बाप माणसांच्या सावलीतले तिघे…

बाप माणसांच्या सावलीतले तिघे…

सध्या अख्ख्या जगानं ओमायक्रॉन या घातक विषाणूची धास्ती घेतलीय. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या विषाणूमुळे भारतीयांच्या तर छातीत धडकी भरली आहे. भारतात 31 डिसेंबर 2019 ला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर संपूर्ण जगासह देशातही कोरोनाच्या साथीने थैमान घातलं. अधिकृत आकडेवारीनुसार पावणेपाच लाख लोकांना आपले जीव गमवावे लागलेत. राजकीय नेते, डॉक्टर, उद्योगपती, व्यावसायिक, शिक्षक, पोलीस या सगळ्यांचीच कोरोनाला थोपवताना पुरेवाट झाली. प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असताना राज्याच्या राजकारणात वावरणार्‍या तीन तरुणांनी या काळात आपली छाप पाडलीय. आपल्यापैकी कुणीही म्हणू शकेल या तिघांनीच असं काय वेगळं केलंय की जे इतरांना करता आलेलं नाहीये. या मुद्याचा विचार केला तर या तिघांमध्ये प्रामुख्यानं एक साम्य आहे. ते म्हणजे या तिघांचे वडील राज्यातले आणि देशातले मोठे राजकारणी आहेत.

विशेष म्हणजे एक विद्यमान मुख्यमंत्री आहेत तर दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत आणि तिसरे समाजमाध्यमांवरील नेटकर्‍यांच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. राजकीय वारसा या तिन्ही तरुणांना आपापल्या वडिलांकडून मिळाला असला तरी कोरोनाच्या साथीत या तिघांनीही आपली स्वतंत्र ओळख बनवलीय. देशावरील या संकटाच्या दिवसात स्वतःची राजकीय ओळख सोडण्यासाठी या तिघांनी कसोशीने प्रयत्न केला, तो इथे अधोरेखित करायलाच हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव पर्यावरण आणि पर्यटन मंत्री युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे. दुसरे आहेत माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव कोकणातले आमदार नितेश राणे आणि तिसरे आहेत विरोधकांपासून स्वपक्षीयांपर्यंत आणि समाजमाध्यमांवरील नेटकर्‍यांपासून ते राज्यभरातील कष्टकर्‍यांपर्यंत ज्यांच्यात ‘सीएम मटेरियल’ दिसतं त्या एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. या तिघांनाही जसं राजकीय बाळकडू आपल्या घरातच मिळालं तसेच राजकारणात प्रवेशही अगदी रेड कार्पेटवरून करता आला. सोप्या भाषेत सांगायचं तर तिघांनाही सगळेच रेडीमेड मिळालंय.

आज देशभरात लाखो तरुण राजकारणात संधी मिळवण्यासाठी धडपड करत असताना या तिघांना जे सारं काही आहे ते आयतं मिळालंय. त्या प्रत्येक गोष्टीमागे त्यांच्या वडिलांची पुण्याई होती. यापैकी आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच आमदार आणि कॅबिनेट मंत्री झालेत. तर नितेश राणे दुसर्‍यांदा आमदार झालेत. डॉ. श्रीकांत शिंदे सलग दुसर्‍यांदा संसदेमधून आपला ठसा उमटवत आहेत. यापैकी डॉक्टर श्रीकांत हे आहेत ऑर्थोपेडिक सर्जन. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे हे दोघेही उच्चशिक्षित. तिघांच्याही स्वभावाचा पोत पूर्णतः वेगळा. कामाची शैली तर त्याहीपेक्षा भिन्न. यापैकी दोघांचा पक्ष एकच…तर तिसर्‍याला तीन पक्षांच्या प्रवासानंतर स्थैर्याचा शोध. नितेश राणेंनी अनेक पक्ष बदलले असतील पण त्यात लक्षात रहातो तो त्यांचा स्वतःचा ‘राणे ब्रॅण्ड’…अर्थात तिन्ही तरुणांना आपापले ब्रॅण्डच यशदायी ठरले असले तरी तिघांचेही स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु असल्याचं गेल्या दोन वर्षात पाहायला मिळालंय.

मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली वैद्यकीय क्षेत्रातील तुफानी समाजसेवा असू द्या, किंवा नितेश राणे यांनी तीन पक्षांच्या सरकारला आपल्या माहितीजालाच्या जोरावर सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळवणं असू द्यात किंवा आदित्य ठाकरे यांनी स्वतःचा ठाकरीपणा अधोरेखित करताना सुनील शिंदे यांच्यासारख्या राजकीय अन्यायग्रस्ताला पुन्हा मुख्यप्रवाहात आणण्यासाठी घेतलेला निर्णय असूद्या. या तिघांपैकी प्रत्येकानं काटेकोरपणे पाहिलं आहे की, मी वडिलांचा मुलगा म्हणून लक्षात राहण्यापेक्षा विकासकामं करणारा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांच्या आणि माध्यमांच्या किती-कसा लक्षात राहू शकतो. त्यामुळेच येणार्‍या नव्या वर्षात आणि नव्या काळात हे तिघेही कुठे आणि कसे असणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

2014 मध्ये कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे फक्त एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणूनच परिचित होते. मुळातच त्यांनी डॉक्टरकी सोडून निवडणूक लढवावी की नाही याबद्दल त्यांच्या कुटुंबासह संघटनेमध्येही वेगवेगळे मतप्रवाह होते. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलालाच निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता. साहजिकच डॉक्टरकी बाजूला सोडून श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले. मात्र निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी कसोशीने प्रयत्न केला तो आपलं वेगळंपण जपण्याचा. त्यातच डॉक्टर असल्यामुळे आणि कल्याण-डोंबिवली हा मतदारसंघ बहुतांश प्रमाणात सुशिक्षितांचा असल्यामुळे डॉक्टर श्रीकांत हे त्यांना आपले वाटू लागले. कारण तरुणाईच्या कार्यक्रमातून स्वतःला जल्लोषी ठेक्यावर थिरकवतानाही मतदारसंघाचा विकास बाजूला पडणार नाही याची खबरदारी त्यांनी उत्तमरित्या घेतलीय. रेल्वेच्या समस्यांवर तर त्यांनी अक्षरशः डोंगराएवढं काम केलंय. गेल्या दोन वर्षांतील कोरोना काळात त्यांनी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून राज्यभरात त्यातही ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेल्या कामाला पक्षातील, मित्र पक्षातील नेत्यांबरोबरच विरोधकांनीही शाबासकी दिलीय.

एरव्ही केंद्र सरकार आणि आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक विकास करणार्‍या डॉ. श्रीकांत यांनी काही महिन्यांपासून मात्र आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या मतदारसंघातील विरोधकांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यासाठी त्यांनीही तोडफोडीलाच हात घातलाय. राजकारणात हे सूत्र अवलंबताना तुम्हाला हात मोकळा तर सोडावा लागतोच शिवाय शब्दालाही जागावं लागतं. जोडीला विकासकामांचा रेटाही लावावा लागतो. त्यामुळेच परवा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे खासदार डॉ. श्रीकांत यांना जाहीर चिमटा काढताना म्हणाले, आम्ही दोन वर्षं निधी मागतोय तो पालक मंत्र्यांकडून मिळाला नाही. मुलाने मागताच लगेच निधी मिळाला. यावर खासदार शिंदे यांनीही आव्हाडांना जाहीरपणेच ऐकवलं, ‘तुमच्याकडेही महत्वाचं गृहनिर्माण मंत्रालय आहे. तुम्हीही खूप चांगली कामं केली आहेत. विकासासाठी निधी लागला तर नक्कीच मिळून जाईल. त्यासाठी वडील-मुलगा असं काही होणार नाही’ हे सुनावून टाकलं.

विरोधकांना सुनावणं हा डॉ. श्रीकांत शिंदे किंवा आदित्य ठाकरे या दोघांचाही स्वभाव नाही. कारण बहुधा त्यांच्या वडिलांच्याच स्वभावाचा तो परिणाम असावा. उद्धव ठाकरे काय किंवा एकनाथ शिंदे काय…तोलून मापून बोलणं. अधिक ऐकून कमी बोलणं हीच दोघांच्या स्वभावाची आणि कामाची पद्धत. पण हीच गोष्ट नितेश राणे यांना लागू पडत नाही. कारण नारायण राणे यांचे संस्कार. आपल्या शब्दांमधून विरोधकांवर विशेषतः ठाकरेंवर आसूड ओढणं ही राणेंच्या राजकारणाची गेल्या दीड दशकांची शैली. तीच नितेश यांनी चपखल उचललीय. त्याला नितेश यांनी ट्विटर-फेसबुकची दिलेली जोड तर उल्लेखनीयच आहे. नारायण राणे यांच्या खबरींचं जाळं हा राजकारणातला नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात नितेश यांनी स्वतःचं वेगळेपण जपताना सत्ताधार्‍यांची भंबेरीच उडवलीय.

मग पालिका रुग्णालयातील कोविड वार्डातील मृतदेहाचे फोटो असू द्या किंवा सुशांत सिंह प्रकरणातील सत्ताधार्‍यांना अडचणीचे ठरणारे सूक्ष्म तपशील. नितेश राणे यांनी गेल्या दोन वर्षांत आपल्या राजकीय शैलीत बदल करताना स्वतःच्या शीघ्रकोपी स्वभावाला खूपच मुरड घातलीय. काहींना हा भाजपात गेल्यावर झालेला बदल वाटतो, तर मला वाटतं, ‘राणे पॅटर्न’ हा दीर्घ पल्ल्याच्या यशाचा मार्ग ठरु शकत नसल्यानेच नितेश यांनी स्वतःला बदलवून घेतलंय. नितेश यांनी आपला मतदारसंघ बांधताना सिंधुदुर्ग ते मुंबई असा मतदारांमध्ये साधलेला समन्वय एका कुशल लोकप्रतिनिधीचा परिचय देतो. आपल्या लोकांना सहज उपलब्ध होणं हा एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीतला महत्वाचा यशोबिंदू आहे. तीच गोष्ट या दोन्ही नेत्यांच्या मुलांकडून होताना दिसते. आदित्य यांच्या संपर्क कवायतीसाठी ‘ठाकरे’ असणं ही एक अडचण आहेच.

आदित्य ठाकरेंनी दोन वर्षांत पर्यावरण आणि पर्यटनमंत्री म्हणून खूपच चमकदार कामगिरी केली आहे. कोरोना काळात ‘वरळी पॅटर्न’ने तर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलंय. आदित्य यांच्या ‘मिशन 151’ च्या हट्टापायी सेनेचं जबर नुकसान झालं आणि त्यानंतर आदित्य यांनी स्वतःत बदल घडवायला सुरुवात केली. डॉक्टर श्रीकांत आणि नितेश यांना आपापले मतदारसंघ सांभाळायचे आहेत. पण या दोघांपेक्षा आदित्य यांच्यासाठी आव्हान कठीण आहे. कारण आजारी वडिलांच्या प्रकृतीमुळे शिवसेनेची तटबंदी अभेद्य ठेवणं आणि त्याचबरोबर निष्ठावंतांना सांभाळताना मनाचा मोठेपणा दाखवणं हे कसोटी पहाणारं आहे. वरळी मतदारसंघात पुढची काही वर्षं आपल्यासमोर विरोधकच नसेल याची काळजी आदित्य यांनी पक्षप्रमुख वडिलांच्या माध्यमातून घेतली आहे. त्याचवेळी त्यांनी राजकीय अन्यायग्रस्त ठरलेल्या सुनील शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणून आमदार केलंय.

ही गोष्ट आदित्य यांच्यासाठी दूरगामी फायद्याची ठरणार आहे. आदित्य हे फक्त उपर्‍यांनाच आणि खुज्यांनाच संधी देतात हा तक्रारीचा सूर शिंदेंच्या आमदारकीमुळे मात्र हवेत विरलाय. आदित्य ठाकरेंना शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर बातमीत ठेवणं हेही एक आव्हान नजीकच्या काळात पेलावं लागणार आहे. ते करत असताना शिवसेना आणि युवासेना यात एक दरी जाणवतेय ती बुजवणं हे सर्वस्वी आदित्य ठाकरेंच्या हाती आहे. सुनील शिंदे यांचं आमदार होण्यासारखी घटना आदित्य ठाकरेंची उंची वाढवून गेलीय. अशाच घटनांची मालिका सुरू राहिली, तरच मुंबई-ठाणे महापालिकांवरचा भगवा कायम राहील. कारण हा सेनेचा भगवा उतरवण्यासाठी तर भाजपने कंबर कसलीय. त्यासाठी ते दंड-बैठका तर सेनेच्याच तालमीत तयार झालेल्या राणेंसारख्या नेत्यांकडून करुन घेतायत. हा रणसंग्राम तर रंगेलच पण त्यात रंग भरतील ती मंडळी मात्र बापमाणसांच्या सावलीतच वाढलेली असतील…

First Published on: December 2, 2021 3:08 AM
Exit mobile version