ज्याचा त्याचा करोना

ज्याचा त्याचा करोना

फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट. तेव्हा आपल्याकडे करोनाचं नुकतंच आगमन झालं होतं. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण होते. फेब्रुवारी महिन्यात करोना सरसकट सर्व भारतीयांचा चेष्टेचा विषय होता. त्यात डॉक्टरही अपवाद नव्हते. मार्च सुरू झाला आणि करोनानं मुक्काम लांबवला. सरकारे जागी झाली, मग उपाययोजना वगैरे आल्या. पहिल्यांदा शाळा बंद करण्यात आल्या. त्या दिवसात व्हॉट्सअ‍ॅपवर एक जोक फिरत होता. ‘गॅलरीत कपडे सुकवता सुकवता एक महिला दुसर्‍या महिलेला म्हणते, काय ओ तुम्ही गावाला नाही जाणार? आम्ही तर चाललो. पोरांना करोनाच्या सुट्ट्या पडल्यात ना!’ करोनाच्या सुट्ट्या? मार्चमध्ये हा विनोद विनोद वाटत होता. सध्या हा विनोद अंगावर येतो. असंच झालं रामदास आठवलेंच्या बाबतीत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ‘गो करोना, करोना गो’ ही वैश्विक प्रार्थना म्हटली. तेव्हा आठवलेंची खिल्ली उडवली गेली. व्हिडिओ व्हायरल करून ‘काहीही’ म्हटलं गेलं. पण करोना तेव्हा खिल्लीचा विषय होता. आज प्रत्येक भारतीय मनातल्या मनात ‘गो करोना’ असं दिवसातून एकदा तरी म्हणतो.

करोनानं जगाला छळलंय. अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली अशा मी मी म्हणणार्‍या महासत्तांची पाचावर धारण बसलीय. त्यांचा करनोही वेगळा असेल निश्चित. इटालियन लेखिका फ्रानसेस्को मेलँड्रीं यांनी ‘फ्रॉम युवर फ्युचर’ नावाचे पत्र लिहून त्यांचा करोना काय आहे? हे जगाला सांगितलंच होतं. पण आपला करोना दिवसागणिक बदलत जातो. बघा ना… २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’ लागला तेव्हाच आपण लढाई जिंकल्यांचा आनंद साजरा केला. संध्याकाळी ५ वाजता विजयोत्सव साजरा केला. मग २४ मार्च रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्चपासून २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन घोषित केला. तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपच्या विनोदातील त्या ताईंप्रमाणे करोना सर्वांसाठी ‘सुट्टी’ची संधी होता. काहींसाठी तो ‘वर्क फ्रॉम होम’ होता. काहींसाठी अत्यावश्यक सेवा होता. तर काहींसाठी कायमची सुट्टी होता. अनेकांसाठी आर्थिक तडजोड होता, अनेकांसाठी आर्थिक चणचण होता. अनेकांचा करोना तेव्हा एवढा गंभीर नव्हता.

मुंबईत कॉर्पोरेट क्षेत्रात एखाद्या कंपनीत नवीन कर्मचारी रुजू झाल्यास पहिला महिना त्याचा हनिमून पीरियड असल्याचं म्हटलं जातं. या पहिल्या महिन्यात त्याला कंपनी, सहकारी आणि काम समजून घेण्यासाठी वेळ दिला जातो. चुकांसाठी माफ करण्यात येतं. जबाबदारीपेक्षा प्रशिक्षणावर भर असतो. हनिमून पीरियड संपला की घाण्यात जुंपायला बैल तयार. पहिला लॉकडाऊन तसाच वाटला. मध्यमवर्गीय लॉकडाऊन एन्जॉय कसा करावा? याच्या कल्पना व्हॉट्सअ‍ॅपवर करू लागले. घरच्या घरी रेसिपी, योगा, वेबसीरिज, वाचन असं सगळं गुडी गुडी सुरू झालं. मध्यमवर्गाच्या खालच्या रेषेत असणारा वर्ग रेशन दुकानांवर तुटून पडला. त्याच्याही खाली असलेला मजूरवर्ग कधी हे २१ दिवस संपवून आपापल्या कामाला लागतोय याचा विचार करत होता. लॉकडाऊन प्रत्येकासाठी वेगळं होतं. काहींसाठी जगण्याचा संघर्ष होता, तरी काहींना मस्तपैकी जगण्याची संधी…

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपण खूप काही गोष्टी शिकलो. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन, आयसोलेशन… अशा जुन्या संकल्पनांची पुन्हा एकदा उजळणी झाली. भारतात पूर्वीपासूनच अस्पृश्य समाजापासून सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात होतं. सर्वच समाजातील विधवा, परितक्त्या आणि वृद्धांना क्वारंटाईन किंवा आयसोलेटेड करण्याची पद्धत होतीच की. मधल्या काळात स्वातंत्र्य बितंत्र मिळाल्यामुळे या ‘क्रांतिकारी’ कल्पना आपण विसरलो होतो. कारण आज त्याच जगाला करोनासारख्या विषाणूपासून वाचवत आहेत. हो ना. पूर्वी समाज म्हणून या संकल्पना वापरल्या जात होत्या. आता करोना पॉझिटिव्ह नावाची नवी जमात तयार होतेय. त्यांना क्वारंटाईन, आयसोलेट केलं जातं. कोणत्या समाजात जन्म घ्यावा, हे जसं व्यक्तीच्या हातात नसतं. तसं करोनाचा संसर्ग कुठून होईल? हे देखील आपल्या हातात नाही. वरकरणी तुम्हाला टीव्हीत, बातम्यांत ते टाळ्या वाजवून करोनाला हरवणारे रुग्ण दाखवले जात असले, तरी समाजात सगळीकडेच तशी परिस्थिती नाही. पॉझिटिव्ह रुग्णांना अनेक ठिकाणी अवहेलनांना सामोरे जावे लागले आहे.

पहिल्या लॉकडाऊननंतर अनेकांचा करोनाबद्दलचा दृष्टीकोन बदलत चाललाय. १४ एप्रिलला सकाळी ११ वाजता पंतप्रधानांनी दुसर्‍या लॉकडाऊनची घोषणा करताच. इथल्या ‘नाही रे’, ‘श्रमहारा’, ‘श्रमिक’, ‘मजूर’, अशा निरनिराळ्या नावांनी परिचित असलेला कामगार वर्ग जागा झाला. मुंबईतल्या वांद्रे, गुजरातच्या सुरतमधील रस्त्यावर उतरून तो आम्हाला घरी जाऊ द्या म्हणून सांगू लागला. तेव्हा त्यांचा, त्यांच्यावर बातम्या करणार्‍यांचा, त्या बातम्या पाहणार्‍यांचा, सरकारचा, विरोधकांचा आणि निर्णय घेणार्‍या विरोधकांचाही करोना वेगवेगळा होता. म्हणूनच मोदींनी तिसर्‍या लॉकडाऊनला दिलेली ‘आत्मनिर्भर’ बनण्याची गोळी मजूरवर्गाने तेव्हाच घेतली. हजारो किमींचा पायी प्रवास करण्यासाठी हे मजूर तयार झाले. मध्यमवर्गासाठी हे काहीतरी नवीन होतं. माध्यमांसाठी कटेंट होता. सरकार-विरोधकांसाठी तो मुद्दा होता आणि श्रमिकांसाठी जगण्याचा संघर्ष….

करोनाच्या दिवसांत अनेक गोष्टी लॉकडाऊन झाल्या; पण भारतातलं राजकारण काही लॉकडाऊन झालं नाही. सत्ताधार्‍यांसाठी सत्ता टिकवण्यासाठी करोनाची संधी होती. तर विरोधकांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी करोना राजमार्ग वाटतोय. अनेकांना करोनात व्यापाराची संधी दिसतेय. हँड सॅनिटायझर, होमियोपॅथीच्या गोळ्या बनविण्याचे कारखाने रातोरात उभे राहिलेत. तर अनेकांनी अन्नधान्य, भाजीपाला, दारूचा काळाबाजार करून आपले हात ओले करून घेतले. बघता बघता लॉकडाऊनचे तीन टप्पे होऊन गेले. आता चौथा लॉकडाऊन सुरु आहे. तोही येत्या काही दिवसांत संपेल. मागच्या दोन महिन्यात प्रत्येकाच्या करोनाने भयंकर स्वरुप धारण केलंय. मध्यम वर्गातील अनेकांची पगार कपात झालीय. अनेकांना लॉकडाऊननंतर त्याच संस्थेत कामाला जायला मिळेल की नाही? यांची चिंता सतावतेय. करोनानंतरचं जग कसं असेल? किंवा जग तरी असेल की नाही? असे नाना प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेत. एक अंध:कारमय भविष्य…

अशातही करोना पॉझिटिव्ह-निगेटिव्ह आणि रोजच्या जीवनात पॉझिटिव्ह-निगेटिव्ह असलेल्यांसाठी करोना वेगळा आहे. आणखी दोन-चार महिन्यात समजा हे संकट टळलं तर त्यानंतरचा करोनाचा आफ्टरइफेक्ट निश्चितच वेगवेगळा असणार. काहींनी सर्वस्व गमावलेलं असेल, काहींनी नवी संधी शोधली असेल. तर काही सकाळ झाल्यावर ज्या उमेदीने बाहेर पडतात, त्या उमेदीने बाहेर पडतील. मात्र हे लॉकडाऊनचं चक्र पुढं असं चालूच राहिलं तर कदाचित २०२० च्या शेवटाला सर्वांचा करोना एकसमान असेल. आता कमी अधिक प्रमाणात त्रासदायक असलेला करोना तेव्हा सर्वांसाठीच डोकेदुखी असेल. अर्थात ‘जर, तर’ला जागा नाही. कदाचित तुमच्या, माझ्या आणि संशोधकांच्याही पलीकडे करोना काहीतरी वेगळाच असेल…

First Published on: May 22, 2020 5:35 AM
Exit mobile version