मनाचं ‘खोल खोल पाणी’ शोधत जाणारा नाटककार

मनाचं ‘खोल खोल पाणी’ शोधत जाणारा नाटककार

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरी यांच्या मोठ्या प्रवासाला निघून जाण्यानं मनाचं ‘खोल खोल पाणी’ शोधणाऱ्या नाटककाराला आज मराठीजन मुकला आहे. ३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालनाट्य आणि ३ कादंबऱ्या असे ९० पेक्षा अधिक कलाकृती तुम्हा आम्हाला देऊन आपल्या सर्वांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या या सारस्वताची महाराष्ट्राला खरी ओळख आहे ती प्रतिभावंत नाटककार म्हणूनच… महाविद्यालयीन जीवनातील नाटकांची आवड मतकरी यांना आयुष्यभर पुरली. युवा वयात हाताला नाट्यलेखनाची लागलेली सवय इतकी खोल खोल होत गेली की त्यांनी मग मानवी अंतरंग ढवळून काढले.

आकाशवाणीवरून ‘वेडी माणसे’ ही पहिली श्रुतिका करणाऱ्या मतकरींनी वाऱ्यावरचा मुशाफीर, वर्तुळाचे दुसरे टोक, बिऱ्हाड बाजल, आरण्यक, समोरच्या घरात, लोककथा, दुभंग, माझं काय चुकलं, खोल खोल पाणी, सत्तांध, घर तिघांचं हवं, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे अशी एकापेक्षा एक सरस नाटके दिली. मानवी मनाच्या मुळाशी जात गुढतेच्या अंधाऱ्या गुहेत त्याला शोधत राहणारी त्यांची प्रयोगशीलता अफलातून होती. लेखनाचे विविध प्रकार समर्थपणे हाताळत असताना त्यांच्या गूढकथांनी वाचकांना एका वेगळ्या कलाकृतीचा मेंदू आणि मन ढवळून काढणारा अनुभव दिला.

दीडशेपेक्षा अधिक गूढकथा लिहिणाऱ्या मतकरींचे हे वैशिष्टय त्यांच्या नाटकांवर प्रभाव पाडणारे होते. म्हणूनच त्यांच्या नाटकांमधील पात्रांनी नेहमीच भारावून टाकले. ते एक प्रकारचे संमोहन होते. मनाची पकड घेणारी प्रयोगशीलता आणि कथानकाची विविधता यामुळे गेली अनेक वर्षे मराठी नाट्यप्रेमी माणसाला त्यांच्या नाटकांची कायम ओढ लागलेली असायची… त्यांनी आपल्या जाळ या कादंबरीवरून ‘माझं काय चुकलं’ हे नाटक लिहिलं आणि ते गाजलं. ‘लोककथा ७८’ या दलितांवरील नाटकाचे देशभर प्रयोग झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे ‘चार दिवस प्रेमाचे’ हा त्यांच्या नाट्यशैलीचा निखळ आनंद देणारा अनुभव खूप विशेष होता. या नाटकाचे हजाराच्या वर प्रयोग झाले.

मतकरींची बालनाट्ये हा एक वेगळा आगळा अनुभव आहे. सध्या गाजत असलेली ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा शिम्मा राक्षस’ ही बालनाट्ये तर मुलांबरोबर मोठ्या माणसांनाही पुन्हा पुन्हा नाट्यगृहांकडे नेणारी ठरली आहेत. गेल्या काही वर्षे आणि महिन्यांमध्ये नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावून या नाटकांनी बालनाट्ये पुन्हा रुजवण्याचे मोठे काम केले आहे. हेच मतकरी यांच्या जीवनाचे ध्येय होते. नाटकांची आवड छोट्या वयापासून मुलांमध्ये लागल्यास त्यांच्या जाणीवा समृद्ध होतील. यासाठी त्यांनी चाळी, झोपडपट्टीतील मुलांमध्ये नाट्य चळवळ रुजवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांना आशा होती की यामधून चांगले लेखक, नाटककार आणि अभिनेते आकाराला येतील… मुख्य म्हणजे ही मुले माणूस म्हणून घडतील. सतत प्रयोगशीलतेचा ध्यास जपल्यामुळेच गेल्या सहा दशकांमध्ये त्यांच्या हातून नाट्य आणि साहित्य क्षेत्रात खूप मोठे काम झाले.

समाजवादी विचारांचा रथ पुढे नेणाऱ्या मतकरींचे ‘आपलं महानगर’ वर विशेष प्रेम होते. माहीमच्या कार्यालयात ते नेहमी येत. सर्व पत्रकारांशी आपुलकीने गप्पा मारत. महानगरमध्ये आल्यावर त्यांना आपली माणसे भेटल्याचा आनंद होई. साधी राहणी, जीवन मूल्यांवर असलेली मोठी निष्ठा आणि समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात सतत दिसली. तीच त्यांच्या साहित्यकृतींमधून दिसली. त्यांचा हा वारसा त्यांचा मुलगा लेखक, समीक्षक गणेश मतकरी आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद पुढे नेत आहेत… आपलं महानगर परिवारातर्फे रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण आदरांजली!

First Published on: May 18, 2020 11:40 AM
Exit mobile version