Blog: स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात…!

Blog: स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात…!

ऋषी कपूर

श्रीनिवास नार्वेकर

स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात…, कुसुमाग्रजांच्या ‘स्वप्नांची समाप्ती’ या कवितेत ही ओळ आहे. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर गेल्यानंतर ही ओळ प्रकर्षाने आठवली. ऋषी कपूरच्या जाण्याने एका स्वप्नाचीच समाप्ती झालीय. त्याला समोर पडद्यावर बघणं म्हणजे एक गोड स्वप्नच असल्यागत होतं खरं तर. लवरबॉय रोमँटिक चार्म जसा शशी कपूरमध्ये होता, तसाच ऋषी कपूरमध्ये होता. मला आठवणारा ऋषी कपूर ‘प्यार हुआ इकरार हुआ’मध्ये ‘फिर भी रहेंगी निशानियां’च्या वेळी छत्रीतून दुडुदुडू चालत जाणाऱ्या छबीपासूनचा. त्यानंतर मग ताडकन ‘मैं बच्चा नहीं हूं’ म्हणणारा ‘मेरा नाम जोकर’.. आणि मग अर्थातच ‘हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाय’ म्हणणारा ‘बॉबी’.. त्याचं लवरबॉय देखणेपण अर्ध काम करून जायचं आणि उरलेलं अर्ध काम त्याचा अभिनयातला प्रामाणिकपणा करायचा.

तो प्रचंड ताकदीचा अभिनेता वगैरे नव्हता कधीही, पण स्वतःच्या सगळ्या मर्यादा आणि प्लस पॉईंट्स पूर्णपणे ठाऊक असलेला अत्यंत प्रामाणिक कलाकार होता. शिवाय त्याला मिळालेली गाणी हीसुद्धा त्याची सगळ्यात जमेची बाजू होती. त्याच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेतला तर ७० नी ८० च्या दशकात त्याने केलेल्या चित्रपटांतली उत्तम गाणी आणि पडद्यावर त्या गाण्यांना त्याने दिलेला न्याय त्याला आणखी उत्तम कलाकार बनवून गेला. आपल्याला नेमकं काय नी किती करायचंय, याची नेमकी जाण असणं, हे चांगल्या कलावंताचं लक्षण असतं आणि ऋषी कपूरला हा नेमकेपणा माहिती होता. बॉबीनंतर रफू चक्कर, खेल खेल में, दूसरा आदमी, हम किसी से कम नहीं यांच्याबरोबरीनेच लैला मजनूसुद्धा.. त्यातच मग अमिताभसोबतचे कभी कभी, अमर अकबर अँथनी, नसीब… कर्ज, ये वादा रहा, प्रेमरोग, ये इश्क नहीं आसान, सरगम, जमाने को दिखाना है, बी. आर. चोप्राचा तवायफ…, त्यापाठोपाठ आलेला सागर, नगीना, एक चादर मैली सी… मर्यादित चौकटीतही दीदार-ए-यार, बदलते रिश्ते यासारखे केलेले सिनेमे. त्यानंतर मग चांदनी, खोज, बोल राधा बोल, दामिनी, दिवाना…, एकटा असो किंवा आणखी कोणाबरोबर, डिंपल असो किंवा दिव्या भारती, त्याच्या प्रामाणिक अभिनयात फरक पडला नाही, म्हणूनच कदाचित अजूनही मनात रुतून राहिला असावा.

कारकिर्दीच्या सेकंड इनिंगमध्ये लक बाय चान्स, फना, दिल्ली ६, दो दुनी चार, लव्ह आज कल, अग्निपथ, डी-डे, कपूर अँड सन्स… ही केवळ यादी म्हणून नाही, तर या निमित्ताने ऋषी कपूर किती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका अगदी सहजपणे करुन गेलाय, हे आठवण्याचा प्रयत्न… साठी पार केल्यानंतरही त्याचा ‘बॉबी’तला गोंडस चेहरा आजही कायम होता. हा गोंडसपणा टिकवून ठेवणं किंवा टिकून राहणं कठीण असतं फार. त्याच गोंडस चेहऱ्यानं तो गेला हे एकच समाधान.. हे गोंडस स्वप्न यानंतर खरोखरच स्वप्नात उरेल याचं वाईट वाटतंय…

श्रद्धांजली…


लेखक प्रथितयश नाट्यकर्मी आणि मराठी सिनेक्षेत्राचे अभ्यासक आहेत

First Published on: April 30, 2020 10:32 PM
Exit mobile version