भारतीय सैन्य जिंकलेच!

भारतीय सैन्य जिंकलेच!

Birbhum: Army jawans pay gun salute to martyr Rajesh Orang during his funeral rites at his ancestral village Belgoria in Birbhum district of West Bengal, Friday, June 19, 2020. Orang was among the twenty Indian Army soldiers who were martyred in a clash with the Chinese troops in Ladakh's Galwan Valley. (PTI Photo) (PTI19-06-2020_000183B)

वर्ष 1962 च्या युद्धातही चीनने रात्रीच्या अंधारात येऊन बेसावध भारतीय जवानांवर हल्ला केला होता आणि आताही असाच हल्ला केला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की चीन लपूनछपून कारवाया करतो. म्हणून 1962च्या युद्धात भारताचा चीनकडून दारूण पराभव झाला, तेव्हापासून भारतीय जनता चीनविषयी प्रचंड भीतीग्रस्त आहे. चीनच्या सैन्याची संख्या, चीनकडील अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आदींच्या संख्येमुळे, तसेच आर्थिक स्तरावर चीन जगात बलाढ्य देश असल्याने ही भीती ठळकपणे दिसून येते. ही मानसिकता मोडून काढण्याची घटना या धुमश्चक्रीत घडली आहे, या दृष्टीने भारतीय जनतेने त्याकडे पहायला हवे. अन्यथा ही भीती कायम राहील आणि त्यातून आपण कधीच बाहेर पडणार नाही आणि लढण्यापूर्वीच अशा पराभूत मानसिकतेत राहिल्यास चीनला कधीच धडा शिकवू शकणार नाही. भारतीय सैन्य हे वर्ष 1962 चे सैन्य राहिलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. खरेतर या घटनेने ही पराभूत मानसिकता बदलण्याचे मोठे काम केले आहे, हे समजून घ्यायला हवे. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला, त्यावेळी चिनी सैनिक पूर्णपणे तयारीत होते. त्यांनी खिळे आणि तारा लावलेले दांडे, दगड आदी घेऊनच हल्ला केला. त्याला अशा प्रकारची कोणतीही तयारी नसताना आणि अचानकपणे झालेल्या या हल्ल्याला तितक्याच शक्तिनिशी दिलेले प्रत्युत्तर भारतीय सैन्याच्या पराक्रमाची कल्पना देते.

जगात समोरासमोरील युद्धाचा इतिहास खूपच जुना झाला आहे. सध्याच्या अत्याधुनिक शस्त्रांच्या काळात अशा प्रकारची हातघाईची छोटी लढाई दुर्मिळ झालेली आहे. अशा वेळी भारतीय सैन्याने परतवून लावलेले आक्रमण जगातील अन्य देशांच्या सैन्याला अभ्यासण्यासारखीच गोष्ट ठरणार आहे, हे भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. दोन बटालियनमध्ये ही धुमश्चक्री झाली. एका बटालियनमध्ये साधारण 600 ते 700 सैनिक असतात. म्हणजे 2-4 सैनिकांमध्ये ही हातघाई झालेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ही लढाई झाली तो भाग डोंगराकडचा होता आणि खाली खोल दरी होती. अशा वेळी स्वतःला सावरत लढणे हे कठीण काम होते. यावेळी दोन्हीकडील सैन्याचे काही सैनिक खोल दरीतही कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. काही सैनिक नदीत पडल्यावर त्यांना बाहेर काढण्यातही आले; मात्र तेथील थंड पाण्यामुळे आणि एकूणच थंड वातावरणामुळेही काहींचा मृत्यू झाला, अशी माहितीही समोर आली आहे. अशा वातावरणात लढून चीनची मोठी हानी करणारे भारतीय सैनिक कौतुकास पात्र आहेत. याचे कौतुक देशपातळीवर करून भारतीय सैन्याचे आणि भीतीग्रस्त जनतेचेही मनोबल वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आणि विविध राजकीय पक्ष, संघटना, तसेच प्रसारमाध्यमे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. राजकीय पक्षांनी राजकारण करण्यापेक्षा राष्ट्रभक्तीचा विचार केला पाहिजे. तसेच चीनने वर्ष 1962 मध्ये भारताला पराभूत केल्याच्या घटनेपेक्षा त्याच्याकडे युद्ध जिंकल्याचा एकही पराक्रम नाही. उलट त्याला व्हिएतनामसारख्या टीचभर देशाने युद्धात धूळ चारली होती, हेही लक्षात घ्यायला हवे.

या घटनेनंतर दोन्ही सैन्यात जवळपास 6 तास चर्चा झाली; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. उलट चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतावरच त्यांच्या सीमेत घुसखोरी करून हल्ला केल्याचा आरोप केला. यातून चीनची भूमिका लक्षात येत आहे. आता भारत सैनिकी स्तरावर काय भूमिका घेतो, हे पहावे लागले. चीनचे 43 सैनिक ठार झाल्यावर चीन घाबरला असणार, यात शंका नाही. आपल्यावर असलेली भीती मोडून आता ही भीती आपल्याविषयी चीनवर कशी अधिक निर्माण करता येेईल, यासाठी भारताने प्रयत्न करायला हवे. आता झालेली लढाई हातघाईची होती. उद्या चीनने शस्त्रांद्वारे प्रत्युत्तर दिले, तर भारताला तसेच प्रत्युत्तर देण्यास तयार रहावे लागणार आहे. भारतीय सैन्याची ती तयारी असणार आहे, यात शंका नाही. तरीही आता अधिक सावध रहावे लागेल. त्यातही चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने सैन्य स्तरावरच काही करायला हवे, असेही आवश्यक नाही. गलवान व्हॅलीमध्ये गेल्या 41 दिवसांपासून सीमावाद चालू होता आणि त्यावरून चर्चाही चालू होती. अशा चर्चा म्हणजे चीनने केलेला देखावा आहे, हे आता ठळकपणे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा चर्चांना किती वेळ द्यायचा, हे भारताला ठरवावे लागेल.

दुसरीकडे करोनामुळे जागतिक स्तरावर बहुतेक मोठे देश चीनच्या विरोधात उभे ठाकलेे आहेत. भारताच्या सैनिकांवर झालेल्या या आक्रमणानंतर त्यांची सहानुभूती भारताला मिळत आहे. त्यांचे सहाय्य घेऊन भारताने चीनच्या विरोधात आर्थिक स्तरावर म्हणजे व्यापारी स्तरावर चीनविरोधात कृती केली पाहिजे. चीनकडून भारतात येणार्‍या वस्तूंवर बंदी घालण्याची प्रक्रिया चालू केली पाहिजे. यातून भारताची काही प्रमाणात आर्थिक हानी झाली, तरी सध्या चीनला योग्य संदेश देण्यासाठी तसा प्रयत्न करावाच लागेल. संयुक्त राष्ट्रांतही चीनला घेरण्यासाठी सर्व चीनविरोधी देशांना भारताने पाठिंबा दिला पाहिजे. त्याच वेळी सर्व भारतीयांना सरकारने विश्वासात घेऊन चीनविरोधात काय करता येईल, हे सांगायला हवे. यातूनही चीनला वेगळा संदेश जाईल आणि त्याला विचार करावा लागेल. चीनची अशा प्रकारे चोहोबाजूंनी कोंडी झाल्यास तो एकटा पडणार, यात शंका नाही आणि तो भारताचा विजयही असेल. अशा वेळी चीनने युद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रत्युत्तर देण्यास तयार रहावे लागणार आहे.

तसेच तैवान आणि हाँगकाँग या प्रदेशांनाही सोबत घेतले पाहिजे. कारण भारताने लडाख सीमेवर हातघाईच्या लढाईत चीनच्या एका कमांडिंग अधिकार्‍यासह 43 सैनिकांना ठार केल्याचा आनंद भारतात तितकासा व्यक्त होत नसला, तरी तैवान आणि हाँगकाँग या चीनविरोधी प्रदेशात तो बर्‍यापैकी व्यक्त होत आहे. भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाल्याने भारतीय जनतेमध्ये चीनच्या विरोधात संताप आहे. स्वतःचे 43 सैनिक ठार झाल्याचे चीनने अद्याप अधिकृतपणे सांगितलेले नाही. कारण त्याचे अधिक सैनिक ठार झाले असल्याने तो त्याचा पराभव आणि अपमानच ठरणार आहे. करोनाच्या संदर्भातही त्याने अशीच लपवाछपवी केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या गोष्टींत तर तो अधिक लपवाछपवी करणार, यात शंका नाही. त्यामुळे भारतातील काही ठरावीक घटकांकडून 43 च्या आकड्याकडे संशयाने पाहिले जात आहे; मात्र तैवान आणि हाँगकाँग हे चीनचे 43 सैनिक ठार झाल्याच्या घटनेवर खूश आहेत. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. त्याच उक्तीनुसार तैवान आणि हाँगकाँग यांचा आणि भारताचा शत्रू एकच असल्याने या दोन्हींकडून भारतीय सैन्याने चीनच्या सैनिकांना ठार केल्याचा आनंद होणे साहजिकच आहे. तैवानच्या ‘तैवान न्यूज डॉट कॉम’ या वृत्तसंकेतस्थळाने एक छायाचित्र ‘पोस्ट’ करून त्याला ‘फोटो ऑफ द डे’ (दिवसभरातील महत्त्वाचे चित्र) असे म्हटले आहे. या चित्रामध्ये भगवान श्रीराम आकाशातून चिनी ड्रॅगनवर धनुष्यबाण मारत आहेत, असे दाखवले आहे. तसेच या चित्रावर ‘आम्ही जिंकतो आणि आम्ही मारतो’, असे लिहिले आहे. याचाच अर्थ ‘भारताने चीनला मारले आहे’, असे त्याला स्पष्ट लक्षात आले आहे, हे समजले पाहिजे. तैवान आणि हाँगकाँग यांना आनंद होण्यामागचा अर्थही लक्षात घ्यायला हवा.

बर्‍याच वेळा शत्रूला आपण अपेक्षित असे जेव्हा प्रत्युत्तर देऊ शकत नाही; मात्र त्याच वेळी अन्य कुणी ते दिले, तर आपल्याला जसा आनंद होतो, तो आनंद या चित्रातून तैवानमधील लोकांना झालेला दिसून येत आहे. चीन तैवानला त्याचा भूप्रदेश समजून त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. तो तैवानला स्वतःचा भूप्रदेश सांगत जागतिक स्तरावर सर्व देशांना तैवानला कोणत्याही प्रकारचे सैनिकी आणि आर्थिक सहाय्य करण्याला विरोध करतो. नुकतेच तैवानच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला भारतातील भाजपचे 2 खासदार ऑनलाईन उपस्थित राहिल्यावर चीनने त्याचा विरोध केला होता. दुसरीकडे ब्रिटनने हाँगकाँगला चीनकडे सोपवल्यावर चीनने तेथील जनतेवर कठोर कायदे लागू करून वचक बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला तेथील जनतेकडून प्रचंड विरोध होत आहे. चीन हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र त्याला यश मिळालेले नाही. करोनामुळे तेथील आंदोलन जरी रस्त्यावर येऊन होत नसले, तरी चीनला विरोध केलाच जात आहे. अमेरिका, तसेच युरोपमधील राष्ट्रे यांनी भारत अन् चीन यांना शांतता राखण्याचा सल्ला दिला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्याशी दूरभाषवर चर्चाही केली आहे. या देशांनी शांततेचा सल्ला दिला असला, तरी भारतीय सैनिकांच्या पराक्रमाने तेही खूश झालेच असणार यात शंका नाही; मात्र ते सार्वजनिक स्तरावर बोलू शकत नाहीत, हे समजायला हवे.

First Published on: June 22, 2020 5:35 AM
Exit mobile version