काम मिळेल, पण मशीनसमोर काम करताना माणसाची केव्हा मशीन होईल हे सांगता येणार नाहीये हे दर्शवणारं आहे. सध्या कोरोनामुळे रिकाम्या झालेल्या माणसाला हाती कामचं हवं आहे.

मरण्याच्या भीतीपेक्षा त्याची जगण्याची उमेद मोठी आहे. यामुळे समाजातील एक वर्ग गार्टनरच्या नजरेतूनच येणारं वर्ष पाहत आहे. तर दुसरीकडे कोरोनाने महामारी जरी आणली असली तरी वर्षभराच्या त्याच्या मुक्कामात लोकांमध्ये त्याने आत्मबळही निर्माण केलं आहे. या आत्मबळातूनही परिस्थिती बदलता येते. हे सध्याच्या कोरोना योद्धांना बघितल्यावर जाणवतं. यामुळे बाबा वेंगा काय किंवा नॉस्ट्रॅडॅमस काय आणि आपल्या आजूबाजूचे परिचयाचे ज्योतिषी काय ते जे सांगतात ते ऐकायचं काम करायचं. कारण ते देखील त्यांच्या अभ्यासावरच भविष्य सागंत असतात. पण दुसर्‍या दिवशी तुमचा मृत्यू आहे हे सांगितल्यावर घाबरून खोल गेलेला श्वास परत नॉर्मल स्टेजला आणणे जरा कठीणच आहे. यामुळे अशा विनाशी भविष्याला अंतिम निर्णय न समजता मोकळ्या हवेत जाऊन मोकळा श्वास घ्यायला हवा. त्यासाठी मनाने मनालाच सांगावं की कोरोनासारख्या छुप्या शत्रूचा वर्षभर जर मी सामना करू शकतो तर कुठेलेही संकट मला कमकुवत करू शकत नाही. असा विचार जेव्हा प्रत्येकाच्या मनात येईल तेव्हा बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडेमसचे भविष्यही वाचायला, ऐकायला रंजक वाटेल नाहीतर आताच जग संपल्यासारखे वाटेल.

First Published on: December 28, 2020 6:17 PM
Exit mobile version