अमेरिकेच्या निवडणुकीवर भारतीय मोहोर

अमेरिकेच्या निवडणुकीवर भारतीय मोहोर

अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

जगाचे डोेळे लागलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडून त्याचे निकाल जाहीर झाले. डोनाल्ड ट्रम आणि जो बायडेन यांच्यात सुरशीचा सामना सुरू असताना अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याविषयी लोकांच्या मनात कुतूहल होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांचे वय जास्त असल्याने जनता त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या आणि नेहमीच खाओ, पिओ, मजा करो, अशी अमेरिकी संस्कृतीला शोभणारी भाषा आणि बॉडी लँग्वेज असलेले डोनाल्ड ट्रम यांनाच विजयी करेल, असे अनेकांना वाटत होते. पण अमेरिकी नागरिकांनी आपली पसंती जो बायडेन यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

मी हरलो तर देश सोडेन, अशा वल्गना करणारे डोनाल्ड ट्रम्प आता कुठल्या बेटावर राहायला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हा एक खुशालचेंडू माणूस आहे. त्यांनी चार वर्षांपूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना काय घोषणा केल्या होत्या, त्या अचाट आणि अफाट घोषणावर अमेरिकी नागरिकांनी कसा विश्वास ठेवला, त्यांना कसे निवडून दिले आणि मागील चार वर्षे कशी पार पडली, हा एक राजकीय विश्लेषकांच्याही डोक्यावरून जाणारा घटनाक्रम आहे. शेवटी अमेरिकी नागरिकांच्याही लक्षात आले की, आपण भावनेच्या भरात काही तरी भलतेच करून बसलो आहोत आणि अख्ख्या जगात अमेरिकेचे हसे करून घेणारा आणि कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसलेला राष्ट्राध्यक्ष निवडून दिला. पण ती चूक त्यांनी यावेळी दुरुस्त केली आणि अगदी वयोवृद्ध असले तरी जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिले.

अमेरिकेच्या स्थापनेपासून रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक हेच दोन प्रमुख पक्ष तिथे आहेत. त्या व्यतिरिक्त काही लोकांनी नवे पक्ष काढण्याचा तुरळक प्रयत्न केला, पण त्यात त्यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे त्या देशात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या पक्षांमध्ये चुरशीची लढत होत असते. पण कुठल्याही पक्षाचा राष्ट्राध्यक्ष निवडून आला तरी अमेरिका आणि त्यांचा राष्ट्राध्यक्ष यांचे एक धोरण ठरलेले असते, त्यात कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे जसे म्हणतात, अंधारात सगळी मांजरे काळी, तसे अमेरिकेत कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही वर्णाचा राष्ट्राध्यक्ष निवडून आला तरी जगातील लोकांच्या जीवनात काही फरक पडत नाही. कारण त्याच्यासाठी अमेरिकेचे हित आणि अमेरिकेचा जगात सुपर पॉवर म्हणून इतर देशांवर वरचष्मा कायम ठेवणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट असते. अमेरिका हा जगातला बडा भाई आहे. त्यामुळे आपले ते स्टेटस कायम ठेवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अमेरिका हा देश कितीही उच्च संस्कृती आणि सोज्वळपणा जगाला दाखवत असला तरी जगात कुठे तरी युद्ध सुरू राहील आणि तेही आपल्या नाही, तर दुसर्‍याच्या भूमीवर सुरू राहील, याची सोय अमेरिकी राज्यकर्ते करत असतात. भारत आणि चीन ही आशिया खंडातील दोन मोठी राष्ट्रे आहेत. त्यांची लोकसंख्या जगात पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाची आहे.

हे दोन्ही देश म्हणजे मोठ्या बाजारपेठा आहेत. त्यांचे संबंध सुधारले आणि त्यांच्यातील आपापसातील व्यापार वाढला तर आपला माल कुठे आणि युद्धसामुग्री कुठे खपणार याची चिंता अमेरिकेला असते, त्यामुळे भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कसे बिघडलेले राहतील, याची व्यवस्था अप्रत्यक्षपणे अमेरिका करत असते. भारताच्या सीमेपलीकडे चीन किंवा पाकिस्तानच्या हद्दीत काय चालले आहे, याची चिंता अमेरिकेला जास्त असते. त्यामुळेच नुकतेच अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांनी चीनने भारताला लागून असलेल्या सीमेपलीकडे ५० हजार सैन्य तैनात केल्याची बातमी दिली होती. हे फक्त भारताबाबतच नाही, तर जगातील विविध देशांबाबत अमेरिकेचे उपद्व्याप सुरूच असतात. कारण त्यात त्यांचे मोेठे शस्त्रकारण आणि अर्थकारण दडलेले असते. त्या अर्थकारणावरच अमेरिकेचे सुपरपॉवर पद टिकून आहे.

चीनला अमेरिकेला मागे टाकून पुढे जायचे आहे, त्या दिशेने त्यांच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे ते अमेरिकेला मानत नाहीत. त्यात पुन्हा त्यांच्या देशात कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे देशाच्या आत काय चालले आहे, ते बाहेरच्या जगाला कळत नाही. कोरोना विषाणूचा चीनमध्ये उगम होऊन जगभरात झालेला उद्रेक आणि जगातील माणसांना आणि देशांच्या अर्थव्यवस्थांना बसलेला फटका याचा अख्ख जग भयंकर अनुभव घेत आहे. अमेरिकेकडून जास्त शस्त्रखेरदी भारतच करत असतो, त्यामुळे ती त्यांची मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या मनात नेहमी असुरक्षिततेची भावना टिकून राहील, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून ते पाकिस्तानला फुकट शस्त्रसामुग्री आणि अर्थसहाय्य देत असतात. कारण पाकिस्तानला फुकट दिले की, आपल्या सुरक्षेसाठी भारताला शस्त्रखरेदी करावी लागते, ती मोठ्या किमतीला भारताला विकली जातात.

अमेरिका आणि त्यांचे जागतिक राजकारण हा एक मोठा विषय असला तरी ही राष्ट्राध्यक्षीय निवडणूक एका विशेष अर्थाने लक्षणीय ठरत आहे. त्याचा भारतीय समाजमनावर मोठा प्रभाव पडत आहे. भारतीय वंशाच्या ३५ अमेरिकी नागरिकांनी यावेळी या निवडणुकीत भाग घेऊन ती विविध पातळ्यांवर लढवली आहे. त्यात काही रिपब्लिकन तर काहींनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. त्यात अर्धे पराभूत झाले तर अर्धे विजयी झाले आहेत. कमला हॅरिस ही भारतीय वंशांची महिला अमेरिकेची पहिली उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अनेक भारतीय उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेत जात असतात. आता अमेरिकेत भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिक बनलेल्या या भारतीय वंशाच्या मतदारांची अमेरिकेतील निवडणुकीतील उमेदवारांना दखल घ्यावीच लागते, मग तो रिपब्लिक पार्टीचा उमेदवार असो नाही तर डेमोक्रॅटिक पार्टीचा असो. बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते.

ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे असलेले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांना पुन्हा निवडून यायचे होते, त्यासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अमेरिकेतील भारतीयांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय हे आता तिथल्या निवडणुकीवर केवळ प्रभाव टाकणारे मतदार राहिलेले नाहीत, तर यातील बरेच जण आता तेथील निवडणुका लढवू लागले आहेत. मराठमोळे श्री ठाणेदार नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यपातळीवर निवडून आले आहेत. त्यात एक दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चीनची संख्या मोठी असली आणि अमेरिकेत चिनी लोकांची संख्यादेखील लक्षणीय असली तरी त्यांच्यापैकी कुणी अमेरिकेतील निवडणुका लढवताना दिसले नाहीत. त्यामुळे अमेरिकेत प्रत्यक्ष राजकारणात शिरून भारतीयांनी चिन्यांवर सरशी मिळवलेली आहे हे विशेष.

कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या आणि नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची धोरणे हे पाकिस्तानला पूरक ठरणारी असल्याचे मानले जाते. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याला विरोध केला, एनआरसी, सीएएला विरोध केला. पाकिस्तानच्या पथ्यावर पडणार्‍या गोष्टींना त्यांचा पाठिंबा आहे. पण या दोघांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. त्यांचे पुर्वसुरी असलेले डेमोक्रॅटिक पार्टीचे बराक ओबामा यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या समारोपाच्या भाषणात पाकिस्तान हा अतिरेक्यांचा अड्डा झालेला आहे, असे विधान केलेले होते. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त करून अमेरिकेचे नाक कापणारा ओसामा बीन लादेन हा पाकिस्तानमध्येच लपलेला होता. अमेरिकेच्या कमांडोनी तिथे शिरून त्याचा खात्मा केला. पाकिस्तानचे समर्थन आणि त्यांना साथ देताना कमला हॅरिस आणि बायडेन यांंना ही घटना लक्षात ठेवावी लागेल, नाही तर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अशी त्यांची परिस्थिती होईल आणि अमेरिकेलाच ते जड जाईल.

First Published on: November 9, 2020 6:28 PM
Exit mobile version