राणेंच्या चुकांवर चुका… म्हणूनच वेट अ‍ॅण्ड वॉच

राणेंच्या चुकांवर चुका… म्हणूनच वेट अ‍ॅण्ड वॉच

कोकणी माणूस देवभोळा असतो. चांगल्या कार्याची सुरुवात करताना तो दहा वेळा विचार करतो. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात शुभ कार्य करत नाहीत, असा समज आहे. त्यामुळेच गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात शिवसेना-भाजपची युती असो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असो, मनसेच्या विधानसभा निवडणुकीचे राज असो वा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश असो, यापैकी कशालाही मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे चारही फ्रंटवर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ सुरू आहे, असेच म्हणावे लागेल.

येत्या रविवारी घटस्थापना असून, त्या दिवसापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती होणार की नाही याची काळजी आणि सस्पेन्सवर जशी शिवसेना-भाजपच्या संभाव्य उमेदवारांचे लक्ष आहे, त्याहूनही युतीची अधिक काळजी सध्या एकाच राजकारण्याला लागली आहे, ते म्हणजे माजी मुख्यमंत्री, विद्यमान भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांना. कारण आतापर्यंत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या किमान अर्धा डझन तारखा जाहीर झाल्या; पण प्रत्येकवेळी काही ना काही कारण पुढे करत राणेंचा भाजप प्रवेश टळलेला आहे. त्यांच्या भाजप प्रवेश आणि स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाला अजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने राणे आणि त्यांची दोन्ही मुले नितेश आणि निलेश अद्यापही रेड झोन मध्येच आहेत.

राणेंच्या राजकारणातील फ्लॅशबॅक बघितला तर एवढा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ राणेंनी कधीच बघितला नाही. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर आठवड्याभरातच त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला. त्यानंतर 10 वर्षे मिळालेले मंत्रीपद बघता ते राज्याच्या सत्ताकेंद्रातील चार दशके केंद्रबिंदूच राहिले होते. हे सगळे 2014 पर्यंत. पण कुडाळ, मालवण मतदारसंघात राणेंना शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी धोबीपछाड दिल्यानंतर राणेंचे कोकणातील वर्चस्वाला काळी किनार लागत गेली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेशचा झालेला पराभव आणि त्यानंतर स्वत:च्या पराभवाने राणेंच्या कोकणातील साम्राज्य हळूहळू कमी होऊ लागले. वांद्य्रातील पोटनिवडणूक राणे काँग्रेसमधून लढले. मात्र ती निवडणूक हरल्याने काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर घेतले. त्यादरम्यान, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे बिनसल्याने त्यांनी काँग्रेसचा हात सोडून पुढील राजकीय वाटचाल 2017 मधील सप्टेंबर महिन्यातच जाहीर केली. त्यानुसार राणे यांनी मुलगा नितेश आणि निलेश राणे यांनी वाढवलेल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होत स्वाभिमानी पक्षाची मुहूर्तमेढ राज्याच्या कानाकोपर्‍यात रोवण्याचे ठरवले. मात्र सहा महिन्यातच पुन्हा राणे यांनी स्वाभिमान पक्षाला वार्‍यावर सोडत भाजपच्या कोट्यातून मार्च 2018 मध्ये खासदारकी मिळवली आणि ते राज्यसभेवर गेले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात प्रवेश करायचा होता. मात्र त्यांना कॅबिनेटमध्ये घेतल्यास शिवसेनेशी उगाच पंगा कशाला अशी माहिती फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला देत राणेंचा कॅबिनेट प्रवेश लांबवला. राणे यांना शिताफीने थांबवत कायम ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’वरच बोळवण करण्यात भाजपचे चाणक्य आतापर्यंत तरी यशस्वी झालेले दिसतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी घटस्थापनेच्या सुमारास स्वाभिमान पक्षाची घोषणा करणारे राणे आता पुन्हा घटस्थापनेलाच आपला पक्ष भाजपत विलीन करण्यासाठी उतावीळ झालेले आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असतानाच ‘नारायण राणेसाहेबांबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ’,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. राणेंचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळे जागावाटपासोबत राणेंचा प्रवेशही डेडलॉक असल्याचे जाणवते. एवढेच नाही तर कोकणातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील राणेंना पक्षात घेऊ नका, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. सुरुवातीला 1 सप्टेंबरला सोलापुरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा प्रवेश केला जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र चार आठवडे उलटल्यानंतरही राणेंचा भाजप प्रवेश झालेला नाही, ही वस्तुस्थिती राणे समर्थकांना पचत आणि पटत नाही.

भाजपचे नेते आणि कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संदेश पारकर यांनी नारायण राणे हे आता राज्यस्तरीय नेते राहिले नसून ते आता कणकवली पुरतेच मर्यादित असल्याची टीका केली आहे. राणे हे स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे पारकर सांगत आहेत. त्यांच्या येण्याने भाजपचा कोणताही फायदा होणार नाही तर राणे यांचाच वैयक्तिक फायदा होणार आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला, भाजप कार्यकर्ते कडाडून विरोध करीत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये घेणार नाहीत, असे संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्याना सांगितले आहे.

याआधीही राणे यांना भाजपने बराच काळ वेटिंगवरच ठेवले होते. नंतर ते भाजपच्या मदतीने खासदारही झाले. मात्र ते दिल्लीत फार काही रमले नाहीत. त्यांचे कायम लक्ष महाराष्ट्रातच राहिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदापासून दूरच ठेवलेले आहे. नारायण राणे यांनी मुळात शिवसेना सोडायलाच नको होती; पण त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मोठी चूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राणे यांना गेल्या महिन्यात खडे बोल सुनावले होते. निमित्त होते राणे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. दिल्लीत गेलो तरी मनाने महाराष्ट्रातच आहे आणि अजूनही राज्यात भरपूर काम करायचे आहे, असे सांगत राणे यांनी दिल्लीत खूश नसल्याची कबुली कार्यक्रमात दिली होती.

तळकोकणातील छोट्या गावात जन्मलेला, चेंबूरमधील गिरणी कामगाराचा मुलगा, घराण्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्याचा मुख्यमंत्री होतो ही उल्लेखनीय बाब असल्याने समस्त कोकणवासियांसह राज्यातील जनतेला राणेंचा अभिमान होता. शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री केले; पण शिवसेना सोडण्याचा निर्णय चुकीचाच होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही चूक की घोडचूक होती हे राणे यांनीच ठरवावे, असेही पवार म्हणाले होते.

काँग्रेसमध्ये कधीच आश्वासनाची लगेचच पूर्तता केली जात नाही. ताटकळत ठेवले जाते. यातून पुढे जायचे असते. उभे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविल्याने आम्ही हे शिकलो. राणे यांना बहुतेक काँग्रेसच्या राजकारणाचा अनुभव आला नसावा, अशी टिप्पणीही पवार यांनी त्यावेळी केली होती. मात्र राणेंना भाजप प्रवेशासाठी एवढा काळ वाट पाहायला लावते, यावरून राणेंसारखा नेता कुठल्याही पक्षात नको असा विचार काँग्रेसप्रमाणे भाजपही का करीत आहे, हे राणे यांनी लक्षात घ्यावे. 2005 मध्ये शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला आव्हान दिल्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली. नंतर शिवसेनेतील डझनभर आमदारांना फोडत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. कॅबिनेट मंत्रीपद मिळवले. असा प्रवास सुरू असताना राणेंनी थेट हायकमांडला आव्हान दिले. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपत येताना या सर्व गोष्टी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी कानावर घातल्याच असणार. त्यामुळे राणे यांचा प्रवेश सुरुवातीला रोखून ठेवणार्‍या फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला कोकणासह राज्यात अंगावर घ्यायला राणेंची गरज आहे, असे सांगितल्यानेच राणेंचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. मात्र आयत्यावेळी शिवसेनेबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याने जागावाटपात राणेंच्या प्रवेशाने मिठाचा खडा नको यासाठीच राणेंना मुख्यमंत्र्यांनी अजूनही लटकवत ठेवले आहे.

राणे आपला स्वाभिमान पक्ष, भाजपत विलीन करणार असून यावेळी तरी त्यांनी भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाला आव्हान देऊ नये अशीच धारणा समस्त कोकणवासीय आणि राणे समर्थकांची असणार. कारण गेल्या 14 वर्षांत वारंवार राणेंकडून चुका झाल्या असल्याने यावेळी तरी त्यांच्याकडून चूक होऊ नये एवढीच अपेक्षा. कारण राणे वारंवार सांगतात की, मी आज जो काही आहे त्याचे सारे श्रेय शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. त्यामुळे राणेंनी यावेळी तरी असल्या चुका पुन्हा करू नयेत. कारण ते बाळासाहेबांना सुद्धा आवडले नसते. राणेंचे जेवढे प्रेम शिवसेनाप्रमुखांवर होतेे तेवढेच प्रेम बाळासाहेबांचेही राणेंवर होते.

First Published on: September 25, 2019 5:32 AM
Exit mobile version