अलविदा… 2020

अलविदा… 2020

कभी अलविदा ना कहना.. असे नेहमी म्हटले जाते. मात्र गेल्या 31 डिसेंबर 2019 वर्षाच्या शेवटच्या दिवशी नवीन वर्षाचे अर्थात 2020 चे स्वागत करताना येणारे आगामी वर्ष हे आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, गावासाठी शहरासाठी राज्यासाठी तसेच देशासाठी आणि जगासाठी देखील काय घेऊन येणार आहे याची सुतराम शक्यतादेखील कुणाच्या ध्यानीमनी नव्हती.

मागच्या वर्षीदेखील याच जल्लोषात थर्टी फर्स्ट साजरा करताना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांनी एकमेकांना दिल्या होत्या. मात्र माणसाच्या मनात आणि मेंदूत कितीही प्रगतीचे आणि विकासाचे विचार असले आणि ते विचार अंमलात आणण्याची त्याची क्षमता असली तरीदेखील नियतीच्या मनात काय आहे हे जोपर्यंत मानवाला कळत नाही तोपर्यंत नियती समोर मानव हा हतबलच आहे हे 2020 या वर्षाच्या अनुभवावरुन मानवाच्या लक्षात आले.

2020 हे साल एकविसाव्या शतकामध्ये काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय कोरोना वर्ष असेदेखील याचे नामकरण करता येईल. अजूनही कोरोनाचा अवतार संपुष्टात आलेला नाही, मात्र नव्या वर्षाचे स्वागत करताना किमान येणारे 2021 हे नवीन वर्ष तरी देशातील जगातील राज्यातील आणि आपल्या कुटुंबातील आरोग्य स्वास्थ्यासाठी कोरोनामुक्त वर्ष असावे, अशी शुभेच्छा द्यायला हरकत नसावी. जानेवारी महिन्यातच कोरोनाने जगाला हादरे द्यायला सुरुवात केली होती. अर्थात हे हादरे भारतात आणि महाराष्ट्रात पोचेपर्यंत फेब्रुवारी मार्च महिना उजाडला. आणि म्हणता म्हणता केंद्र सरकारने लागू केलेला एक दिवसाचा जनता कर्फ्यू हा पुढे सात महिने संचारबंदीत गेला.

22 मार्चपासून महाराष्ट्राचा आणि देशाचा कारभार आणि एकूणच चलनवलन ठप्प पडले अजूनही पूर्वपदावर येऊ शकले नाही एवढी भयानकता या कोरोनाच्या या अदृश्य विषाणूने जगभरात पसरवली. जागतिक पातळीपासून ते अगदी देशाच्या राज्याच्या जिल्ह्यांच्या शहरांच्या गावांच्या आणि कुटुंबातील सीमारेषा ही या अतिभयंकर अशा या अदृश्य विषाणूने अधिक गडद करत स्वतःच्या कब्जात कधी घेतल्या हे सामाजिक प्राणी म्हणवणार्‍या मानवाला कळलेदेखील नाही. राष्ट्राराष्ट्रात या अदृश्य विषाणूने वाद पेटवले. ज्याच्या श्रीमंतीचा आणि भौतिक सुखसमृद्धीचा अवघ्या पृथ्वीला हेवा वाटावा, अशी अमेरिकेसारखी जगातील प्रचंड आर्थिक शक्ती या अदृश्य विषाणूने कोलमडून टाकली. जिथे अमेरिकेसारख्या आधी प्रगत आणि अतिश्रीमंत देशाने नांगी टाकली तिथे भारतासारख्या विकसनशील देशाचा काय टिकाव लागणार हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र ते चित्र इतक्या भयानक पद्धतीने पुढच्या काळात समोर येईल याची कल्पना मात्र मानवाने केलेली देखील नव्हती.

या अदृश्य विषाणूने माणसामाणसात जीवघेण्या भीतीच्या कधीही तुटू न शकणार्‍या भिंती उभ्या केल्या. त्याने माणसाचा माणसावरचाच विश्वास धुळीस मिळाला. प्रत्येक माणूस एकमेकाकडे साध्या खोकल्याच्या आवाजाने किंवा शिंकण्याच्या आवाजाने देखील जीवघेण्या भीतीने बघू लागला. माणसाचे कुटुंबापेक्षा रक्ताच्या, नात्यापेक्षा स्वत:वर किती प्रचंड प्रेम आहे याची क्रुरताही या 2020 या वर्षात दिसून आली.

कॅलेंडर वरच्या तारखा बदलल्या, दिवस बदलले, वर्ष बदलले म्हणजे माणसामाणसातील नाते बदलत नाही हे जरी खरे असले तरीदेखील या वर्षाने याच रक्ताच्या नात्यातील व्यवहार मात्र पूर्णपणे बदलून टाकला. त्यामुळेच कोरोनामध्ये निधन झालेल्या बापाच्या मृतदेहाला अग्नी देण्यास मुलगाही पुढे आला नाही. कुटुंबात जर एकाला जरी कोरोनाची लक्षणे आढळून आली आणि तो पॉझिटिव्ह निघाला तर अख्ख्या कुटुंबाने वैद्यकीय उपचारासाठी शरीराने तर विलगीकरण कक्षात टाकलेत, मात्र मानसिक पद्धतीने तो कधी विलग केला हे जाणवूदेखील दिले नाही. कुटुंबा-कुटुंबात एवढा टोकाचा अंतर्विरोध हा पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने उघडकीस आला.

2020 हे साल जरी कोरोनामुळे काळेकुट्ट वर्ष म्हणून ओळखले जाणार असेल तरीदेखील या वर्षाच्या अनुभवातून माणूस बरंच काही शिकला हे देखील नाकारता येणार नाही. त्यातली सर्वाधिक जर महत्त्वाची अशी कोणती बाब असेल तर ती म्हणजे माणूस स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत, स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आणि एकूणच कौटुंबिक स्वच्छता, स्वतःच्या घराची स्वच्छता, स्वतःच्या घरात राहतो त्या परिसराची स्वच्छता, बिल्डिंगच्या आवारातील स्वच्छता, या एरवी दुर्लक्षित असलेल्या बाबींकडे त्याने यावेळी प्रथमच अत्यंत गंभीरपणे लक्ष दिले हेदेखील कबूल केले पाहिजे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबत माणूस हा कमालीचा जागरूक झाला हे 2020 या वर्षाचे सर्वात मोठे देणे समाजाला मिळाले आहे. याचबरोबर माणसाला भौतिक सुखाचे जे कमालीचे आकर्षण असते ते भौतिक सुख हे नियतीसमोर शून्य आहे हेदेखील त्याला कळून चुकले. आरोग्यम् धनसंपदा सुदृढ शरीर आणि सुदृढ मन हीच खरी धनसंपत्ती हे कोरोनाने माणसाच्या मनावर बिंबवले.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बुडाले, जगरहाटी ठप्प पडली, मात्र तरीदेखील माणसामाणसातील माणुसकी ही पूर्णपणे संपलेली नाही, अद्यापही माणसात माणुसकी जिवंत आहे आणि या जिवंत असलेल्या माणुसकीने जगाला कोरोनाच्या जीवघेण्या संकटातूनही तारून नेले हे देखील या वर्षात लक्षात आले. कुटुंबातल्या आणि रक्तातल्या उभा राहिलेल्या भिंतींवर माणुसकीच्या भिंतींनी मात केली हे आश्चर्यकारक सत्यदेखील अत्यंत प्रतिकूल आणि खडतर काळामध्ये मानवाच्या लक्षात आले.

एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही सर्वात जर प्रतिकूल काळ कोणाचा होता तर तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा होता. मात्र तरीदेखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि तुलनेने कमी असेल परंतु तरीदेखील महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे या परिस्थितीशी दोन हात करण्यात यशस्वी झाले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. जगातील दुसर्‍या तिसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या विशाल आणि भौगोलिकदृष्ठ्या विखुरलेल्या प्रदेशांमधील जनतेचे आरोग्य राखणे त्यांना कोरोना मुक्त ठेवणे एवढे प्रचंड आव्हान सरकारची यंत्रणा वापरुन रोखणे हे खरोखरच अत्यंत प्रतिकूल काम होते. मात्र तरीदेखील याबाबत काहीशा विलंबाने का होईना, परंतु केंद्र आणि राज्य सरकारने तसेच स्थानिक महापालिकांनी आणि विशेषता सुरक्षा दलांनी पोलिसांनी आरोग्य कर्मचार्‍यांनी सफाई कामगारांनी जी काही या कोरोना काळामध्ये लढाई लढली ती रस्त्यावरची जीवघेणी लढाई होती, मात्र ती लढाईदेखील या कोरोना योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि जिद्दीने लढली आणि ती यशस्वीदेखील करून दाखवली. ही गोष्ट सर्वात महत्त्वपूर्ण आणि दखल घेण्याजोगी आहे असे म्हटले पाहिजे.

त्यामुळेच उद्यापासून सुरू होणार्‍या 1 जानेवारी 2021 या नववर्षाचा सूर्य जेव्हा आकाशात चमकेल तेव्हा कोणालाही 2020 च्या कटू आठवणी कटू अनुभव हे पुन्हा नकोसे आहेत. कोरोनाचे सावट हे आजही पूर्णपणे नष्ट झालेले नाही, त्याचे नवे नवे अवतार पुन्हा पुन्हा जन्माला येत आहेत. त्यामुळे 2021 नववर्षाच्या शुभेच्छा देताना हे नववर्ष जगाला, भारताला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक मानवाला कोरोनामुक्तीचे जावो, आरोग्यसंपन्न जावो आणि त्याची आर्थिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आणि आरोग्याची देखील भरभराट व्होवो, याच शुभेच्छा.

First Published on: December 30, 2020 8:39 PM
Exit mobile version